Monday, April 5, 2010

मुक्काम घर

घर म्हणजे घरातली माणसं, त्यांचे नातेसंबंध, ओलावा, प्रेम वगैरे हो ना? घर म्हणजे नुसत्या दारे, खिडक्या, भिंती, छप्पर नव्हे, नाही का?

हे काही खरं नाही. घर म्हणजे ते सगळं सुद्धा सिमेंट, दगड, वीटा वगैरे. भिंती- त्यावरचे रंग, खिडक्या- त्यातून दिसणारी झाडे,आकाशाचा तुकडा, कपाटे, पुस्तके, पेपर, स्वैपाकघरातली भांडी, ड्बे, खुर्च्या, टेबले सगळं सगळं. हे सगळं माझ्या ओळखीचं आहे, त्यांच्याशी माझ्या आठवणी निगडीत आहेत. हे सारं माझ्या भोवती आहे, म्हणून तर हे माझं घर आहे ना? या घरातल्या सगळ्या वस्तू जोवर आपल्याला आपलंस करून घेत नाहीत ना,? तोवर घर आपलं होत नाही.
लग्नानंतर मी पुण्यात राहायला आले, तरी घर, माझं मुक्कामाचं ठिकाण, माझं मूळ तिथंच होतं औरंगाबादला, इथल्या घरी मी जणू तात्पुरतीच राहात होते. काळाच्या लांबीवर आपलं घर ठरत नाही. महिन्या दोन महिन्यांनी औरंगाबादला जाऊन पुरेशी उर्जा मी घेऊन येत असे. म्हणजे मी इकडे दु:खात होते असं नाही. व्यवस्थित स्वैपाक करत होते, संध्याकाळी मिलिन्दची वाट पाहात होते, आम्ही भरपूर नाटका-सिनेमांना जात असू, भांडत असू. पण एक उपरेपण होतं.
आमचं शिवतीर्थनगरमधलं घर दोघांसाठी बरंच मोठं होतं, आमच्याकडे सामानही फारसं नव्हतं, आहे तेच इकडे तिकडे फिरवून मी घराचं रूप बदलत असे तेही तटस्थतेने. आम्ही एक सॉफ्ट बोर्ड बनवून घेतला होता, तिथे मी काय काय कविता लिहून लावत असे, मिलिन्दही काही निवडक/ आवडतं लिहून ठेवत असे, ती एक माझी आवडती जागा होती, पण तसं तर मी माझ्या रूममधेही भिंतभर काहीतरी लिहून लावलेलं असायचंच की!
प्रत्येक माणूस म्हणजे एक बिंदू असतो. लग्न झाल्यावर दोन बिंदूंनी एक रेषा बनते. ती कुठल्याही प्रतलात सामावू शकते, सासरच्या - माहेरच्या. मुलं झाली की तीन बिंदूंनी एक प्रतल बनतं, आणि मग त्या कुटूंबाचं अस्तित्व जाणवू लागतं.
मुलं नसली की ते घर, घर वाटत नाही का? म्हणजे आपलं घर हेच त्यांचं मूळ घर असतं ना? मुक्ता झाल्यावरदेखील माझं उपरेपण पुरतं गेलं नव्हतं. सर्वत्र मधलं घर मिलिन्दने घेतल्यावरच मी पाहिलं. मी आणि मुक्ता तिथे धमाल करायचो, भिंतीवर खूप चित्रे काढली होती. खिडकीत बसून गप्पा मारायचो, ओट्यावर पाय पसरून बसायचो. हळूहळू मी बदलत चालले होते. नंतर मुक्ताची शाळा सुरू झाली, पुढे पुढे सारखं औरंगाबादला जाणं जमेनासं झालं.
औरंगाबाद सुद्धा बदलत चाललेलं होतं. आमचं घरंच नाही तर अख्खं औरंगाबादच मला आवडतं. तिथल्या हवेतच आपलेपणाचा वास आहे. त्या गल्ल्या, ते रस्ते, ते दरवाजे, दरवाज्यांमधून रस्ते, चिमण्यांचं झाड, ती दुकानं, ते फुलवाले, ती बुचाची आणि चटकचांदणीची झाडे, आमचा बसस्टॉप, आमची पाणीपुरीची ठरलेली गाडी, रस्त्यांवरची ती दुकाने, आधी सायकलवर नंतर लुनावर माझ्याबरोबर असायच्या त्या मैत्रीणी, आमचा बसायचा ठरलेला कट्टा, आम्ही रात्र रात्र जागायचो ती गच्ची, तो वरचा चंद्र......... सगळंच बदलत चाललेलं होतं. अनोळखी होत चाललेलं.....आपण एखाद्या शहरावर इतका जीव टाकतो, त्याला ते माहितही नसतं, ते शहर चाललंय पुढे पुढे... मला गाठणं शक्य होत नाहीये......... मी तरी त्या शहरावर प्रेम करते की त्या काळाच्या तुकड्यावर? शोधलं पाहीजे.
आमचं घर बदललं नाही. ज्या घरात सुना येतात ते घर त्यांच्या कलाने चालायला लागतं. तिथे येणार्‍या लेकींना ते परकं वाटायला लागतं. औरंगाबादचं घर हे आई-बाबांचं घरच राहिलं त्यामुळे तिथे गेलं की अजूनही ते मूलपण भेटू शकतं आणि त्यात शिरता येतं. आपलं घर हे आपण आहोत तसं आपल्याला स्वीकारणारं असतं. तिथे निवान्त पसरता येतं, उशीरापर्यन्त झोपता येतं, आईबाबांशी भांडताना यांना काय वाटेल याचा विचार करावा लागत नाही, शाळेतलं प्रगतीपुस्तक दाखवावं तसं आपल्या कौतुकाच्या गोष्टी त्यांच्यासमोर मिरवता येतात, मनातलं दु;ख बोलून दाखवावं अशी चार-दोन नाती आपण कमावतो पण आपला आनंद मोकळेपणाने सांगावा अशी नाती दुर्मीळ असतात.

