Thursday, January 7, 2016

भेटीलागीं जीवा

मला माझी आई माहित आहे, तिची आई-माझी मोठीआई माहित आहे, मोठीआईची आई माहित आहे,
तिची आई कुठली होती? माहित नाही. तिची आई? नाही ना! त्यांच्या मागचं मागचं काहीच माहित नाही.
खरं मोठीआईची आईही कुठली? तिचं माहेर? माहित नाही.
 त्या कुणा कुणा आयांचं रक्त माझ्यात खेळतंय आणि माझी त्यांची ओळखच नाहीये.
त्यांचं नाव-गावही मला माहित नाही. ही अशी साखळी शोधत जायला किती मजा येईल!
ही साखळी अशी मागे मागे मागे थेट आपल्या सर्वांच्या आदिमायेपर्यंत पोहचेल.
त्यांचं काय काय माझ्यातून वाहत असेल ना?
त्यांनी काय काय मला दिलेलं असेल .. आपसूक.

झाडाचं कसं वय वाढत जातं तसं तसं वर्षावर्षाचं एक एक वर्तूळ वाढत जातं,
तसं समजा माझ्यातल्या पेशीचा आडवा छेद घेतला तर असं एका एका आईचं/पिढीचं एक एक वर्तूळ असेल का?
आपल्यातलं जे सार आहे, जे शहाणपण आहे ते कुठल्याही आईला, आपल्या मुलीला द्यावसं वाटणारच ना!
म्हणजे ती आई झाली असेल त्या वयापर्यंतचं....
पेशींमधली ती वर्तूळं तरूण शहाणपणाचीच असतील! :)
म्हणजे माझ्या आत खरं एक लायब्ररी असेल, एका एका पूर्वज आईचं एक पुस्तक असेल, तिच्या अनुभवांचं सार, तिचे ठसे!
मी जाऊन ती उघडत नाहिये, त्या शहाणपणाच्या कुप्या आहेतच माझ्यात.
मला तो रस्ता माहित नाहिये.
आणि ते शहाणपण माझ्यात उतरलं नसेल तर गेलं तरी कुठे?
माझ्यात जे आहे ते मला माहितच नाहीये.
मग मी काय करते, पुन्हा ते स्वत: शिकत बसते.

मी म्हणजे कांद्यासारखी असणार!
ती आतली कळी म्हणजे आदिमाय!
म्हणजे जे जे सगळं आदिम माझ्यात आहे ते ते!
भूक, भीती, काम, क्रोध, मत्सर,मोह, प्रेम, आनंद, वंशसातत्याची प्रेरणा, माया.....
मग त्यावर पाकळ्यांचे थर....
मग संचय, घर, सत्ता असं काय काय
मग त्यावर नागरीकरणाची पुटं!
शिष्टाचार वगैरे..
आडवा छेद घेतला तर कळणारच कुठे काय कसं...

खरं म्हणजे मी एक पृथ्वी आहे.
गाभ्याशी सगळ्या आदिम गोष्टी घेऊन असलेली.
माझ्या संपर्कातले लोक कुठे कुठे माझ्यावर वसती करून असलेले.
जर ते वाळवंटात असतील तर म्हणतील मी कोरडी आहे,
जर बर्फाळ प्रदेशात असतील तर म्हणतील थंड आहे,
कुठे नदी,तळ्याकाठी असतील तर म्हणतील, प्रेमळ आहे,
कुठे पर्वतावर असतील तर म्हणतील एकटी आहे,
कुठे महानगरात असतील तर म्हणतील, गर्दीची आवड आहे,माणसांची हौस आहे,
काहीतरी गाभ्यामधे हालचाल झाली, भूकंप झाला, लाव्हा बाहेर आला तर म्हणतील,
चिड्चिडी आहे, बेभरवशाची आहे
 एकाच वेळी हे सगळंच खरं आहे.
जन्मापासूनच्या सगळ्या खुणा वागवत असलेली मी एक पृथ्वी आहे.

त्या सगळ्या खापर खापर आयांचं सोडून द्या, मला माझी नीटशी ओळख नाही.
मी जर या एकुलत्या आयुष्यात मला शोधू शकले , ओळखू शकले तर त्या सगळ्या सगळ्या खापर आया मला भेटणारच आहेत.
जर माझ्यातल्या आदिमतेला जाणू शकले, तिथवर पोचले,  तर मला आदिमायेला मिठी मारता येणार आहे.
मला हे करायचं आहे.
आणि नंतर लेकीला पोटाशी धरायचं आहे.


.....

Tuesday, January 5, 2016

घंगाळ



मूळ शब्द कदाचित गंगाळ असावा. शब्दकोशात पाहिलं नाही.
आमच्या वापरात मात्र तो घंगाळ असा होता.
त्यातला ग ही घ कडे झुकलेला.

तांब्याचं घंगाळ आणि त्याला जाड पितळी कड्या.
न्हाणीघरात असायचं ते!

वडगावला आमच्याकडे मोठ्ठं न्हाणीघर होतं,
चुलीवर हंडा तापत असे, त्यातलं पाणी घंगाळात ओतून घ्यायचं,
त्या खरपूस पाण्याने स्नान!
मुधोळलाही होतं, आणखी कुठे कुठेही!

