Wednesday, March 24, 2010

’ट्युलिप्स’च्या देशातून

’ट्युलिप्स’च्या देशातून हे एक छोटेसे पुस्तक आहे,सव्वाशे-दीडशे पानांचे, अंजू व्हॉन वेर्श हिने लिहिलेले. ही गायिका/कवयित्री संजीवनी मराठे यांची मुलगी. कमर्शियल आर्टचा डिप्लोमा झाल्यावर ती फ्रेंच भाषेचा अभ्यास करत होती, तिचं एक छान मित्रमंडळ होतं. या मंडळींची ह्युब व्हॉन वेर्श या डच तरूणाशी ओळख झाली. त्याला अंजूशी परिचय करून घ्यावासा वाटला. महिनाभरात दोघांनी लग्न करायचं ठरवलं. वयाच्या एकविसाव्या वर्षी (७२ साली) अंजू लग्न करून हॉलंडला गेली. तिथून तिने आईवडीलांना पत्रे लिहिली. तिच्या लग्नाला वीस वर्षे झाली, त्यानिमित्त तिने पाठवलेल्या पत्रांचं (संपादित करून) संकलन म्हणजे हे पुस्तक आहे. हा इतका घरगुती मामला आहे.
कुणाकडे तरी सहज गेले होते, तेंव्हा हे पुस्तक जरा चाळलं, चार पाने वाचली, पुस्तक पूर्ण वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली, नंतर कधीतरी अन्य पुस्तके आणण्यासाठी दुकानात गेले होते तेंव्हा हे पुस्तक मी घेऊन आले. पुस्तक मला आवडलं, खरं म्हणजे अंजूच खूप आवडली. तिचं माझं सगळं जुळतं असं नाही, तिच्या एका पत्रात आहे, ’तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी सर्वतोपरी डच व्हायचा प्रयत्न करत आहे’ तिला ’मृण्मयी’ आवडली, तिच्यापर्यन्त पोचता येत नाही म्हणून खंत वाटते, मला तर ’मृण्मयी’ पटलीच नाही.( मजा म्हणजे नंतर तेरूओ खूप आवडल्याचं ती लिहिते.)

अंजू पत्रांमधे ह्युबविषयी लिहिते, मित्रांविषयी, मुलांविषयी, तिच्या सासरच्या लोकांविषयी लिहिते, ती ठिकठिकाणी सहलीला गेली त्या स्थळांची, तिथल्या शिल्पांची, चित्रांची वर्णने आहेत, शिवाय पुस्तकांविषयी, संगीताविषयी, चित्रपटांविषयी, निसर्गाविषयी लिहिते. महत्त्वाचं हे आहे की सगळं ती मनापासून लिहिते. स्वत:ला तपासत राहते, परीस्थिती स्वीकारते. त्या दोघांच सहजीवन खूप छान आहे.
सगळ्यात... मधे मधे ती असं मनातलं, खरं खरं काय काय लिहीते ना? ते मला फार आवडतं. सुरवातीच्या एका पत्रात ती लिहिते,
’मी रडले परवा रात्री. तुझा आवाजच आठवेना.’
ह्यापुढचंही छान आहे.
ह्युब म्हणाला,’मला आठवतोय ना, शिवाय घरी गेल्यावर टेप ऎकूच’
पुस्तक वाचताना आधी महिना-दोन महिन्यांच्या ओळखीवर लग्न करून परदेशी जाणार्‍या या मुलीची काळजी वाटते, पोटातून माया वाटते.
वरचा प्रसंग वाचल्यावर जरा बरं वाटलं, आहे की नवरा सोबत. आईचा आवाज आठवत नाहीये म्हणून येणारं रडू त्याला कळू शकलं. त्यावर तो ’मी आहे ना?’ असं म्हणालेला नाही. या क्षणी तो असून उपयोग नाही हे सुद्धा त्याला कळलं.
तिने घरात एक ’इंडिया कॉर्नर’ केला. आईने पाठवलेल्या कडूनिंबाच्या पानांपासून भारतातून आणलेलं/ पाठवलेलं सगळं तिने तिथे ठेवलं. इथे नवर्‍याशिवाय ओळखीचं कुणी नाही, ती लिहते ...पण ही ’जागा’ खोलीत आली आणि एक जवळचं माणूसच कायम इथे आलं असं वाटलं...
