Saturday, February 21, 2009

कुटंबात विचार

"कुटुंबात लोकशाही असली पाहिजे" हा एक महत्वाचा मुद्दा आहे.खरोखरच कुटुंबाकुटुंबांमधे लोकशाही आली तर ती एक क्रांतीच होइल.
तरीही कुटुंबात कोणत्या विषयांबद्दल विचार होतो हे महत्वाचे आहे असे मला वाटते.

बहुतांशी कुटुंबात विचार आणि विचारविनिमय या दोन्ही अर्थांनी विचार होत नाहीत.
’विचार होत नाहीत ’ ही कुटुंबव्यवस्थेची मर्यादा आहे का? शोधून पाहिले पाहीजे.
त्याचे कारण ’विचार’ करायचे शिक्षण देऊ शकतील अशा व्यक्ती सामान्य कुटुंबात अभावानेच असतात ’ हे असेल तर तसे का आहे?
" विचार करणे "या गोष्टीचा प्रसार का होत नाही? कारण कुठल्याही सत्तेला विचार करणारे नकोच असतात.मग ती घरातली असो, अध्यात्मातली असो की राजकारणातली असो, कारण विचार करणारे स्वतःचे रस्ते शोधू शकतात .
कुटुंबात विचार होत नाहीत कारण कुटुंबात भावनेला ,विचारांच्या वरचे स्थान आहे.निर्णय घेण्यात भावनेचा वाटा जास्त असतो.
कुटुंबाचे "साध्य "काय आहे? सुख????
("विचार "हे कधीही साध्य होऊ शकत नाही,ते साधन आहे व्यवस्था बदलण्याचे ,माणसे बदलण्याचे.)
सुख--- तेही प्रत्येकाला वाटेल ते नाही तर समाजात ज्याला सुख म्हंटले जाते ते!कुटूंब सुखी असून चालत नाही तर ते तसे दिसावे लागते.
सुखी दिसण्यासाठी विचारांची गरज नसते. समाजाने आदर्श घालून दिलेले असतात त्या वाटांवरुन चालताना स्वतः विचार करावा लागत नाही.
"एकत्रित" विचार हा बहुदा तेंव्हाच होतो जेंव्हा तो विचार करणे याच हेतुने माणसे जमतात. हे अगदी मान्य .
पण वर्षानुवर्षे एकाच घरात राहणारी माणसे एकत्रित विचार करायला का जमत नाहीत?
कुटूंब, कुटुंबातल्या कोणत्या सदस्यांना एकेकट्याने विचार करायला स्वातंत्र्य आणि space देते?
(किती घरातल्या बायकांना हे मिळते?)
बरं हे एकेकटे सदस्य कशाचा विचार करतात?
कुटुंबात आपण आपल्या माणसांचा विचार करायला शिकतो की त्यांची काळजी घ्यायला?त्यांची कदर करायला?त्यांच्या इच्छेसाठी स्वतःला बदलायला?तत्वांना मुरड घालायला?
भावना या विचारांपेक्षा अधिक महत्वाच्या आहेत हेच आपण शिकतो आणि आपल्या माणसांना ,ती दुखावतील याला घाबरायला लागतो.
जर कुटुंब सुखी असायला विचारांची गरजच पडत नसेल तर "कुटुंबात विचार होत नाहीत" याची काळजी करायचे कारण नाही.
मग कुटुंबात विचार व्हावेत असे का वाटते?
१.कुटुंबांनी सुखाच्या वरच्या पातळीवर जावे असे वाटते.
२.जोपर्यंत ही कुटुंबे सरळ रेषेत चालत असतात तोवर विचारांविना काही अडत नाही पण अशा कुटुंबांवर काही आघात झाला (मुलाने आंतरजातीय ७-८ वर्षांनी मोठ्या मुलीशी लग्न करायचे ठरवले ) की ती कोलमडून पडतात.
अशा प्रसंगी दिशा दाखवणे आणि निर्णयाचा स्वीकार करणे या दोन्हींसाठीची ताकद विचारांमधे असते.
म्हणून कुटुंबात विचार व्हायला हवेत.

