Tuesday, October 5, 2010

गोंदण

आमच्या वाड्यात सगळे मुलगेच होते. मी एकटी मुलगी. एकटी कशी? आक्का होती ना? मी बालवाडीत होते तेंव्हा ती सातवी-आठवीत असेल. ती काही सारखं आमच्याबरोबर खेळायची नाही. सगळ्या मुलग्यांपेक्षा ती मोठी होती. मुले तिचं ऎकायची. ती अबोल, कामसू, नीटनेटकी होती. अभ्यासात फारशी हुशार नसेल पण त्याचं कुणाला काही नव्हतं. एकूण मुलीनं कसं असावं याचा ती आदर्श होती. ती मोठ्यांमधेच मोडायची. मी मात्र मुलांबरोबर भरपूर दंगा करत असे. लपाछपी, विटीदांडू आणि चक्का फिरवणे हे आमचे आवडीचे खेळ होते. दिवस दिवस आम्ही ते खेळत असू. मुलांचेच खेळ खेळत असू असे नाही, एखाद्या खेळाची लाट येत असे, मग सगळे तोच खेळ खेळत, गोट्या तर गोट्याच, चिरकी (ठिक्कर) तर चिरकीच. चिरकी खेळायला कधीकधी आक्का आमच्यात येत असे. भराभर घरं बांधायची. तिचे लांबसडक पाय लयीत लंगडी घालत असत. तिची चिरकी हव्या त्या घरात पडत असे. बाकी गोट्या वगैरे खेळायला ती कधी आली नाही.
मी कशी होते? मी सारखी बडबड करत असायचे. त्यामुळे या काकूंचा निरोप त्या काकूंकडे पोचव अशी कामे माझ्याकडे असत. घरात ज्या गोष्टी फुटू नयेत अशी इच्छा असे, त्या कोणी माझ्यासमोर बोलत नसत. विश्वासला सगळं माहित असे, बाहेर काय बोलू नये हे त्याला कळतं असं मला ऎकून घ्यावं लागे. असाही तो दादागिरी करायचा. मी सतत नाचत असायचे. वेगवेगळ्या पद्धतीने चालायला मला खूप आवडायचं. आमच्या वाड्यात फरशा होत्या. कधी कडांवर पाय न देता मध्यभागीच पाय द्यायचा, कधी फक्त कडांवरून, एका फरशीवर एकच पाय किंवा तिरपं तिरपं चालायचं किंवा नागमोडी चालायचं. जिन्याच्या कठड्यावरून घसरत खाली येणं हा माझा आवडीचा खेळ होता, माझाच काय सगळ्या पोरांचाच! अर्ध्या जिन्यातून हौदाच्या पत्र्यावर उडी मारायची, त्या गंजलेल्या पत्र्यावरून मोरीच्या पत्र्यावर उडी मारायची पुढे गॅलरीचे वाकलेले गज धरून गॅलरीत चढून जायचं हे उद्योग, मोठ्यांचा डोळा चुकवून मी करायला लागले होते. लवकरच माझं लिंबूटिंबू असणं संपणार होतं. आक्काचा सगळ्यात धाकटा भाऊ कायम माझ्याबरोबर असायचा. तो माझ्यापुढे एक वर्ष होता, पण तो माझं सगळं ऎकायचा, खेळात आम्ही दोघेच लिंबूटिंबू असायचो. तिच्या लाडक्या भावाची खास मैत्रिण म्हणून त्यांच्या घरात माझी वट होती.