हॊणार्‍या बाळाबद्द्ल लिहीताना...एक दोन पांढरी झबली शिवून (स्वत:) पाठव. विकत घेऊ नकोस, कारण मग त्यांना तुमचा ’वास’ येणार नाही... अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी तिला महत्त्वाच्या वाटतात ना? त्या मला आवडल्या.
एकदा ती लिहीते...खूप गप्पा मारव्याशा वाटताहेत. या देशात राहून नवं काय शिकले? तर कोणत्याही कामाची लाज वाटू नये, हे. मुलामुलींत मोकळं पण सभ्य कसं वागावं, हे. घरात स्वच्छता राखावी, हे. सर्व माणसं समान भासली पाहिजेत. त्यांचा दर्जा आपल्याला श्रेष्ठ वाटतो तो का वाटतो? -डिग्रीसाठी, कसबासाठी, सहानुभूतीपूर्ण स्वभावासाठी, मानवी स्वभावज्ञानासाठी, चटकन दिसणार्‍या खुल्या दिलासाठी? ज्यांचा दर्जा कनिष्ठ वाटतो, तो का? कोतं, कोमेजलेलं बंद मन, अग्रेसिव्ह स्वभाव, बुद्धीचा जडपणा, वृत्तीचा खवट कुजकेपणा, फाजील महत्त्वाकांक्षा, हिंसक विचार, धडाधड वाटेल तशी स्टेटमेंट्स करण्याचा स्वभाव? एखादं माणूस का कशामुळे आवडतं किंवा नावडतं? म्हणजे नक्की काय घडतं? गीतेत सांगितल्याप्रमाणे चांगलं व वाईट ही दोन्ही परमेश्वराचीच रूपं आहेत हे कळतं पण वळतं का? असे कितीतरी विचार. त्यातले काहीच अजून पक्के झालेले नाहीत. पण बीजं रूजताहेत. ज्या नव्या गोष्टी शिकले असं सांगते आहे, त्या शिकत आहे. न संपणारी ही क्रिया निदान सुरू झाली आहे........अशी विचार करत बसते ना? म्हणूनही ती मला आवडते. ती लिहिते ते काही फार मोठं तत्त्वज्ञान नाही पण तिने ते अनुभवातून मिळवलं आहे.
आईची, भारताची तिला सारखी आठवण येत राहते. ती आठवणी काढते पण हळहळत बसत नाही. घरात कामे करताना, हे कळवू ते कळवू असं ती मनाशी म्हणत असते.
एकदा लिहिते....आत्ता फारा दिवसांनी शांत वाटतंय. ते जोपर्यन्त जाणवतंय तोपर्यन्त अनुभवून घ्यायचं. मग पाण्यावर तरंग उठतात तशी ती शांतता ढवळते, पण तो थोडका वेळ बरंच काही देऊन जातो, नाही का?
ह्युब किती चांगला आहे याबद्द्ल ती बरेचदा लिहीते...आम्हां दोघांची तार नेहमी जुळलेली असते. अधूनमधून बेसूर झाली तरी ती तशी राहत नाही. रोज रात्री दिवसभर धडपड केलेल्या शरीराने आणि अनेक तर्‍हेच्या गोष्टींनी भरलेल्या मनाने बिछान्यावर पडलो की एकमेंकांबद्दल इतकं प्रेम वाटतं, ममता वाटते. शनिवारी व रविवारी उशिरा {हे मला आवडलं} हळूहळू जागं होताना इतकं छान वाटतं. एकमेकांची उणीदुणी (ती असतातच) न पाहता क्रेडिटेबल गोष्टीच डोळ्यात भरतात.
...... मी कधी कधी त्याला म्हणते की ’तू ज्या तर्‍हेने काम करतोस, अभ्यास करतोस, जीवन जगतोस त्याचं मला फार कौतुक वाटतं, पण ते व्यक्त करायला पुरेसे शब्दच सापडत नाहीत.’ मग तो माझ्याकडे एका मस्त नजरेने बघतो. ’समजलं’ असं सांगते ती नजर. मजा आहे ना?....
.....ह्युबचा अभ्यास उत्तम चालू आहे. दर शनिवारी मात्र तो दिवसभर घरकाम-मुलं-स्वैपाक करतो व मी खोली बंद करून चित्रं काढते. ही एक फारच छान अरेंजमेंट आहे......(वा!!!!!)
... आमचे प्रश्न (विशेषत: personal) भिजत घोंगडं करून न ठेवता वेळीच त्यावर बोलून मनं मोकळी करणं आम्हांला जमतं...
