Sunday, October 25, 2020

दसरा

" यावर्षी तर काही नवरात्र वाटतच नाही. देवळं बंद आहेत. कर्णपूरा बंद आहे." आई फोनवर सांगत होती.
  इथे माझ्याकडे कुठलाच सण तसा " सण" वाटतं नाही. सगळे सण औरंगाबाद ला आईकडे मात्र " सणपणा" घेऊन असतात.
 सणांचा एक स्वभाव असतो. दसऱ्याचा एक स्वभाव आहे, तो घेऊन तो औरंगाबादला आईकडेच भेटतो. इथे सगळे सण आमच्यासारखेच आधुनिक झाल्याने त्यांचं वेगळेपण ठसत नाही.
 दसरा खरा जोडला गेलेला आहे तो " कर्णपुऱ्याशी" दसऱ्याला जर " कर्णपुऱ्याच्या देवीला" गेलो नाही, तर मग त्याला दसरा तरी का म्हणायचं?
*****
दसऱ्याच्या दिवशी अगदी लवकर उठायचं.सकाळी सहापासून शहागंज बसस्टँडहून कर्णपुऱ्यासाठी बसेस सुरू व्हायच्या. ही बससेवा नेहमीपेक्षा जरा वेगळी असायची. भरली बस की सुटायची आणि त्याजागी दुसरी लागायची. पहिल्या दुसऱ्या बसने निघायचं असं आमचं ठरलेलं असायचं.
म्हणून मग आईच्या पहिल्या हाकेला उठायचं. आवरायचं. तेव्हा बाहेर उजाडलेलंही नसे. उठल्यापासूनच मनात गुदगुल्या व्हायला सुरुवात झालेली असायची. " आज दसरा आहे." बाबांचं आणि विशूचं आवरलं तरी माझी वेणी राहिलेली असायची. आई दोन वेण्या वर बांधून द्यायची. सण वार काही असो, दोन वेण्या वर बांधायच्या , हेच आईला आवडायचं. तसं माझे केस ही आईचीच जबाबदारी होती. माझ्या केसात कोंडा नसणार, एखादी जरी "ऊ" मी शाळेतून घेऊन आले तरी आई फणीने विंचरून ती लगेच काढून टाकणार. तेल लावून चापून चोपून माझी एकदाच्या वेण्या घालून दिल्या कीच तिला बरं वाटणार. दसरा असल्याने नव्या रंगीत रिबिनी ती बांधणार, एवढाच काय तो फरक. माझ्या वेण्या झाल्या की आम्ही निघायचो. नवा झगा घातलेला असायचा. त्याचा मस्त कोरा वास येत असे. एकूण दसरेपण अंगावर चढलेलं असायचं.
 आमचे दोघांचेही नवे कपडे चार दिवस आधी शिवून आलेले असत. आईचा नियम की नवरात्रात नवे कपडे पहिल्यांदा घालायचे नाहीत. विशू तिचा नियम पाळत असे, मला मात्र ते शिंप्याकडून आल्या आल्या घालून पाहायचे असत. " बरं बाई घाल." आईने कशीबशी परवानगी दिली की मी तो झगा घालत असे आणि वाडाभर फिरून दाखवून येत असे. त्यामुळे तो नवाच झगा पण मी दुसऱ्यांदा घातलेला असे.
 आई आमच्याबरोबर येत नसे. ती नवरात्रात एकदा वाड्यातल्या बायकांबरोबर कर्णपुऱ्यात जाऊन आलेली असे. आज तिला दसऱ्याची घरात कामे असत. 
 आम्ही तिघे शहागंजला जायला निघायचो तेव्हा बाहेर नुकतं उजाडत असे.
 उड्या मारत रस्त्यावरून चालताना मी आणि विशू दोघेही खूप खूश असायचो. कर्णपुऱ्याच्या देवळाबाहेर जत्रा असायची, खूप खूप खूप दुकाने लागलेली असत. खेळण्यांची, खाऊची, कपड्यांची आणि काय काय...
 एकीकडे मी विचार करत असे की मी आज कशी नवी आहे, सगळे कपडे नवे, रिबिनी नव्या, .... मग वाटे, मी पूर्ण नवी कशी असणार? माझी त्वचा? ती तर जुनीच आहे, माझ्या वयाइतकी, मी केवळ एक दिवस खरीखुरी नवी होते, मी जन्मले त्या दिवशी..... ते तर काहीच मला आठवत नाही. मी आता कध्धीच नवी होऊ शकत नाही या विचाराने मी जरा खट्टू व्हायचे.
 सकाळी सकाळी रस्ते झाडत असत, ती धुळ अंगावर येऊ नये म्हणून बाजू बदलत चालावे लागे.
