Friday, October 9, 2009

अजून येतो वास फुलांना

गेल्या काही दिवसांपासून आमच्या पारिजातकाला फुलं येताहेत. छोट्याशा पांढर्‍या पाकळ्यांच्या केशरी दांडी असणार्‍या पंधरा-वीस फुलांचा सडा सकाळी झाडाखाली पडलेला असतो. माझा तर विश्वासच बसत नाहिये! गेल्या वर्षी श्रावणात हे झाड लावलं. या श्रावणात फुले येतील असे वाटले होते. श्रावण गेला भाद्रपद गेला आणि आता अश्विनात पारिजातक बहरला. सत्यभामेने स्वर्गातून आणलेले झाड ते हेच! किती सुंदर देखणी फुलं! त्यांचा तो मंद सुवास! झाडाजवळ उभी राहिले,डोळे मिटून तो वास घेतला आणि मी एकदम कितीतरी वर्षं मागे गेले!
छोटी, झग्यातली, दोन वेण्या वर बांधलेली मुलगी मला दिसू लागली. अंगणभर पारिजातकाचा सडा पडला होता,ही छोटीशी मुलगी फुले वेचत होती. वाड्यात आमच्या शेजारी राहणार्‍या माईआजीची मैत्रिण जवळच राहत असे. त्यांच्या मागच्या अंगणात एक भले मोठे पारिजातकाचे झाड होते. एकदीड फुटाचा खोडाचा व्यास असावा. चार फूट उंचीचं नुसतं खोड, वर दहाफूट व्यासाच्या वर्तूळात पसरलेल्या फांद्या. एवढं मोठं पारिजातकाचं झाड मी आजवर पाहिलेलं नाही. श्रावणात आईला पूजेला फुले लागत म्हणून मी त्यांच्याकडे फुले वेचायला जात असे. मला उशीरा उठायला आवडतं. पण फुलांसाठी मी लवकर उठत असे.त्यांच्याकडे गेले की खाली फुलांचा गालीचा अंथरलेला असे. आणि फुलांचा घमघम वास येत असे. टोपली घेऊन, एकही फूल न तुडवता मी अंगणात उतरत असे. हलक्या हाताने सारी फुले वेचत असे.मग ते झाड हलवत असे, माझ्या अंगाखांद्यावरून फुले खाली पडत. तो फुलांचा पाऊस अंगावर घ्यायला खूप छान वाटे.झाड हलवताना मी वर पाहात असे,पडणार्‍या फुलांचा ओला कोवळा स्पर्श एका वेगळ्याच जगात घेवून जाई. तिथे मी कुणीतरी खास असे,जणू परीकथेतली छोटी राजकुमारी! बाकीचे सगळे माझी इच्छा ऎकण्यासाठी आतुर!
वेचून झाल्यावर सगळी टोपलीभर फुले त्या आजींना द्यायची. मग त्या मला किती फुले देतील याची वाट पाहायची,तो क्षण मला नकोसा होई. एकेक करून मी वेचलेली सगळी फुले मला परकी झालेली असत. मजुरी दिल्यासारखी त्यातली फक्त ओंजळभर फुलं त्या मला देत. मला वाईट वाटे. मी आईला तसे बोलूनही दाखवत असे.आई म्हणायची ,"अगं देवाला चार फुले मिळाली तरी पुरे." तेवढी फुलंही आई चार घरात वाटून टाकीत. माझं वाईट वाटणं केवळ कमी फुलांसाठी नसे.मी दुखावलेली असे, का ते मला सांगता येत नसे.मला त्या आजी मुळीच आवडत नसत. तरी दुसर्‍या दिवशी सकाळी पारिजातकाच्या ओढीने मी त्यांच्या घरी जात असे.
श्रावण म्हणजे ज्या अनेक गोष्टी आहेत, त्यात प्रामुख्याने आहेत पारिजातकाची फुलं! सोमवार ,शुक्रवार आम्ही शुक्लेश्वराला/महादेवाला जायचो. तिथे तर ह्या फुलांचा खच पडलेला असे. ती थोडी सुकलेली असत.पायाखाली गेल्यामुळे फरशीवर कुठेकुठे केशरी डाग पडलेले दिसत. फुलांनी आता पार्टी बदललेली असे. सकाळची स्वप्नाळू दुनियेतली फुले आता अध्यात्मात शिरलेली वाटत. पांढर्‍याशुभ्र पाकळ्यांवर केशरी झाक आलेली दिसे.
ही फुले कधी विकली जात नाहीत.फुलवाल्याकडे मिळत नाहीत.एकट्याने एकांतात वाचायच्या कवितेसारखी असतात ही! ह्यांचं जाहीर वाचन होऊ शकत नाही की कार्यक्रम होऊ शकत नाही. फारतर पुस्तकात येऊ शकतात ही.