तिची ती सुखात माझी मी सुखात अशा होतो. पण मी दुसरीत गेल्यावर घरच्या दारच्या सगळ्यांनीच मी मुलगी असल्याचं माझ्यावर ठसवण्याचे प्रयोग सुरू केले. यापूर्वीच माझं बोलणं सुधारलेलं होतं, मी जे मुलांसारखं आलो, गेलो म्हणायचे ते व्यवस्थित आले, गेले म्हणायला लागले होते. माझं झग्याचा काठ, मागे बांधायचे पट्टे चघळणं मी थांबवलं होतं. इथून पुढे सगळ्यांनीच मला आवरून बसायला शिकवायचं मनावर घेतलं.क्वचित झग्याचा मागचा घेर डोक्यावर (पदरासारखा) घ्यायची मला सवय होती. आईनेच ती बंद पाडली. केव्हाही, कुठेही बसलं की झगा व्यवस्थित गुडघ्यांवरून घेतला पाहिजे, कुठेही बसताना आधी दोन्ही हातांनी झग्याचा मागचा घेर साफ करून घ्यायचा मग समोरचा घेर गुडघ्यांवरून घेऊन व्यवस्थित बंदोबस्त करून बसायचं. हे काही मला जमायचं नाही. मी कशीही बसत असे. मग समोरच्या व्यक्तीने ’आ’ करून उजवा हात तोंडावर घेतला की मी लगेच आवरून बसत असे. कधी कधी मी इतकी माझ्या धुंदीत असे की या खुणांकडे माझं लक्षच जायचं नाही, मला जवळ येऊन हलवून जागं केल्यावर मी व्यवस्थित बसत असे. सारखं माझ्यापुढे आक्काचं उदाहरण ठेवलं जायचं. ती बघ कशी बसते, ती बघ कशी चालते, ती बघ कशी आईला मदत करते. सगळ्यांनी सारखं हेच सांगीतल्यामुळे मी आक्काकडे लक्षपूर्वक बघायला लागले.
ती खूप व्यवस्थित होती. भाजी चिरण्यापासून, धान्य निवडण्यापर्यन्त ती आईच्या बरोबरीने कामे करीत असे. ती झटकून, टोकाला टोके जुळवून, साफ कपडे वाळत घालत असे. तिचे केस कुरूळे आणि आखूड होते. ती त्यांची एक छोटीशी वेणी घालत असे, तिच्या चेहर्‍याभोवती कुरूळ्या केसांची महिरप छान दिसे. एके दिवशी मी आईला म्हणाले की मी कपडे वाळत घालत जाईन, आईने मला छोटे कपडे दिले, दुसर्‍या दिवशी आई म्हणाली, ”काही नको मला मदत, हे काय? येतंच! थोडी कमी धडपडलीस, गुडघे फोडून घेतले नाहीस तर तीच मदत मला खूप होईल!"
चार वाजता आक्का छोट्या चरवीत पाणी घेऊन हात, तोंड धूत असे, ती सफाईने परकराचा घेर आवरून बसायची, चेहर्‍याला, डोळ्यांनाही साबण लावून मग थोडसं पाणी तोंडावर शिंपडत असे, नंतर खूप पाणी घेऊन चेहरा धूत असे. त्यानंतर हाताला कोपरापर्यन्त साबण लावून धुवायची, सगळं पाणी दोन बोटांनी निपटून काढायची, असं पाणी निपटून काढत असताना मला एकदम तिच्या हातावर एक हिरवी चांदणी दिसली. ” आक्का, हे काय गं?” ” तारा आहे. गोंदलेला!” वा! कसला सुरेख दिसत होता तो! त्यांच्या गावच्या जत्रेत तिने लहानपणीच तो गोंदून घेतला होता. ” तुला नाही कुठे गोंदलेलं?” ” नाही” मला कुठेही गोंदलेलं नसावं? लगेच घरी येऊन मी आईच्या मागे लागले, ”मला गोंदवून घ्यायचंय.” भांडलेदेखील, आजपर्यन्त मला का गोंदलेलं नाही म्हणून. आई म्हणाली,”मेंदी काढण्याइतकं काही ते सोपं नाही. खूप दुखतं” आईने मला उडवूनच लावलं.
