Saturday, December 26, 2009

सहप्रवासी

प्रवास ही मला फार आवडणारी गोष्ट आहे.
माणसाचं जडत्व जातं प्रवासात! कसं हलकं हलकं वाटतं!
गतीची आदिम ओढ असत असेल माणसात.
मानवाच्या प्रगतीतला महत्त्वाचा टप्पा चाकाचा शोध हा तर आहे!

स्वतःच्या खूप जवळ असतो माणूस प्रवासात!
मनातलं बोलायचं असेल तर काय करावं? प्रवासाला निघावं.
हवंहवसं ऎकायचं असेल तर काय करावं? प्रवासाला निघावं.
मनात गुंता झाला असेल तर काय करावं? प्रवासाला निघावं.
एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर काय करावं? प्रवासाला निघावं.
स्वतःला भेटलो नसू खूप दिवसात तर काय करावं? प्रवासाला निघावं.

कारने प्रवास म्हणजे एक कौटुंबिक संमेलन असतं.सगळ्यांनी मिळून गप्पा मारत जायचं. मनसोक्त गप्पा होतात. सगळे ऎकण्याच्या मनस्थितीत असतात. मुख्य म्हणजे कोणीही काहीही वाचू शकत नाही.कारप्रवासाचा हा एक महत्त्वाचा फायदा आहे.

हल्ली बसचे प्रवास फार कमी होतात, त्याचीही एक वेगळीच मजा असते. गर्दीतला एकांत! बसच्या प्रवासात वाटलं तर शेजार्‍याशी बोला, न वाटलं तर बाहेरची गंमत बघा. गर्दी असेल तर आकसून बसा, नसेल तर बसा खुशाल मांडी घालून. हवं तर झोपा सुद्धा!(आधी तिकिट काढा) वाटलं तर (च) विचार करा, नाहीतर अविचार करा, लांबचा प्रवास असेल तर ब आणि कविचार सुद्धा करून होईल.आपले विचार असे गतीबरोबर सोडून द्यायचे. धावोत बिचारे हवे तसे. डोळ्यांसमोरून चित्रे सरकत जातात, काही नोंदवून घ्यायचं नाही, कान असून ऎकायचं नाही. एकप्रकारे समाधीच की ती!
त्या धावत्या जगात आपला आपला एक विचारांचा ढग तयार होतो. बसमधल्या विचार करणार्‍या इतरांचेही आपापले ढग तयार होत असणार! वाटलंच तर त्यांच्या ढगात शिरण्याचा खेळ खेळा.

माझा शेजारी काय बरं विचार करत असेल? ती म्हातारी पुन्हा पुन्हा पैसे आणि तिकिट तपासून पाहतेय. काय बरं असेल तिच्या ढगात? कधी एकटी प्रवास करत नसेल म्हणून काळजीत? पैशांचे व्यवहार कधी केलेच नसतील, सगळं काय ते नवर्‍याच्या हातात असं असेल? की कधीतरी चुकून पाचशेची नोट शंभराची म्हणून गेली असेल? आणि तो कोपर्‍यातला माणूस सारखा दिसणार्‍या देवाला/देवळाला तीनतीनदा हात जोडतोय, ते का? याचा आत्मविश्वास कशाने गेला असेल? हा पुढच्या सीट्वरचा तरूण सारखी गाणी ऎकतोय, एका पायाने ताल धरलाय. ह्याचा ढग गुलाबी असणार! कोण बरं असेल ती?
एकदा मी आणि मुक्ता औरंगाबादहून येत होतो, गर्दी होती ,मुक्ता माझ्या मांडीवर बसली होती. मधल्या एका छोट्या गावाला एक पागोटेवाला म्हातारा चढला.पंच्याहत्तरच्या जवळपासचा असावा. पांढरे पागोटे,पांढरा नेहरू शर्ट, पांढरे धोतर. म्हणजे जाहिरातीतला पांढरा नव्हे, तर जरा मळकट पांढरा. ड्रायव्हरच्या मागच्या सीट्वर बसला होता ,आमच्या इथून दिसत होता . सावळा किंवा काळाच. सुरकुतलेला चेहरा, पण थकलेला नाही तर उत्साही. पायावर पाय टाकून एक हात गुडघ्यावर तर दुस-यानी समोरची दांडी धरलेली, दारातून बाहेर पाहात होता. मोठा छान म्हातारा होता. आयुष्यभर कष्टला असेल,हातापायांच्या शिरा तट्तट्लेल्या होत्या. रेखाचित्र काढायचा मोह व्हावा असा समोर बसला होता.याच्या एकाएका सुरकुतीने याला कायकाय शिकवलं असेल? घरातला मोठा हाच असेल आता. मुलं करतीसवरती झाली असतील तरी बापाला विचारत असतील. काय असेल बरं याच्या प्रसन्नतेचं रहस्य? याची म्हातारी कशी असेल? अजुनही म्हाता-यासाठी गरम भाकरी टाकत असेल का? ती सत्तरीची असेल, या वयात चुलीपाशी जात असेल का? नाहीतर म्हाता-याच्या सुना फार चांगल्या असतील. म्हाता-याची चांगली बडदास्त ठेवत असतील. गर्दी आहे म्हणून , जागा चांगली मिळाली नाही म्हणून मी वैतागले होते. म्हाता-याकडे पाहून मला छान वाटलं. माझा मूड परत आला. थोड्या वेळाने आम्हाला चांगली जागा मिळाली. मुक्ता शेजारी बसली. मीही जरा पाय ताणले. या जागेवरून म्हातारा स्पष्ट दिसत होता. एकदम माझं लक्ष त्याच्या पायांकडे गेलं. पायांची नखे रंगवलेली होती. जुन्या काळ्या पांढ-या फोटोला वरुन रंगवावं, तसं ते दिसत होतं.अगदीच विजोड. पण कोडं सुटलं होतं.

म्हाता-याची लाडकी धाकट्या लेकाची धाकटी मुलगी असेल, किंवा मोठ्या लेकाची नात असेल, पोरीलाही म्हातार्‍याचा लळा असेल.

नागपंचमीला मावशीने बांगड्या भरल्या असतील, मेंदी काढली असेल आणि एक नेलपेंट्ची रंगीत बाट्ली आणली असेल. रंगवलेली नखे बघून पोर हरखली असेल. कसा हात बदलून गेला हे पाहिले आणि आपल्या आज्याकडे गेली असेल, नखे रंगविण्यासाठी त्याच्या मागे लागली असेल, तिचा आग्रह मोडवेना म्हणुन म्हाता-याने आपला हात पुढे केला असेल, सुना पदराआड हसल्या असतील पण म्हातारा नातीच्या निरागस आनंदाकडे पाहात बसला असेल. दोन्ही हात झाल्यावर आपले पाय पुढे केले असतील.

पुढे एका फाट्यावर तो उतरून गेला. माझा प्रवास चांगला झाला.