Monday, February 16, 2009

उत्सुकतेने मी झोपलो च्या परीक्षणानिमित्त

उत्सुकतेने मी झोपलो’ चे परीक्षण रविवार १५ फेब्रु. च्या लोकरंग (लोकसत्‍ता रविवार पुरवणी) मध्ये आले आहे, अरुण अनंत भालेराव यांनी केलेले.
ते ज्या कादंबरीविषयी बोलत आहेत ती आणि मी वाचलेली जणू दोन वेगळ्याच कादंबर्‍या आहेत.
मुळात ही मुख्यतः एकाकीपणाची गोष्ट आहे असे मला वाटत नाही. कुटुंबव्यवस्थेत विचार करणार्‍या माणसांना या व्यवस्थेबद्‍दलचे काही मूलभूत प्रश्न पडत जातात. त्यामुळे त्यांचे जगणे बदलते पण कुटुंबव्यवस्थेतील इतरांना हे बदल जाणवतही नाहीत. म्हणजे माधुरीने सासू, जाऊ यांच्याबद्‍द्ल तक्रार केली तर चालणार आहे पण "रोज मन लावून हिंदी सिनेमा पाहताना सासूच्या मनात काय येत असेल" असा प्रश्न विचारणे बसत नाही.
पुढेही गोष्ट विलास आणि हर्षद यांना येणार्‍या एकाकीपणाची नाही तर कुटुंबव्यवस्थेच्या कुटुंबातील घटकांकडून असलेल्या अपेक्षा आणि या प्रत्येक घटकाच्या कुटुंब्व्यवस्थेकडून असणार्‍या अपेक्षांचा आलेख यात मांडलाय. आपली कुटुंबे समाजनियमात बसणारीच असावीत ची धडपड आहे.
यात वनिता आणि विलास यांचं नातं हळुवारपणे आलेलं आहे. हे दोघे चुलत बहीण भाऊ आहेत. त्यांचं एकमेकातलं गुंतणं याला आपल्या समाजचौकटीत प्रेम नाही म्हणता येणार. त्यांची माया आहे एकमेकांवर त्याचं काय करायचं हे दोघांनाही उमजत नाही.
तिसर्‍या भागात तर कुटुंबव्यवस्थेबद्‍दलचेच विचार आहेत.
अरुण भालेराव म्हणतात -- "तरुणांची मिश्र मन:स्थिती सांगताना लेखक आवर्जून १५/२० ठिकाणी म्हणतो, ’त्याला आनंद वाटला. त्याला पडेल वाटले." म्हणजे सध्या जी तरुणांची डिप्रेशन ची स्थिती आपण सर्वत्र पाहतो त्याची जाणीव लेखक ’पडेल वाटले’ अशा साध्या सरळ वर्णनाने करून देतो.
हे असं नाही.
एकतर फक्‍त विलासलाच पडेल वाटते. हर्षदला किंवा वनिताला. संजय किंवा परागला कधी पडेल वाटत नाही. लेखक सांगतोय ती तरुणांची मन:स्थिती नाही. ’पडेल वाटणे’ चा अर्थ एका शब्दात सांगता नाही यायचा. वाचता वाचता आपल्याला कळतंच पडेल म्हणजे विलासला काय वाटतं ते !
त्याला आनंद होतो तेव्हाच त्याला वाटते की किती छोट्या गोष्टी आहेत ह्या, ज्याचा आपल्याला आनंद होतोय. त्याचे त्याला वैषम्य वाटते म्हणजेच पडेल वाटते. किंवा रुखरुख वाटते, हताश वाटतं, वेगवेगळ्या प्रसंगी त्याला वेगवेगळ्या अर्थच्छटा आहेत.
अरुण भालेराव पुढे म्हणतात -------- ’ रचनेचा, विषयाचा वेगळेपणा टिकवण्याच्या लोभापायी लेखकाकडून भाषेच्या बर्‍याच अनावश्यक चुका झालेल्या आहेत. एमए ऐवजी एमे..’
हे वेगळे शब्द लेखकाने आवर्जून वापरले आहेत. लेखकाने एम ए असे का म्हंटले नसेल ? एम ए हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना शिस्तीत अभ्यास करायचा आहे. जमल्यास पुढे एम फिल, पी एच डी वगैरे. एखाद्‍या महाविद्‍यालयात प्राध्यापक व्हायचं आहे.
माधुरीला करायचंय एमे, तिला मजा म्हणून शिकायचंय. त्या पदवीचा वापर ती भविष्यात करेलच असे नाही. लग्नाचं एक वय येईतो ती शिकते आहे. हल्‍ली नुसतं घरी बसून काय करणार त्यापेक्षा शिकायला पाठवतात. तसं तिला शिकायचंय म्हणून एमे.
’दोघे फोनात मजेत हसले’ इथे वाचता वाचता मीही थांबले पण मला ते खटकलं नाही. उलट आकर्षक वाटलं. फोन हा परभाषीय शब्द आपण मराठीत स्वीकारला आहे. त्याला प्रत्ययही भाषेप्रमाणे लावतो त्याऐवजी मराठीप्रमाणे लावला पाहिजे. आपण फोनवर बोलतो का ? तर नाही, फोनात बोलतो, आणि फोनात हसल्यामुळे हसण्याची मजा आणखी वाढली आहे.
भाषेचे हे प्रयोग लेखकाने का केले असावेत ? मला वाटते _______ रोजच्या जगण्यातले, नेहमीचे प्रसंग तो सांगतो आहे पण त्यातला वेगळा अर्थ त्याला जाणवून द्‍यायचा आहे. त्यासाठी त्याच्याकडे भाषा तर रोजचीच आहे. म्हणून तीच भाषा तो अधिक थेटपणे वापरतो आहे.

