Sunday, June 2, 2013

इदं न मम

" आई, तुझ्या मोबाईलमधलं घड्याळ १२ मिनिटे पुढे आहे, पुढे का ठेवलं आहेस? "
भिंतीवरचं घड्याळ अगदी अचूक वेळ दाखवत होतं.
" हो अगं ते बरोबर करायला मला जमलं नाही. तू कर बरं"
मी मोबाईलच्या फंदात पडत नाही. पण मग शोधत गेले settings मग watch असं काहीतरी असेल...
वेळ बदलून दिली.

आई , मोबाईलमधल्या सुविधांचा वापर करण्याचा प्रयत्न करते, बाबा फक्त फोन घेणे आणि करणे एवढंच करतात.
त्यांची नातवंडं त्यांचे मोबाईल घेउन खेळत असतात. काय काय सेटींग करून ठेवतात.....

आई बाबांचा तंत्रज्ञानाचा हात सुटलेला आहे. जेव्हा केंव्हा सोपी मशिन्स होती, रेडीओ किंवा घड्याळ तत्सम तेव्हा त्यांचा पुरेपूर वापर त्यांना करता यायचा.

मी मोबाईल वापरत नाही. त्यातलं काही मला कळत नाही पण ती माझी निवड आहे. किंवा माज आहे. मला माहीत्येय की जर पडायचं ठरवलं तर मला त्यातलं सारं येईलच. तेच संगणकाच्या बाबतीत. त्यातल्या कशातही मी कधीही पडायचं ठरवलं तर मला ते येईलच. खात्रीने.
 जेव्हा मी ’मला नाही काही त्यातलं कळत’ म्हणते तेव्हा माझ्या मनात ’मला नाही त्यात पडायचं" इतपतच आहे. पण बाबा किंवा आईने त्यात पडायचं ठरवलं तरी त्यांना अवघड आहे.

...... मला एकदम वाटून गेलं की कधीतरी माझाही तंत्रज्ञानाशी मिळवलेला हात सुटणार आहे..... मलाही साध्या वापराच्या गोष्टी अनोळखी होत जातील...... त्याची तयारी मी केली आहे का? ते तुटलेपण मी कसं स्वीकारीन?

 जगणं अधिकाधिक आरामदायी करण्यासाठी जी वेगवेगळी उपकरणे मदतीला येत आहेत ती खरंतर आपलं जगणं अधिक गुंतागुंतीचं करत आहेत. रोजच्या जगण्यासाठी आता पूर्वीपेक्षा जास्त कौशल्याची गरज आहे. आणि तंत्रज्ञानाने तर आयुष्याला विळखा घातला आहे.

 आई बाबा कसं स्वीकारत असतील हे तुटलेपण?
त्यांचं वाढणं , माझं वाढणं यात फरक आहे. त्यांच्यासाठी हे कदाचित सहज असेल. किंवा वयामुळेही स्वीकारण्याची सहजता येत असेल.
 किंवा त्या पिढीला तंत्रज्ञानाचा हात सुटला तर असुरक्षित नसेल वाटत.....

मग माझ्यात आहे का ती असुरक्षितता?
शोधली पाहिजे.

तंत्रज्ञान हे एक साधन आहे, ते काही जगणं नाही...... साधं मोबाईल वापरत नाही तर काय काय किती सांगत बसावं लागतं.... कारण तंत्रज्ञानाचा जोर इतका असतो की ते वाहूनच नेतं तुम्हांला.....  तुमच्या गरजा इतर कोणीतरी ठरवत असतं.

 माझ्या गरजा काय आहेत? ते मी ठरवीन. त्या कशा पूर्ण करायच्या? हे ही!........
समाजात राहायचं तर हे शक्य नसतं.

जगण्यानं सांधा बदलला आहे. पूर्वीचं ते संथ आणि शांत आयुष्य नाहीच पुढे कुठे बहुदा.....
मग या जगाचे नियम तरी आत्मसात केले पाहिजेत अशी सक्ती केली जात असावी... स्वत:वरच.....

.......................................

वानप्रस्थाची कल्पना ग्रेट आहे!
आप्त स्वकीयांपासूनच नव्हे तर, अशा उपकरणांपसून देखील.....दूर जाणं
हिमालयात.... कुठे वनात जाणं...... वानप्रस्थाश्रम!
नाही शक्य.... तर..
.......................................
इथे जनात राहून आपल्या मनात सार्‍यांपासून दूर जाता यायला हवं.
म्हणजे तुटलेपण हवं आहे की!!!!
मग काय घाबरायचं त्याला?
येऊ देत की समोर......
हळू हळू सगळं सोडता आलं पाहिजे....
इदं न मम....
...........................................