महिन्यापूर्वी मी आणि सुहृद संगमनेरला चाललो होतो. साडेचार पाच वाजले असतील, जी बस समोर होती तिच्यात बसलो. जागा चांगली मिळाली. बसलो निवान्त. आमच्या पुढच्या सीटवर एक चौकोनी कुटुंब बसलं होतं.दोन मुली, धाकटी पाच वर्षांची असेल, मोठी सात. मोठी खिडकीशी धाकटी वडीलांच्या मांडीवर. बाजूच्या सीटवर एक आजोबा-आजी. त्यांच्यापुढे एक बाई. अगदी मागे दोन-तीन माणसे. गाडी तशी रिकामीच होती. पाच-दहा मिनिटे झाली, लोक हळूहळू वाढत होते. पण ड्रायव्हर काही येत नव्हता. माझ्या कर्णरेषेत बसलेल्या त्या बाईला मी विचारलं,’कितीची बस आहे ही!’ तिला माहित नव्हतं. मागे एक संगमनेर बस सुटताना दिसत होती.मी म्हणाले,’ ती संगमनेर गाडी निघतीये. तिच्याने जायला पाहिजे.’आजोबा म्हणाले,’ ही पण संगमनेरलाच जाते. जागा चांगली आहे. कशाला उठून त्या गाडीत जाताय? ही मुक्कामाला आलीय का? ही पण निघणारचं’ मी दहा मिनिटांसाठी बैग आणि छोट्या मुलाला घेवून या गाडीतून उतरून त्या गाडीत जावं हे त्यांना पटत नव्हतं. मीही निमूट त्यांचं ऎकलं.का कोण जाणे. ज्याला त्याला आपापलं ठरवू द्यावं हेच खरं तर योग्य पण कधीतरी ऎकावं की एक दुसर्‍याचं, काय हरकत आहे?
या गडबडीत समोरचं कुटूंब वेगळं झालं होतं. काय झालं त्यांच्यात कुणास ठाऊक? धाकटी आणि तिचे बाबा मागे बसायला गेले होते. बस सुटली.नाशिकफाटय़ाला तर गर्दी झाली. सुहृद आणि मी दोघच बसलो होतो तर शेजारी एक मावशीबाई आल्या. सुहृदला आवडलं नाही त्याला मांडीवर घेतलं. तो कुरकुरतच होता. या मुलांना काही सवयच नाही. समोरही एक लठ्ठ माणूस येवून बसला, पण तिने नवर्‍याला शेजारी बोलावले नाही. तोही बिचारा मागे आणखीच कुणालातरी शेजारी घेवून बसला होता.
मंचरला आमच्या दोघीचेही शेजारी बदलले. तो काही तिच्याशेजारी बसायला आला नाही. टूसीटरवर आरामात मावावे असे सडपातळ कुटूंब होते ते!
मला दुसरा काही विचार करता येत नव्हता. काय बिघडलयं यांच्यात? !

नारायणगावला बरीचशी बस रिकामी झाली. मी छान मांडी घातली. सुहृदला झोप येतच होती, तो झोपला. थंडी वाजत होती, त्याच्या अंगावर शाल घातली. बाहेर अंधार झाला होता. बस निघाली. बसमधलेही दिवे घालवले. माझ्या डोक्यात सारखी ही दोघचं. मला काही अंदाजच करता येत नव्हता. बस बदलायची या घोळात मी त्यांच्याकडे लक्षच दिले नव्हते. काहितरी धागा मिळाला असता. त्या दोघांनी भांडण सोडावे, असे मला वाटू लागले. माझ्या वाटण्याला काहीही अर्थ नव्हता. हे मलाही कळत होते. घरूनच भांडून निघाले होते का? सुरवातीला तसे वाटले नाही..तो जरा समंजस वाटत होता, म्हणजे एका पोरीला घेवून बसला होता म्हणून. ती का रूसली होती? तो का रूसवा काढत नव्हता? सात वर्षांची मुलगी म्हणजे आठ्तरी वर्षे लग्नाला झाली असतील. अजूनही जर का ही रूसू शकते तर दोघांचे नक्की ठिक चालले असणार! प्रवासातला दोघांचाच असू शकणारा वेळ हे का घालवताहेत.

बस धाब्यावर थांबली. संगमनेर इतकं जवळ आलेलं असताना अर्धातास धाब्यावर थांबायचं म्हणजे कंटाळा येतो. सगळे उठले. शेजारी आजींचा गुडघा दुखतो म्हणून आजोबा मागे बसायला गेले होते. आजी पाय पसरून बसल्या होत्या. आजोबांनी त्यांना उठायला मदत केली.दोघे उतरले.तो आणि धाकटी निघाले. धाकटी म्हणाली,’ मम्मी, चल ना गं’ ती गेली नाही. मोठीला पाठवून दिलं. मोठी परत वर आली,’ मम्मी, पप्पा बोलवताहेत’ ’मला भूक नाही, तुम्ही जा.’ मोठी जावून परत वर आली,’पप्पा म्हणतेत नुसतं चल’ ’माझं डोकं दुखतयं’ ती सीट्वर आडवी झाली. माझ्याकडे घड्याळ नव्हतं, मोबाईल नाही, वेळेचा अंदाज येत नव्हता. मी समोर डोकावले, समजा हातात घड्याळ असेल सहज वेळ दिसली तर पाहावी म्हणून. घड्याळ नव्हते, चांगलीच चिडली असावी. ..... बाहेरून खिडकीवर धप..धप... थंडीमुळे सगळ्या खिड्क्या बंद होत्या.....धपधप...धपधपधप ....ती उठली, माझ्याकडे पाहिलं, खिडकी काढायचा प्रयत्न करू लागली, निघेना. तो म्हणाला,’चल गं’

..................चारी दरवाजे उघडा ग बाई
                  झिप्र्या कुत्र्याला बांधा ग बाई.......................

ती उभी राहिली. साडी जरा नीट केली. मला हसू आवरेना. तिने माझ्याकडे पाहिलं.तिलाही हसू आवरेना. दोघींनाही कळलंच काय झालं ते! म्हणाली,’ गाडीत एकट्याच थांबणार का?’ ’ हो. काय करणार?हा झोपलाय ना!’ ’सामानाकडे लक्ष ठेवा.’ ’हो.’

मला खूप बरं वाटलं. चला आता काळजी नाही.

हळूहळू लोक येऊ लागले. बटाटेवड्याचे, सांबाराचे, पानमसाल्याचे वासच जणू गाडीत चढत होते. त्या वासांनी गाडी भरून गेली. सगळ्यात शेवटी गाडी निघता निघता आपले हसरे चौकोनी कुटूंब चढले. पुन्हा दोघे माझ्या पुढे, दोघे मागे. .............. ती मागे वळून म्हणाली,’अहो, या इथे.’ आता तिला माझी पर्वा नव्हती. तिने माझ्याकडे लक्षसुद्धा दिले नाही. तो म्हणाला,’असू दे.’ ’अहो, या.’ अहो उठून पुढे गेले.

गाडीने वेग घेतला. टू सीटरवर ते कुटूंब आरामात बसले होते, पहिल्यासारखेच. फक्त आता तिची मान त्याच्या खांद्यावर कललेली होती......

(थोड्याच वेळात संगमनेर आलं. मी सुहृदला कडेवर घेऊन उतरले. त्या दोघांची ती कहाणी तशीच पुढे गेली.)

..............मनभावन के घर जाये गोरी.....

Friday, December 4, 2009

देणगी

खूप दिवस झाले गडावर गेलो नव्हतो.या रविवारी मावळे कुठल्या गडावर जाणार आहेत याचा तपास केला. वैराटगडावर जाणार होते. वाईजवळ आहे. Internet वरून माहिती घेतली. अगदी सोपा, तासाभरात पोराबाळांसह चढता येईल असा. ठरवले, जाऊया.

मिलिन्दची फारशी इच्छा नव्हती, दीपाला यायचे नव्हते, अश्विनीसुद्धा जाणार नव्हती. तरी सगळे तयार झाले. साडेपाचला निघायचे, मधे चहा पिऊन साडेआठपर्यन्त पायथ्याशी, साडेनऊला गडावर, अर्धातास थांबून निघायचे, अकराला पायथ्याशी. मुख्य कार्यक्रम वाईत बंडू गोरेंच्या खानावळीत जेवण. बाराला तिथून निघालो की दोन फारतर अडीचपर्यन्त घरी. मग मस्तपैकी रविवार दुपारची झोप.

असा मस्त कार्यक्रम ठरला.

ठरल्याप्रमाणे निघालो. पायथ्याशी नऊला पोहोचलो. सगळे नेहमीप्रमाणे उत्साहात होते. छोटासा गड दिसत होता. आत्ता चढून येवू. मजा करत, एकमेकांची खेचत निघालो होतो. कौस्तुभला बंडू गोरेची आमटी फारच आवडल्यामुळे यावेळेस दीपाला ती खाऊन बघायची होती. टारगेट दीपा होती.

फोटोग्राफर्स फोटो काढत होते. उद्या-परवा ते पाहून आम्ही अहाहा!! वा! म्हणणार होतो. सचिन म्हणाला,’ इथे अगदी गवतासारखा किडा आहे. येऊन बघ.’       ’ असूदे, फोटोत पाहीन."

थोडंसं चढलो आणि वाट सापडेना.

