Tuesday, December 13, 2011

जोशी सर

आम्हांला आठवी, नववी, दहावीला गणिताला जोशी सर होते. (आमच्या शाळेत दोन/तीनच सर होते, बाकी सगळ्या बाई.)

आठवीपासून गणित म्हणजे ’बीजगणित + भूमिती ’ सर छानच शिकवित. सगळ्यांना समजेल असे, कळेल असे. त्यांनी नविन धडा शिकवायला घेतला की त्यादिवशी मजा यायची, मुलींकडून उत्तरे काढून घेत ते शिकवायचे. त्यांचं अक्षर छान होतं. फळ्यावर शिस्तीत लिहित. प्रमाणबद्ध आकृत्या काढीत. भरपूर सराव करून घेत. सिद्धता शिकायला मला खूप आवडायचं. त्यांच्या तासाला लक्ष दिलं तर गणिताचा काहीच अभ्यास करावा लागत नसे. ते ज्या वर्गांना शिकवीत त्या वर्गाचा गणिताचा निकाल सुधारत असे. शाळेत त्यांचा दबदबा होता. ज्या तुकड्यांना ते शिकवित नसत त्या मुलींचं , ’तुम्हांला काय बाई, जोशी सर!" असं असे. शिवाय ते खाजगी शिकवण्याही घेत. त्यांचा क्लास तुफान चालत असे. त्यांचे विद्यार्थी विद्यार्थिनी मेरीटमधे येत.

त्यांची मी आवडती विद्यार्थिनी होते, असं मुली म्हणत, गणितात मी पहिली येत असे. मार्क मिळविणारी मुलं पूर्वीच्या काळी शिक्षकांना आवडायची. पण त्यांच्या वर्गावर्गातून आणि क्लासमधल्या मिळून बर्‍याच आवडत्या विद्यार्थिनी असतील. त्या निवडक पाच सात मुलींपैकी मी एक असेन. मला त्याचं काही नव्हतं आणि त्यांनाही.

मी त्यांचा क्लास लावला नाही. शिक्षकांनी खाजगी शिकवण्या घ्याव्यात हे मला पटायचं नाही. एक समांतर शिक्षणव्यवस्था आपण उभी करतो, ती करू नये असंच माझं मत होतं. असे शिक्षक क्लासमधे जीव ओतून शिकवतात आणि शाळेत वेळ मारून नेतात, आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना स्वत:चा क्लास लावायची सक्ती करतात, असा एक प्रवाद होता. शिक्षकांनी असं शिकवावं की क्लासची गरजच पडू नये ना! असं मला वाटे. जोशी सर वर्गातही छानच शिकवित, त्यांनी मला कधीही त्यांचा क्लास लावायला सांगितलं नाही किंवा आडून सुचवलंही नाही.

आठवीत साठटक्के मुलींनी क्लास लावलेला असायचा. नववीत ऎंशी टक्के आणि दहावीत तर कुठल्याही विषयाला शिकवणी न लावलेली अख्ख्या दहावीत मी एकटी मुलगी होते. आमच्या दहावीच्या सहा तुकड्या होत्या आणि प्रत्येक वर्गात सरासरी ७० मुली!

हळूहळू आमच्यात एक नातं तयार होत गेलं. अवघड गणितं सोडवायला मजा येणार्‍या निवडक मुलीच असायच्या. कधी ते अवघड गणितं आम्हांला सोडवायला घरी देत. फळ्यावर गणित सोडवून दाखव, हा ही एक प्रकार असायचा. सरांनी नेटक्या लिहिलेल्या गणिताखाली मी कितीही प्रयत्न केला तरी माझ्या ओळी तिरप्या जात. माझ्या जागेवर येऊन बसल्यावर जेव्हा मी फळ्याकडे पाहात असे तेव्हा माझे आकडे किती नवशिके आहेत हे माझ्या लक्षात येई.

मी एकदा मैत्रिणीशेजारी शेवटच्या बाकावर जाऊन बसले. वर्गात आल्या आल्या त्यांनी माझ्या जागेकडे पाहिलं, मी आले नाही असंच त्यांना वाटलं. गणित घातल्यावर त्यांना दिसलं, मी मागे बसले होते. त्यांना आवडलं नाही. ”गणित झालं आहे त्यांनी हात वर करा’ ते म्हणाले. माझं झालं नव्हतं. सर मागे माझ्याजवळ आले, ” काय झालं?" ”सर, मला आकडे स्पष्ट दिसत नाहीयेत." त्यांनी मला गणित सांगितलं, मी ते सोडवलं. मला म्हणाले, ” उद्या डोळे तपासून घे." .... मला चष्मा लागला.

आम्ही मिळून गणित सोडवायचो तेव्हा मजा यायची. गणित घातलं की त्यांना ते विशिष्ट वेळेत माझ्याकडून सोडवून हवं असायचं. मग ते मला ’विद्या, चार मिनिटं राहिलीत, तीन मिनिटं राहिलीत’ अशी आठवण करून द्यायचे.

दहावीत असताना असंच त्यांनी एक गणित घातलं, माझं झाल्यावर मी ते फळ्यावर सोडवून दाखवलं. ते असे फळ्याकडे पाहात राहिले आणि म्हणाले, ’ ह्या प्रकारचं गणित सोडवायच्या तीन पद्धती मला माहीत आहेत, तू ही चौथी रीत शोधून काढली आहेस. या पद्धतीने सगळ्यात कमी वेळ लागतो, इतर मुलींनाही मी हीच पद्धत सांगेन." असेच मिनिटभर माझ्याकडे कौतुकाने पाहात राहिले, तास संपला होता, गेले.

’तर्क’ मी त्यांच्याकडून शिकले असेन. आपण जी स्थिती मांडतो आहोत, ती कुठल्या मर्यांदामधे सत्य आहे, हे सांगितलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. एकदा तर्क तुमच्यात कुठल्याही मार्गाने, समजा गणिताच्या, शिरला की सगळीकडेच तो त्याचे अस्तित्व दाखवून देतो. भाषेतही उतरतो. मग आपल्यासाठी तर्क जाणणारे/अवलंबणारे आणि इतर, असे माणसांचे दोन गट पडतात.

आपल्या आवडत्या विषयाच्या, आवडणार्‍या सरांनी, शिकवण्या घ्याव्यात! छे! मी त्यांना भाव देत नसे. ते माझ्याशी मायेनेच वागत.

एकदा मी आणि आई, कपडे घ्यायला गेलो होतो. तिथली एक मिडी मला खूप आवडली. सॉफ्ट जीन्सची, हिरव्या रंगाची, त्यावर पांढरा टॉप होता, मेघा स्लिव्हजचा, बंद गळ्याचा. मी इतक्या छोट्या बाह्या वापरत नसे, शिवाय त्या मिडीची उंचीही कमी होती, जेमतेम गुडघ्यांपर्यंत, आई म्हणाली, ” घालशील का? तरच घेऊ, नाहीतर दुसरी बघ.” मी म्हणाले, " हो घालेन. मला हीच हवी आहे." घरी आल्यावर घालून बघितली तर उंचीला कमी होतीच पण अंगातही घट्ट बसत होती. मला ती इतकी आवडली होती की परत करायचीच नव्हती. मी ती शाळेत घालून गेले. मैत्रिणींचं वा वा, नऊ बुक्के देणं, झालं. जोशी सरांचा तास होता. गणित झालेली वही दाखवायला मी त्यांच्याजवळ नेऊन दिली, त्यांनी एकदा माझ्याकडे पाहिलं. मला कळलं, मी घातलेले कपडे त्यांना आवडले नव्हते. ते बोलले काहीच नाहीत. माझी चिडचिड झाली, हे काय? यांना काय करायचंय? आणि बाकीच्या मुली काहीच्या काही घालतात, ते बरं यांना चालतं, हे सगळं मनातल्या मनात!
त्या मिडीत मला वावरायला अवघड होत होतं, नेहमीसारखं धावणं तर सोडाच भरभर चालणंही शक्य नव्हतं. आईला ती मिडी आवडली नव्हती, सरांना आवडली नव्हती मग माझंही मन उतरलं. घालते म्हणाले होते म्हणून मी चार वेळा घातली असेल, नंतर तशीच नवी पडून राहिली. पुढे आईने तिची उशीची खोळ शिवली.

दहावीत एकदा असं झालं, की एक सोपा धडा सरांनी मी शिकवणार नाही, तुमचा तुम्ही करा, करू शकाल असं सांगितलं. मधल्या सुट्टीत एका चिंतातूर मुलीने धडा काढला आणि "काय गं, विद्या, कसा जमणार?" म्हणाली. धडा खरोखरच सोपा होता. पण सरांनी शिकवायचा नाही, म्हणजे काय? सगळ्या मुलींना जमेल का? आणि त्यांच्या क्लासमधे ते असंच सांगतील का? वा! असं नाही चालणार! सरांनी शिकवलाच पाहिजे. आम्ही मुलींनी हे सरांना सांगायचं ठरवलं. सगळ्याच मुलींचा पाठिंबा होता. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? अर्थात मीच! मला या गोष्टींची हौस होतीच.
सर आले, त्यांनी पुढचा धडा शिकवायला घेतला. मी उठून उभी राहिले आणि गाळलेला धडा शिकविण्याची विनंती केली. ............ सरांचं आणि माझं एक जोरदार भांडण झालं. विशेषत: हा धडा स्वत:चा स्वत: करायला कुणाला जमणार नाही? असा प्रश्न विचारल्यावर जे चार सहा हात वर झाले त्यात माझाही एक होता हे पाहिल्यावर हे ठरवून चाललंय याची त्यांना कल्पना आली. त्यांनी थेट मलाच लेक्चर द्यायला सुरूवात केली, दहावीचं वर्ष आहे, नसत्या गोष्टींत वाया घालवू नकोस, तुला कुठलीही शंका आली तर केंव्हाही माझ्याकडे ये, तुला दीडशेपैकी दीडशे मिळवायचे आहेत, बाकीच्या मुलींचं काय ते त्या बघून घेतील.......... मी असं वागावं याचं त्यांना खूप वाईट वाटलं, मलाही मी जास्तच आगाऊपणा केल्याचं जाणवलं.
आमच्या हट्टापायी त्यांनी तो धडा थोडक्यात घेतला.

ते आमच्या गल्लीतच थोडं पुढे राहात. क्वचित एक दोन शंका विचारायला मी त्यांच्याकडे गेले असेन.

नववी दहावीत कधीतरी, एका तासाला, त्यांनी शिकवायचं सोडून, स्वत:ची गोष्ट सांगायला सुरूवात केली. ते बीडचे, घरची गरीबी, पण हे हुशार, बारावीला चांगले मार्क्स पडले, इंजिनीअरींगला नंबर लागलेला, पैशांची सोय होत नव्हती म्हणून बीडलाच नोकरी करत BSc केलं, पुढे MSc, वगैरे वगैरे.

दहावीच्या सेन्डऑफला आम्ही सगळ्या रडलो. सरांचेही डोळे पाणावले.

