Thursday, January 7, 2016

भेटीलागीं जीवा

मला माझी आई माहित आहे, तिची आई-माझी मोठीआई माहित आहे, मोठीआईची आई माहित आहे,
तिची आई कुठली होती? माहित नाही. तिची आई? नाही ना! त्यांच्या मागचं मागचं काहीच माहित नाही.
खरं मोठीआईची आईही कुठली? तिचं माहेर? माहित नाही.
 त्या कुणा कुणा आयांचं रक्त माझ्यात खेळतंय आणि माझी त्यांची ओळखच नाहीये.
त्यांचं नाव-गावही मला माहित नाही. ही अशी साखळी शोधत जायला किती मजा येईल!
ही साखळी अशी मागे मागे मागे थेट आपल्या सर्वांच्या आदिमायेपर्यंत पोहचेल.
त्यांचं काय काय माझ्यातून वाहत असेल ना?
त्यांनी काय काय मला दिलेलं असेल .. आपसूक.

झाडाचं कसं वय वाढत जातं तसं तसं वर्षावर्षाचं एक एक वर्तूळ वाढत जातं,
तसं समजा माझ्यातल्या पेशीचा आडवा छेद घेतला तर असं एका एका आईचं/पिढीचं एक एक वर्तूळ असेल का?
आपल्यातलं जे सार आहे, जे शहाणपण आहे ते कुठल्याही आईला, आपल्या मुलीला द्यावसं वाटणारच ना!
म्हणजे ती आई झाली असेल त्या वयापर्यंतचं....
पेशींमधली ती वर्तूळं तरूण शहाणपणाचीच असतील! :)
म्हणजे माझ्या आत खरं एक लायब्ररी असेल, एका एका पूर्वज आईचं एक पुस्तक असेल, तिच्या अनुभवांचं सार, तिचे ठसे!
मी जाऊन ती उघडत नाहिये, त्या शहाणपणाच्या कुप्या आहेतच माझ्यात.
मला तो रस्ता माहित नाहिये.
आणि ते शहाणपण माझ्यात उतरलं नसेल तर गेलं तरी कुठे?
माझ्यात जे आहे ते मला माहितच नाहीये.
मग मी काय करते, पुन्हा ते स्वत: शिकत बसते.

मी म्हणजे कांद्यासारखी असणार!
ती आतली कळी म्हणजे आदिमाय!
म्हणजे जे जे सगळं आदिम माझ्यात आहे ते ते!
भूक, भीती, काम, क्रोध, मत्सर,मोह, प्रेम, आनंद, वंशसातत्याची प्रेरणा, माया.....
मग त्यावर पाकळ्यांचे थर....
मग संचय, घर, सत्ता असं काय काय
मग त्यावर नागरीकरणाची पुटं!
शिष्टाचार वगैरे..
आडवा छेद घेतला तर कळणारच कुठे काय कसं...

खरं म्हणजे मी एक पृथ्वी आहे.
गाभ्याशी सगळ्या आदिम गोष्टी घेऊन असलेली.
माझ्या संपर्कातले लोक कुठे कुठे माझ्यावर वसती करून असलेले.
जर ते वाळवंटात असतील तर म्हणतील मी कोरडी आहे,
जर बर्फाळ प्रदेशात असतील तर म्हणतील थंड आहे,
कुठे नदी,तळ्याकाठी असतील तर म्हणतील, प्रेमळ आहे,
कुठे पर्वतावर असतील तर म्हणतील एकटी आहे,
कुठे महानगरात असतील तर म्हणतील, गर्दीची आवड आहे,माणसांची हौस आहे,
काहीतरी गाभ्यामधे हालचाल झाली, भूकंप झाला, लाव्हा बाहेर आला तर म्हणतील,
चिड्चिडी आहे, बेभरवशाची आहे
 एकाच वेळी हे सगळंच खरं आहे.
जन्मापासूनच्या सगळ्या खुणा वागवत असलेली मी एक पृथ्वी आहे.

त्या सगळ्या खापर खापर आयांचं सोडून द्या, मला माझी नीटशी ओळख नाही.
मी जर या एकुलत्या आयुष्यात मला शोधू शकले , ओळखू शकले तर त्या सगळ्या सगळ्या खापर आया मला भेटणारच आहेत.
जर माझ्यातल्या आदिमतेला जाणू शकले, तिथवर पोचले,  तर मला आदिमायेला मिठी मारता येणार आहे.
मला हे करायचं आहे.
आणि नंतर लेकीला पोटाशी धरायचं आहे.


.....

No comments:

Post a Comment