चढलो ते अवघडच होते. दीपाला वाटले इथूनच परतावे. मुक्‍ताचीही तयारी होती. पण वाट सापडली आणि निघालो. पुढे दोन मुले भेटली , ती म्हणाली वाट दाखवतो. हे इथेच आहे पंधरा मिनिटांवर. ती जगदीशपेक्षा पोचलेली होती, कारण पुढे आम्हांला दीड तास लागला. वाट अवघड होती. बाजूच्या झाडांनी ओरखडे निघत होते. जगदीशला शिव्या घालायला सुरवात झाली होती. थोड्या शिव्यांची हकदार मीही होते.

खाली गावात लग्न होते. त्याचा लाऊडस्पीकरवरून आवाज येत होता. लग्न लागले, त्याचं संगीत पार्श्वभूमीला ...मुक्‍ता म्हणाली,’आपली बिकट वाट सुरू होतेय म्हणून हे म्युझिक लागलयं.’ मिलिन्द म्हणाला,’ नाही अगं, तिकडे कोणीतरी बिकट वाटेला लागलाय त्याच्यासाठी म्युझिक आहे हे!.’ एकूण तरीही मजेत. वाट दाखवणार्‍या मुलाकडे कुर्‍हाड होती. ती कशाला? तर दुपारच्या वेळी वर रानडुक्करे येतात . मग रानदुक्करांचं जेवण वर येत आहे. त्यांची पण internetवर कम्युनिटी आहे, आपण येणार त्यांना कळलंय, ते दबा धरून बसले आहेत वगैरे वगैरे.

पुढे वाटच नव्हती. चक्रीवादळाचा भरपूर पाऊस पडल्यामुळे सगळीकडे निसरडं झालं होतं. न येता घरी थांबले ते किती हुशार! आशा मस्त पाय ताणून बसली असेल, एका हातात चहा, एका हातात पेपर!

तसंच चढायला लागलो. पाय पक्का रोवू अशी जागा नव्हती. बाजूला तीन तीन फूट गवत होतं. त्याला धरलं तर ते हातात येत होतं. गुरूत्वाकर्षणाचं काम तर सुरूच होतं. कोणी घसरत होतं, पडत होतं, मी किंचाळत होते. आम्ही चतूष्पाद झालेलो होतोच.प्रत्येकजण सापडेल त्या मार्गाने चढत होता. सुह्रुद्सगट सगळे माझ्या वाटेने येवू नका असे सांगत होते. विद्याधीश म्हणाला ,’विद्यामावशी माझ्या वाटेने ये. बघ चांगली आहे.’ मी म्हंटलं,’अरे माझी तर बघ पायघड्या घातल्यात.’ अश्विनी म्हणाली, ’विद्या पण वैतागली आहे.’ खरचं याला सुखाचा जीव दुःखात घालणं म्हणतात. मी आणि सुहृद तिथेच थांबू म्हंटलं तर तेही शक्य नव्हतं. कसे चढलो माहित नाही पण चढलो. खाऊन घेतलं. परतताना दुरून असेल पण सोपी वाट असेल असं वाटत होतं. छे! आल्या वाटेनेच उतरायचं होतं तीच सोप्पी!!!!

सुहृद सगळावेळ मिलिन्दबरोबर होता, मधून मधून त्याला कडेवर घ्यावं लागत होतं.
उतरायला सुरवात केली ती बसूनच, कपड्यांची पर्वा न करता घसरत होतो. काटे/कुसळ कपड्यात घुसत होते. काढण्यात अर्थ नव्हता. उभ्याचे आडवे करून घ्यायचे, टोचत नाहीत.

पडेल असं वाटलं की मी किंचाळत होते. मला माहित आहे, मला जरा किंचाळायची सवय आहे.पण इथे जरा अतीच होत होतं. मिलिन्द्च्या कडेवर सुहृद होता, त्याच्यापाशी जातो म्हणून जितूकाका माझ्यामागून पुढे गेला , माझ्यासमोर पडला...., तीनेक फूट घसरला...., पुन्हा उठून चालायला लागला...., आवाज नाही. सुहृद-वेदात्मनपासून खाडिलकरकाकांपर्यन्त सगळे घसरत होते ,पडत होते पण कोणीही ओरडलं नाही. मी एकटी किंचाळत होते. विद्याधीशने मोजायला सुरवात केली.एक-दोन.... आठ-नऊ-दहा.....पंधरा... काय चाललंय माझं? मला कळत नव्हतं.

मी किंचाळण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केलं. थोडासा तोल गेला की मी किंचाळत होते. पण क्षणभर आधीसुद्धा मी किंचाळणार आहे, हे मला माहित नसायचं. ती प्रतिक्षिप्त क्रिया होती. . मी अस्वस्थ झाले.
मी घाबरत होते म्हणून अस्वस्थ होते का? नाही. भीती वाटणं साहजिक होतं, त्याला काय लाजायचंय?
मग चारचौघात किंचाळत होते म्हणून अस्वस्थ होते का? नाही. भीती वाटल्यावर ज्याला किंचाळायची सवय आहे तो किंचाळेलच ना? अति होतंय म्हणून का? असावं जरासं.
मुख्य कारण हे होतं की माझं काही नियंत्रणच नव्हतं माझ्या किंचाळण्यावर.
विद्याधीश, मुक्‍ता माझ्यापुढेच होते. विद्याधीश म्हणाला,’विद्यामावशी, रोलरकोस्टरवर कसं होईल तुझं?’
मी तिथे जाणारच नाही.  दोघेही खूप बडबड करत होते. मला लक्ष केंद्रीत करणं जमत नव्हतं. पायाखालचा दगड गडगडत गेला. मी किंचाळले. मुक्‍ता म्हणाली,’ तुझ्याकडून ही देणगी मला मिळाली नाही.’ देणगी??   इथे मी ते बंद करायचा प्रयत्‍न करत होते.

माझा तरी का एवढा अट्टाहास? शिंक किंवा खोकला विचारून येत नाही. आपण गृहीत धरतो. तसं ते स्वीकारलेलं आहे सगळ्यांनी आणि हृदयाची धडधड किंवा नाडीचे ठोकेदेखील मला विचारून पडत नाहीत. त्याचं मला काही वाटत नाही. पण किंचाळणं मला मी ठरवीन तेंव्हा हवं होतं. ते मला जमत नव्हतं. का??

आपल्या मेंदूवर आपली अधिसत्ता आहे असं मला वाटायचं. मेंदू म्हणजे समजा भारत, त्यातल्या सगळ्या राज्यांवर, केंद्रशासित प्रदेशांवर माझं राज्य़.  ( माझं म्हणजे कुणाचं?) सगळीकडे सारं काही नियंत्रणाखाली. आणि अचानक बस्तरमधे किंवा तेलंगणात किंवा उत्तरपूर्वेत असे आदिवासी निघावेत की ज्यांना ह्या देशात काही व्यवस्था लावलेली आहे, कुणाचं तरी प्रशासन आहे हेच माहीत नसावं? ते आपले स्वतःचंच राज्य समजताहेत. माझं तिथे काहीच चालत नाहीये.
आता प्रश्न फक्त किंचाळण्याचा नव्हता, अजून कुठे कुठे कोण कोण आदिवासी दडून आहेत, माहीत नाही.ते काही बंड करून उठणार नाहीत. तेवढी सत्ता त्यांच्याकडे नाही. पण ते अस्तित्वात आहेत, माझ्यात आहेत. हे मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही.स्वीकारण्यावाचूनही.
स्वीकारायचंच असेल तर त्यातलं सौंदर्य तरी पाहूया. मी इतक्या वेळा किंचाळले पण एकदाही पडले नाही.किंचाळण्याने मला वाचवलं का?
किंचाळणारी मी आणि तिच्याकडे चकित होऊन पाहणारी मी अशा दोन मी होतो काहीवेळ!! अदभुत!!

आता जरा बरी वाट होती. अर्थातच किंचाळणं थांबलं.