माझं मेरीट एका टक्क्याने गेलं. मला खूप वाईट वाटलं. माझी बक्षिसे घ्यायलाही मी शाळेत गेले नाही. पुढे अकरावी, बारावी मग इंजिनीअरींगची धमाल! मी सरांना पूर्ण विसरले. कधी कधी सर दिसत. त्यांच्या घरी बरीच माणसे होती. दोघांना घरात बोलता येत नसेल, सर आणि त्यांच्या मिसेस कधी कधी फिरायला गेलेले किंवा टेकडीवर गप्पा मारताना दिसत. एक दोनदा खालच्या वर्गातल्या मुलींनी सांगितलं, ”वर्गात सरांनी तुझं उदाहरण दिलं, तुझा विषय काढला."
SE किंवा TE ला असताना मी चार दिवस गावाला गेले होते. आल्यावर कळलं, सर गेले! हार्टअटॅक! मी सुन्न झाले! वय काहीच नव्हतं, फारतर पंचेचाळीस.
आतून रिकामं रिकामं वाटायला लागलं.
सर मला आवडायचे, ते चांगलं शिकवायचे, मला त्यांच्याबद्दल आदर होता. त्यांना कळायचं, हे त्यांना कळलं असेल?
वेळच्या वेळी माणसांशी बोललं पाहिजे!

Saturday, December 3, 2011

मराठे बाई

सहावी, सातवीला भूगोल शिकवायला आम्हांला ’मराठे बाई’ होत्या.
उंचीला कमी, स्थूल, कुरूळ्या पातळ केसांची एक वेणी घालायच्या. गोरा रंग आणि मध्यम आकाराचं कुंकू. त्यांची पर्स म्हणजे खादीची शबनम. जरा हळू चालायच्या, गुडघे दुखत असतील.

क्वचित नकाशे घेऊन यायच्या. आम्ही आमच्या भूगोलाच्या पुस्तकातले नकाशेच बघायचो. फळ्यावर त्यांनी कधी फार काही लिहिलं नाही. आल्या की खुर्चीवर बसायच्या. आमचं ’एक साथ नमस्ते’ झालं की हाताने आम्हांला बसायची खूण करायच्या. गप्पा मारत तास सुरू व्हायचा. आमची जगाची सफर सुरू व्हायची.
गवताळ प्रदेश, टुंड्रा प्रदेश, विषुववृत्तीय जंगले, अमेझॉनचं खोरं आणि सहाराचं वाळवंट .......... त्या आमच्या डोळ्यासमोर उभं करीत. त्या कधीही तयार उत्तरे देत नसत. आम्हांला शोधायला लावीत. आधी विशिष्ट भौगोलीक परीस्थिती कशी तयार होत असावी यासंबंधी काही सांगत तेव्हढ्यावरून तिथल्या वनस्पती, तिथला समाज, रितीरिवाज यांची सांगड घालत, आमच्याकडून उत्तरे काढून घेत शिकवीत.

त्यांनी घेतलेला ’थरचे वाळवंट’ हा तास अजून मला आठवतो. पुरेसं पाणी नसेल, वाळूच वाळू आजूबाजूला.... काय करतील माणसं?, प्राणी? झाडं?....... पुढचे काही दिवस पाणी सांडताना माझा हात थबकायचा.
कुठलाही समाज भूगोलाच्या साथीनेच वाढतो ना?

त्यांच्या तासिकेला मी खूप रमून जात असे. मला मजा यायची, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला, कल्पना करायला... बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मीच द्यायची. त्यांचा माझा संवाद .... असाच तास असे बरेचदा... तशी काही मी त्यांची लाडकी विद्यार्थीनी नव्हते. मराठीच्या बाईंची होते, गणिताच्या बाईंची होते, पण मराठे बाईंची? नाही. तसं नसेल ... आज मला वाटतं, मी होते त्यांची खास विद्यार्थीनी.... आमच्यात एक नातं होतं. आम्ही दोघींनीही ते कधी जाहीर केलं नाही. मी एखादं छान उत्तर दिलं ना! की त्यांच्या डोळ्यात कौतुक दिसे. बाकी इतर वेळी मलाच कामं सांगायची किंवा मीच हवी, असं त्यांचं नसायचं. त्यांना कुणीही चाले. आम्ही एकमेकींना समजून होतो.... हे मला आज कळतंय.

त्या परीक्षेच्या दृष्टीने फार तयारी करून घ्यायच्या नाहीत. त्या वहीत काही उतरवून देत नसत. प्रश्नोत्तरे सोडवा, एवढंच सांगत. वर्गातल्या मुलींना त्यांचा तास आणि त्याही फार आवडायच्या नाहीत. त्या नावडत्या होत्या असंही नाही. आमच्या गप्पांत त्यांचा विषय आणि त्या फारशा नसायच्या. शाळेतही त्या फारशा चर्चेत नसायच्या. कुठल्या बाईंची मुले काय करतात, त्या कुठे राहतात, शाळेत कशा येतात अशी माहिती आमच्याकडे असे. मराठे बाईंची घरगुती माहिती आम्हांला नव्हती, ती शोधावी इतका रस कुणी दाखवला नाही. मराठे बाई काही नीट शिकवत नाहीत, कळत नाही, असं मुली कधी मांडत असता, मी बाईंच्या बाजूने बोलले नाही. याची रूखरूख मला तेव्हाही वाटत असे.

एकदा काही कारणाने मी दोन दिवस शाळेत गेले नव्हते. कशासाठीतरी वर्गातल्या दोन मुलींची निवड करायची होती. आमच्या वर्गशिक्षिका बाईंनी दोन मुलींची निवड केली, त्यात मी नव्हते. शाळेत गेल्यावर मला हे कळलं. मला वाईट वाटलं. माझ्या मैत्रिणींनी हे फारच मनावर घेतलं. त्यादिवशी मी नसले तरी बाईंनी माझी निवड करायलाच हवी होती असं त्यांचं म्हणणं पडलं. मग काय! मला डावलल्याचं , आणखीनंच वाईट वाटायला लागलं, मी रडायला सुरूवात केली. मुलींनी सहानुभूती दाखवायला सुरूवात केल्यावर मला रडं आवरेना. मग गणिताच्या तासाला, इतिहासाच्या तासाला त्या त्या बाईंनी मला समजावलं, ’बरोबरच आहे, तू नव्हतीस, त्यामुळेच" वगैरे वगैरे... मग भूगोलाचा तास होता. मराठे बाई आल्या. मी बाकावर डोकं ठेवून शोकमग्न! "काय झालंय?" बाईंनी विचारलं. मुली तयारच होत्या, त्यांनी सांगितलं. मी हळूहळू डोकं वर काढलं. बाई माझ्यावरच ओरडल्या,"काय हा वेडेपणा? एवढं रडण्यासारखं त्यात काय आहे? अशा साध्या गोष्टींनी तू मोडून पडणार आहेस? रडून रडून डोळे किती सुजवून घेतलेस, पाहिलंस का? उद्या मोठी होशील तेव्हा हे घडणारच आहे ना! अपमान झाला की काय करशील? अपयशी झाल्यावर काय करशील? तुझ्या हक्काचं तुला मिळणार नाही, तेव्हा काय करशील? नेहमी आपली चूक असते, असं नसतं बेटा, भोगावं लागतंच. किती रडशील?" ..........बाई खूप वेळ बोलत होत्या... काही माझ्याशी, काही वर्गाशी, काही स्वत:शी........ शेवटी मला सांगितलं, "रडायचं नाही. जा, डोळे धुवून ये."

मराठे बाई कुठे असतात, मला माहित नाही. दहावीनंतर आमची भेट झालेली नाही.

बाई, मला तुमची आठवण येते.

Monday, October 17, 2011

वाट पाहणे

वाट पाहण्यात एक मजा आहे... आपण ती लूटू शकलो तर!
आपण काही गोष्टींची वाट पाहतो ज्या निश्चित घडणार असतात.
काही गोष्टींची वाट पाहत असतो... त्या घडणार आहेत की नाहीत? आपल्याला माहित नसतं.

आपण पावसाची वाट पाहतो... तो येणार आहे, निश्चित येणार आहे. कधी? कसा? वेळेवर? अवेळी? पुरेसा? अपुरा?.....
वाट पाहायची तर आपल्याकडे वेळ असावा लागतो.
आपली वृत्ती ’माझ्या तालावर जगाने चालावं’ अशी नसेल तर प्रत्येकाला आपण त्याच्या नैसर्गीक गतीने पुढे येण्याची मुभा देतो.

आमच्या लहानपणी आमच्याकडे काहीही मागीतलं की लगेच मिळण्याची/ आम्हांला ते आणून देण्याची पद्धत नव्हती. ते शक्यही नसायचं.
नव्या गोष्टींचं अप्रूप होतं.
मी आठवीत गेले की मला सायकल मिळणार असं ठरलेलं होतं.
मी सहावीत असताना विश्वासला सायकल आणली होती. तो फारच रूबाब करायचा. मला माझी सायकल मिळायला अजून दोन वर्षे होती. माझे वाट पाहणे सुरू झाले.
मला त्याची सायकल वापरायला मिळावी म्हणून मी त्याची मर्जी राखत असे, सायकल पुसत असे, मग मला एखादी चक्कर मिळायची....
मी आठवीत गेले तेव्हा मला सायकल घेतली, फिलिप्स कंपनीची काळ्या रंगाची २४ इंची लेडीज सायकल, पायाला चाकं लावल्यासारखी मी कुठेही सायकलवर जात असे, गल्लीतल्या मैत्रिणींकडेसुद्धा!, सीटवर बसल्यावर माझे पाय पुरत नसत, सायकल आली आणि गती आली जगण्यात, औरंगाबादेत चढ उतार फार, जीव खाऊन चढ चढला की उतारावर नुसतं बसायचं. "मी फार वेगाने सायकल चालवते" अशा तक्रारी क्वचित घरी येत. सायकल चालवून चालवून किती जोरात चालवणार?? दोन्ही हात सोडून हाताची घडी घालायची असे प्रयोग मी फारसे करीत नसे. शाळेत सायकलस्टॅंडवर सायकल लावली तरी माझ्या मनात सायकल असे. आपल्याला बसने जायचे नाही, त्यामुळे बसस्टॉपवर न जाता, दप्तर कॅरीअरला लावायचं. ओढणी बांधायची आणि निघायचं. निघताना शाळेजवळ खूप सायकली असत, स्लो सायकलींग, अगदी हळू सायकल चालवायलापण मजा येते. सायकल पडू द्यायची नाही, पाय खाली टेकवायचा नाही, स्टॉपवर जाणार्‍या मैत्रिणींबरोबर त्यांच्या चालण्याच्या गतीने सायकल चालवायची. पुढे कधी या रस्त्याने तर कधी त्या रस्त्याने घरी यायचं. पहिल्यांदा मा्झ्याशी माझी भेट सायकलनेच घडवून आणली असावी. सायकलवर असतो तेव्हा एकटे अगदी एकटे असतो आपण, मग स्वत:शी बोलता येतं काय काय.....
सायकलची मी खूप दिवस वाट पा्हिली आणि ती मिळाल्याचा आनंद, ती मजा अजून आठवते. नंतर कुठल्याही वाहनाने तो आनंद मला दिला नाही. मीही कशाची इतकी वाट पाहिली नाही.