आम्ही जरा मोठं घर घ्यायचं ठरवलं. मी खूप घरे पाहिली आणि आमचं सध्याचं घर आम्हां दोघांनाही आवडलं. घरात काही सोयी करून घ्यायच्या ठरवल्या. आम्ही दोघांनी बसून काय काय हवं हे ठरवलं. त्याचे मी काही आराखडे बनवले, हावळांशी चर्चा झाल्या. एकूणच मी घराची अंतर्गत रचना या विषयात बूडून गेले. वीटांची एक भिंत करायची ठरली, मी लॉरी बेकरचं पुस्तक घेऊन आले, त्यातली एक मांडणी सुचवली. नुसत्या वीटांमधून किती वेगवेगळ्या रचना करता येऊ शकतात! काटकसरही करत होतोच. त्यामुळे स्वैपाकघरातल्या नव्या ओट्याला जुन्या ओट्यासारख्याच पांढर्‍या टाइल्स लावायच्या ठरवल्या. मग वेगळेपणासाठी त्यावर पेंटींग करायचं ठरवलं. इंटरनेटमुळे तर जगच घरात आलंय. टाईल पेंटींगचे खूप नमुने पाहिले. शेवटी एक मधुबनी चित्र काढायचं ठरवलं. चित्र काढायला मजा आली. त्या टाइल्स बसवल्या आणि घर थोडं थोडं माझं होऊ लागलं. हावळांची डिझाइन्स होती, काम मिलिन्दचा मित्र पीडी करत होता. घरात झोपाळा बसवायचा ठरवला होता, मी तो कधी बसेल याची वाट पाहात होते. पीडी बरोबर टिंबर मार्केटमधे चकरा मारल्या, शेवटी आम्हांला हवा तसा झोपाळा मिळाला. मिलिन्द तेंव्हा महिनाभर सिडनीला होता. तीन-चार महिन्यांच्या सुहृदला घेऊन मी घराच्या आघाड्या सांभाळत होते, घरात गुंतत चालले होते. झोपाळा आणला. बसवायचा राहिला होता.