शेवटच्या टप्प्यावर खाडिलकरकाका थांबले होते. म्हणाले,"बसा. सगळे आले की निघू. कसा निघाला गड? वाटत होतं सोपा आहे. आता वैतागला असाल पण उद्या कुणाशी आजच्या अनुभवाबद्दल बोलताना किती छान वाटेल! आपल्या कायम आठवणीत राहील हा गड!" मी मान डोलावली. पुढे त्यांच्या स्टाईलने आणि त्यांच्या त्या इंग्रजीत म्हणाले ,"जगातली कुठलीही सुंदर जागा सहजी आपले सौंदर्य दाखवत नाही. ती आपला कस पाहते. ते देणं दिलं की मगच तिथलं खरं सौंदर्य कळतं." मी पुन्हा मान डोलावली.

सगळे आले. आम्ही निघालो.दोन वाजले होते.रस्त्याला लागण्यापूर्वी एकदा मागे वळून पाहिले. गड छोटासाच दिसत होता. दाढीसारखा एक गवताचा/झाडांचा पट्टा होता. त्यात आम्ही अडकलो होतो, घसरत होते. त्याचे या बेट्याला काहीच नाही!

तो तसाच !
योगी? की कलंदर?
की दोन्ही??

Thursday, November 19, 2009

आहे मनोहर तरी

सुनीताबाई गेल्या.
दुसर्‍या दिवसापासून आमची ठरलेली कामे सुरूच होती. वाटले हे दुःख आपण किती लवकर मागे टाकले. जरा तिथे थांबण्याइतकाही वेळ आपल्यापाशी नव्हता का? उदासीत का असेना रोजची कामे तर सुरूच होती. मुकामार लागावा ,दिसू नये कुठेच काही, वाटावे काही लागलेच नाही आणि झोपेतून उठल्यावर सारे अंग ठणकायला लागावे तसे झाले. दोन दिवसांनी काही सुचेना, तेंव्हा ’आहे मनोहर तरी’ पुन्हा वाचायला घेतले.

0000000000000000000000000000000000000000000000000000000000
अर्पणपत्रिका आहे,

कवितांना :
ज्यांनी आयुष्यभर साथ दिली. . .


कवितांनी त्यांना शेवटपर्यंन्त कशी साथ दिली, हे मला परवाच कळले. किती कविता त्यांना शेवटपर्यंन्त पाठ होत्या , माणसांना विसरल्या तरी त्या कवितांना विसरल्या नव्हत्या आणि कविता त्यांना.

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

हे पुस्तक आपल्याला इतके का आवडते?
त्यांनी वाचकांना खूप विश्वासात घेतले आहे. आपण सख्ख्या मैत्रिणीशी गप्पा मारायला बसतो ना तसे वाटते. त्या गप्पांमधे सुद्धा चारदोन वाक्येच खरी आपल्या आतल्या स्वराची असतात. इथे तो आतला स्वर पुस्तकभर लावलेला आहे. ही मैत्री आपल्याला श्रीमंत करते.
प्रत्येक पुस्तक वाचताना आपण ते स्वतःशी जोडून घेतो.आपल्या अनुभवांमधे गुफूंन घेतो. त्या पुस्तकाची खास आपली अशी स्वतंत्र आवृत्ती तयार होते. ह्या पुस्तकात सुनीताबाईंच्या आठवणींच्या प्रदेशात माझ्याही काही आठवणी मिसळल्या आहेत, वाचताना माझा दोन्हीकडे प्रवास होतो.

0000000000000000000000000000000000000000000000000000000

हे पुस्तक इतकी वर्षे आवडतं आहे.
काय आहे आपलं आणि सुनीताबाईंचं नातं? मी शोधत होते.........
वाचत गेले तसं दोघींमधले फरकच ठळकपणे नजरेसमोर येत गेले. सुनीताबाई व्यवस्थित ,कष्टाळू तर मी अव्यवस्थित , आळशी. जन्मतारखा माझ्या लक्षात राहात नाहीत. विरजण लावणे ,लोणी काढणे तर माझे नावडते काम. नाही म्हणणं मला अवघड जातं , आवश्यक तेंव्हा म्हणतेही पण गैरसमज होऊ नयेत यासाठी मी दक्ष असते. हे काय ? मी तर पुलंच्याच गटात जाते आहे. हे नातं opposite pole असंच आहे का? नाही ,काही साम्यसुद्धा आहेतच. त्यातलं महत्त्वाचं आहे, उलट सुलट विचार करुन स्वतःला तपासत बसणे, विचारांचा खेळ आवडीचा. एकांताचा तुकडा प्रिय. गणित विषय आवडीचा.’ आहे मनोहर तरी’ मधे हे गणित आवडणार्‍या व्यक्तिचं लेखन आहे हे ठायी ठायी दिसून येतं. ’घर’ याबद्दल जिव्हाळा. फरक इतकाच की मनातल्या मनात बांधलेल्या या घरांची मी फावल्या वेळात कितीतरी drawings ( engg. drawings) केली. कवितांची आवड : यात त्या PhDआहेत तर मी पहिलीत सुद्धा नाही. ......

..........पण यापलीकडे सुद्धा आहेच की बाई असण्याचं सनातन नातं. माणूसपणाची ओढ असणारं.........

oooooooooooooooooooooooooooooooooooooo

Sunday, November 8, 2009

गमते उदास


सुनीताबाई गेल्या.
इतक्यात त्यांचे काही लेखन वृत्तपत्रात वाचले नव्हते.
वाटायचे प्रकृती कशी असेल? मध्यंतरी त्यांची प्रकृती बरी नसल्याची बातमी वाचली होती.
कधीतरी ही बातमी यायची होतीच. खूप उदास वाटतंय. सवयीने ही उदासी जाते हे ही माहीत आहे. आज आतमधे काहीतरी तुटलंय.
सुनीताबाईंना मी पहिल्यांदा औरंगाबादला स.भु. सभागृहात पाहिले. बोरकरांच्या कवितावाचनाच्या वेळी. त्या पुलंपेक्षा प्रभावी वाटल्या होत्या.
काही चांगले कार्यक्रम मला पाहता/ऎकता आले म्हणून माझाच मला हेवा वाटतो, त्यातील हा एक कार्यक्रम आहे. ’सरीवर सरी’ तर अजून कानात आहे.
पुढे ’आहे मनोहर तरी’ आलं. तत्पूर्वी त्यातले काही वेचे म.टा.त आले होते. पहिला उतारा धामापूरच्या तलावाबद्दलचा होता.मी किती भारावून गेले होते, मला आठवतंय. पुढचे दिवस "आहे मनोहर तरी" चे होते. कितीदातरी कितीतरी वर्षे हे पुस्तक मी वाचत होते. कुठलंही पान उघडावं आणि वाचावं, आयुष्याबद्द्ल काही प्रश्न पडू पाहात होते,तेंव्हा सगळ्या प्रश्नांची खोलवर उत्तरे
शोधणारे, स्वत:ला काट्यावर तोलणारे, तरी काव्यमय आणि इतके खरे !
सुनीताबाईंशी अंतरीचं नातं जुळलं. पुलंना पत्रे पाठवली होती, पण सुनीताबाईंना काय लिहायचं? असंच वाटलेलं.
माझं आणि मिलिन्द्चं आवडतं पुस्तक! आमच्या कुठल्या आवडी जुळताहेत हे आजमावताना पुस्तके खूप महत्त्वाची होती.या पुस्तकावर आम्ही दोघेही किती बोललोय!
सुनीताबाईंचाही आवाज मोठा असं कळल्यावर मला माझ्या मोठ्या आवाजाचं काही वाटेनासं झालं इतकं हे पुस्तक माझ्यात भिनलं होतं.
लग्नानंतरही ह्या पुस्तकाने मला खूप आधार दिला. मुळाशी जावून प्रश्न सोडवताना सुनीताबाईंचा आधार वाटत राहिला.
पुढे त्यांची आणखीही पुस्तके आली. "कार्लाइलच्या बायको"बद्द्ल उत्त्सुकता होती ते समांतर जीवनही आलं
जी.एं.ची पत्रे, सुनीताबाईंची पत्रे!
त्यांच्या एकटीच्या काव्यवाचनाची VCD. माझी आवडती!
त्यातल्या सगळ्याच कविता किती मन लावून वाचल्यात त्यांनी!
शेवटची पद्मा गोळ्यांची ’आताशा मी नसतेच इथे’ ऎकताना तर त्या स्वतःबद्द्लच बोलताहेत, असं वाटतं.