मी आक्कासारखी होण्याचा माझ्या परीने प्रयत्न करत होते. ते मला जमण्यातलं नव्हतंच. ती शेवया छान करायची, म्हणून मीही करायला शिकले आणि त्यात तरबेज झाले. आधी हात अगदी स्वच्छ धुऊन घ्यायचे, कोरडे करायचे. लोण्यासारखा मऊ कणकेचा गोळा हळुवार हातावर फिरवायचा, त्याची लांब दोरी बनवायची आणि ताटात ठेऊन द्यायची. त्यावर स्वच्छ ओला रूमाल झाकायचा. मग दुसर्‍या गोळ्यापासून एक दोरी बनवायची, वाटल्यास आणखी एक गोळा घ्यायचा. एकानंतर एक दोरी अशा तिन्ही दोर्‍या वळायला घ्यायच्या चार- पाच वेळेला त्या इकडून तिकडे वळल्या की बारीक तार पडत असे. त्यानंतर तिन्हींची टोकं बोटाला गुंडाळून त्या हातावर घ्यायच्या, हाताभोवती शेवया फिरवायला छान वाटे. एका एका तारेचा गार आणि नाजूक स्पर्श हाताला होत असे, त्या दोर्‍यांमधून पलीकडचं दृष्य मजेशीर दिसे. कोणीतरी शेवटची टोके जुळवून देई. दोन्ही हात शेवईसगट ताटात ठेवायचे वरून कोणी ओला रूमाल घाली. मिनिटभर हात तसे ठेवल्यावर रूमाल काढायचा आणि हात लांबवून शेवया ताणायच्या. वळून अर्धा मिलि. केलेला तारेचा व्यास आणखी कमी होत असे. त्यानंतर सुबक घडी करून त्या काठीवर वाळत घालायच्या. काय दिसायच्या त्या! मस्त!(पुढे चौथी-पाचवीत तर मी हातावर खूप छान घेते, अढी पडत नाही म्हणून वळणार्‍या बायका त्यांची वळून झालेली ताटे मला देत.)
एवढं एक शिकले मी तिच्यासारखं! मुलीचं एक तरी काम मला जमलं. एव्हाना मी तिच्यासारखं व्हायचं ठरवून टाकलेलं होतं. नाहीतरी विशूसारखं किंवा वाड्यातल्या इतर मुलांसारखं खोडकर आणि दाणगट मला व्हायचंच नव्हतं. काही खेळ मी सोडून देऊ शकत नव्हते, मुलांमधे खेळायला मजा यायची, हे ही खरंच. पण मोठी झाल्यावर मी ”मुलगी” च असणार होते ना! आता मला शाळेतली एक मैत्रिणही मिळाली होती. पण मला ते गोंदलेलं नव्हतं ना? त्याशिवाय माझ्या मुलगी असण्यावर शिक्कामोर्तब कसं होणार? आमच्या वाड्यातल्या सगळ्या बायकांना गोंदलेलं होतं, एवढंच काय! माझ्या आईला देखील कपाळावर एक ठिपका होता गोंदल्याचा! हे कमी म्हणून की काय माझ्या नव्या मैत्रिणीच्या हनुवटीवर गोंदलेलं. मीच एकटी बिच्चारी! अधून मधून आईच्या मागे लागून काही उपयोग होत नव्हता.
माझे केस लांब होते. आई रोज दोन वेण्या रिबीनी लावून वर बांधून द्यायची. रविवारी न्हायलं की मला केस मोकळे सोडायला मिळत. रिठ्याचा मस्त वास येत असे. केस पुसून आई एक बटवेणी घालून देत असे, बाकी सगळे केस मोकळे! मी डोके मागे करून ते किती लांब झाले आहेत, कुठपर्यन्त पोचताहेत हे पाहात असे. समोर वाकून ते जमिनीला टेकवत असे, हे सारं आईचा डोळा चुकवून. चार वाजता एकदा आईने वेण्या घालून दिल्या की पुन्हा पुढच्या रविवारपर्यन्त मला केसांशी खेळायला मिळत नसे. आमच्या वाड्यात नुकतेच लग्न झालेल्या दोन तीन काकू होत्या. त्यांना माझ्या केसांची वेणी घालून द्यायला फार आवडे. एखाद्या रविवारी त्यांच्यापैकी कुणाकडूनतरी मी वेगळ्या पद्धतीची वेणी घालून घ्यायची. एकदा केसांचे पेड घालताना मी पाहिलं तर काकूंच्या हातावर त्यांचं नाव गोंदलेलं! हिरव्या अक्षरात ’कमल’ पुढे छोटं कमळाचं फूल काढलेलं! मी ते पाहातच राहिले. काकू म्हणाल्या,” तुला नाही गोंदलेलं?” मी मान हलवली. (नुसते केस लांब असून काय उपयोग?) ” अगं देवाकडे जाशील तेंव्हा तो विचारेल ना? नांदून आलीस पण गोंदून नाही आलीस?” मला काही अर्थबोध झाला नाही. देव पृथ्वीवर काय काय केलं याच्या चौकशा करतो हे मला माहित होतं. पण नांदून म्हणजे काय? ” तू मोठी झालीस की तुझं लग्न करून देतील, तू नवर्‍याच्या घरी जाशील, त्याला म्हणायचं नांदायला गेलीस.” अच्छा! देवाकडे गेल्यावर मान खाली घालायची माझी इच्छा नव्हती. हे असलं कारण आईला पटणार नाही हे नक्कीच!