आम्ही सणांची, त्यात दिवाळीची खूप वाट पाहायचो. धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री उद्या लवकर उठायचे आहे, अभ्यंगस्नान, दिवाळी सुरू ... अशी स्वप्ने पाहात झोपायचं.... भाऊबीजेच्या रात्री , दिवाळी जाताना हुरहूर लावून जायची.
परीक्षा संपून सुट्या लागायची वाट पाहायचो.

सतत कशाची ना कशाची वाट पाहणं सुरूच असतं ना?

वाट पाहता पाहता आपण चिडायला लागलो ना? तर खेळातली मजा गेली.

साधी सिगनलवर वाट पाहण्याची गोष्ट. समोर सेकंद दिसत असतात तरी लोक चिडतात, अधीर होतात. अशावेळी मी एक खेळ खेळते. समोरच्या सेंकंदांच्या गतीने इकडे तिकडे पाहात आपण आकडे म्हणायचे. २० सेकंदांनंतर आपल्या मनातला आकडा आणि समोरचा आकडा, जुळतात का ते पाहायचे, किंवा आणखीही काही खेळ खेळता येतात. उदा. बंद केलेली गाडी शेजारचा स्कूटरवाला किती सेकंद उरलेले असताना सुरू करेल? या वेळेवरून त्या माणसाच्या स्वभावाचा एक अंदाज बांधता येतो.
सकाळची वेळ, एकदा पौड फाट्याच्या सिग्नलसाठी किमया पासूनच थांबायला लागलं. ’काही इलाज नाही" स्वत:ला सांगत होते, सिग्नल इतका दूर होता, दिसतही नव्हता. आजूबाजूचे लोक वैतागलेले, प्रत्येकजण वेळेचं गणित करत असणार! कोणी उगाचच हॉर्न वाजवत होतं. एक मुलगी स्कूटी बंद करून हाताची घडी घालून उभी, वा! ... कुणी त्या थांबलेल्या गर्दीतही जमेल तितकं पुढं जायचा प्रयत्न करत होतं. तीन सिग्नल्स तरी थांबायला लागणार! माझ्या शेजारच्या रिक्षात कुणीतरी दोघे. त्याची बॅग, तिची पर्स, हातात हात. यांना दोघांना तीन काय चार सिग्नल थांबायला लागलं तरी चालणार आहे. या गर्दीपेक्षा हे दोघे वेगळे आहेत. मी विचार केला, चला, आज या दोघांसाठी हा दहा मिनिटे उशीर आपण चालवून घेऊ या. मग छानच वाटायला लागलं.

कुणी गावाहून येणार असलं, विशेषत: बाबा, तर आई, दाराच्या कडीला पळी लावून ठेवायची किंवा खुंटीला तांब्या लावायची. ते वेळेवर सुखरूप यावेत म्हणून!.. आज गंमत वाटते पण अंधश्रद्धांमधे कशी काळजी आणि प्रेम असतं ना!
आपण अंधश्रद्धा सोडल्या .......... हे अबोल व्यक्त होणंही थांबवलं.

कुणा येणाराची वाट पाहणं, सारखं आतबाहेर करणं.. हे ही थांबलंय. मोबाईलमुळे कळतंच ना! "येणारा आत्ता कुठवर आला असेल" चा खेळ खेळायला मजा येते.

सगळ्यात आनंददायी असतं येऊ घातलेल्या बाळाची वाट पाहणं.

वाट पाहण्याचा आलेख असाच असतो ना! वाट पाहायची, खूप वाट पाहायची, खूप खूप वाट पाहायची, ज्याची वाट पाहिलेली असते तो क्षण येतो आणि जातो, तो आठवत राहायचा,

ठरवलेला कार्यक्रम व्यवस्थित पार पडला की नंतर थकवा येतो, असा थकवा मला खूप आवडतो.

आणि वाट पाहणंही आवडतं, ते लांबलं तरी आवडतं, ज्याची वाट पाहतोय ते अजून घडायचं आहे!

वाट पाहणं...... मस्तच ना?

Friday, September 23, 2011

डोहकाळिमा

कोथळीगडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी दगडातून काढलेल्या पायर्‍या आहेत! गुडघ्यापेक्षाही उंच, एकावेळी एक पायरी चढणे मुष्कील.
दगडी पायर्‍या ओलसर... दगडी भिंती शेवाळलेल्या... वरून येणारा प्रकाशझोत...
पायर्‍या संपल्या असाव्यात असं वाटताना एक वळण.... पुन्हा पायर्‍या....... आता डोक्यावर नेहमीचं आकाश!
कठड्यावरून बाहेर पाहिलं तर आहा!
आम्ही कितीतरी उंचावर..... छोटी छोटी शेतं, तळी, डॊंगर, खालून पंख पसरून उडणार्‍या घारी!
वर काय असणार आहे? कुणास ठाऊक?.............. नाही कसं?
भन्नाट वारा... विस्तारलेलं क्षितीज.... कूठून चालत चालत आलो याचा एक अंदाज घ्यायचा... पोचल्याचा आनंद आणि परतीचे वेध!..
एका दगडी दरवाज्यातून वर पोचलो.
वाढलेलं गवत त्यातून एक छोटी पायवाट.....
गड किल्यांवर जाणे म्हणजे एक ’खजिना शोध’ खेळच असतो!
खजिना कुठल्या टप्प्यावर कुठे दडलाय? मुळात आहेच की नाही? काहीच माहित नसतं.
आपण नि:संग वृत्तीने चालत राहायचं... खजिना शोधायला निघालोच नाही,असं! .....चालता चालता इतके दमतो ना आपण.. काय शोधतोय.. कशाची वाट पाहतोय.. विसरायला होतं...... काही अपेक्षाच उरली नाही अशा बिंदूला पोचलो की..... अवचित खजिन्याचं दार उघडतं.
.....पायवाटेने जरा चालत गेलो तर.... उजव्या बाजूला एक लहानसं तळं..... झाडांनी आच्छादलेलं. अविश्वसनीय! डोळ्यांची तयारीच नव्हती, इतकं सुंदर काही पाहण्याची! ......पाहिल्या न पाहिल्यासारखं करून... बाजूने एक चक्कर मारली. बस! एवढासच आहे बालेकिल्ला! जिथून तळ्यातलं पाणी दिसत नव्हतं अशा जागी बसले होते. वारा पडलेला. खूप उकडत होतं, जवळचं पाणी संपलेलं. तळ्यातलं न घेता येण्यासारखं...
तळ्यावर छाया धरून असलेली ती झाडं दिसत होती. खरंच इथे तळं आहे? की नाही? थोडावेळ नुसतंच पाहात राहिल्यानंतर , झाडातून वाट काढत पाण्याजवळ गेलो. कुठलीतरी अदृश्य कालरेषा ओलांडून आदिम काळात पोचल्यासारखं वाटत होतं. एखादी सुंदर कविता असावी तसा तो डोह होता! शेवाळी काळं पाणी, ते जिवंत असल्याच्या खुणा सांगणार्‍या इवल्या इवल्या मासोळ्या. कधीकाळी माणसांनी तो बांधून काढला होता. आता मात्र अस्पर्श....बाजूने ती झाडे... रानकेळीची, उंबराची, समोर पाहिलं तर जुनी ओळख विसरून उभा असलेला पिंपळ. अगदी कडेवर! खुशाल आपली मुळं पाण्यात सोडून, ती मिरवत असलेला, पाण्यात त्याचं प्रतिबिंब! ”खाली शाखा वरी मूळ” झाडांनी काय, माणसांनी काय, मर्यादेत असावं. इतक्या कडेवर, इतक्या ताठपणे आपणं कुठल्या पाण्यावर जगतोय ते दाखवणारं झाड! ...... कधीकाळी या डोहाच्या काठानं एखादी कथा उमलली असेलही... सुखांतिका असेल की शोकांतिका... कोण जाणे.... या डोहाइतकी अस्सल असेल हे नक्की!.... कथा प्रवाहात वाहून गेली पण कविता अजून शिल्लक आहे......
पाणी प्यायलो .... आणि निघालो.....
त्या दगडी पायर्‍या चढून, त्या डोहाला भेटायला कुणी कुणी जाईलही. मी मात्र पुन्हा कधी तिथे जाणार नाही. तो डोह असेल, ती त्याच्यावर माया करणारी झाडं असतील, ती मुळं असतील, त्या मासोळ्या असतील.... पण कदाचित ते पिवळं पडलेलं केळीचं पान तिथे असणार नाही. माझं मन तेच शोधत बसेल, मी तिथे जाणार नाही. ...... आणि ती उत्सुकता, बेपर्वाई, .... ती पुन्हा जाताना माझ्यात असूच शकणार नाही! नव्या अनुभवाचं घर मला तिथे बांधायचं नाही..... मी तिथे पुन्हा जाणार नाही.

Tuesday, July 5, 2011

ब्रह्मकमळ

ब्रह्मकमळाबद्दल मी कुठे कुठे वाचलं होतं. कुणाकुणाकडून ऎकलं होतं. वाटायचं कधीतरी पाहिलं पाहिजे! ....इतकंच. ओढ नव्हती लागली.
हे ’खरं’ ब्रह्मकमळ आहे की नाही ही चर्चा नंतरची. हे फड्या निवडूंगाचं झुडूप आहे, ते हिमालयातलं खरं ब्रह्मकमळ इथे लागत नाही/ रूजत नाही. वगैरे....
खर्‍या ब्रह्मकमळापेक्षा ही निवडुंगाची फुलं देखणी असतात आणि त्यांचा मंद सुवास हुरहूर लावतो एवढं खरं!
........

आपल्याला फुलं पाहायची सवय असते , त्या फुलांचे देठ / कळ्या फांद्यांना येतात... रितसर.
कधीही फुलाचं चित्र काढायला सांगितलं की फूल काढायचं, त्याला एक दांडी, खाली काही पाने....
ब्रह्मकमळाचं तसं नाही. एक पान... पानाच्या कडेच्या टोकातून कळी उगवते... वरच्या दिशेने नाही तर खालच्या दिशेने वाढते... एके दिवशी वळण घेते.... आणि पानाच्या नव्वद अंशाच्या कोनात फूल उमलतं... पानाखाली झोके घेणारं.....
........

संगमनेरला ब्रह्मकमळाचं पान लावलं. नंतर तिथे फूल आलं ते नेमकं आम्ही गोकुळाष्ट्मीला गेलो होतो, त्याच्या दोन दिवस आधी! आम्हांला फूल पाहायला मिळाले नाही. ठीक आहे.
मग आत्यांनी एक पान आमच्या्कडे आणलं. दीडेक वर्ष तेवढं पान कुंडीत होतं. त्याचा रंग हिरवा असल्याने मी पाणी घालायचे. हे काही लागत नाही....., भाग्यश्रीकडे पाने फुटली होती.

दीडवर्षानंतर त्याला हळूच एक पान फुटलं. वा!
मग आणखी एक.... त्या पानाला आणखी एक..... अशी पाने फुट्त गेली.
कुंडी भरगच्च दिसायला लागली.
आता मी फुलाची, कळी कुठे फुटतेय का? याची वाट पाहू लागले.
एक सरळसोट दांडी वाढायला लागली. याला कळी येईल का? छे! ती चार फूट वाढून त्यालाही पानेच फुटायला लागली. मोराच्या पिसासारखी! आणखी काही हिरवी मोरपीसे तयार झाली.