आहे मनोहर तरी मधे उल्लेख आहे .......
आर्थर कोस्लर म्हणतो "लहानपणी शिकवले गेले होते, ज्यांच्या पुण्याईवर हे जग टिकून आहे अशी एकूण छत्तीस देवमाणसे आहेत. जगाच्या पाठीवर कुठेकुठे विखुरलेली ही माणसे नेमकी छत्तीस नाहीत. ती हजार, दहा हजारही असतील. वेगवेगळ्या क्षेत्रात ती आपल्याला अचानक भेटतात. कुणी एखादा शेतकरी, कुणी डॉक्टर, कुणी सामाजिक कार्यकर्ता, एखादा सैन्यातला माणूस, कुणी एखादी शिक्षिका, कामगार, शास्त्रज्ञ, कुणीही. यांच्यातला समान धागा कुठला ? राष्ट्रा-राष्ट्रांच्या, मानवी समूहांच्या, प्रचंड गोंधळ आणि मूर्खपणा असणार्‍या, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नसणार्‍या या जनसागरात, स्वतःपुरती शिस्त आणि स्वाभिमान जपत स्वतःच्या साध्यासुध्या जीवननिष्ठांची कुंपणे घालून या लोकांनी छोटी छोटी स्वतंत्र बेटॆच जणू निर्माण केली आहेत. कोणताही वादळवारा त्यांना उद्‍ध्वस्त करू शकत नाही आणि कितीही उंच लाटा त्यांना बुडवू शकत नाहीत. तुमच्याआमच्यासारखीच ही सामान्य माणसे. पण असा काहीतरी घट्ट विश्वास त्यांच्या नजरेत भरून राहिलेला दिसतो, की अत्यंत निराशेच्या, वैफल्याच्या क्षणी दीपस्तंभासारखे ते डोळे प्रकाशकिरण दाखवितात. हे कुणी संतमहात्मे नव्हेत. पण युगानुयुगांचे हे आधारवड. उभ्या मानवजातील जीवनमूल्यांचा, स्वाभिमानाचा, धैर्याचा, प्रेमाचा, तळमळीचा, क्षमाशीलतेचा, आशेचा प्राणवायू ते पुरवत असतात."


सुनीताबाई त्यातल्या एक होत्या.

Friday, October 9, 2009

अजून येतो वास फुलांना

गेल्या काही दिवसांपासून आमच्या पारिजातकाला फुलं येताहेत. छोट्याशा पांढर्‍या पाकळ्यांच्या केशरी दांडी असणार्‍या पंधरा-वीस फुलांचा सडा सकाळी झाडाखाली पडलेला असतो. माझा तर विश्वासच बसत नाहिये! गेल्या वर्षी श्रावणात हे झाड लावलं. या श्रावणात फुले येतील असे वाटले होते. श्रावण गेला भाद्रपद गेला आणि आता अश्विनात पारिजातक बहरला. सत्यभामेने स्वर्गातून आणलेले झाड ते हेच! किती सुंदर देखणी फुलं! त्यांचा तो मंद सुवास! झाडाजवळ उभी राहिले,डोळे मिटून तो वास घेतला आणि मी एकदम कितीतरी वर्षं मागे गेले!
छोटी, झग्यातली, दोन वेण्या वर बांधलेली मुलगी मला दिसू लागली. अंगणभर पारिजातकाचा सडा पडला होता,ही छोटीशी मुलगी फुले वेचत होती. वाड्यात आमच्या शेजारी राहणार्‍या माईआजीची मैत्रिण जवळच राहत असे. त्यांच्या मागच्या अंगणात एक भले मोठे पारिजातकाचे झाड होते. एकदीड फुटाचा खोडाचा व्यास असावा. चार फूट उंचीचं नुसतं खोड, वर दहाफूट व्यासाच्या वर्तूळात पसरलेल्या फांद्या. एवढं मोठं पारिजातकाचं झाड मी आजवर पाहिलेलं नाही. श्रावणात आईला पूजेला फुले लागत म्हणून मी त्यांच्याकडे फुले वेचायला जात असे. मला उशीरा उठायला आवडतं. पण फुलांसाठी मी लवकर उठत असे.त्यांच्याकडे गेले की खाली फुलांचा गालीचा अंथरलेला असे. आणि फुलांचा घमघम वास येत असे. टोपली घेऊन, एकही फूल न तुडवता मी अंगणात उतरत असे. हलक्या हाताने सारी फुले वेचत असे.मग ते झाड हलवत असे, माझ्या अंगाखांद्यावरून फुले खाली पडत. तो फुलांचा पाऊस अंगावर घ्यायला खूप छान वाटे.झाड हलवताना मी वर पाहात असे,पडणार्‍या फुलांचा ओला कोवळा स्पर्श एका वेगळ्याच जगात घेवून जाई. तिथे मी कुणीतरी खास असे,जणू परीकथेतली छोटी राजकुमारी! बाकीचे सगळे माझी इच्छा ऎकण्यासाठी आतुर!
वेचून झाल्यावर सगळी टोपलीभर फुले त्या आजींना द्यायची. मग त्या मला किती फुले देतील याची वाट पाहायची,तो क्षण मला नकोसा होई. एकेक करून मी वेचलेली सगळी फुले मला परकी झालेली असत. मजुरी दिल्यासारखी त्यातली फक्त ओंजळभर फुलं त्या मला देत. मला वाईट वाटे. मी आईला तसे बोलूनही दाखवत असे.आई म्हणायची ,"अगं देवाला चार फुले मिळाली तरी पुरे." तेवढी फुलंही आई चार घरात वाटून टाकीत. माझं वाईट वाटणं केवळ कमी फुलांसाठी नसे.मी दुखावलेली असे, का ते मला सांगता येत नसे.मला त्या आजी मुळीच आवडत नसत. तरी दुसर्‍या दिवशी सकाळी पारिजातकाच्या ओढीने मी त्यांच्या घरी जात असे.
श्रावण म्हणजे ज्या अनेक गोष्टी आहेत, त्यात प्रामुख्याने आहेत पारिजातकाची फुलं! सोमवार ,शुक्रवार आम्ही शुक्लेश्वराला/महादेवाला जायचो. तिथे तर ह्या फुलांचा खच पडलेला असे. ती थोडी सुकलेली असत.पायाखाली गेल्यामुळे फरशीवर कुठेकुठे केशरी डाग पडलेले दिसत. फुलांनी आता पार्टी बदललेली असे. सकाळची स्वप्नाळू दुनियेतली फुले आता अध्यात्मात शिरलेली वाटत. पांढर्‍याशुभ्र पाकळ्यांवर केशरी झाक आलेली दिसे.
ही फुले कधी विकली जात नाहीत.फुलवाल्याकडे मिळत नाहीत.एकट्याने एकांतात वाचायच्या कवितेसारखी असतात ही! ह्यांचं जाहीर वाचन होऊ शकत नाही की कार्यक्रम होऊ शकत नाही. फारतर पुस्तकात येऊ शकतात ही.
पण क्वचित एखादी मुलगी पारिजातकाचा गजरा शाळेत घालून येई, शाळेत येईयेईतो तो सुकून जाई. तेव्हा आम्ही मुली फार गजरे घालायचो,फुलं माळायचॊ. बाईंना फुले द्यायला चढाओढ असे. आमच्या शाळेबाहेर एक- दोन बुचाची झाडे होती.आम्ही कायम तिथे फुले वेचत असायचो.वरून फुल पडलं की वेचायचं,कधीकधी झेलायचं. हे माझं / तुझं चालायचं. हातात त्या फुलांचा गठ्ठा असे, मग फुरसतीत त्यांच्या वेण्या तयार करायच्या. आताही बुचाची झाडे फुलली आहेत. लॉ कॉलेज रस्त्यावर तर फुलांचा सडा पडलेला असतो. मला एकदाही तिथे कुणी फुले वेचताना दिसले नाही. फुले वेचणा-या त्या मुली कुठे गेल्या?
मीही आपण कधीतरी फुले वेचत असू हे विसरुन गेले होते. पारिजातकाच्या ह्या गंधामुळे मी त्या दिवसांमधे फिरुन आले. गंधाच्या आठवणी एवढ्या तीव्र असतात हे मला पहिल्यांदाच कळले.
पूर्वी मी नर्सरीत जाऊन तिथे छान दिसणारी/फुले न येणारी कुठल्यातरी अवघड नावांची रोपे घेऊन येत असे. ती निरनिराळ्या कारणांनी टिकली नाहीत. यावेळेस अस्सल देशी झाडे लावायची ठरवले. कण्हेर ,गुलाब,जास्वंदी,कोरांटी, अबोली, सोनचाफा वगैरे. सहज माळ्याला विचारलं पारिजातक मिळेल का? तर त्याने आणून दिला.
ठरवून झाडे लावली असं नाही. लहानपणी आजूबाजूला होती ती झाडे लावू असं वाट्लं होतं. पण ते तेवढ्‍यापुरतंच .
पारिजातकाला फुले येण्याची वाट पाहिली तीही तेवढ्यापुरतीच. फुले आल्यावर मला कळले, मला आतून किती हवी होती ही फुले!
मला आजवर हे माहीत नव्हते, माझ्यात किती रुजलेली आहेत ही फुले! बालपणीचा कुणी मित्र भेटल्यासारखं वाटतंय मला. मधल्या वर्षांनी काहीच परिणाम केलेला नाही आमच्या मैत्रीवर. ती तशीच टिकून आहे फुलाच्या ओल्या कोवळ्या स्पर्शासारखी! मला खूप छान वाटतंय. खूप आनंद होतोय.
या वळणावर हे झाड माझी वाट पाहत थांबलं असेल अशी अपेक्षा मी केली नव्हती.पर्‍या,राजकुमार्‍या आणि त्यांचे सेवक सगळेच पुस्तकात गेले. त्यांना बाहेर येता येत नाही की मला त्यांच्या राज्यात शिरता येत नाही. मोठं होणं किती हतबल करतं नाही माणसाला? तरीही टेरेसवर जावून डोळे मिटून येणारा वास घेतला की त्या आठवणींमधे तरी जावून येता येतं. मनाची मोठी गंमत असते नाही? आत खोलवर कुठे काय काय द्डून बसलयं आपल्यालाही पत्ता नसतो. कुठ्ल्या किल्लीने कुठले दार उघडेल आणि त्यात काय सापडेल काही सांगता येत नाही.
माझ्या आठवणीत आज फक्त फुलांचा सडा आणि ते झाड आहे. काळाच्या ओघात आजींना मी कधीतरी माफ करुन टाकलंय. त्या बिचार्‍या एकट्या राहत, गावातच मुलगा सून वेगळे राहत,त्यांचं वय झालं होतं.त्यामुळे विक्षिप्तपणा असेल. आज मला त्यांच्याबद्द्ल कृतज्ञताच वाटते. त्या सगळी फुले वेचण्यासाठी ठेवत. माझी आणि पारिजातकाची गाठ त्यांच्याशिवाय कशी पडली असती?
तर,
आमच्या पारिजातकाला फुले येताहेत ही बातमी मी सगळ्यांना सांगायला सुरवात केली. पण "हो का?" "वा! वा!" "छान!" याच्यापलीकडे कोणी गेलं नाही. मी हिरमुसले. कोणाला काही कळलंच नाही.
मला वाटतं या आनंदाचंही असंच आहे, एकांतात वाचायच्या कवितेसारखं!