वर्षातून एकदा उन्हाळ्याच्या सुटीत चार-सहा दिवस आम्ही आमच्या मधल्या मामाकडे जायचो, मुधोळला. सगळीच मामे-मावस भावंडं जमलेली असायची. सगळ्यांची सगळ्यात आवडती गोष्ट होती, ”बंगई" म्हणजे झोपाळा. मुधोळला गेल्यावर हातपाय धुवून झाले, देवाला आणि मोठ्यांना नमस्कार करून झाला की बंगईवर बसायचे. समोरून तीन, मागे तीन, बाजूला दोन उभे, एखादं छोटं मांडीवर ! अशी ती झुलायला सुरूवात व्हायची. जागा बदलल्या जायच्या पण झुलणे सुरूच. कधी कधी भांडणं व्हायची, आया म्हणायच्या ”जा की जरा, नागूमावशीच्या बंगईवर.’ मग काहीजण डोळे पुसत तिकडे. मामाच्या घरी लाकडी पाट होता तर इकडे बाजेसारखी विणलेली बंगई होती. नागूमावशीची मुले जर बंगईवर बसलेली असली तर उठून सहजच आम्हांला बसू देत. किती उदार! नागूमावशी काहीतरी निवडत बसलेली असायची, मग तिच्या चौकशा सुरू होत. शेवटी ”मुधोळच्याच शाळेत घाला नाव, म्हणजे रोज बंगई खेळता येईल.” एकेकदा वाटायचं खरंच असं करावं का? आई जवळ नसेल तर चालणार नाही हे लक्षात येई. शाळेला सुट्या लागून बरेच दिवस झालेले असत, शाळेच्या आठवणीने एक कळ येऊन जाई. मग पुन्हा तिथून उठून मामाकडे. कोणी बंगईवरून उठलं तर बंगईवर! जोरात झोका घेऊन, पाय लांब करून तुळईला लागेल का हे पाहायचे. पण असले खेळ मोठे कोणी चालू देत नसत. बाकीचं आमच्या आजूबाजूचं सगळं स्थिर जग आणि आमचं त्यापासून वेगळं असं हलतं जग. आमच्या जगाचे जणू नियमच वेगळे! तिथे बसल्यावर आम्हांला सारखं हसायला येत असे. वेगात समोरून येणारा वारा आम्हांला मागे ढकलायचा, मग पायाने जमिनीवर रेटा देऊन आम्ही वेग वाढवून त्याला हरवायचा प्रयत्न करायचो, तो बेटा आणखी वेगाने येऊन आम्हांला हसवत असे. मित्रच आमचा! आम्ही स्थिर आहोत अशी कल्पना केली की बाजूच्या भिंती, कोनाडे, दारं हलताना दिसायची, ती एक गंमतच वाटे. झोपाळ्यावर बसणे म्हणजे आमच्या आनंदाची परमावधी! रात्री झोपताना नाखुषीनेच आम्ही त्यावरून उतरत असू. झोपलो तरी बंगईवर बसून आहोत असंच वाटे, दुसर्‍या तिसर्‍या दिवशी आमचं इतर गंमतींकडे लक्ष जात असे.
बंगईशिवाय मुधोळ अशी कल्पनाच करता येत नाही. मामांनी पुढे ओसरीवर फरशी घातली, आणखी काही बदल केले पण बंगई तशीच ठेवली. नंतर आम्ही भावंडे ज्याला जेंव्हा जमेल तेंव्हा वर्षा-दोन वर्षांनी मुधोळला जात असू. मग सावकाश एकट्या- दुकट्यांना त्यावर बसता येत असे.
कधी मामा बंगईवर बसून आणि मी समोर खुर्चीवर असे आमचे वाद झालेले आहेत, खूप टोकाचंही काय काय मी बोललेली आहे. पुढे पुढे मी ते बंद केलं, ऎकणं वाढवलं. बरोबरीच्या नात्याने मामांनी सांगीतलेलं ऎकलं. रात्री त्यावर बसून मामी काही मनातलं बोलल्या आहेत. बंगई हे संवादाचंच प्रतिक होतं शब्दांच्या आणि शब्दांशिवायच्याही.

आमच्याकडे बंगई बसली आणि इतकं छान वाटलं मला! औरंगाबादच्या माझ्या घराच्या जोडीला हे घरही माझं झालं आहे. आता जेंव्हा मी हे घर माझं आहे असं म्हणते तेंव्हा आतून आतून मला माहित असतं, हे माझं आहे. मग हे गावही मला माझं वाटू लागलं. मुलांसाठी तर हे गाव म्हणजे त्यांचंच गाव आहे आणि मुलं इतकी माझी आहेत ना!......... हल्ली कुठून गावाहून आले आणि इथल्या ओळखीच्या खुणा दिसायला लागल्या की मला बरं वाटतं, चला आलो आपल्या घरी!

बंगईला आम्ही झोपाळाच म्हणतो. बंगई बसवल्यावर माझ्या लक्षात आलं, माझ्या आठवणीतून मी ही माझ्या घरी घेऊन आले आहे, पण त्याबरोबरच काहीच मला आणता आलेलं नाही. बंगई खूप वेगळी आहे झोपाळ्यापेक्षा, त्याची मजा घ्यायला खूप भावंडं लागतात. माझ्या सगळ्या भावंडांसाठी, माझ्या बालपणासाठी मी ’बंगई’ हे नाव मागेच ठेवून आले. ते एकटं नाव तोडून मला इकडे आणताच आलं नसतं.

कधी झोपाळ्यावर बसून सुहृदला झोपवायचं, कधी मी, मुक्ता, सुहॄद बसून सुहृदच्या आवडीच्या कविता म्हणतो, कधी आम्ही दोघं बोलत बसतो, कधी मुलं ओढण्या बांधून त्याचं हलतं घर बनवतात, कधी येणार्‍यांशी मनमोकळ्या गप्पा होतात. कधी मी एकटीच काही काही आठवत बसते. झोपाळा बसणार्‍याचं मूलपण जागतं ठेवतो.

माझे सगळे विचार आणि माझी रूखरूख जर मला गाठोड्यात गुंडाळून खुंटीला टांगता आली ना! तर मी म्हणेन कुठे बाहेर न जाता, पुस्तके वाचत, काही बाही लिहीत असंच कायम घरी राहायलाच मला आवडेल.