 शहागंजला पोचलो तर बस लागलेलीच असे. या पहिल्या बसेस नुसती सीटं भरली तरी सोडत. बस निघे आणि खिडकीतून गार वारा तोंडावर येई, तो आणखी उल्हसित करत असे.
 कर्णपुऱ्याला पोचलो की पूर्ण उजाडलेलं असे.
स्टेशनजवळच्या या भागात कधी आमचं काही काम नसायचं. नांदेडला जायचं असे तेव्हा हे ओलांडून पुढे रेल्वेस्टेशनवर जावं लागे, तेही वर्षातून एकदा, उन्हाळ्याच्या सुट्टीत.
  भल्या पहाटे पण बरीचशी दुकानं लागलेली असत, काही लागत असत. " घ्या" " घ्या" चा गलका सुरू झालेला नसे. 
 आमचं ठरलेलं असे आता कुठल्याही दुकानांशी रेंगाळायचं नाही आधी देवीचं दर्शन. तिथे रांगेत वेळ जायला नको म्हणून तर इतक्या लवकर आलेलो असायचो. उशीरा आलो तर तास / दोन तास रांगेतच जायचे. आम्ही अक्षरशः फक्त दहा मिनिटे रांगेत उभे राहात असू. तिथेही काय काय करायचं हे ठरलेलं असे. देवीचं दर्शन मग तिच्या रथाचं दर्शन मग आणखी दोन चार देव, एक दोन तर तिथे वाड्यात आहेत, तिथली लोकं नुकती उठलेली असत, मग एक दोन झाडे , आपट्याचं आणखी कसलंसं. हे करून देवीच्या मागच्या आवारात बसलं की तोवर तिथे गंध लावणारे आलेले असत मग त्यांच्याकडून कपाळावर ॐ काढून घ्यायचं. त्यांच्यासमोर मान वर करून कपाळावर आठी न आणता उभं राहावं लागे. ते झालं की डोळे मिटून घ्यायचे मग ते काका गंधावर चमकी टाकत. ती झटकायची आणि मग एकमेकांचं गंध बघायचं. हे पोराटोरांचं काम , बाबा काही गंध लावत नसत. 
तो कपाळावरचा गार गार गंधाचा स्पर्श म्हणजे दसरा.
 आता दसऱ्याची खरी मजा सुरू व्हायची. आता रमतगमत त्या जत्रेतून फिरायचं. आम्ही तिथे ठराविक गोष्टी घ्यायचो. पण बघत फिरायला खूप मजा यायची. आम्ही बाहेर पडेतो सगळी दुकाने सजून तयार! गलबला सुरू झालेला असायचा. दुकाने उघडी त्यामुळे सगळा माल समोर, खच्च भरलेलं दुकान!! आधी आम्ही रेवड्या घ्यायचो, एक पाकीट फोडून खायला सुरु!
 बाबांचं आईसारखं नसे, हे केवढ्याला? ते केवढ्याला? घेऊ का नको? ते बिनधास्त घेऊन देत. आमच्या त्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आमची इस्टेट असे, पुढे कितीतरी दिवस आम्ही त्या घेऊन खेळणार असायचो. दरवर्षी वेगळ्याच कुठल्यातरी खेळण्याचं पीक आलेलं असायचं बहुतेक दुकानदारांकडे ते खेळणं असणारच.
 बाबा आम्हाला कितीही रेंगाळू द्यायचे, आईसारखी त्यांना घाई नसे. आमचा तिघांचा एक गट बनलेला असे, असंच आम्ही तिघंच जायचो ते दिवाळीचे फटाके घ्यायला , तिथेही बाबा आरामात , हवे तितके फटाके घेऊन द्यायचे, उलट दोन भुईनळ्यांची पाकिटे आम्ही घेतली तर ते म्हणायचे " अजून एक घ्या" 
आम्ही म्हणायचो , " बाबा ! कशाला?" 
" असू दे, मी उडवीन."
ते स्वत: उडवणार नाहीत आम्हालाच देणार हे आम्हाला माहित असायचं.
" बघा हं. घरी गेल्यावर आई म्हणाली, एवढे जास्त कशाला आणलेत? तर तुमची जबाबदारी!"
 ते " हो" म्हणत.
मग पंचवीस रूपयांचे फटाके घेतले तरी आम्ही अठरा रुपये असं आईला सांगायचो. तरी ती म्हणे, " अठरा रुपये? एवढे कशाला आणायचे?" तेव्हा आम्ही एकमेकांकडे पाहून हळूच हसत असू.