Sunday, March 8, 2009

बाई गं!

मी मुलगी आहे म्हणून
मी जन्मले तेंव्हा
काही घरांमधे आनंद साजरा झाला असेल
काही दुःख
(काहींनी ’पहिली बेटी धनाची पेटी’ असं म्हणून सुस्कारा टाकला असेल ,
पुढच्याची वाट पाहात बसले असतील)

मी थोडी मोठी झाले की
मला सांगितलं,
"आवरुन बसत जा.
असं अंगचटीला येवू नकोस."
आणखी थोडी मोठी झाले, शहाणी झाले,
"बाई ग, वेळेत घरी ये,
मोठ्यानं हसू नको,
बोलताना नजरेला नजर देवू नको,
सगळं जग श्वापदांनी भरलेलं आहे,
त्यांच्या जाळ्यात अडकू नको"
मग मी जगाला घाबरायला शिकले.
मान खाली घालून चालायला शिकले.
(किती जणी तर आत्मविश्वासच गमावून बसल्या.)
शिकले सवरले
लग्न करुन बसले,
(म्हणजे काही इलाजच नव्हता)
वाटलं चला आपलं घर मिळालं,
(कितीजणींना वाटलं आगीतून फुफाट्यात पडलो)
नव्या चालीरीती शिकवल्या गेल्या .
नव्या साच्यात बसवलं गेलं.
घरासाठी मूल दिलं
एक मुलगी.............
वाटलं ही तर आपली प्रतिकृती!
बाई ग!
तू माझ्यासारखीच आहेस,
पण माझ्यासारखं जगू नकोस.
मोकळेपणाने वाढत जा
मोठ्याने हस. मोठ्याने बोल.
नजरेला नजर भिडव,
आपलं म्हणणं पटवून दे.
बाई म्हणजे नसतं काही कमी!
बाईला तर हवी स्वातंत्र्याची हमी!
तू पंख पसर
मुक्तपणे विहर
जग नाही श्वापदांचे!
जग आहे माणसांचे!
चांगली माणसे, वाईट माणसे,
काही बरी, काही खरी!
त्यांना तू घाबरु नको,
आपला मार्ग बदलू नको.
आता तू नाही बदलायचं!
जगाने बदलायला हवं.
तुझं माझं बळ एक करु
आणि एक नवं विश्व घडवू.
ज्यात बाई असेल पुरुषाच्या बरोबरीची
पुरुष असेल बाईच्या बरोबरीचा!
कुणी लहान नाही
कुणी मोठं नाही
बाई गं!
चल पाऊल उचल
आपल्याला हे करायला हवं.
**************************************************
आपण बाईपण विसरलो तरी
बाकीचे विसरत नाहीत.
बाकीच्यांना वगळून
आपल्याला जगता येत नाही.
आपल्या वागण्याचे
अर्थ लावणारे ते असतात.
आपण कितीही मुक्‍त असलो
तरी चौकटी आखणारे ते असतात.
सगळं कसं नियमबद्ध
ते करु शकतात.
अपवाद म्हणून का असेना
आपल्याला नियमात बसवतात.
नुसते आपण बदलून उपयोग नसतो,
बाकीचे बदलावे लागतात.
*******************************************
मी बाई आहे.
पण मी बाईसारखी नाही वाढले.
हवं तेच शिकले.
हवं तेव्हढं शिकले.
हव्या त्या माणसाशी लग्न केलं.
वाटलं आपण जग जिंकलं.

पण जगणं इतकं सोपं असतं होय?
काही चौकटी मोडल्या तरी
नव्या चौकटी उभ्या राहतात.
वर्तूळ किती विस्तारलं तरी
क्षितीज कवेत घेता येत नाही.
या बाईपणाच्या मर्यादा काय म्हणून?
माणूसपणाच्या म्हणू हवं तर!

Saturday, February 21, 2009

कुटंबात विचार

"कुटुंबात लोकशाही असली पाहिजे" हा एक महत्वाचा मुद्दा आहे.खरोखरच कुटुंबाकुटुंबांमधे लोकशाही आली तर ती एक क्रांतीच होइल.
तरीही कुटुंबात कोणत्या विषयांबद्दल विचार होतो हे महत्वाचे आहे असे मला वाटते.