कळी काही येत नव्हती. येणारही नाही कदाचित! असू दे. असंही झाड किती सुंदर दिसत होतं.
..... आणि गेल्या वर्षी जूनमधे एक कळी आली. मी सारखं पाहते तरी मला दिसली नव्हती, पाहिली त्यादिवशी चांगलीच मोठी झालेली. वा! डोळ्यासमोर असून कशी दिसली नाही!
रोज सकाळी उठून कळी किती मोठी झाली, हेच बघायचं. पानाला फुटलेली कळी खालच्या दिशेने वाढत होती, एके दिवशी अचानक तिने दिशा बदलली. कळीच्या देठाचा बाक कसला वळणदार असतो!
कळी छान टपोरी झाली. संध्याकाळी सात - साडेसातला खजिन्याचं दार उघडावं तसं हळू हळू पाकळ्या विलग होऊ लागल्या. आमच्या सारख्या आतबाहेर चकरा सुरू झाल्या. साधारण साडेअकराला ब्रह्मकमळ पूर्ण उमललं. त्याचा त्याला एक मंद असा छान वास असतो. कमळासारखंच.. पाकळ्या.. पाकळ्या.... एक परीपूर्ण पद्म!

.....ब्रह्मकमळ रूजत नव्हतं.... त्याला पानेच आली... फूल येतच नव्हतं...... आणि फूल आलं.....
बस! घडतं तेव्हा इतकंच असतं ते! .......

फुलायचं कसं हे झाडाला माहितच नव्हतं. एकदा ते रहस्य उलगडलं. मग सोपंच झालं. जुलैमधे फूल आलं, ऑगस्टमधे आलं, सप्टेंबरच्या शेवटी दोनतीन आली.
ऑक्टोबरमधे माळी म्हणाला, ” आता इतक्या उशीरा ही फुलं कशी आली?”
पुढे डिसेंबरातही आली. आता त्याला इतकं फुलायचं होतं की ऋतूंचंही भान उरलं नाही.
पुन्हा वेड्यासारखी मे मधे फुले आली.
त्या बेट्याला बाहेर काय चाललंय याच्याशी काही देणं घेणं नव्हतं, ते आपल्या आतच मग्न! असं वेडं झाड इतकं गोड दिसतं!

आता त्याला कळ्याही आल्या खूप! म्हणजे शंभर सव्वाशे! पानाच्या कडेने टोकाटोकाशी कळ्या!
एवढीशी कुंडी.... तेवढंच पाणी.... बाहेरच्या परीस्थितीचा विचार न करून त्याला चालणार नव्हतं...
किती माती... किती पाणी... किती फुलं..... काहीतरी गणित बघायलाच हवं ना?
मी गावाहून आले तर बर्‍याचशा मोहरीएवढ्या कळ्या काळ्या पडलेल्या!
असं सर्वांगांनी नाहीच फुलता येत इथे!
तू आजूबाजूची माणसं बघतोस का? न फुलता वाढणारी.... फुलण्याच्या शक्यता कोमेजतात त्यांच्या! .....पानांचे पिसारेदेखील फुलवू शकत नाहीत ते!

कळ्या कोमेजल्या तरी कोमेजल्या त्यापेक्षा जास्त हिरव्या होत्या. त्यातल्या काही मोठ्या होत होत्या. मोजल्या तर पंचवीस- तीस!
पहिल्या दिवशी तीन फुले आली. दुसर्‍या दिवशी चक्क पंधरा! फुलांचा वास पसरलेला! झाडाच्या अंगाखांद्यावर सगळीकडे फुले! झाड सजलेलं!
हे वैभव रात्रीपुरतं! सकाळी फुलं सुकून जातात. कुणीतरी म्हणालं ओला मलमलचा रूमाल फुलासमोर धरून ठेवायचा, नंतर तो एका बाटलीत पिळायचा. सुगंध साठवता येईल. मला तसं करावसं वाटलं नाही.
कुणी म्हणालं रात्री फूल तोडून डब्यात घालून फ्रिजमधे ठेवायचं. दुसर्‍या दिवशी तसंच राहतं. मला हे ही करावसं वाटलं नाही.
तिसर्‍या दिवशी अकरा फुलं उमलली. नीट फोटो काढता यावेत म्हणून हातात धरली तर मऊ मुलायम स्पर्श! सुगंध गच्चीत भरून राहिलेला.
एका पानाला तीन फुले होती! पानाला फुलांचा भार होत असणार?...... छे! ’प्रेमाचं ओझं’ असणार ते!
......

चौथ्या दिवशी सकाळी गच्चीत पाहवेना. तीसेक फुले सुकलेली.... पानांखाली लोंबत असलेली. आता नक्कीच हा भार! ही फुलं ना, गळूनही पडत नाहीत! चिवट पानाशी जोडलेली.....
काहीही जिवंत असतं तोवर हलकं, संपलं की त्याचं ओझं.........
काही काही प्रत्यक्षात संपलं तरी आठवणीत जिवंत राहतं.... मग त्याची आठवणही जिवंत, रसरशीत, सुगंधी.... जर आठवणीत संपून गेलं तर... त्या कलेवराचं ओझंच होत जाणार.....

नुसतं फुललेलं झाड कसं आठवणीत ठेवायचं? त्यापाठोपाठ असं उदास, निराश, अश्रू गाळणारं झाडही आठवणारच ना?
History + Edit items + Remove selected items .......... असं नाही ना करता येत!
प्रत्येक फुलत्या गोष्टीचा शेवट काय हे दाखवणारं, शहाणं करणारं झाड ते!
.......

आपल्याला शक्य झालं तर आपली फुले सुकली की वार्‍यावर सोडून द्यायची..... त्यांचा भार होऊ द्यायचा नाही. प्रत्यक्षात नाही आठवणीतही नाही......
.......

झाड अजूनही बर्‍याच मोहरीएवढ्या हिरव्या कळ्या धरून आहे. त्यातल्या काही आठ- दहा दिवसांत लवंगेएवढ्या होतील. मग आणखी मोठ्या होतील, एक दिवस फुलतील........
दुसर्‍या दिवशी सुकतील.....

फुलण्या सुकण्याच्या मधली अथांग काळी रात्र पसरलेली.... त्यावर उमललेलं सुगंधी शुभ्र कमळ.....
अशा काळोखात कुणी कुणी प्रकाशाचे कण धरून असतं... त्यातलं एक
अंधारावर विजय मिळवणारं नव्हे.... अंधार दाखवणारं
अशा काळोखात कुणी कुणी अस्तित्वाचे कण धरून असतं... त्यातलं एक
.......

Monday, February 14, 2011

इथल्या पिंपळपानावरती

आमच्या वाड्यात पिंपळाचं मोठ्ठं झाड होतं किंवा आहे किंवा असेलही अजून. मी तिथे गेलेले नाही गेल्या वीस-पंचवीस वर्षात!
आपण तीन फुटांवरून जग न्याहाळत असतो नां? तेव्हा सगळंच असतं मोठ्ठं, उंच! कुणीतरी आपल्याला उचलून घेतलं नां, की तेच जग पाच फुटांवरून पाहता येतं. आता जग असं वेगवेगळ्या पातळ्यांवरून पाहता येत नाही. (तेव्हा स्वप्नात उडता यायचं ते वेगळंच!)

तर आमच्या वाड्यात पिंपळाचं मोठ्ठं झाड होतं किंवा आहे किंवा असेलही अजून. असं आपल्या काळजात रूतून बसलेलं काही काढून दाखवायचं म्हणजे मोठं कठीण काम. जसं आत आहे तशीच त्याची प्रतिकृती शब्दातून उभी करता येईल याची खात्री नाही. त्या दिवसांत शिरायचं म्हणजे ती कोवळीक आत उरलीये की नाही याची खात्री नाही. हल्ली तर त्या दिवसांतली तीच का मी? याचीही खात्री नाही.

पण आमच्या वाड्यात पिंपळाचं मोठ्ठं झाड होतं किंवा आहे किंवा असेलही अजून. ते माझ्या लहानपणावर पाखर घालून उभं होतं. आपण कुणा आप्ताची ओळख करून देतो, तेच जुने घीसेपिटे शब्द वापरून.. फारतर आपला असा एक ’च’ लावतो, माझा’च’ आहे, असं म्हणत... म्हणून समोरच्याला कळतंच असं नाही. तर असं आहे... लिहिलं तरी रूखरूख न लिहिलं तरी रूखरूख.