 जत्रा संपवून आम्ही तिथल्या तात्पुरत्या उभारलेल्या बसस्टॉपपाशी यायचो तेव्हा आमच्या पिशवीत नक्की असायचं म्हणजे तारेचा पंखा/ भिरभिरं. पिळ दिलेल्या तारेत दोन पात्यांचा तो पंखा घालायचा आणि सुरळीला धरुन झटकन वर आणायचा मग तो जो काय उडायचा! बस्स! कमाल तंत्रज्ञान!
 दुसरं म्हणजे टिकटिकी , पुढचे कितीतरी दिवस त्या टिकटिक्या बंद पडेपर्यंत वाडाभर दिवसभर ऐकू येणार... टिक टॉक टिक टॉक टिक टॉक..
 हा आवाज म्हणजे दसरा!
आम्ही शहागंज बसमधे बसायचो, बसायला जागा नसेल तर ती सोडून द्यायचो, पुढच्या बसमधे बसायचो.
 उन्हं आलेली असत आणि चालून आम्ही दमलेलो असायचो.
 एवढं करून आम्ही घरी यायचो तर ऐरवी आमची उठून दूध प्यायची वेळ असे. गंमत वाटायची!
 आई तिची सकाळची कामं वगैरे आटपून  स्वैपाकाला लागलेली असे. आम्ही नवे खेळ मित्रांना दाखवत/ खेळत.. अंगणात!
 आम्ही घरी यायचो आणि मग आम्ही तिचं मिळून तिला एक मदत करायचो. चक्का+साखर आधी पुरणयंत्रातून काढून मग चाळणीच्या जाळीतून गाळून देणे.
 ते झालं की ( नैवेद्य दाखवून) मला आणि विशूला पुरणयंत्र एकाला, गाळणी एकाला, चाटायला मिळे. गाळणीशी खेळत बसलो, एकीकडून बोटाने चाटला तरी दुसऱ्या बाजूला आहेच! ! आई म्हणे, " ठेवा ते! आता जेवायला बसायचंय, हात स्वच्छ धुवून घ्या.
 आम्ही हात धुवेतो आई ताट- पाट- रांगोळी- उदबत्ती अशी तयारी करे.
 जेवण झालं की दुपारून आई दाराला झेंडूची माळ करे, आम्ही तिला फुलं निवडून ओळीत मांडून द्यायचो.
 तिला सतत काहीतरी काम असे, दुपारून पडायला वेळ मिळत नसे. बाबा झोप काढत आम्ही वाड्यात चक्कर मारुन इकडच्या तिकडच्या बातम्या गोळा करून आणायचो. हीचं काहीतरी सुरुच.
 संध्याकाळी सीमोल्लंघनाला हर्सुलच्या देवीला जायचं असे. तेव्हा आई तिच्यासोबत मला घरीच ठेवून घेत असे, याचं एक कारण त्या देवीला जायला खूप चालावं लागे.
 चार साडेचारला बाबा आणि विशू सीमोल्लंघनाला निघत, ते आत्याकडे जात आणि मग त्यांच्या आणि आमच्याकडचे छोटे मोठे पुरूष हर्सुलच्या देवीला जात.
  त्यांना पाठवल की आई आणि मी , दोघीच घरी!! मला आईच्या गटात आल्याने मोठं झाल्यासारखं होई, मला ते आवडे, असा कामसू बायकांचा गट!! आई अंगण झाडून रांगोळी काढायला घेत असे. ती भराभर सुंदर रांगोळी काढे, रांगोळीच्या भवती महिरप म्हणून छापे घालण्याचं काम माझ्याकडे असे, मी न रेंगाळतात ते आईसारखं भराभर करायला जाई. थोडी रांगोळी सांडली तरी आई ती भरून घेई आणि "छान" असं म्हणून कौतुक करी.