त्याचा घाट किती सुंदर असतो.
असं पसरट भांडं का बरं घेत असतील?
पाण्याचा पृष्ठभाग जास्त, त्यामुळे पाणी गार होण्याचा वेग अधिक असणार.
उष्णतेची, उर्जेची तेव्हा काही काळजी करत नसणार.
हंड्यात खूप तापलेलं पाणी , पटकन कोमट होण्याचीही गरज असेल, कोण जाणे.

आमच्या तिकडे एक गंगाजमना घागरही मिळायची,
अर्धी पितळेची आणि अर्धी तांब्याची!
चकाचक घासली की काय सुंदर दिसायची!

कुठून कुठून दूरून पाणी आणायला लागतं,
आता प्लास्टीकच्या कळशा घागरी दिसतात.

जुनी भांडी काळाच्या ओघात संपून जात आहेत.
अशी घागर किंवा विशेषत: घंगाळ आपल्याकडे असावं अशी माझी इच्छा होती.

घंगाळाचा मी विचार करून पाहिला,
बाथरूमधे कदाचित अडचणीचं झालं असतं.
हॉलमधे सजावटीची वस्तू म्हणून ठेवावं.
एक घंगाळ घ्यायला पाहिजे.

मी बाजारात जाऊन खूप शोधलं, आणलं,  असं झालं नाही.
माझ्या मनात ते होतं.
कधीतरी मी ते आणणार होते.

******

परवा नांदेडला लग्नाला गेले होते.
रूखवतावर सगळी भांडी मांडलेली होती.
त्यात एक घंगाळही होतं.
दणकट आणि बर्‍यापैकी मोठं.
’घंगाळ कसं काय?" मी विचारलं.
" अगं हल्ली देतात. प्रत्येक लग्नात असतं."
" हॉलमधे ठेवतात, पाणी घालून, फूलांच्या पाकळ्या!"

आणि काय गंमत झाली!
त्या क्षणी मनातल्या मनात मी घंगाळ घ्यायचं रद्द केलं.

आता मला घ्यायचं नाहीये.

मला तो क्षण कळला.

असं का झालं असेल?

तीच गोष्ट शंभर लोकांनी केली की मला वाटतं मला नाही करायची?
कमाल आहे!
मला माझं माझं वेगळं आणि खास असं लागतं.
माझ्यात असा माज आहे.
तो बाहेर दिसत नसेलही पण आत आहे आणि ते मला माहित आहे.

त्याक्षणी मला तो कळला.

हे काय बुवा आहे आतलं?
का मला माझं वेगळं लागतं?
अतिशहाणपणा?
प्रवाहात वाहणं म्हणजे सामान्य आणि वेगळं म्हणजे अभिजात अशी काही धारणा माझ्या मनात आहे का?
सरसकट नसेलही... कुठे आपण स्वत:ला खोलवर शोधतो?
माझ्या आतलं फार काही मला माहित नाही.
माझ्या कळत, माझ्या समोर अशी इच्छा संपून गेली.
हे शोधावं असं झालं.

माझ्या लग्नाच्या वेळी, जेव्हा मी साड्यांचा विचार करत होते,
तेव्हा आजसारखी नऊवारीची लाट आली नव्हती.
आईच्या पिढीतलं कुणी नऊवारी घालत नव्हतं, आज्या घालायच्या.
त्यांच्यामागे नऊवारी राहणार नाही, हे दिसत होतं.
मी कधीतरी एक नऊवारी घेणार आहे आणि निदान माझ्या मुलीला नऊवारी देणार आहे,
नेसायला शिकवणार आहे, असं माझं ठरलेलं होतं.
पण आता आता नऊवार्‍यांची लाटच आली आहे.
हुश्श! नऊवारी टिकवण्याची माझ्यावरची सांस्कृतिक जबाबदारी संपली.
( आणि मुलीवरचीदेखील! :))

मी अशा कुठल्या कुठल्या सामाजिक जबाबदार्‍या डोक्यात घेऊन असते.
घंगाळ टिकवण्याची जबाबदारी मी घेतलेली असेल.
ती संपली.

इतकं सहज नसावं बहुदा.
शंभर जण तेच तेच करायला लागले, अवती भवती तेच दिसायला लागलं की मला ते नको होतं.
दहा जणींना तीच वस्तू आवडली की त्याबद्दलची माझी ओढ संपून जाते.
हे असं का होतं?

इतरांनांही खरं असं होत असेल, कोण जाणे
कुणाकुणाचं कसं असतं ना? सगळ्यांना जे आवडतं तेच यांना आवडतं.
पुस्तकांचं वेगळं असतं.
आपल्याला आवडलेलं पुस्तक समोरच्यालाही आवडलं तर उलट धागा जोडला जातो.
वस्तूंच्या बाबतीत असा जोडला जात नाही का? कल्पनांच्या बाबतीत काय होतं?

मला काय आवडतं? आणि का आवडतं?
जर एखादी गोष्ट मला खरोखरच आवडत असेल तर इतरांना आवडो न आवडो मला का फरक पडावा?
हे वस्तूंच्या बाबतीतच आहे का?
मला रूखवत आणि ते मुलीकडच्यांनी काय काय देणं पसंत नाही,
त्यात घंगाळ आलं, म्हणून ?
माहित नाही मी गोंधळले आहे.
घंगाळ घेण्याची इच्छा उरलेली नाही.

मी विचार करत्येय.. अशा इच्छा कशाकशाने संपत असतील?
त्याची काही गुरूकिल्ली असेल का?
ती मला सापडेल का?
:)