पण क्वचित एखादी मुलगी पारिजातकाचा गजरा शाळेत घालून येई, शाळेत येईयेईतो तो सुकून जाई. तेव्हा आम्ही मुली फार गजरे घालायचो,फुलं माळायचॊ. बाईंना फुले द्यायला चढाओढ असे. आमच्या शाळेबाहेर एक- दोन बुचाची झाडे होती.आम्ही कायम तिथे फुले वेचत असायचो.वरून फुल पडलं की वेचायचं,कधीकधी झेलायचं. हे माझं / तुझं चालायचं. हातात त्या फुलांचा गठ्ठा असे, मग फुरसतीत त्यांच्या वेण्या तयार करायच्या. आताही बुचाची झाडे फुलली आहेत. लॉ कॉलेज रस्त्यावर तर फुलांचा सडा पडलेला असतो. मला एकदाही तिथे कुणी फुले वेचताना दिसले नाही. फुले वेचणा-या त्या मुली कुठे गेल्या?
मीही आपण कधीतरी फुले वेचत असू हे विसरुन गेले होते. पारिजातकाच्या ह्या गंधामुळे मी त्या दिवसांमधे फिरुन आले. गंधाच्या आठवणी एवढ्या तीव्र असतात हे मला पहिल्यांदाच कळले.
पूर्वी मी नर्सरीत जाऊन तिथे छान दिसणारी/फुले न येणारी कुठल्यातरी अवघड नावांची रोपे घेऊन येत असे. ती निरनिराळ्या कारणांनी टिकली नाहीत. यावेळेस अस्सल देशी झाडे लावायची ठरवले. कण्हेर ,गुलाब,जास्वंदी,कोरांटी, अबोली, सोनचाफा वगैरे. सहज माळ्याला विचारलं पारिजातक मिळेल का? तर त्याने आणून दिला.
ठरवून झाडे लावली असं नाही. लहानपणी आजूबाजूला होती ती झाडे लावू असं वाट्लं होतं. पण ते तेवढ्‍यापुरतंच .
पारिजातकाला फुले येण्याची वाट पाहिली तीही तेवढ्यापुरतीच. फुले आल्यावर मला कळले, मला आतून किती हवी होती ही फुले!
मला आजवर हे माहीत नव्हते, माझ्यात किती रुजलेली आहेत ही फुले! बालपणीचा कुणी मित्र भेटल्यासारखं वाटतंय मला. मधल्या वर्षांनी काहीच परिणाम केलेला नाही आमच्या मैत्रीवर. ती तशीच टिकून आहे फुलाच्या ओल्या कोवळ्या स्पर्शासारखी! मला खूप छान वाटतंय. खूप आनंद होतोय.
या वळणावर हे झाड माझी वाट पाहत थांबलं असेल अशी अपेक्षा मी केली नव्हती.पर्‍या,राजकुमार्‍या आणि त्यांचे सेवक सगळेच पुस्तकात गेले. त्यांना बाहेर येता येत नाही की मला त्यांच्या राज्यात शिरता येत नाही. मोठं होणं किती हतबल करतं नाही माणसाला? तरीही टेरेसवर जावून डोळे मिटून येणारा वास घेतला की त्या आठवणींमधे तरी जावून येता येतं. मनाची मोठी गंमत असते नाही? आत खोलवर कुठे काय काय द्डून बसलयं आपल्यालाही पत्ता नसतो. कुठ्ल्या किल्लीने कुठले दार उघडेल आणि त्यात काय सापडेल काही सांगता येत नाही.
माझ्या आठवणीत आज फक्त फुलांचा सडा आणि ते झाड आहे. काळाच्या ओघात आजींना मी कधीतरी माफ करुन टाकलंय. त्या बिचार्‍या एकट्या राहत, गावातच मुलगा सून वेगळे राहत,त्यांचं वय झालं होतं.त्यामुळे विक्षिप्तपणा असेल. आज मला त्यांच्याबद्द्ल कृतज्ञताच वाटते. त्या सगळी फुले वेचण्यासाठी ठेवत. माझी आणि पारिजातकाची गाठ त्यांच्याशिवाय कशी पडली असती?
तर,
आमच्या पारिजातकाला फुले येताहेत ही बातमी मी सगळ्यांना सांगायला सुरवात केली. पण "हो का?" "वा! वा!" "छान!" याच्यापलीकडे कोणी गेलं नाही. मी हिरमुसले. कोणाला काही कळलंच नाही.
मला वाटतं या आनंदाचंही असंच आहे, एकांतात वाचायच्या कवितेसारखं!