 ते झालं की पुन्हा माझी वेण्या.. रोज खरं ती माझी एकदाच वेण्या घाले. मग सकाळी कर्णपुऱ्याहून आल्यावर काढून ठेवलेला झगा पुन्हा घालायचा. शेवंतीची वेणी , मधे चमकी आणि सुपारीचं फूल असलेली...
अशी शेवंतीची वेणी म्हणजे दसरा!
आई मला डोक्यावर हेअरबॅंड लावतात तशी माळून द्यायची. " आता लोळू नको, नीट बसून राहा"
 मग नीट बसून मी आईकडे बघत बसायचे. आई तिची वेणी घालायची , नवी साडी नेसायची, पावडर कुंकू करून , शेवंतीची वेणी माळून ती खूप सुंदर दिसे. शेवटी ती तिचं मंगळसूत्र नीट करत असे.
 शेवंतीच्या सारख्या सारख्या वेण्यांनी आमची टीम सजे. 
 आम्ही दोघी मग पुरुषांच्या येण्याची वाट बघत बसायचो.
 आई मधेच जाऊन वाड्यातल्या मारुतिला दिवा लावून येई. घरात दिवा लावे. आम्ही दोघीच " शुभंकरोती मग रामरक्षा" म्हणत असू. आई ओवाळण्याची तयारी करून ठेवे.
 आईसोबत असणं मला खूप आवडे. तेव्हाही, त्या वयातही असं आईसारखी बाई होणं मला जमेल की नाही? मला शंका होती. पण मला तेव्हा तिच्यासारखं व्हायचं होतं.
 एक सतरंजी अंथरून आई त्यावर तांदळाच्या दोन भावल्या काढी. सतरंजीच्या काठावर तांदळाने महिरप काढी.
 अंधार पडला की हे दोघे देवीहून येत. येताना ते आपट्याची पाने घेऊन येत.
 आई दारात त्यांच्या पायावर गरम पाणी टाकून , पोळीचा तुकडा ओवाळून टाके.
 एकदा का बाबा आणि विशू आले की माझा संयम संपत असे.
 " आई, मला का नाही ओवाळायचं?"
आई म्हणे, " बरं बाई!"
मग मीही दाराबाहेर उभं राहायचे, आई माझ्याही पायावर गरम पाणी घाले आणि तुकडा ओवाळून टाके.
 आत आल्यावर सतरंजीवर जो चाकू ठेवलेला असे तो घेऊन बाबा एका भावलीच्या पोटात दडवलेली अंगठी बरोबर काढत.
 भावली बरोबर शोधणे बहुदा शकुनाचे असे आणि बाबांची भावली चुकू नये म्हणून ज्या भावलीत अंगठी असे ती भावली आई जरा जाड करत असे.
 हा घरचा कार्यक्रम झाला की आम्ही वाडाभर सोनं द्यायला आपट्याची पाने घेऊन निघायचो.
पोरांची अशी टोळीच निघत असे.
असं टोळीने हुंदडायचं म्हणजे दसरा!
 नमस्कार केला की प्रत्येकजण काहीतरी खाऊ हातावर ठेवे. असा एक सणाचा- उत्सवाचा माहौल असे.
फिरून फिरून पाय बोलायला लागलेले असत.
दमून घरी आल्यावरही बाबांचे कोण कोण विद्यार्थी येतच असत. आम्ही पेंगू लागायचो, आई म्हणे, " जेवल्याशिवाय झोपू नका" 
 तसंच आम्ही जेवायचो. आई हलक्या हाताने शेवंतीची वेणी काढून ठेवायची. दुसऱ्या दिवशी ती शाळेत घालून जायची असे.
 अंथरुणावर पडल्या पडल्या झोप येई. झोप येता येता घरभर शेवंतीचा, आपट्याच्या पानांचा, झेंडूचा, श्रीखंडाचा, नव्या कपड्यांचा मिळून एक वेगळाच गंध दरवळत असे...... तो गंध म्हणजे दसरा!

