Monday, June 14, 2010

सर आली धावून....

खूप पाऊस पडला की आमच्या वाड्यात पाणी साचायचं. आम्ही भराभर होड्या करायचो, पाण्यात सोडायचो, दारातून वाकून ती कुठपर्यन्त जातेय ते बघायचो. आणखीही कोणी कोणी होड्या सोडायचं. थोड्या वेळाने पाणी ओसरायचं. कधीकधी झड लागून असायची, सतत पाऊस सुरू. सूर्यदर्शन नाही, मग मला त्या संन्याशांची काळजी वाटायची, सूर्यदर्शन झाल्याशिवाय कसे जेवणार ते? बिचार्‍यांना उपास. आमच्याकडे एक रामदासी यायचे सकाळी सकाळी, त्यांना भिक्षा घालायची म्हणजे मला पळावंच लागायचं त्यांच्या मागे. पुस्तकातल्या रामदासांसारखे दिसणारे हे रामदासीबुवा मोठ्यांदा ’ मना वासना दुष्ट कामा नये रे’ म्हणत असायचे. त्यांच्या जेवणाची विशेष काळजी वाटायची.
इतका सतत पाऊस कोसळायचा, वाटायचं जगबुडी येणार की काय?? आपण तर त्या नोहासारखी नौकाही बांधून ठेवलेली नाही. सगळे मोठे तर बिनधास्त! सतत एकवीस दिवस, एकवीस रात्री असा पाऊस पडत राहिला तर काय करतील??
दोन दिवसांनी सगळ्या घरादाराला, पुस्तकांना, कपड्यांना एक पावसाचा वास यायला लागायचा. स्वच्छ सूर्यप्रकाशाची ओढ लागून राहायची. चिकचिक, ओल, दमटपणा....... ओल्या छत्र्या, रेनकोट....न वाळलेले कपडे... एकदा घरात आलं की पुन्हा बाहेर पडावसं वाटायचं नाही. घरातल्या घरात करायचे उद्योग सुरू व्हायचे. बाबा काही पावसाच्या गोष्टी सांगायचे, गंमतशीर गणितं, कोडी. मी नुकतीच वाचायला शिकल्यामुळे, माझ्या वाचनाचे प्रयोग, कविता, गाणी काय काय सुरू व्हायचं. तरी पाऊस संपायचा नाही.
अशाच एखाद्या रात्री, मध्यरात्री , अचानक ती जोरदार सर यायची. वरच्या मजल्याच्या पत्र्यावरून खाली पडणार्‍या सरीचा तो आवाज मला सहन व्हायचा नाही. छाती भरून यायची, पुढच्या क्षणाचा भरवसा नाही, असं काहीतरी... मी श्वास रोखून बसायची..... रेझोनन्स असेल. ती माझी अस्वस्थ होण्याची फ्रिक्वेन्सी असेल.....आई लगेच उठायची, जागीच असल्यासारखी.... मला तिला सांगायचं असायचं ’ हा आवाज थांबव’ मला काही बोलताच यायचं नाही. मी बधिर.. घाबरून बसलेली... स्वत:ला कुठं लपवावं न कळणारी. मी काही हालचाल करायचे नाही, रडायचे नाही, काहीही करणं शक्यच नसायचं मला. आई उठून उदबत्ती लावायची. मला मांडीवर घेऊन बसायची, अगदी जवळ. माझ्या पायांवर माझी आवडती गोधडी घालायची. हात माझ्या पायांभोवती गुंफायची. माझ्या गालाला गाल लावून ती रामरक्षा म्हणायला सुरूवात करायची....हळू आवाजात....माझी भीती संपायची नाही... पण बाहेरच्या त्या अमानवी आवाजाच्या विरोधात, माझ्या बाजूने आईने तिचा आवाज लावलेला असायचा. रामरक्षा झाल्यावर तो अंगारा मला लावायची. तोवर सर संपली नसेल तर... पुढे ’भीमरूपी महारूद्रा’ ....... ती विशिष्ट सर संपली की मला जरा बरं वाटायला लागायचं. थोपटत थोपटत आई मला झोपवायची. आईची साडी आणि गोधडी यांच्या मधे, आईला चिटकून, मी झोपत असे.
सकाळी जाग येई तेंव्हा उजाडलेलं असे. आई नेहमीसारखी कामाला लागलेली. रात्रीचं स्वप्न विसरावं तसं मी सगळं पुसून टाकत असे.
शाळेत जाण्याच्या तयारीला लागत असे.... रेनकोट घालून घराबाहेर पडत असे....

2 comments:

  1. आवडलं!
    भीती आणि रामरक्षेची सांगड अजूनही माझ्या मनात पक्की आहे. कमालीची भीती वाटते तेव्हा आपोआपच मनात रामरक्षा सुरु होते. कदाचित त्याचं कारणही लहानपणी रामरक्षेबरोबर जोडले गेलेले असे उबदार क्षण हेच असेल.

    ReplyDelete
  2. रेनकोट घालून घराबाहेर पडत असे....
    हा विराम छान आहे.

    मनाला/नेणीवेला भिववणार्‍या पावसापासून रक्षण करण्याचं सामर्थ्य, आईच्या उबदार स्पर्शात, मायेच्या रामरक्षेच्या मंत्रोच्चारात आहे. ते कवच पांघरले की शरीराल्या भिजवणार्‍या पावसापासून वाचवायला प्लॅस्टिकचा रेनकोट पुरेसा..

    ReplyDelete