बहुतांशी कुटुंबात विचार आणि विचारविनिमय या दोन्ही अर्थांनी विचार होत नाहीत.
’विचार होत नाहीत ’ ही कुटुंबव्यवस्थेची मर्यादा आहे का? शोधून पाहिले पाहीजे.
त्याचे कारण ’विचार’ करायचे शिक्षण देऊ शकतील अशा व्यक्ती सामान्य कुटुंबात अभावानेच असतात ’ हे असेल तर तसे का आहे?
" विचार करणे "या गोष्टीचा प्रसार का होत नाही? कारण कुठल्याही सत्तेला विचार करणारे नकोच असतात.मग ती घरातली असो, अध्यात्मातली असो की राजकारणातली असो, कारण विचार करणारे स्वतःचे रस्ते शोधू शकतात .
कुटुंबात विचार होत नाहीत कारण कुटुंबात भावनेला ,विचारांच्या वरचे स्थान आहे.निर्णय घेण्यात भावनेचा वाटा जास्त असतो.
कुटुंबाचे "साध्य "काय आहे? सुख????
("विचार "हे कधीही साध्य होऊ शकत नाही,ते साधन आहे व्यवस्था बदलण्याचे ,माणसे बदलण्याचे.)
सुख--- तेही प्रत्येकाला वाटेल ते नाही तर समाजात ज्याला सुख म्हंटले जाते ते!कुटूंब सुखी असून चालत नाही तर ते तसे दिसावे लागते.
सुखी दिसण्यासाठी विचारांची गरज नसते. समाजाने आदर्श घालून दिलेले असतात त्या वाटांवरुन चालताना स्वतः विचार करावा लागत नाही.
"एकत्रित" विचार हा बहुदा तेंव्हाच होतो जेंव्हा तो विचार करणे याच हेतुने माणसे जमतात. हे अगदी मान्य .
पण वर्षानुवर्षे एकाच घरात राहणारी माणसे एकत्रित विचार करायला का जमत नाहीत?
कुटूंब, कुटुंबातल्या कोणत्या सदस्यांना एकेकट्याने विचार करायला स्वातंत्र्य आणि space देते?
(किती घरातल्या बायकांना हे मिळते?)
बरं हे एकेकटे सदस्य कशाचा विचार करतात?
कुटुंबात आपण आपल्या माणसांचा विचार करायला शिकतो की त्यांची काळजी घ्यायला?त्यांची कदर करायला?त्यांच्या इच्छेसाठी स्वतःला बदलायला?तत्वांना मुरड घालायला?
भावना या विचारांपेक्षा अधिक महत्वाच्या आहेत हेच आपण शिकतो आणि आपल्या माणसांना ,ती दुखावतील याला घाबरायला लागतो.
जर कुटुंब सुखी असायला विचारांची गरजच पडत नसेल तर "कुटुंबात विचार होत नाहीत" याची काळजी करायचे कारण नाही.
मग कुटुंबात विचार व्हावेत असे का वाटते?
१.कुटुंबांनी सुखाच्या वरच्या पातळीवर जावे असे वाटते.
२.जोपर्यंत ही कुटुंबे सरळ रेषेत चालत असतात तोवर विचारांविना काही अडत नाही पण अशा कुटुंबांवर काही आघात झाला (मुलाने आंतरजातीय ७-८ वर्षांनी मोठ्या मुलीशी लग्न करायचे ठरवले ) की ती कोलमडून पडतात.
अशा प्रसंगी दिशा दाखवणे आणि निर्णयाचा स्वीकार करणे या दोन्हींसाठीची ताकद विचारांमधे असते.
म्हणून कुटुंबात विचार व्हायला हवेत.

Monday, February 16, 2009

उत्सुकतेने मी झोपलो च्या परीक्षणानिमित्त

उत्सुकतेने मी झोपलो’ चे परीक्षण रविवार १५ फेब्रु. च्या लोकरंग (लोकसत्‍ता रविवार पुरवणी) मध्ये आले आहे, अरुण अनंत भालेराव यांनी केलेले.
ते ज्या कादंबरीविषयी बोलत आहेत ती आणि मी वाचलेली जणू दोन वेगळ्याच कादंबर्‍या आहेत.
मुळात ही मुख्यतः एकाकीपणाची गोष्ट आहे असे मला वाटत नाही. कुटुंबव्यवस्थेत विचार करणार्‍या माणसांना या व्यवस्थेबद्‍दलचे काही मूलभूत प्रश्न पडत जातात. त्यामुळे त्यांचे जगणे बदलते पण कुटुंबव्यवस्थेतील इतरांना हे बदल जाणवतही नाहीत. म्हणजे माधुरीने सासू, जाऊ यांच्याबद्‍द्ल तक्रार केली तर चालणार आहे पण "रोज मन लावून हिंदी सिनेमा पाहताना सासूच्या मनात काय येत असेल" असा प्रश्न विचारणे बसत नाही.
पुढेही गोष्ट विलास आणि हर्षद यांना येणार्‍या एकाकीपणाची नाही तर कुटुंबव्यवस्थेच्या कुटुंबातील घटकांकडून असलेल्या अपेक्षा आणि या प्रत्येक घटकाच्या कुटुंब्व्यवस्थेकडून असणार्‍या अपेक्षांचा आलेख यात मांडलाय. आपली कुटुंबे समाजनियमात बसणारीच असावीत ची धडपड आहे.
यात वनिता आणि विलास यांचं नातं हळुवारपणे आलेलं आहे. हे दोघे चुलत बहीण भाऊ आहेत. त्यांचं एकमेकातलं गुंतणं याला आपल्या समाजचौकटीत प्रेम नाही म्हणता येणार. त्यांची माया आहे एकमेकांवर त्याचं काय करायचं हे दोघांनाही उमजत नाही.
तिसर्‍या भागात तर कुटुंबव्यवस्थेबद्‍दलचेच विचार आहेत.
अरुण भालेराव म्हणतात -- "तरुणांची मिश्र मन:स्थिती सांगताना लेखक आवर्जून १५/२० ठिकाणी म्हणतो, ’त्याला आनंद वाटला. त्याला पडेल वाटले." म्हणजे सध्या जी तरुणांची डिप्रेशन ची स्थिती आपण सर्वत्र पाहतो त्याची जाणीव लेखक ’पडेल वाटले’ अशा साध्या सरळ वर्णनाने करून देतो.
हे असं नाही.
एकतर फक्‍त विलासलाच पडेल वाटते. हर्षदला किंवा वनिताला. संजय किंवा परागला कधी पडेल वाटत नाही. लेखक सांगतोय ती तरुणांची मन:स्थिती नाही. ’पडेल वाटणे’ चा अर्थ एका शब्दात सांगता नाही यायचा. वाचता वाचता आपल्याला कळतंच पडेल म्हणजे विलासला काय वाटतं ते !
त्याला आनंद होतो तेव्हाच त्याला वाटते की किती छोट्या गोष्टी आहेत ह्या, ज्याचा आपल्याला आनंद होतोय. त्याचे त्याला वैषम्य वाटते म्हणजेच पडेल वाटते. किंवा रुखरुख वाटते, हताश वाटतं, वेगवेगळ्या प्रसंगी त्याला वेगवेगळ्या अर्थच्छटा आहेत.
अरुण भालेराव पुढे म्हणतात -------- ’ रचनेचा, विषयाचा वेगळेपणा टिकवण्याच्या लोभापायी लेखकाकडून भाषेच्या बर्‍याच अनावश्यक चुका झालेल्या आहेत. एमए ऐवजी एमे..’
हे वेगळे शब्द लेखकाने आवर्जून वापरले आहेत. लेखकाने एम ए असे का म्हंटले नसेल ? एम ए हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना शिस्तीत अभ्यास करायचा आहे. जमल्यास पुढे एम फिल, पी एच डी वगैरे. एखाद्‍या महाविद्‍यालयात प्राध्यापक व्हायचं आहे.
माधुरीला करायचंय एमे, तिला मजा म्हणून शिकायचंय. त्या पदवीचा वापर ती भविष्यात करेलच असे नाही. लग्नाचं एक वय येईतो ती शिकते आहे. हल्‍ली नुसतं घरी बसून काय करणार त्यापेक्षा शिकायला पाठवतात. तसं तिला शिकायचंय म्हणून एमे.
’दोघे फोनात मजेत हसले’ इथे वाचता वाचता मीही थांबले पण मला ते खटकलं नाही. उलट आकर्षक वाटलं. फोन हा परभाषीय शब्द आपण मराठीत स्वीकारला आहे. त्याला प्रत्ययही भाषेप्रमाणे लावतो त्याऐवजी मराठीप्रमाणे लावला पाहिजे. आपण फोनवर बोलतो का ? तर नाही, फोनात बोलतो, आणि फोनात हसल्यामुळे हसण्याची मजा आणखी वाढली आहे.
भाषेचे हे प्रयोग लेखकाने का केले असावेत ? मला वाटते _______ रोजच्या जगण्यातले, नेहमीचे प्रसंग तो सांगतो आहे पण त्यातला वेगळा अर्थ त्याला जाणवून द्‍यायचा आहे. त्यासाठी त्याच्याकडे भाषा तर रोजचीच आहे. म्हणून तीच भाषा तो अधिक थेटपणे वापरतो आहे.