***

आमच्या वाड्यात साधारण मध्यभागी एक पिंपळाचं झाड होतं. त्याला एक चौरस पार बांधलेला होता, चांगला तीन-साडेतीन फूट उंच, त्यावर कुणी बसत नसे. याचं एक कारण त्याची उंची, दुसरं पिंपळाच्या झाडाला आणि पारावर मोठे काळे मुंगळे असत, तिसरं म्हणजे तिथे एका कोनाड्यात देवघरात असावा तसा मारुती होता. आईने तिथे एक छोटी घंटा बांधली होती, जी वाजवायला मला खूप आवडे. आई मारूतीला रोज सकाळ-संध्याकाळ दिवा लावत असे. मारूतीसमोर बसून घंटा वाजवायची घाईघाईने (मुंगळ्यांना जवळ येऊ न देता) ’मनोजवम मारुततुल्यवेगम’ म्हणायचं आणि शेजारी उभ्या असणार्‍या आईच्या कडेवरच उतरायचं.
वरच्या मजल्यावर गेलं की तिथून वर पिंपळाला फांद्या फुटलेल्या होत्या. आकाशभर त्याची पानं पसरलेली होती. कदाचित त्या मुंगळ्यांमुळेच आम्ही कधी झाडावर चढत नसू. कठड्यावर बसून वर पाहिलं की ती पाने दिसत, मधे मधे कोरलेलं आकाश दिसे, आणखी बघत बसलो तर वर कावळ्यांची दोन- तीन घरटी दिसत. काही चिमण्यांची घरटी दिसत. संध्याकाळी हे पक्षी घरी परतत तेंव्हा नुसता कलकलाट करीत. सकाळी उजाडताच किलबिल ऎकू येई. पानांची सळसळ, समुद्राची गाज असावी तशी कायम सोबतीला असे.
पावसाळ्यात झाडच पाऊस पाडत आहे असं दिसे. मे महिन्यात वारं सुटलं की ते गदागदा हलत असे, अंगात आल्यासारखं.
कधीकधी कुठेतरी जाणारा पोपटांचा थवा विश्रांतीसाठी थोडावेळ झाडावर उतरत असे. पिंपळ झोकदार दिसे. कधी पांढर्‍या बगळ्यांचा थवा उतरे, आम्ही दोन्ही हातांची बोटे हलवत ’ बगळ्या बगळ्या कवडी दे, माळावरचा घोडा घे’ चं गाणं म्हणत असू. गाणं झालं की झटकन आपापल्या बोटांची नखे पाहात असू, बगळ्यांच्या मनात आलं तर ते एखाद दोन कवड्या देऊन जात. त्या सवंगड्यांना दाखवायच्या. मला एकटीला जर कवडी मिळाली तर मला आपण आकाशातल्या त्या बगळ्यांची खास मैत्रिण आहोत असे वाटे. ती एक कवडीदेखील दिवस आनंदी करून जात असे.
कधी माकडांची, वानरांची टोळी येई, वाडाभर धुडगूस घालून जाई. त्यांना म्हणायचेही गाणे होतेच. आम्ही भीतभीत किती माकडे आहेत हे मोजायचा प्रयत्न करत असू. पिंपळाला कुठे कुठे शेपट्या फुटलेल्या दिसत. उड्या मारताना माकडांची लहानगी पोरे आयांच्या पोटाला चिकटलेली असत.
कबुतरे येत, कधी एखादी घार कधी कोकीळ.... आम्ही काही वरंच पाहात नसू, पिंपळाखालच्या जगात आम्हांला अधिक रस असे.
बहुदा संक्रांतीच्या आधी पिंपळाची फळे पिकत नंतर ती टपाटप खाली पडत. अंगणभर ती फुटलेली फळे! त्यावर पाय़ ठेववत नसे, जपूनच चालावं लागे. कधी ही फळं संपणार असं होऊन जाई.
दाट सावली देणारा पिंपळ होळीच्या सुमारास आपली पानं गाळायला लागे. सुरूवातीस एक दोन चार पानं गाळणारा पिंपळ नंतर खूप पानं गाळून आठ-दहा दिवसांत रिकामा होत असे. हे पानगळीचे दिवस मला खूप आवडत. वाडाभर पानांचा खच. त्यावरून चालताना पानांचा कडमकुडूम आवाज येई. वाळली पाने म्हणजे खजिना असल्यासारखी त्यात मी काय काय शोधत बसे. क्वचित एखादं अख्खं जाळीदार पान सापडे. काही पानांना जाळं लागलेलं असे, काही पाने चित्रविचित्र प्रकारे वळलेली असत. काही पानांवर गाठी असत. त्या पानांमधे बसलं ना की गोष्टीत गेल्यासारखं वाटे. म्हणजे आईने, आजीने गोष्ट वाचली असेल त्यातही मी होतेच आणि पुढेही कोणी कोणी वाचली तर असेनच. गोष्ट म्हणजेच माझं घर. ..... असल्या कल्पना करत मला फार वेळ बसता येत नसे. आत्याबाईंना वाडा झाडून लख्ख करायचा असे. त्यांना वाडा झाडू नका, राहू देत की पानं तशीच, असं म्हणायची माझी हिंमत नव्हती. आठ दहा दिवस पाने तशीच साचू दिली तर! त्या पानांमधे बसायला, चालायला कसली मजा येईल!...
ही हौस मी स्वप्नात पुरवून घेत असे. स्वप्नांचं बरं असतं ना? आत्याबाईंना बाहेरच ठेवता येतं.
हे परीक्षांचे दिवस असत. आता शाळा संपेल, वर्ग बदलेल, आत्याबाईंनी एका कोपर्‍यात पानांचा ढीग गोळा केला की गळ्यात आवंढा दाटून येई. स्वच्छ झालेलं अंगण परकं होऊन जाई.
पानं नसल्यामुळे झाड शिडशिडीत दिसे. फांद्यांची जाळी मजेदार दिसे. त्यातून इतकं ऊन / प्रकाश अंगणात येई, डोळे चमकत असत. नेहमीचा वाडा वेगळाच दिसे. पंधरा दिवस हे असं. नंतर एके दिवशी फांद्यांकडे पाहिलं तर इवली इवली लाल, पोपटी पाने फुटलेली दिसत. अशी पानं फुटली की आम्ही अंगणात झोपायला सुरूवात करत असू. रोज वाढणारी ती पाने बघत असू. सुट्या लागल्या की निवांत गादीवर पडल्या पडल्या पिंपळाच्या पालवीकडे पाहण्यात कितीतरी वेळ जात असे. गावाला जाण्याचे वेध लागलेले, शाळेतला निकाल आणि ही नवी पाने, त्या पिपाण्या कसं एकात एक मिसळून गेलं आहे. कोवळी पाने अगदी पातळ असतात, त्यांचा स्पर्श आश्वासक असतो. पानांवरची जाळी किती आकर्षक असते! हळू हळू ती मोठी व्हायला लागतात. अवघं झाड पोपटी हिरवं होत जातं. जुन्या झाडातून एक नवं झाड उमलून आलं की आम्ही गावाला निघत असू.
गावाहून आल्यावर आम्हांला नेहमीचा पिंपळ दिसत असे.

आम्ही वाड्याच्या मागच्या बाजूला कधीच जात नसू. तिकडे एक नाला होता, म्हणत नाला असले तरी पाणी बरं असावं, धोबी तिथे कपडे धूत. वाड्याच्या मागच्या बाजूच्या खिडकीत बसून हे दिसे. मी आणि दीपू, माझा सवंगडी , आमची बसायची आवडती जागा म्हणजे ही खिडकी होती. बरेचदा दीपू माझ्यासाठी या खिडकीत जागा धरून ठेवी. कधीतरी एकदा आईबरोबर मी मागे गेले होते. आई कुणाशीतरी बोलत होती. तिथे कपडे धुणारी एक मावशी मला म्हणाली, ”हे बघ, तुमच्या पिंपळाची मुळं, पाणी प्यायला इथं आलीत.” खरंच मुळ्या होत्या. तिथून आमचा वाडा तर किती दूर दिसत होता. पाणी प्यायला पिंपळ इतक्या दूरवर येतो??
हा पिंपळ काय खात असेल? कुठलं पाणी पित असेल? असा विचार मी कधीच केला नव्हता. ते कळलं आणि मोठं झाल्यासारखं वाटलं. न बोलताच मी घरी आले.
पिंपळ कायम इथं उभा असला तरी काम करतच असतो, कुठून पाणी मिळव, अन्न मिळव, घरटी धर, सावली दे.

****

Tuesday, January 11, 2011

ऊन खात बसू

सुहृदला गोष्ट वाचून दाखवत होते....’ बोक्या ऊन खात बसला होता’.....
सुहृद म्हणाला,’ ऊन काही खाण्याचा पदार्थ नाही’
”खरं आहे, पण तसं म्हणायची पद्धत आहे.”


एकीकडे पुढची गोष्ट वाचून दाखवत होते, मनाने कुठेच्या कुठे पोचले होते.
ऊन खाणे........ मी विसरलेच आहे.

अशा थंडीच्या दिवसात आमची कितीतरी कामे ऊन्हात व्हायची.
शाळेत जाण्यापूर्वी माझी वेणी घालून द्यायची असे, आई फणी, कंगवा घेऊन म्हणे ’चल, उन्हात बसू.’ खोबर्‍याचं तेल पातळ होण्यासाठी आधीपासूनच उन्हात ठेवलेलं असे.

रविवारी न्हायलं की केस वाळवण्यासाठी उन्हात जाऊन बसायचं. आधी केसांना टॉवेल गुंडाळलेला असे त्याचा मानेवर भलामोठा अंबाडा मला आवडे किंवा सोडल्यावर त्याची लांबलचक वेणी मागे हलवायला, खांद्यावरून पुढे घ्यायला मला आवडे. ”ओले केस सोड पाहू आधी” असं म्हणून आई मला उन्हात घेऊन जाई. माझे केस खसाखसा पुसून देई आणि ओला टॉवेल धुवायला घेऊन जाई. मी तिथेच उन्हात बसून राही. केसांशी मी खेळत बसे. केस हळू हळू कोरडे होत, मग भुरभुरायला लागत, अंग तापायला लागे., उब थेट आत शिरत असे. आईकडून न्हाहून घ्यायचं म्हणजे दमायचंच काम. उन्हात बसून झोप यायला लागे, डोळे मिटायला लागत. पापण्या मिटून सूर्याकडे पाहिले की त्या लाल-केशरी-पिवळ्या अशा दिसत. त्या रंगांचा गरम स्पर्श जाणवे. जणू आकाशातल्या एका सूर्याचे आपल्या डोळ्यात दोन सूर्य झाले आहेत. नंतर सावलीत डोळे उघडून पाहिले तर सावलीतही तेच रंग दिसत., कुठेही पाहिले तरी तेच रंग, जणू डोळ्याला चिकटलेले..... आत जाऊन झोपावे तर त्या थंडीत नको वाटे... उन्हात झोप अनावर होई... उन्हाचेही चटके बसत.... भूक लागलेली असे... तसेच जाऊन आत झोपले तर मस्त झोप लागत असे. अंगावर किंचित शिरशिरी येई. आई वरून पांघरूण घाली. मनातलं हिला बरोबर कसं कळतं? भुकेल्यापोटी जेमतेम वीस-पंचवीस मिनिटे झोप होत असे. जेवण्यासाठी आईची हाक ऎकू येई आणि कडाडून भूक लागलेली असे, डोळे उघडले तर सगळं नेहमीसारखं दिसायला लागलेलं असे.

पेपर वाचायचा असला की तो घेऊन उन्हात जाऊन बस, पुस्तक? तेही उन्हात जाऊन वाचायचे. पेनात शाई भरायची आहे? ऊन्हात बसून भरू, नखे कापायची आहेत? उन्हात कापू, हरभरे खायचे आहेत? उन्हात बसून खाऊ, शेंगदाणे कुटायचेत? उन्हात बसू...... स्वैपाकाचे आणि जेवणाचे काम तेव्हढे आत होत असे. ऊन सरकत असे, त्याप्रमाणे उन्हात बसायची जागा बदलत असे. उन्हावरून वेळ सुद्धा कळते असे.
आधी उन्हाकडे तोंड करून बसायचं, तापायला लागलं की पाठ करून बसायचं.
हिवाळ्याच्या दिवसांमधे मिळेल तेव्हढं ऊन शोषून घ्यायचं.

वाड्यातली आम्ही मुलं अशी उन्हात बसायचो, ऊन सरकलं की जागा सरकून घ्यायचो जणू आयांनी उन्हात घातलेली वाळवणंच...... पितात सारे गोड हिवाळा...उन्हात बसूनच नां?

पौषातला रविवार म्हणजे आईचे उपवास आणि आदित्याराणूबाईची पूजा. नैवेद्य असे, दुधातली तांदळाची खीर. ती खायची तीदेखील उन्हात बसूनच. रथसप्तमीला पितळी ताटावर आई चंदनाने सूर्य काढी त्याच्या रथाला एकच चाक ....... जयाच्या रथा एकची चक्र पाही.. नसे भूमी आकाश आधार काही.. असे सारथी पांगुळा ज्या रथासी.. नमस्कार त्या सूर्यनारायणासी.. आईला सारथी कसाबसा जमे पण घोडे जमत नसत. मग मी किंवा विश्वास त्या रथाचे चार घोडे काढत असू. दुसर्‍या दिवशी छोट्या सुगड्यातून दूध उतू घालायचे. ते पूर्वेला गेले तर छान!

सूर्याचे आणि ऊन्हाचे हिवाळाभर कौतुकच असायचे. हिवाळ्यातला आकाशाचा तो निळा रंगही किती मोहविणारा!