तिला सासरघर पण खूप छान मिळालं. सासूबद्दल तर ती ’मला दुसरी आई मिळाली’ असं लिहिते.
विभी, टॉम आणि प्रेमा (दत्तक-कन्या) यांच्या वाढण्याबद्द्ल लिहिते. स्वत:च्या घरांबद्दल लिहिते.
.......आपण आघारकर बंगल्यात असताना अनुभवलेल्या कितीतरी लहान मोठ्या घटना मला आठवतात. दर पावसाळ्याच्या सुरवातीला गुलबक्षी फुलायची, फाटकापासल्या गवतांत बचनागाची इवली फुलं डोलायची, अंगणाच्या डाव्या बाजूला खूप आघाडा उगवे, गुलाबाचा वेल आणि फाटकावरचा जाईचा वेल, कडुनिंबाचा गंध - किती किती आठवणी. हादगा तर वेड लावणारा. आघाड्याच्या पानाखालची चंदेरी मखमल, आजीकरता अडुळशाची पिकली पानं पण आणायची असत. मोगर्‍याची फुलं हळुवार हुंगावीशी वाटत. गुलबक्षीच्या काळ्या बिया पण त्यांचं देखील नवल वाटायचं. तुला आठवतं का कोपर्‍यातल्या त्या निरूपद्रवी संत्र्याच्या झाडाला खरोखरच एकदा दोनतीन बारकी संत्री लागली होती. अदभूतच नव्हतं का ते?.... या सगळ्या अनुभवांचा व्यक्तीच्या घडणीत खूप वाटा असतो. आमच्या इथल्या country house मध्ये आमच्या मुलांनाही अशा नवलाच्या परी पाहायला मिळतात. शेळ्यामेंढ्या, पशुपक्षी, गवती पानंफुलं पाहत बागडावं - अगं ,एकदा तर मुलांच्या डोळ्यांदेखत भरदुपारी एका वासराचा जन्म झाला....!(खरं आहे! मी लहानपणी एका वासराचा जन्म पाहिला होता, तो माझ्या मनावर कोरला गेलाय.) अशा अनुभवांची लेणी त्यांच्या बालमनावर चढतात..... त्यांचं निसर्गप्रेम फुलतं ठेवतात...
ती असं साधं, सरळ लिहित जाते. सोपं नसतं ते! अर्थात ही खरीखुरी पत्रे आहेत, त्यामुळे नात्यातला ओलावा दिसत राहतो. कधी कधी ती तटस्थपणे लिहीते.
.....आपण दूर अंतरावरून एकमेकांना भेटतो. नेमक्या सुखद भावना एकमेकांना पोचवतो. जवळीक असण्यामधून जे संघर्ष निर्माण होतात ते या परीस्थितीत निर्माण होत नाहीत. अर्थात जर आपला स्नेहसंबंध खर्‍या अर्थाने विकसीत होत असेल, तर त्यात मतभेदांनाही जागा असली पाहिजे आणि ते असूनही मैत्रीचं नातं फुलत राहिलं पाहिजे. नाहीतर तो संबंध एकांगी आणि पोकळ होतो. कुणाशी मतभेद होणं या गोष्टीलाही नात्यात स्थान असतं, याची जाणीव होत आहे.......
तिचं वाढत जाणं पत्रातून दिसत राहतं. हळूहळू ती तिथे रूळते मग संसारात रमत जाते. मग तपशील वाढायला लागतात, मनातलं खरं बोलणं कमी व्हायला लागतं. ( संसारात रमलो की आपण स्वत:पासून दूर जायला लागतो का?)

हे पुस्तक वाचाच अशी मी तुम्हांला शिफारस करणार नाही, चालणार आहे नाही वाचलं तरी. आपल्याला आवडणारी माणसं ग्रेट्च असतात असं नाही, महत्त्वाचं असतं ती आपली असतात. पुस्तकांचही तसंच आहे. शिवाय ग्रेट पुस्तके तर सगळ्यांचीच पण आपली पुस्तके (माणसेही) फक्त आपलीच!
हे पुस्तक म्हणजे काही राजप्रासाद नाही की बंगला नाही किंवा एखादी गगनचुंबी इमारत नाही तुमचं लक्ष वेधून घेईल अशी. हे एक साधं घर आहे, ओसरी असणारं, तुम्हांला या म्हणणारं. माझे या घराशी कसे धागे जुळले माहित नाही पण सवड झाली की मी तिथे जाऊन येते.