6 comments:

  1. विद्या आवडल. ही स्मरणरंजने किंवा गतकातरता (मराठीत नॉस्टॅलजीया) तुला लिहीताना जेवढी मजा आली तेव्हढीच वाचताना मलापण मिळाली. या आठवणी नकळत आपल्याला आपल्या बालपणात घेउन जातात आणि मग जाणवत तो काळ किती सुखी होता ते. कारण आता आपण कोणाच्या आनंदाच्या घटनेला पण हात राखून प्रतिक्रीया देतो. मला वाटत आपण तो निरागसपणा हरवून बसलोय की काय?

    ReplyDelete
  2. विद्या,
    ऑफिसमध्ये तुझा हा ब्लॉग वाचणं अवघड होऊन बसलं. कसाबसा ताबा ठेवला डोळ्यांवर.
    माझ्या आजोळी-शिरोळला झाड होतं परिजातकाचं. टोपलीभर फुलांमध्ये देव झाकून गेलेले असायचे आणि देवघरात तो वास भरून राहिलेला असे. अजूनही पारिजातकाची फुलं ओंजळीत घेउन खोल वास घेतला की मी शिरोळच्या देवघरात पोचते. मला आजोबा भेटतात. आम्ही दोघं मिळून गोळा करायचो ती फुलं. घराच्या कौलांवर पडलेली फुलंही मी झाडावर चढून गोळा करायचे. त्याच्या गोलगोल बियाही आम्ही साठवायचो दुकान दुकान खेळताना त्या पैसे म्हणून उपयोगी पडायच्या!
    खूप छान वाटलं ब्लॉग वाचून.

    ReplyDelete
  3. विद्या, खूपच छान!! खरचं तुझा ब्लॉग मलापण लहानपणीच्या काळात घेऊन गेला.