अशात तो धनुर्मास येई.त्यात एखाद्या रविवारी सूर्योदयाला देवाला आणि सूर्याला नैवेद्य दाखवायचा. त्याआधी आम्हांला स्नान करून तयार असावे लागे, कुणीतरी बिचारा मुंजाही आवरून येत असे, नाहीतर आई आत्याच्या मुलांना रात्री झोपायला बोलावत असे. म्हणजे मुंजाची वाट पाहायला नको. वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, बाजरीचा खिचडा, तूप, लोणी असा बेत असे. इतक्या पहाटे जेवायला गंमत वाटे. पेपर येण्यापूर्वी आमची जेवणे होत. पेपर आला की आम्ही सगळे एकेक पान घेऊन उन्हात बसत असू, अर्थात आई सोडून.

माझ्या मोठीआईला ऊन खात बसायला आवडे. आई अजूनही तिचं आवरलं की गच्चीत ऊन खात पेपर वाचते.
मी ते विसरूनच गेले आहे.

सुदैवाने हिवाळ्यात आमच्या गच्चीत ऊन येते..न्हायलं की सवयीने मुक्ता सुहृदला केस उन्हात वाळवून या असं सांगते. माझेही केस उन्हात वाळवते....सोय म्हणून... एक काम म्हणून... मी त्याची मजा घेत नाही... उन्हाशी खेळत नाही, ते अंगाखांद्यावर मिरवत नाही.
एखाद्याने प्रेमाने आपल्यावर वर्षत राहावं आणि आपण त्याला विसरूनच जावं ? इतकी कृतघ्न मी कधी झाले?
उन्हाशी तर मी बेईमानी केली.
त्याची आणि माझ्या मुलांची साधी ओळखही करुन दिली नाही.

------------------------

Sunday, January 2, 2011

गोष्ट एका शोधाची ... शोधातल्या प्रवासाची... प्रवासातल्या आनंदाची....

या वेळेस नाताळच्या छोट्या सुट्टीत कोल्हापूर- बेळगाव (जमल्यास धारवाड) जायचं ठरवलं. अशी ’भाषा सहल’ काढायचं कधीचं मनात होतं यावेळी अचानक जमून आलं. या सहलीचे दोन उद्देश होते, एक म्हणजे कोल्हापूर, बेळगाव इथली मराठी ऎकायची, दुसरं म्हणजे प्रकाश नारायण संतांच्या लंपनचं बेळगाव त्याच्या नजरेतून पाहायचं, त्याचं घर आणि तो परिसर पाहायचा. (जमल्यास धारवाडचे जीएंचे घरही पाहून यायचे.)
कोल्हापूर सोडल्यावर थोड्यावेळाने तवंदीकडे जाणारा रस्ता लागला, हे इंदिरा संतांचं माहेर.
पुढे हत्तरगी, यनकनमर्डी वगैरे गावे लागल्यावर आपण लंपनच्या भागात जात आहोत, हे जाणवू लागलं. बेळगाव आल्यावर आमचा शेजारी मुलांना म्हणाला,” स्वेटरं घेतलात ना? घालून सोडा”

२५ ला रविवारी संध्याकाळी बेळगावला पोचलो. बेळगाव माझ्या कल्पनेपेक्षा खूपच मोठं होतं /आहे. लंपनचे घर शोधणे अवघडच होते.

सोमवारी सकाळी मिलिन्दला म्हणाले, ”आपण गुगल वरून बेळगावचा नकाशा काढून आणायला हवा होता.” ” डिरेक्टरीत नकाशा आहे.” हा माणूस जिथे असेल तिथला आजूबाजूचा छापील मजकूर वाचायचा ठेवत नाही!
त्यात कुठेही गुंडीमठ रस्ता नाही! लंपनचे घर तर गुंडीमठ रस्त्याजवळ! हॉटेलमधे विचारले, माहित नव्हते. लेखकाने रस्त्याचे नाव बदलले असणार!
शारदा संगीत मधे लंपनच्या भावविश्वातला नकाशा आहे, तो आणि डिरेक्टरीतला नकाशा यांची पुन्हा पुन्हा तुलना करत होतो. गावाच्या मध्यातून जाणारा लोहमार्ग सारखाच होता. रेल्वेचे पहिले गेट, दुसरे गेट, तिसरे गेट तेही होते. काही रस्ते (नावं नव्हेत) सारखे होते.
आम्ही सोबत विनायक गंधे यांचं ” लंपनचे भावविश्व” हे पुस्तक आणलं होतं. ते पद्मगंधा प्रकाशनाचे पुस्तक आहे.
” पद्मगंधा प्रकाशनात फोन करून गंधेंचा फोन नं. मिळवायचा का? ते सांगू शकतील. त्याआधी धर्मापुरीकर काकांना फोन करून विचारते.”
काका प्रवासात होते, त्यांच्याकडे सुप्रिया दीक्षितांचा फोन नं. होता पण घरी!

कुठून कशी सुरूवात करावी? लंपनच्या गावात तर पोचलो पण घर कुठे आहे?

मी मुक्ता- सुहृदचे आवरेपर्यन्त मिलिन्दने पद्मगंधा प्रकाशनात फोन केला होता, तिथे कुणी नव्हते सगळे ठाण्याला साहित्यसंमेलनात! मग मिलिन्दने डिरेक्टरीतून राणी पार्वतीदेवी कॉलेजचा फोन नं शोधून, तिकडे फोन केला, कुणी नव्हते. नंतर ’तरूण भारत’ कार्यालयात फोन केला, त्यांनी ”लोकमान्य वाचनालय” (गोवा वेस) इथे जा, तिथे अशोक याळगी असतील, ते तुम्हांला लंपनचे घर दाखवतील असे सांगितले.

वा! नवरा असावा तर असा! (इथे नवर्‍याविषयीच्या कौतुकाने मला भरून आले.)

एकदा याळगी भेटले की झाले. ते घराचा पत्ता देतील मग लंपूच्या शाळेचं नाव विचारून घेऊ. हे काम तर झकास झाले!

आम्ही वाचनालयात गेलो. खालच्या मजल्यावर पुस्तक प्रदर्शन होते. वरचे वाचनालय बंद होते, कधी उघडणार? पुस्तक विक्रेत्याकडून मिलिन्दने याळगींचा नंबर घेतला, याळगींना फोन लावला. तेही साहित्यसंमेलनात! चार वाजता वाचनालय उघडेल तेंव्हा या, (आणखी एक नाव सांगितलं) , त्यांना मी बोलून ठेवतो म्हणाले.
छे! आता काय करायचे?

आम्ही प्रदर्शनाच्या इथे रेंगाळलो. पुस्तक विक्रेत्याशी गप्पा मारल्या. त्याला प्रकाश संत किंवा त्यांची पुस्तके माहीत नव्हती. मी सारखा फिरतीवर असतो, बेळगावात नसतो अशा सबबी सांगत होता. काही पुस्तके घेतली.
एका परिचितांकडे जायचे होते, त्यांच्याकडे जावे, तिथे कदाचित माहिती मिळू शकेल. ’रेल्वेच्या पहिल्या गेटाकडे’ जावे आणि फिरून जरा शोधावे असे मी म्हणत होते.

लंपन आमचा कितीही लाडका असला तरी त्याची पुस्तके वाचणारे कमीच भेटतात. आपल्याकडे साक्षरतेचं प्रमाण कमी. साक्षरांमधेही वाचणारे कमी. वाचणारांमधेही बहुतेक रोजचे वर्तमानपत्र आणि साप्ताहिकं, मासिकं वाचणारे! पुस्तके वाचणारे लोकच मुळात किती कमी आहेत!

तेव्हढ्यात घाईघाईने एक आजोबा वाचनालयाच्या मागच्या बाजूने येत होते. मिलिन्दने त्यांना आम्ही कशासाठी आलो आहोत ते सांगितले. ते म्हणाले,” मी तुम्हांला एक फोन. नं. देतो, ते तुम्हांला अधिक माहिती देऊ शकतील.” शेजारीच त्यांचा बंगला होता, आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी एक फोन लावला, आम्हांला म्हणाले,” विष्णुपंत कुलकर्णी स्वत:च इकडॆ येत आहेत.”

दरम्यान गंमत अशी झाली होती की आम्ही वाचनालयात गेलो, पाठोपाठ काही भुरटे चोर वाचनालयाच्या मागच्या बाजूला गेले, त्यांनी तोड्फोड केली आणि काही वस्तू चोरून घेऊन जात होते, ते या शेजारच्या वेलंगी आजोबांनी पाहिले. म्हणून ते घाईघाईने इकडे आले होते, त्यामुळे त्यांची आमची भेट झाली. विष्णुपंत कुलकर्णी म्हणजे वाचनालयाचे चिटणीस. ते येईपर्यन्त वेलंगी आजोबांनी आम्हांला इंदिरा संतांचे जुने घर कुठे आहे ते सांगीतले. दहा मिनिटांत कुलकर्णी आले, पंच्याहत्तर/ शहात्तर वर्षांचे विष्णुपंत सायकलवरून आले. वेलंगी आजोबांनी त्यांना थोडक्यात चोरीविषयी सांगीतले, नंतर आमची ओळख करून दिली. तेव्हढ्यात वेलंगीआजी बाहेर आल्या त्यांनी (बहुधा चोरीसंदर्भात) आमची चौकशी सुरू केली, आम्ही केंव्हा आलो, काही पाहिले का? वगैरे. आम्ही काहीही पाहिले नव्हते, आम्हांला काहीही ऎकू आले नव्हते, त्या पुस्तक-विक्रेत्याला तर अजूनही काही कळले नसेल. विष्णुपंत कुलकर्ण्यांनी आमची त्यातून सुटका केली आणि आम्हांला इंदिरा संतांच्या नवीन घराचा पत्ता दिला. तिथे रवी संत (इंदिराबाईंचा मुलगा) राहतात, हे ही सांगीतले.
वा! त्यांच्याकडून तर नक्की माहिती मिळेल. हे तर एकदम भारी! आम्ही रिक्षाने तिकडे निघालो, मधे राणी पार्वतीदेवी कॉलेज लागलं तिथे वर्षभर पुलं शिकवायला होते. थोडे शोधल्यावर इंदिराबाई्चे घर सापडले. शेजार्‍यांनी सांगितले, मोठा कुत्रा आहे, म्हणून बाहेरूनच आवाज देत होतो. एक तरतरीत आजी बाहेर आल्या, त्यांना आम्ही कुठून, कशासाठी आलोय ते सांगीतले, त्या म्हणाल्या,” तुम्ही आत या. ” या रवी संत यांच्या पत्नी, इंदिराबाईंच्या सूनबाई, वीणा संत.