श्याम मनोहरांची ’कळ’, ’खूप लोक आहेत’ ही पुस्तके वाचताना मी भारावल्यासारखी झाले होते. हे पुस्तक वाचताना तसे झाले नाही. पूर्वीही काही काही कळले नव्हते, याही वेळी काही काही कळले नाही. पुस्तक ’ग्रेट’ आहे असे नाही पण अतिशय चांगले आहे.
कथानकात फारसे काही घडत नाही, त्यात गुंतण्यासारखे काही नाही म्हणून मग त्यातल्या आशयाचा आपण पुन्हा पुन्हा विचार करायला लागतो, बरंचसं पटतं, थोडंफार पटतही नाही.
वाटलं ’कुटुंबात विचारच होत नाहीत’ हे म्हणणे तपासून पाहावे.

Friday, February 13, 2009

कुटुंब

"उत्सुकतेने मी झोपलो’ ही श्याम मनोहरांची तीन विभागात पण सलग आशय असणारी कादंबरी.

यात मध्यमवर्गीय कुटुंबव्यवस्थेचा उभा छेद घेतलेला आहे. यातील निरीक्षणांना काही सन्माननीय अपवाद असतीलही पण ते नियम सिध्द करण्यापुरते. एरवी सर्वत्र काय दिसते ?


"कुटुंबात विचारच होत नाहीत"
(कशाला विचार हवेत ? कुटुंब म्हणजे सुरक्षितता, कुटुंब म्हणजे सुख...)