    पारिजातक आणि चाफ़ा (सोनचाफ़ा,पांढरा चाफ़ा,लाल चाफ़ा सर्व प्रकार) माझी लहानपणापासूनची आवडती फ़ुले. माझ्या मावशीच्या वाड्यात ब-याच प्रकारची फुलझाडे होती, गुलाब, जास्वंद, अबोली, चाफ़ा, पारिजातक. पण मला आवडायची ती पारिजातक आणि चाफ़्याची फुले. मी मावशीकडे राहायला गेले की नेहमी लवकर उठायचे (आम्हां भावंडात चढाओढ असायची कोण आधी उठतय याची). मग आवरुन अंगणात जायचे. पारिजातकाचा सडा पडलेला असायचा. पांढ-या, चांदणीसारख्या नाजूक पाकळ्या आणि तसेच नाजूक केशरी देठ. मी इतक्या हलक्या हाताने गोळा करायची फ़ुले माझ्या फ़्रॉकच्या ओच्यात (तशी मी हूमदांडगेश्वर म्हणून प्रसिध्द होते :))! थोडी जमा झाली की एका ताट्लीत पाणी घालून त्यात अलगद ठेवायची. पाण्यावर तरंगणारी ती फुले इतकी छान दिसत.

    मला अजूनही पारिजातकाचा सडा पाहिल्यावर, फुले वेचण्याचा मोह आवरत नाही. मी आणि गौतमी जेव्हा पायी आजीकडे जातो, तेव्हा कोप-यावरील बंगल्याबाहेर पडलेल्या सड्यातून फुले गोळा करतो. तसेच चाफ़्याचे, कधी फ़िरायला गेले आमच्या भागात, तर कुठेही चाफ़्याचे फ़ूल दिसले की पट्कन उचलतेच मी!

    -आशा

    ReplyDelete
  4. विद्या खूपच छान.मला आठवतयं माझ्या लहानपणी आमच्या सोसायटीत एक कारखानीस म्हणून रहात होते.दरवर्षी नवरात्रात त्या काकू कुमारीकांना बोलावून त्यांची पूजा करीत असत. त्या दिवसाची आम्ही सर्व मैत्रीणी आतुरतेने वाट बघायचो.त्या सर्व गंधांची आज आठवण करुन दील्याबद्दल विद्या मी आभारी आहे. पहील्यांदा त्या आमचे पाय धुवून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायच्या.नंतर वासाचे तेल अंगाला लावून चोळायच्या. नंतर संपूर्ण आंगाला चंदनाचा लेप लावायच्या.व त्यानंतर आंघोळीच्या बादलीत अत्तर टाकून आम्हाला न्हाउ घालायच्या.नंतर आम्हाला फ्रॉकसाठी कापड आणलेले असायचे. ते नवीन कापड, काचेच्या बांगड्या, आणि जाई कींवा जुईच्या फूलांचा गजरा.......यानी आमची ओटी भरायच्या.नंतर केळीच्या पानाभोवती रांगोळी काढून,उदबत्त्या लावून आमची खास अशी पंगत जेवायला बसायची.त्या वयात त्या सर्वच गोष्टींचा वेगळा,निराळाच असा एक गंध होता.खरचं परत येतील ते दीवस??????????

    ReplyDelete
  5. खूप छान. माझा आणि फुलांचा ‌ऋणानुबंध फार विकसित नाही; पण पारिजातकाचं जरा वेगळं आहे. एकांतात वाचायची कविता आम्हालाही दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  6. विद्यामावशी,
    आज आईने तुझा ब्लॊग वाचायला दिला.फार छान आहेगं!गंमत सागूं,मला सुद्धा प्राजक्त(पारिजातक)खूप आवडते.किती सुंदर ,नाजुक असते हे फुल!काय माहित पण मला त्याला नुसते बघितले तरी प्रसन्न वाटू लागते.आमच्याइथे एका बंगल्यात त्याचे झाड आहे.तिथून जाताना आम्ही नेहमी फुले गोळा करतो.पण ते मध्ये कापले होते. तेव्हा मी आईला विचारायचे,का कापले ते झाड?
    पण सुदैवाने आता त्याच्या फांद्या परत आल्या आहेत!
    या आणि यापुढील आठवणी मी नक्की जपून ठेवणार,तुमच्यासारख्या!

    ReplyDelete