Tuesday, January 8, 2013

ऑब्जेक्शन मिलॉर्ड !


आपण जगत असतो म्हणजे आपल्या आधी जगून गेलेल्यांच्या नुसत्या आवृत्या काढत असतो, असंच वाटतं हल्ली. आधी जगलेल्यांचं एक वेगळं कॉम्बिनेशन!
 आपण जन्मतो. कितीएक जन्मले. वाढलो.... प्रेम केलं.... मुलं झाली.... नवीन ते काय? कुठलाही अनुभव नवा करकरीत नाही ना?
जगून गेलेल्यांचं जगणं जगत राहण्यात काय गंमत आहे?
असं वाटून कोणी मरायचं ठरवलं तर त्यातही नवीन ते काय?
आत्महत्येत तरी नवीन काय?
तुम्ही कितीही जगलात तरी जगण्याचा गाभा जुनाच.... तुमचं असं खास काहीच नाही!
मला असं जगायचंच नाही मुळी! सुख असो की दु:ख असो, आनंद असो की निराशा! मला माझं नवं कोरं हवं आहे.
जगातल्या उर्जेचं गणित आणि वर्षनुवर्षांचं पाण्याचं चक्र ...... प्लीज ही उदाहरणं नकाच देऊ.
मला पहिल्यांदाच मिळू शकेल असा अनुभव मला हवा आहे. माझा!  माझा!
समजा कुठलातरी नवीन शोध लावला तर तो अनुभव नवा असेल का? शोध ज्याचा लागला ते नवीन, पण शोध लागल्याचा आनंद तर माणूस कधीचा मिळवत आलाच आहे ना?
जगात नवीन काही नसतंच/ नसणारच आहे, हा साक्षात्कार भयंकर आहे!
जगात पाठवताना आपल्याला कुणी जायचंय की नाही? विचारलेलं नाही. समजा असेल विचारलेलं तरी आपल्याला माहीत नाही.
दिलं जगात सोडून... पण का रे बाबा? कशासाठी?
माहीत नाही.
आपणच शोधायचं.
जगण्याचा उद्देश काय? माहीत नाही. मरायचं कधी माहीत नाही.
ऑब्जेक्शन मिलॉर्ड! मला हे चालणारच नाही.
पूर्वीच्या बंडखोरांनी केलेलंही मला करायचंच नाही.....
हं! असं ठरवलं तर काहीच करता यायचं नाही.
आणि काहीच न करणं तर इतकं सर्वसामान्य आहे!
हे शक्यच नाही हे ही कळलेलंच पूर्वासूरींना!

मग या शोधातूनच ’अहं ब्रह्मास्मि’ चं तत्वज्ञान पुढे आलेलं असेल का?
स्वसमाधान?
..... तो पहिला जीव... ज्याने नवा कोरा अनुभव घेतला..... तोही मीच होते.... नंतरही जगत/मरत आले.... तीही मीच आहे......
असं जर असेल तर हा खेळ कशासाठी?
झालंय ना माझं सगळंच जगून.....
मग त्या जगनियंत्याचा जन्म झाला असेल का?
त्याच्या करमणूकीसाठी हे चाललेलं आहे......
हतबल होऊन माणसांनी शोधलेल्या पळवाटा आहेत या.
मला नाहीच ना व्हायचंय त्याच्या खेळातलं प्यादं.
आय क्विट! मी खेळ सोडतीये.
हा हक्क तर मला असलाच पाहिजे.
तो ही नाही ना!
ही कसली गोची आहे? आणि तीसुद्धा नवीन नाही. कितीक या भोवर्‍यात गरगरले असणार!
सामान्यपण स्वीकारण्याची ही कसली सक्ती आहे!
...........................................
यावर एक युक्तिवाद असा केला जाईल की अनुभव जुना असला तरी तो घेणारी तू नवीन आहेस.
असेल. पण मला आधी उमटलेल्या पावलांवरूनच चालायला लागणार आहे ना?
मला कुठेतरी माझ्या पावलाचा ठसा उमटवायचा आहे. मला अस्पर्श भूमी हवी आहे.
अशा भूमीच्या शोधात कितीही चालायची माझी तयारी आहे.

....................................