Sunday, June 2, 2013

इदं न मम

" आई, तुझ्या मोबाईलमधलं घड्याळ १२ मिनिटे पुढे आहे, पुढे का ठेवलं आहेस? "
भिंतीवरचं घड्याळ अगदी अचूक वेळ दाखवत होतं.
" हो अगं ते बरोबर करायला मला जमलं नाही. तू कर बरं"
मी मोबाईलच्या फंदात पडत नाही. पण मग शोधत गेले settings मग watch असं काहीतरी असेल...
वेळ बदलून दिली.

आई , मोबाईलमधल्या सुविधांचा वापर करण्याचा प्रयत्न करते, बाबा फक्त फोन घेणे आणि करणे एवढंच करतात.
त्यांची नातवंडं त्यांचे मोबाईल घेउन खेळत असतात. काय काय सेटींग करून ठेवतात.....

आई बाबांचा तंत्रज्ञानाचा हात सुटलेला आहे. जेव्हा केंव्हा सोपी मशिन्स होती, रेडीओ किंवा घड्याळ तत्सम तेव्हा त्यांचा पुरेपूर वापर त्यांना करता यायचा.

मी मोबाईल वापरत नाही. त्यातलं काही मला कळत नाही पण ती माझी निवड आहे. किंवा माज आहे. मला माहीत्येय की जर पडायचं ठरवलं तर मला त्यातलं सारं येईलच. तेच संगणकाच्या बाबतीत. त्यातल्या कशातही मी कधीही पडायचं ठरवलं तर मला ते येईलच. खात्रीने.
 जेव्हा मी ’मला नाही काही त्यातलं कळत’ म्हणते तेव्हा माझ्या मनात ’मला नाही त्यात पडायचं" इतपतच आहे. पण बाबा किंवा आईने त्यात पडायचं ठरवलं तरी त्यांना अवघड आहे.

...... मला एकदम वाटून गेलं की कधीतरी माझाही तंत्रज्ञानाशी मिळवलेला हात सुटणार आहे..... मलाही साध्या वापराच्या गोष्टी अनोळखी होत जातील...... त्याची तयारी मी केली आहे का? ते तुटलेपण मी कसं स्वीकारीन?

 जगणं अधिकाधिक आरामदायी करण्यासाठी जी वेगवेगळी उपकरणे मदतीला येत आहेत ती खरंतर आपलं जगणं अधिक गुंतागुंतीचं करत आहेत. रोजच्या जगण्यासाठी आता पूर्वीपेक्षा जास्त कौशल्याची गरज आहे. आणि तंत्रज्ञानाने तर आयुष्याला विळखा घातला आहे.

 आई बाबा कसं स्वीकारत असतील हे तुटलेपण?
त्यांचं वाढणं , माझं वाढणं यात फरक आहे. त्यांच्यासाठी हे कदाचित सहज असेल. किंवा वयामुळेही स्वीकारण्याची सहजता येत असेल.
 किंवा त्या पिढीला तंत्रज्ञानाचा हात सुटला तर असुरक्षित नसेल वाटत.....

मग माझ्यात आहे का ती असुरक्षितता?
शोधली पाहिजे.

तंत्रज्ञान हे एक साधन आहे, ते काही जगणं नाही...... साधं मोबाईल वापरत नाही तर काय काय किती सांगत बसावं लागतं.... कारण तंत्रज्ञानाचा जोर इतका असतो की ते वाहूनच नेतं तुम्हांला.....  तुमच्या गरजा इतर कोणीतरी ठरवत असतं.

 माझ्या गरजा काय आहेत? ते मी ठरवीन. त्या कशा पूर्ण करायच्या? हे ही!........
समाजात राहायचं तर हे शक्य नसतं.

जगण्यानं सांधा बदलला आहे. पूर्वीचं ते संथ आणि शांत आयुष्य नाहीच पुढे कुठे बहुदा.....
मग या जगाचे नियम तरी आत्मसात केले पाहिजेत अशी सक्ती केली जात असावी... स्वत:वरच.....

.......................................

वानप्रस्थाची कल्पना ग्रेट आहे!
आप्त स्वकीयांपासूनच नव्हे तर, अशा उपकरणांपसून देखील.....दूर जाणं
हिमालयात.... कुठे वनात जाणं...... वानप्रस्थाश्रम!
नाही शक्य.... तर..
.......................................
इथे जनात राहून आपल्या मनात सार्‍यांपासून दूर जाता यायला हवं.
म्हणजे तुटलेपण हवं आहे की!!!!
मग काय घाबरायचं त्याला?
येऊ देत की समोर......
हळू हळू सगळं सोडता आलं पाहिजे....
इदं न मम....
...........................................

4 comments:

  1. मस्त!

    > मला एकदम वाटून गेलं की कधीतरी माझाही तंत्रज्ञानाशी मिळवलेला हात सुटणार आहे..... खरं आहे.

    Zen and the art of motorcycle maintenance या पुस्तकात एकीकडे आपलं तंत्रज्ञानावर अवलंबून असणं आणि दुसरीकडे त्यापासून मुक्तता हवी असणं या वरवर परस्परविरोधी प्रवृत्तीमागील प्रेरणांचा अगदी अप्रतिम असा शोध घेतला आहे. त्याची आठवण मला हा लेख वाचताना झाली.

    ReplyDelete
  2. आवडलं.. आणि पटलंही.. जमेल का.. माहित नाही.

    ReplyDelete
  3. >> इथे जनात राहून आपल्या मनात सार्‍यांपासून दूर जाता यायला हवं.
    आवडलं..
    गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा

    ReplyDelete
  4. > वाहूनच नेतं तुम्हांला..... तुमच्या गरजा इतर कोणीतरी ठरवत असतं.
    हो. होतय खर तसं. आणि सुरुवातीची ती वाटणारी चैन नंतर न कळत गरज कधी बनली हे कळतच नाही. मग काय पुरते अपंगच बनतो.

    ReplyDelete