त्यांच्याशी गप्पा झाल्या. शेवटची पंचवीस वर्षे इंदिराबाई इथेच राहात होत्या असे त्या म्हणाल्या. मला इंदिराबाईंची वासंती मुझूमदारांनी घेतलेली मुलाखत टीव्हीवर बघितल्याचे आठवत होते, ती ह्याच घरात झाली का? असे विचारल्यावर त्या हो म्हणाल्या, बाहेरचा झोपाळा ओळखीचा वाटला.
जुनं घर रेल्वेच्या पहिल्या गेटाजवळ ठळकवाडीत आहे. इंदिराबाईंच्या बहुतेक कविता त्यांनी त्या घरातच लिहिलेल्या आहेत. ( ’ घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली’) पूर्वी बाईंनी लावलेली सायली खरंच अंगणात होती, मोठ्ठं अंगण होतं, फणसाचं झाड होतं (कटीखांद्यावर घेऊन बाळे?), लक्ष्मीची झाडे होती, केळीचं झाड होतं, आंब्याचं होतं.’ म्हणे समोरची खुर्ची , ”बैस इथे क्षणकाळ” , घेते ठेऊन टेबल , माझी धनोली, घड्याळ ’ म्हणणारे घर ते तेच! ’उंदरांचाही संसार होऊ दे’ म्हणणारे घर ते तेच!
आमचा असा समज होता, प्रकाश संत हे बेळगावला त्यांच्या आजी आजोबांजवळ राहायचे. वीणाताई म्हणाल्या,” ते सख्ख्य़ा आजीला दत्तक गेलेले असले तरी ते राहायचे आई-बाबांबरोबरच! ” आम्ही शोधत होतो ते लंपनचे घर म्हणजे इंदिराबाईंचे ठळकवाडीतील घरच होते. आम्ही सगळ्यांना प्रकाश नारायण संतांचे / लंपनचे घर पाहायचे आहे सांगत होतो, बेळगावात बहुतेकांना इंदिरा संतांचे घर माहित होते! :)
आता घराची कशी अवस्था असेल सांगता येणार नाही, खूप जुनं झालेलं आहे. घरमालक काही लक्ष घालत नाहीत. पुस्तकातल्या सारखा हा स्वतंत्र बंगला नसून जोडून असणार्‍या (चाळवजा) चार घरांपैकी पहिले कोपर्‍यावरचे कौलारू घर आहे. आता अंगण राहिलंच नाही, घरासमोर मोठी भिंत आली आहे, त्या म्हणाल्या.
”सुप्रिया दीक्षित ( प्रकाश संतांच्या पत्नी ) म्हणजे सुमीच ना? ” दिवाळी अंकातील एका लेखात प्रकाश संतांनी आपल्या बालमैत्रीणीला लग्नासाठी कसे विचारले, तेव्हा त्यांची मनस्थिती कशी होती, ते सारं वाचल्याचं मला आठवत होतं. ” हो. त्यांची आई आणि इंदिराबाई दोघी मैत्रिणी, दोघीही ट्रेनिंग कॉलेजमधे शिकवायच्या. त्यांचे घर चार घरे सोडून होते.” मिलिन्दने त्यांना शारदा संगीत विद्यालय, लंपूची शाळा कुठे आहे ते विचारले. त्यांनी आम्हांला लंपनचे घर, त्याची शाळा आणि शारदा संगीत विद्यालय कुठे आहे, कसं जायचं ते सांगीतलं. ” या भागात लंपन, लंपू अशी छोट्या मुलांची नावे खरोखरच असतात का?” ” हो, पण इकडे म्हणणार लंप्या, आमच्या निरंजनला त्याचे सगळे मित्र निर्‍याच म्हणतात.” पुढे त्या म्हणाल्या,” मुलांची आपसातली बोली तुम्हांला कशी ऎकायला मिळणार? ते ” काय बे” ” धरून सोड ” असं ही मुलं बोलत असतात.”
”बेळगाव आता खूप बदललं असेल ना?”
” खूपच. माझे मिस्टर म्हणजे रवी ६७ वर्षांचे आहेत, प्रकाश त्यांच्याहून सात वर्षांनी मोठे होते. आता ते ७४ वर्षांचे असते, ते दहा वर्षांचे असतानाचे बेळगाव म्हणजे साठ-पासष्ठ वर्षांपुर्वीचे बेळगाव.” प्रकाश संतांबद्दल म्हणाल्या ” ते पुस्तकातल्या लंपनसारखे प्रत्यक्षातही फार हळवे होते, ते आईच्या हाताचा ठसा, नाही का? अगदी तसेच!”

त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. साठ-पासष्ठ वर्षांपूर्वीचे बेळगाव शोधायला! इथे पंधरावीस वर्षात माझ्या डोळ्यांसमोर शहरं किती बदलत जातात, अनोळखी होत जातात, मी पाहिलंय.

रेल्वेच्या पहिल्या गेटाजवळ रिक्षा सोडली आणि वीणाताईंनी सांगितल्याप्रमाणे सावरकर रस्त्यावरून निघालो, हणमशेटांकडे घर कुठल्या गल्लीत आहे याची विचारणा केली. पुढे गेल्यावर एका किराणा दुकानदाराला विचारले, त्यालाही घर माहीत होते. प्रत्येकजण आता इंदिराबाई तिथे राहात नाहीत हे सांगत होता. तरीही आम्हांला पाहायचे आहे म्हंटल्यावर चकित होत होता. समोर अपार्ट्मेंट झाल्याने ही घरे मागे गेली आहेत, कुठल्या गल्लीतून शिरावे अंदाज येत नव्हता. एका गल्लीत वीणाताईंनी वर्णन केलेलं घर दिसलं.


दार वाजवून विचारलं, ” इंदिरा संत राहायच्या ते हेच घर का?”
”हो”
आम्ही पुण्याहून आलोय, घर पाहायचंय, का पाहू इच्छितो वगैरे बोललो.
ते ” वेलकम, या, या ” म्हणाले.
कल्पनेतल्या घरापेक्षा हे घर फारच छोटे होते. ( तरी वीणाताईंशी बोलल्याने मनाची तयारी झाली होती. घर नांदते होते, हेच खूप होते. कुलूप लावलेले रिकामे असते तर?)
सलामीलाच ज्यांना भेटायचं होतं ते कुरकुरे फाटकराव भेटले नाहीत. आज्जी आणि कृष्णाबाई तिथे उभं राहून एकशे सत्तावीस मिनिटे गप्पा मारायच्या. ...... आम्ही ज्या वास्तूत उभे होतो ते लंपनचेच घर होते, लेखकाने त्याच्या प्रतिभेने काही गोष्टी कल्पिल्या असतील पण मूळ जे होते ते हेच होते. आम्ही लंपनच्या घरात उभे होतो! खरेच वाटेना!
मला आता भीती वाटू लागली, तो माडीवरच्या खोलीत जाणारा जिना या घरात असेल ना? माडीवरची ती आधी त्याच्या आईची असणारी, नंतर लंपूची झालेली खोली असेल ना?
उन्हातून आल्यामुळे आतल्या मंद उजेडाला डोळे सरावत होते. हळूहळू आतलं दिसायला लागलं. बैठकीची खोली, नंतर मधली खोली शेवटी स्वैपाकघर, फोटो काढण्याची परवानगी मिळाली, फोटो काढले. स्वैपाकघरातून बाहेर येताना एकदम भिंतीलगत असणारा मधल्या खोलीतून वर जाणारा जिना दिसला. वा!... ”वरची खोली पाहिली तर चालेल का?” आजी आम्हांला वर घेऊन गेल्या. वरची खोली पाहिल्यावर ते घर आवडूनच गेलं, आल्याचं सार्थक झालं.
मागच्या बाजूला असणार्‍या दोन खिडक्या, समोरच्या बाजूला वर दोन खिडक्या एका बाजूला तो जिना, हवासा एकांत लंपूला इथे मिळत असणार! स्टुलावर उभे राहिलेले भिंतीवर दिशा रंगवणारे आजोबा मला दिसायला लागले. रंगाचा डाग पडलेल्या जमखानेबुवांना आज्जीने याच जिन्यावरून खाली नेलं ! .......
आम्ही तिथून बाहेर पडलो.(जोशी आजी- आजोबा धन्यवाद!)
गुंडिमठ रस्त्यावरून चालताना लंपूच्याच काय काय गोष्टी आठवत होत्या.
पहिल्या गेटाजवळच्या हॉटेलात खाऊन घेतलं.
पहिलं गेट ओलांडून गावाच्या दुसर्‍या भागात गेलो. लंपूचा नकाशा पाहात होतोच.
रेल्वेचे रूळ हे लंपनच्या भावविश्वाचा महत्वाचा भाग आहेत. त्यांचे फोटो काढले. कुसुमच्या पत्रातली वाक्ये आठवत होती....माझ्या आयुष्याचा तालही मला या रूळांमुळेच सापडलाय. मी आनंदानं या नव्या तालावर चालत राहीन.......

उजवीकडे वळलो एक छोटी बाग लागली नंतर ठळकवाडी क्लब.... अच्छा! ही बाग म्हणजेच मधुमालती ग्राउंड, पूर्वी हे मोकळं असणार आणि एक घसरगुंडी असणार...... चालत पुढे गेलो. कानडी शाळा लागली....लंपूच्या नकाशाप्रमाणे वळलो पण शारदा संगीत विद्यालय काही लागलं नाही. बेळगावकरांच्या दुकानापासून अगदी जवळ आहे असं वीणाताई म्हणाल्या होत्या. बरंच पुढे जाऊन माघारी फिरलो आणि आता शाळा शोधूया असे ठरवले. ... बटणं जागेवर आणि चड्ड्या पोटावर ठेवण्याच्या कामात गुंतलेली पोरं अर्थातच आम्हांला दिसणार नव्हती.. .....

रजपूत बंधू प्रशाला..... छोटीशीच शाळा... एक दोन फोटो काढले, आणखी काढले नाहीत, शाळेची जागा वादात आहे, भांडणं कोर्टात गेली आहेत. शाळेची रया गेली आहे, आम्ही जिना चढून जाऊन वरचे वर्ग बघून आलो. कुठले कुठले वास कोंडलेले ते वर्ग अगदी बापुडवाणे दिसत होते...... लंपनच्या वेळी या शाळेत केवढे चैतन्य नांदत असणार! ...... शाळेला अजरामर करणारा भारी लेखक आपल्या शाळेत शिकून गेलाय याची तिथे कोणालाही कल्पना नाही!
बेळगावकरांच्या दुकानाशी आलो आणि शारदा संगीत विद्यालय शोधायचा पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहायचा असे ठरवले.
यावेळी नकाशा बाजूला ठेऊन विचारत विचारत गेलो. संगीत शाळा सापडली. लंपनने दाखवलेल्या गल्लीच्या अलीकडची गल्ली आहे, अजिबात वर्दळ नाही. काही विचारपूस करावी तर विद्यालय बंद होते. मिलिन्दने पाटीवर पाहिले तर स्थापनेला पंचवीस वर्षेच झालेली, कदाचित संचालक बदलले असतील, वीणाताईंनी सांगितलेले विद्यालय आम्ही शोधले होते, नक्की!
सकाळी दहाला निघालेलो, साडेतीन- चारला हॉटेलवर परतलो.
दमलो होतो आणि खूप मजेत होतो.......