श्याम मनोहरांची ’कळ’, ’खूप लोक आहेत’ ही पुस्तके वाचताना मी भारावल्यासारखी झाले होते. हे पुस्तक वाचताना तसे झाले नाही. पूर्वीही काही काही कळले नव्हते, याही वेळी काही काही कळले नाही. पुस्तक ’ग्रेट’ आहे असे नाही पण अतिशय चांगले आहे.
कथानकात फारसे काही घडत नाही, त्यात गुंतण्यासारखे काही नाही म्हणून मग त्यातल्या आशयाचा आपण पुन्हा पुन्हा विचार करायला लागतो, बरंचसं पटतं, थोडंफार पटतही नाही.
वाटलं ’कुटुंबात विचारच होत नाहीत’ हे म्हणणे तपासून पाहावे.

Friday, February 13, 2009

कुटुंब

"उत्सुकतेने मी झोपलो’ ही श्याम मनोहरांची तीन विभागात पण सलग आशय असणारी कादंबरी.

यात मध्यमवर्गीय कुटुंबव्यवस्थेचा उभा छेद घेतलेला आहे. यातील निरीक्षणांना काही सन्माननीय अपवाद असतीलही पण ते नियम सिध्द करण्यापुरते. एरवी सर्वत्र काय दिसते ?


"कुटुंबात विचारच होत नाहीत"
(कशाला विचार हवेत ? कुटुंब म्हणजे सुरक्षितता, कुटुंब म्हणजे सुख...)

मला वाटले, हे तपासून पाहू या का ? काय दिसते आपल्याला ?
कुटुंबात कशाकशाबद्द्ल विचार होतात ?
रोज होणारे विचार (चर्चा)
  • भाजी कुठली करायची ? डब्यात काय ? जेवायला काय ?
  • कपडे कुठले घालायचे ?
  • रोजचे वेळापत्रक सांभाळणे
  • कार्यालयीन कामासंबंधी
  • टीव्ही, ठळक बातमी, मालिकांसंबंधी
अधूनमधून होणारे विचार (चर्चा)
  • खरेदीसंबंधी,, हे घेऊ या का ? ते घेऊ या का ? केव्हा ? कधी ? (वस्तू, कपडे, दागिने वगैरे वगैरे)
  • सणवार, विशेष समारंभ साजरा करण्यासंबंधी, आहेर, त्यास उपस्थित राहणे वगैरे वगैरे
  • मुलांची प्रगती
  • आर्थिक बाबी
  • घरातल्या ज्येष्ठांविषयी, प्रकृती-आजारपण
  • राजकारण
  • खेळ (टीव्ही वरील)
  • कुटुंबाकुटुंबातील तुलनात्मक आचरणासंबंधी
क्वचित केले जाणारे विचार
  • सहलीसंबंधी
  • लग्नासंबंधी
  • व्यवसाय निवड / बदल
वरील यादी परिपूर्ण आहे असे मी म्हणत नाही पण कुटुंबात बोलले जाणारे विषय साधारणपणे याला समांतर जाणारेच असतात.
यात विचार काय आहे ? बहुतेकवेळा ’पर्याय निवड’ असते. इतर वेळा समाजात बरं दिसेल, तथाकथित प्रतिष्ठेचे असेल त्याचं अनुकरण असं असतं.
यापलिकडे खरंच कुटुंबात काही मूलगामी विचार होतात का ? माणसं समजून घेतली जातात का ? की प्रेम (तेही चौकटीतले) हेच पुरेसे आहे असे समजले जाते ? कुटुंबात काही गाभ्याशी जाणारे प्रश्न पडतात का ?
समजा - नैतिकता म्हणजे काय ? याचा विचार होतो का, किंवा स्वातंत्र्य ? (आपल्याला आहे का?) मृत्यू अटळ आहे. त्याचा विचार / स्पष्ट उच्चार कुटुंबांमधून होतो का ? जगण्याचा तरी होतो का ?
विचार करायचा म्हंटलं तर असा एखादा प्रश्न, (जो आपली खरी ओळख दाखवेल) कुटुंबामध्ये सापडेल का ?
कुटुंबात विचार होत नाही याविषयी मला वाटले तसे हे...
याशिवायची त्यांची बाकीची निरीक्षणे अशी
१]लग्न ही केवळ स्त्रीपुरुषांची गोष्ट नसते,कुटूंबाची गोष्ट असते.मुलीचे,मुलाचे लग्न योग्य वयात होणे आवश्यक असते.
२]कुटूंबात विचारच होत नाही
३]कुटूंबात माणूसच समजत नाही
४]कुटूंबात वर्ल्ड व्ह्यू येत नाही.
५]निर्मितीला कुटूंबात जागा नसते.
६]कुटूंबव्यवस्थेत ज्ञानाला जागा नाही.
७]कुटूंब एकाच प्रकारची असतात.(म्हणजे आई-वडील मुले, फारतर वडीलांचे आई-वडील, असे)
८]कुटूंबव्यवस्थेत नव्वद टक्के आठवणी सगळ्यांच्या सारख्याच असतात.
९]स्त्रीपुरुषसमानता हे तत्व कुटुंबव्यवस्थेतून नाही आले.
१०]स्त्रीपुरुषसमानतेचे कुटुंबात काय करायचे हे अजून नीट नाहीच उमगत.
११]श्रमप्रतिष्ठा हे तत्व कुटूंबव्यवस्थेतून नाही आले. श्रमप्रतिष्ठेचे कुटुंबात काय करायचे हे अजून नीट नाहीच उमगत
१२]कुटुंबातल्या घटकांनी सामंजस्याने वागून एकमेकांचा आदर ठेवून एकमेकांच्या दुःखात सहभागी व्हावे आणि कुटुंबव्यवस्था टिकवावी. या तत्वाशिवाय दुसरे तत्व सापडले नाही कुटूंबव्यवस्थेतून.
१३) कुटूंबव्यवस्थेतून सतीची चाल बंद झाली नाही.
१४) कुटूंबव्यवस्थेतून भ्रष्टाचार बंद होत नाहीय.
१५). कुटूंबव्यवस्थेत फार कामे असतात, विचार करायला वेळच नसतो. कोणकोणती कामे करायची अन कशीकशी करायची याचाच विचार कुटूंबव्यवस्थेत होतो.
१६) जगायचे असेल तर नुसते कुटुंब नीट असून उपयोगी नाही, समाजच नीट पाहिजे.
१७) कौटुंबिक अवकाशात लहाम मुलांच्या विचित्र गोष्टी बसू शकतात, मोठ्यांच्या विचित्र गोष्टी नाही बसू शकत.
१८) मोठे झाल्यावर ओढीवर संयम ठेवायचा असतो, ओढीप्रमाणे वागून कुटुंब टिकेल ?
१९) कुटुंबव्यवस्था नसती तर मृत्युचे दुःख इतके कळले नसते.
२०) कुटुंबात एकटे व्हायची, असायची पद्‍धत हवी.
२१) कुटुंबव्यवस्था कितीही वाढवली तरी विश्वाएवढी नाही होणार.
२२) कुटूंबव्यवस्थेत मैत्रीची गोष्ट वरचेवर होत नाही.
२३) एकटे होऊन जीवनाचा विचार करण्याचे आकर्षण जबरदस्त असते. या आकर्षणाला कुटूंबव्यवस्थेत जागा हवी.
२४) म्हातारपण येईपर्यंत काळाचा खडक दिसतच नाही. कुटुंबव्यवस्थेत अशी काही सुधारणा केली पाहिजे की कुटूंबव्यवस्थेतल्या घटकांना लहानपणापासून काळ ठसठशीत जाणवेल.