Sunday, November 8, 2009

गमते उदास


सुनीताबाई गेल्या.
इतक्यात त्यांचे काही लेखन वृत्तपत्रात वाचले नव्हते.
वाटायचे प्रकृती कशी असेल? मध्यंतरी त्यांची प्रकृती बरी नसल्याची बातमी वाचली होती.
कधीतरी ही बातमी यायची होतीच. खूप उदास वाटतंय. सवयीने ही उदासी जाते हे ही माहीत आहे. आज आतमधे काहीतरी तुटलंय.
सुनीताबाईंना मी पहिल्यांदा औरंगाबादला स.भु. सभागृहात पाहिले. बोरकरांच्या कवितावाचनाच्या वेळी. त्या पुलंपेक्षा प्रभावी वाटल्या होत्या.
काही चांगले कार्यक्रम मला पाहता/ऎकता आले म्हणून माझाच मला हेवा वाटतो, त्यातील हा एक कार्यक्रम आहे. ’सरीवर सरी’ तर अजून कानात आहे.
पुढे ’आहे मनोहर तरी’ आलं. तत्पूर्वी त्यातले काही वेचे म.टा.त आले होते. पहिला उतारा धामापूरच्या तलावाबद्दलचा होता.मी किती भारावून गेले होते, मला आठवतंय. पुढचे दिवस "आहे मनोहर तरी" चे होते. कितीदातरी कितीतरी वर्षे हे पुस्तक मी वाचत होते. कुठलंही पान उघडावं आणि वाचावं, आयुष्याबद्द्ल काही प्रश्न पडू पाहात होते,तेंव्हा सगळ्या प्रश्नांची खोलवर उत्तरे
शोधणारे, स्वत:ला काट्यावर तोलणारे, तरी काव्यमय आणि इतके खरे !
सुनीताबाईंशी अंतरीचं नातं जुळलं. पुलंना पत्रे पाठवली होती, पण सुनीताबाईंना काय लिहायचं? असंच वाटलेलं.
माझं आणि मिलिन्द्चं आवडतं पुस्तक! आमच्या कुठल्या आवडी जुळताहेत हे आजमावताना पुस्तके खूप महत्त्वाची होती.या पुस्तकावर आम्ही दोघेही किती बोललोय!
सुनीताबाईंचाही आवाज मोठा असं कळल्यावर मला माझ्या मोठ्या आवाजाचं काही वाटेनासं झालं इतकं हे पुस्तक माझ्यात भिनलं होतं.
लग्नानंतरही ह्या पुस्तकाने मला खूप आधार दिला. मुळाशी जावून प्रश्न सोडवताना सुनीताबाईंचा आधार वाटत राहिला.
पुढे त्यांची आणखीही पुस्तके आली. "कार्लाइलच्या बायको"बद्द्ल उत्त्सुकता होती ते समांतर जीवनही आलं
जी.एं.ची पत्रे, सुनीताबाईंची पत्रे!
त्यांच्या एकटीच्या काव्यवाचनाची VCD. माझी आवडती!
त्यातल्या सगळ्याच कविता किती मन लावून वाचल्यात त्यांनी!
शेवटची पद्मा गोळ्यांची ’आताशा मी नसतेच इथे’ ऎकताना तर त्या स्वतःबद्द्लच बोलताहेत, असं वाटतं.

आहे मनोहर तरी मधे उल्लेख आहे .......
आर्थर कोस्लर म्हणतो "लहानपणी शिकवले गेले होते, ज्यांच्या पुण्याईवर हे जग टिकून आहे अशी एकूण छत्तीस देवमाणसे आहेत. जगाच्या पाठीवर कुठेकुठे विखुरलेली ही माणसे नेमकी छत्तीस नाहीत. ती हजार, दहा हजारही असतील. वेगवेगळ्या क्षेत्रात ती आपल्याला अचानक भेटतात. कुणी एखादा शेतकरी, कुणी डॉक्टर, कुणी सामाजिक कार्यकर्ता, एखादा सैन्यातला माणूस, कुणी एखादी शिक्षिका, कामगार, शास्त्रज्ञ, कुणीही. यांच्यातला समान धागा कुठला ? राष्ट्रा-राष्ट्रांच्या, मानवी समूहांच्या, प्रचंड गोंधळ आणि मूर्खपणा असणार्‍या, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नसणार्‍या या जनसागरात, स्वतःपुरती शिस्त आणि स्वाभिमान जपत स्वतःच्या साध्यासुध्या जीवननिष्ठांची कुंपणे घालून या लोकांनी छोटी छोटी स्वतंत्र बेटॆच जणू निर्माण केली आहेत. कोणताही वादळवारा त्यांना उद्‍ध्वस्त करू शकत नाही आणि कितीही उंच लाटा त्यांना बुडवू शकत नाहीत. तुमच्याआमच्यासारखीच ही सामान्य माणसे. पण असा काहीतरी घट्ट विश्वास त्यांच्या नजरेत भरून राहिलेला दिसतो, की अत्यंत निराशेच्या, वैफल्याच्या क्षणी दीपस्तंभासारखे ते डोळे प्रकाशकिरण दाखवितात. हे कुणी संतमहात्मे नव्हेत. पण युगानुयुगांचे हे आधारवड. उभ्या मानवजातील जीवनमूल्यांचा, स्वाभिमानाचा, धैर्याचा, प्रेमाचा, तळमळीचा, क्षमाशीलतेचा, आशेचा प्राणवायू ते पुरवत असतात."


सुनीताबाई त्यातल्या एक होत्या.

2 comments:

  1. "कधीतरी ही बातमी यायची होतीच. (पण तरीही) खूप उदास वाटतंय."

    अगदी बरोबर.

    ReplyDelete
  2. गमते उदास! खरंच असं वाटलं बातमी ऐकल्यावर. तू अगदी मनातलं लिहिलं आहेस.

    ReplyDelete