मला वाटले, हे तपासून पाहू या का ? काय दिसते आपल्याला ?
कुटुंबात कशाकशाबद्द्ल विचार होतात ?
रोज होणारे विचार (चर्चा)
  • भाजी कुठली करायची ? डब्यात काय ? जेवायला काय ?
  • कपडे कुठले घालायचे ?
  • रोजचे वेळापत्रक सांभाळणे
  • कार्यालयीन कामासंबंधी
  • टीव्ही, ठळक बातमी, मालिकांसंबंधी
अधूनमधून होणारे विचार (चर्चा)
  • खरेदीसंबंधी,, हे घेऊ या का ? ते घेऊ या का ? केव्हा ? कधी ? (वस्तू, कपडे, दागिने वगैरे वगैरे)
  • सणवार, विशेष समारंभ साजरा करण्यासंबंधी, आहेर, त्यास उपस्थित राहणे वगैरे वगैरे
  • मुलांची प्रगती
  • आर्थिक बाबी
  • घरातल्या ज्येष्ठांविषयी, प्रकृती-आजारपण
  • राजकारण
  • खेळ (टीव्ही वरील)
  • कुटुंबाकुटुंबातील तुलनात्मक आचरणासंबंधी
क्वचित केले जाणारे विचार
  • सहलीसंबंधी
  • लग्नासंबंधी
  • व्यवसाय निवड / बदल
वरील यादी परिपूर्ण आहे असे मी म्हणत नाही पण कुटुंबात बोलले जाणारे विषय साधारणपणे याला समांतर जाणारेच असतात.
यात विचार काय आहे ? बहुतेकवेळा ’पर्याय निवड’ असते. इतर वेळा समाजात बरं दिसेल, तथाकथित प्रतिष्ठेचे असेल त्याचं अनुकरण असं असतं.
यापलिकडे खरंच कुटुंबात काही मूलगामी विचार होतात का ? माणसं समजून घेतली जातात का ? की प्रेम (तेही चौकटीतले) हेच पुरेसे आहे असे समजले जाते ? कुटुंबात काही गाभ्याशी जाणारे प्रश्न पडतात का ?
समजा - नैतिकता म्हणजे काय ? याचा विचार होतो का, किंवा स्वातंत्र्य ? (आपल्याला आहे का?) मृत्यू अटळ आहे. त्याचा विचार / स्पष्ट उच्चार कुटुंबांमधून होतो का ? जगण्याचा तरी होतो का ?
विचार करायचा म्हंटलं तर असा एखादा प्रश्न, (जो आपली खरी ओळख दाखवेल) कुटुंबामध्ये सापडेल का ?
कुटुंबात विचार होत नाही याविषयी मला वाटले तसे हे...
याशिवायची त्यांची बाकीची निरीक्षणे अशी
१]लग्न ही केवळ स्त्रीपुरुषांची गोष्ट नसते,कुटूंबाची गोष्ट असते.मुलीचे,मुलाचे लग्न योग्य वयात होणे आवश्यक असते.
२]कुटूंबात विचारच होत नाही
३]कुटूंबात माणूसच समजत नाही
४]कुटूंबात वर्ल्ड व्ह्यू येत नाही.
५]निर्मितीला कुटूंबात जागा नसते.
६]कुटूंबव्यवस्थेत ज्ञानाला जागा नाही.
७]कुटूंब एकाच प्रकारची असतात.(म्हणजे आई-वडील मुले, फारतर वडीलांचे आई-वडील, असे)
८]कुटूंबव्यवस्थेत नव्वद टक्के आठवणी सगळ्यांच्या सारख्याच असतात.
९]स्त्रीपुरुषसमानता हे तत्व कुटुंबव्यवस्थेतून नाही आले.
१०]स्त्रीपुरुषसमानतेचे कुटुंबात काय करायचे हे अजून नीट नाहीच उमगत.
११]श्रमप्रतिष्ठा हे तत्व कुटूंबव्यवस्थेतून नाही आले. श्रमप्रतिष्ठेचे कुटुंबात काय करायचे हे अजून नीट नाहीच उमगत
१२]कुटुंबातल्या घटकांनी सामंजस्याने वागून एकमेकांचा आदर ठेवून एकमेकांच्या दुःखात सहभागी व्हावे आणि कुटुंबव्यवस्था टिकवावी. या तत्वाशिवाय दुसरे तत्व सापडले नाही कुटूंबव्यवस्थेतून.
१३) कुटूंबव्यवस्थेतून सतीची चाल बंद झाली नाही.
१४) कुटूंबव्यवस्थेतून भ्रष्टाचार बंद होत नाहीय.
१५). कुटूंबव्यवस्थेत फार कामे असतात, विचार करायला वेळच नसतो. कोणकोणती कामे करायची अन कशीकशी करायची याचाच विचार कुटूंबव्यवस्थेत होतो.
१६) जगायचे असेल तर नुसते कुटुंब नीट असून उपयोगी नाही, समाजच नीट पाहिजे.
१७) कौटुंबिक अवकाशात लहाम मुलांच्या विचित्र गोष्टी बसू शकतात, मोठ्यांच्या विचित्र गोष्टी नाही बसू शकत.
१८) मोठे झाल्यावर ओढीवर संयम ठेवायचा असतो, ओढीप्रमाणे वागून कुटुंब टिकेल ?
१९) कुटुंबव्यवस्था नसती तर मृत्युचे दुःख इतके कळले नसते.
२०) कुटुंबात एकटे व्हायची, असायची पद्‍धत हवी.
२१) कुटुंबव्यवस्था कितीही वाढवली तरी विश्वाएवढी नाही होणार.
२२) कुटूंबव्यवस्थेत मैत्रीची गोष्ट वरचेवर होत नाही.
२३) एकटे होऊन जीवनाचा विचार करण्याचे आकर्षण जबरदस्त असते. या आकर्षणाला कुटूंबव्यवस्थेत जागा हवी.
२४) म्हातारपण येईपर्यंत काळाचा खडक दिसतच नाही. कुटुंबव्यवस्थेत अशी काही सुधारणा केली पाहिजे की कुटूंबव्यवस्थेतल्या घटकांना लहानपणापासून काळ ठसठशीत जाणवेल.