साखळी ही माझ्या आवडत्या कथांपैकी एक आहे! मिलिन्दला म्हणाले,” संध्याकाळी असर्गेश्वर शोधूया का?”
प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत एक मिलिटरी महादेव होता, एक बिस्कीट महादेव होता एक कपिलेश्वर होता. ”असरगा - असर्गेश्वर” हॉटेलात किंवा रिक्षावाल्याला माहित नव्हते. रिक्षावाला म्हणाला, ”मी इथलाच आहे, असला महादेव कुठला, पाहिलो नाही” मग मी कुठल्या महादेवाजवळ धबधबा आहे का? विचारले. नव्हता. शाळेची पायी सहल काढायची म्हणजे शाळेपासून दोन-तीन किलोमीटरवर हवा. कपिलेश्वर तसा आहे आणि पूर्वीचं मंदिर तळ्यात आहे, निदान पाण्याशी संबंध आहे, म्हणजे हाच असर्गेश्वर असणार असा मी निष्कर्ष काढला. तिथे जाऊन आलो.
---------


धारवाडला जाऊन जीएंचं घर पाहून येऊ असं मी म्हणत होते, मिलिन्दने उदारपणे सहलीचा एक दिवस वाढवला. आता आमचा आत्मविश्वास वाढला होता. जीएंची पुस्तके आम्ही सोबत आणली नव्हती. धारवाडचे आमचे नक्की नव्हते. आम्हांला कडेमनी कांपाउंड एवढेच आठवत होते.
दुसर्‍या दिवशी साधारण दहाला निघालो. कौस्तुभकडे ’जीएंच्या कथांमधील परिसर’ असं पुस्तक असल्याचं मिलिन्दला आठवलं, त्याला फोन लावला, तासाभराने वाचून आम्हांला कळव असं सांगितलं.... दीडतासात धारवाड. बेळगावला सगळीकडे आम्ही मराठीतच बोलत होतो.

धारवाडला मराठी कळणारे फारसे कुणी नाहीत. स्टॅंडवर उतरलो. जीएंच्या नावाची, कडेमनी कांपाउंड भागाची चौकशी केली, कुणाला काहीच माहित नव्हते अगदी पुस्तकांच्या दुकानदारालासुद्धा! दुकानात मराठी पुस्तके नव्हती. आता दोन पर्याय होते, कॉलेजात जाणे किंवा वाचनालयात जाणे. ( जणू साहित्यिकाचे घर शोधण्याची एक पद्धतच आम्ही शोधली आहे :) :) )

आम्ही रिक्षाने तिथल्या मुख्य ग्रंथालयात गेलो. तिथल्या कर्मचार्‍यांना जीएंचे नाव ऎकूनही माहीत नव्हते, मराठी येत नव्हते. मी तिथे मराठी पुस्तके आहेत का? विचारले तर त्या बाईंनी मला कपाटाकडे नेले आणि तिथली मराठी पुस्तके दाखवली. एका बाजूला फक्त तीस-चाळीस पुस्तके होती! इतकी अनास्था! त्यातले एकही जीएंचे नाही!...... सोलापुरात महाकवी बेन्द्रे यांच्याबद्दल किती माहिती आहे? त्यांची किती पुस्तके उपलब्ध आहेत एकदा शोधले पाहिजे...... ही साहित्याबद्दलची अनास्था म्हणायची की भाषांमधला दुरावा?

तिथे बरीच कॉलेजातली मुले अभ्यास करत बसली होती. मी विचारले, ”यांत कुणी मराठी शिकणारे असेल का?” त्यांनी नकारार्थी मान हलवली. मी निघाले, त्यांनी मला थांबवलं आणि मुख्य ग्रंथपालांना ’हिरेमठ’ यांना बोलावून आणलं. त्यांनांही जीएंची माहिती नव्हती. मी आपली ते इथेच राहात होते, ते मराठीतले ’ ग्रेट रायटर’ आहेत वगैरे सांगत होते. ते म्हणाले,” तुम्ही किती दिवस धारवाडमधे आहात? मी संध्याकाळपर्यन्त शोधतो.” आम्ही चार पर्यन्त निघणार होतो. तरी त्यांनी फोन नं. लिहून घेतला, कळवण्यासारखी माहीती मिळाल्यास कळवतो म्हणाले. वर तुम्ही १९७ ला फोन करून ’कडेमनी कांपाऊंड ’ सांगा ते तिथला फोन नं. देऊ शकतील, असा सल्ला दिला.
तिथला फोन नं मिळायला तिथे कोणी राहते की नाही, कोण जाणे!

आम्ही निराश होऊन ग्रंथालयाच्या पायर्‍यांवर बसून राहिलो. आता कॉलेजात जाऊन पाहिले पाहिजे, मी म्हणाले आपण पोस्टात जावूनही पत्ता शोधू शकू. असेच बसलो होतो, मिलिन्द भाग्यश्रीला फोन लावून ”पुस्तकातून जीएंचा पूर्ण पत्ता कळव.” म्हणाला. कौस्तुभला फोन लावला तर त्याने कथांमधले ’सोमेश्वर मंदिर, दुर्गामाता मंदिर, कर्नाटक व्यायामशाळा’ धारवाडमधे आहेत हे कळवले. भाग्यश्रीने ” कडेमनी कांपाऊंड, माळमड्डी ” असं सांगीतलं आणि जीएंच्या कॉलेजचं नाव जेएसएस......

... जीएंना जाऊन २३ वर्षे होताहेत, त्यापूर्वी दोन-तीन वर्षे त्यांनी धारवाड सोडलं... पंचवीस/ सव्वीस वर्षांपूर्वी धारवाड सोडलेल्या एका थोर मराठी लेखकाशी धारवाडला काहीही देणंघेणं नाही... जीएंच्या वृत्तीनुसार असतील तेव्हाही आजूबाजूच्यांना त्यांची ओळख नसेल...... एका लेखकाचं घर शोधत जाणं त्यांना आवडलंही नसतं.... जीए इतकं कमी फिरले आहेत, त्यांचा सारा वेळ घर, क्लब आणि कॉलेज यामधेच जाई.... त्यांचे मित्र (काही मोजकी माणसं), त्यांची पुस्तके, त्यांचं लेखन..... लोकांमधे ते रमले नाहीत......पण माणसाच्या मनात असणार्‍या अनघड वाटा त्यांना ऒळखीच्या होत्या, माणसाआतला प्रदेश, माणसातला माणूस त्याचं दु:ख, सुख, मत्सर, क्रौर्य , चांगुलपणा, मर्यादा , नियतीशरणता ते जाणत होते...... त्यांची पुस्तके सोडून ....... घर पाहण्याचा हट्ट आम्ही का धरत होतो? पाच- सहा तासात इथला परीसर नुसता डोळ्याखालून घालणंही अवघड......

उगीचच लंपू-मुक्ताचे फोटो काढत होते. इतक्यात दोघीजणी आल्या, त्यातली एक दुसरीला म्हणाली,” तुम्ही आत जाऊन या, मी इथेच थांबते.” मराठी ऎकून आम्हां दोघांचेही डोळे चमकले. ज्या बाई थांबल्या होत्या त्यांच्याशी मी बोलले, त्या कल्याणी राजे, मुळच्या नागपूरच्या, गेल्या दीडवर्षापासून धारवाडमधे विवेकानंद केंद्राचं काम पाहतात. त्यांनांही जीएं ठाऊक नव्हते, पण त्यांनी त्यांच्या एका परिचितांना फोन केला. त्या मुलालाही काही कल्पना नव्हती, तो म्हणाला बाबांना माहित असेल. कल्याणीताईंनी त्याच्या बाबांना फोन केला, ते सांगू शकणार होते, बॅंकेत कामात होते, त्यांनी दहा मिनिटांनी फोन करायला सांगितला. कल्याणीताईंनी आम्हांला त्या श्रीयुत गोखले यांचा फोन नं दिला. मी त्यांचे आभार मानले, दुसर्‍या बाई आल्यावर त्या दोघी गेल्या.

मी दहा मिनिटांनी गोखल्यांना फोन केला. ” मी विद्या कुळकर्णी बोलतेय....... सगळं सांगितलं.” ते म्हणाले,” तुमच्याकडे काही व्हेईकल आहे का?” ” नाही, आम्ही रिक्षाने येऊ.” ” तुम्ही माळमड्डीच्या कॅनरा बॅंकेजवळ या, मग मी तुम्हांला घर दाखवीन. तिथून अगदी जवळ आहे पण नवीन माणसाला सापडणार नाही. मी गाडी घेऊन येतो.” आम्ही कॅनरा बॅंकेजवळ थांबलो, त्यांना फोन केला, ते म्हणाले ” दोन मिनिटांत पोचतो.” ते चारचाकी गाडी घेऊन आले. ते मुळचे धारवाडचेच, पूर्वी संघप्रचारक म्हणून काम केलेले, आसामात जावून आलेले, सध्या ते व्यवसाय करतात.
आम्ही त्यांच्या गाडीत बसलो. त्यांना दोन तीन घरांमधलं कुठलंतरी कडेमनी कांपाऊंड आहे हे त्यांना माहित होतं.
कडेमनी कांपाऊंड हे आमच्या समजुतीप्रमाणे कुठल्या भागाचं नाव नव्हतं तर एका प्लॉटचं नाव होतं. आधी आम्ही पाहिली ती घराची मागची बाजू होती. तिथे कुणी राहात नाही, असं शेजारी म्हणाले. गोखल्यांनी आम्हांला पुढच्या बाजूने नेलं. घर दाखवलं. आम्ही त्यांचे आभार मानले, ते मिलिन्दला म्हणाले ” कुळकर्णी साहेब [:)], मी घाईत आहे नाहीतर तुम्हांला स्टॅंडवर पोचवलं असतं”
घर बंद होतं. फाटकाला कुलूप. मधे एक कुत्रा होता. घरासमोरचं ते अंगण, फुलझाडं, तुळशीवृंदावन पाहून मला जीएंपेक्षा त्यांची बहीण प्रभावतीच आठवत राहिली. अंगणात बारीक रेघेची रांगोळी काढायला तिला खूप आवडायचं.
नंतर सोमेश्वर मंदिर, दुर्गामाता मंदिर आणि कर्नाटक व्यायामशाळा पाहून आम्ही परतलो.
--------------------------------------------------------------------------




**************
दोन्ही ठिकाणी आम्ही वेळेत गेलो....आणखी वर्षा दोनवर्षांनी ही घरे दिसणार नाहीत..... तिथे दिमाखदार इमारती उभ्या राहतील... आयुष्यातला सोन्याचा तुकडा असावा अशी वर्षे ज्या लेखकांनी त्याठिकाणी वास्तव्य केले, त्या लेखकांच्या कुठल्याही ओळखीच्या खुणा पुन्हा दिसणार नाहीत. समाज म्हणून आपण किती अप्पलपोटे आहोत, स्वार्थी आहोत हेच पुन:पुन्हा प्रत्ययाला येत जाते.
कुणी म्हणेल त्यांची पुस्तके? ती तर आहेतच ना?
हो, ती तर राहतीलच, त्यांचे आयुष्य असेल तेवढे दिवस.
पण समाज म्हणून आपण कशाची कदर करायची?
काय आठवायचे आणि काय विसरायचे? कुठल्या आमच्या अभिमानाच्या गोष्टी आहेत, हे ठरवायला नको का?
***************