तरी घरी आल्यावर मी आईच्या मागे लागले. कितीही दुखलं, दोन दिवस शाळेत जाता आलं नाही, मला चालणार होतं. फार नाही पण एक चांदणी मला हातावर गोंदायचीच होती. मी सारखी आईच्या मागे मागे....बाबा म्हणाले,” काय पाहिजे?” ” मला हातावर गोंदायचंय” ” मग गोंदू या. काय बरं काढायचं?” ” मला चांदणी काढायचीयं” मग चांदणी कुठे काढायची हे मी आणि बाबांनी मिळून नक्की केलं. केव्हढी ते ही ठरवलं. आईने आमच्याकडे लक्षच दिलं नाही. तिच्या मते काही गोंदायबिंदायची गरज नव्हती. इतक्यात तर नकोच, मोठी झाल्यावर वाटलंच तर गोंदून घेईल. आता तिला काही कळत नाही. मी बाबांना म्हणाले, ”चला जाऊया.” ” कुठे?” ” कुठे काय? गोंदायला.” मजा म्हणजे कुठे गोंदून मिळतं हे बाबांना माहितच नव्हतं. मी ते विचारून ठेवलेलं होतं. शहागंजच्या बाजारात गोंदणारे लोक बसलेले असतात. बाबा म्हणाले,” ते सकाळी असतात, आता ते निघून गेले असतील.” ठीक आहे. पुढच्या रविवारी जावू या... माझ्या हातावर, माझा असा हिरवा तारा!...कायमचा!...माझी ओळख?..... तो आठवडा मी, चांदणी गोंदल्यावर हात कसा दिसेल, सगळ्यांना कसा दाखवीन, याची चित्रे रंगवण्यातच घालवला, पुढच्या रविवारी बाबांना जमलेच नाही. मी खट्टू झाले. त्यापुढच्या रविवारी सकाळीच आम्ही निघालो. जाताना माझा हात धरून आई म्हणाली,” खूप दुखेल हं. इंजेक्शन दुखतं त्यापेक्षा जास्त. फोड येतील, त्यात पाणी पण भरू शकतं. पुन्हा विचार कर.” मला सगळंच कबूल होतं. त्या हिरव्या चांदणीसाठी..... त्या तार्‍यासाठी मी काहीही करायला तयार होते.
शहागंजच्या बाजारात आम्ही सगळीकडे फिरून आलो, नेमके त्यादिवशी कोणी गोंदणारे आलेले नव्हते. आम्ही तसेच परतलो. येताना बाबा काय काय बोलत होते. मी गप्प. मी येताना दिसलेकीच आईने काय ते ओळखलं.
पुन्हाही काही काही घडत राहिलं आणि माझं गोंदायचं राहूनच गेलं.

नववी-दहावीत कधीतरी पैठणला सहल गेली होती, तेंव्हा तिथल्या जत्रेत मी पेटी घेऊन बसलेले, गोंदवून देणारे पाहिले. त्यांच्याभोवती आयाबाया बसल्या होत्या. हसर्‍या, उत्सुक .... मला पुन्हा त्या भूमिकेत शिरता आले नाही. मी गोंदवून घेतले नाही.