Monday, April 11, 2016

ज्याची त्याची लय

आपल्या जगण्याची, आपल्या आतली, आपली अशी एक मुळातली लय असणार......
प्रत्येकाची वेगवेगळी.
घड्याळाच्या काट्याशी बांधलेलं आयुष्य नको. तब्येतीत जगूया.
जिथे रेंगाळावं वाटलं तिथे रेंगाळायचं, जिथून घाईने निघावसं वाटेल तिथे फार थांबायचं नाही.
जे काही शोधावं वाटेल ते शोधायला जायचं...
मुख्य म्हणजे विचार करायचा.
त्याची संगती लावायची.

कोणी म्हंटलं विचार करणं थांबव, तर ते काही शक्य नाही.
चार लोकांना नाही पडत असे प्रश्न पडले तरी त्यांच्यामागे जायचं.
सुसंगतीच्या मागे धडपडताना विसंगतीच ठळक होत जाते.
त्याचेही नियम शोधायचे.
मजा येते.

स्वत:च्या आत रमायचं असेल तर आजूबाजूला शांतता हवी.
जगण्याचा वेग कमी हवा.

स्वत:साठी वेळ हवा.

काय करायचं?
पहिल्यांदा जगासाठीची दारं बंद करायची.
खिडक्या उघड्या ठेवायच्या. त्याही हव्या तितक्याच.
टीव्ही बंद. चॅनेल्स बंद. माहितीचा सततचा ओघ थांबवायचा. वर्तमानपत्र पुरेत.
लॅन्डलाईन पुरेशी आहे. मोबाईल बंद.
मेल्स पुरेशा आहेत, फेसबुक, व्हॉटसअप बंद.

माणसं आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन गप्पा मारून गेली.
त्यांचा आपल्या आयुष्यातला सहभाग तेवढाच ठरलेला होता.
नाहीतर जोडून राहिली असती, तशी राहिलेली काही आहेतच की!
जुन्या माणसांना नव्याने शोधायला नको, ती स्वत:हून आली तरी नकोत.
नव्या अनोळखी माणसांशी तर ओळखच करून घ्यायला नको.

अशी माणसं आपला वेळ कुरतडत बसतात,
सावध राहून त्यांना थांबवायचं.
बरीचशी माणसं ’हाय-हॅलो’ पुरतीच असतात.
मर्यादा घालून द्यायची.
शेवटी हे आपलं आयुष्य आहे.

माझं आयुष्य आहे.
काळ तर असा आला आहे की रेडिओवरचे निवेदक देखील मैत्री असल्यासारखे गळ्यात पडायला लागतात.
रेडिओ बंद करायचा.
शहरभर विखुरलेल्या, उन्हा- वार्‍या - पावसात उभ्या असलेल्या फलकांवरील जाहिरातीतील आकर्षक हसर्‍या स्त्रियांना आणि पुरूषांना एका दृष्टीक्षेपात बाजूला सारायचं.
त्वचेवरील रंध्र नि रंध्र दाखवू शकणार्‍या फोटोग्राफीमुळे अचंबित व्हायचं.
शहराच्या विद्रुपीकरणाची काळजी करायची आणि
माणसाची नस पकडू पाहण्यार्‍या जाहिराती ज्यांच्यासाठी बनवल्या आहेत त्या माणसांच्या मानसीकतेचा विचार करायचा असला तर तो डोळे मिटून करायचा.

आपल्या लयीत पुस्तके बसतात..... निवान्त वाचायची.
माणसांशी समोरासमोर गप्पा माराव्याशा वाटल्या तर मारायच्य़ा,
त्यांची लढाई समजून घ्यायची.

तात्पर्य काय? आपली आपली स्वत:ची आतली लय शोधून काढायची,
त्या लयीत जगायचं.
ना त्याहून संथ ना त्याहून वेगात.

अशा तारा जुळल्या की त्यातून आपलं आपलं असं संगीत तयार होईल.
त्या तालावर थिरकता येईल.
समही गाठता येईल.


******