Wednesday, June 2, 2010

हर्षमानसी

मी पाचवीत होते की सहावीत आठवत नाही. त्यावर्षी आमचा वर्ग कडेला होता. सगळे वर्ग असे सरळ रेषेत, आमचा मात्र काटकोनात. सुटी संपून नुकतीच शाळा सुरू झालेली. पावसाचा वास, मातीचा वास, पहिल्या पावसानं तरारलेला हिरवा वास, नव्याकोर्‍या वह्यापुस्तकांचा वास, बोटावर उमटलेल्या जांभळ्या कॅमलच्या शाईचा वास, सगळे वास घेऊन नव्या वर्गातलं नवं आयुष्य सुरू करणारी हुरहुर घेऊन बसलेली मी.
मराठीचा तास होता. शिकवायला दातेबाई होत्या. निवृतीच्या जवळ आलेल्या. मोठं कुंकू लावीत आणि चापून चोपून नऊवारी नेसत. शिकवताना आम्हांला मराठीबद्दल काहीही गोडी वाटू नये याची काळजी घेत. धडा वाचून दाखवत, आमच्याकडून वाचून घेत, खूप प्रश्नोत्तरे सोडवून/ लिहून घेत, परीक्षेसाठीची पूर्ण तयारी होत असे, पण आम्ही मात्र कोरड्याच.
त्यादिवशी बाई वर्गात आल्या आणि जोरदार पाऊस सुरू झाला. वर्गाच्या मोठाल्या खिडक्यांमधून तो कोसळताना दिसत होता. भर दुपारी काळोखून आले. पावसाचा इतका आवाज होता की पहिल्या बाकावरही बाईंचे बोलणे ऎकू येत नव्हते. मग आम्ही सगळ्याच नुसता तो पाऊस पाहात बसलो आणि त्याचा आवाज ऎकत बसलो. पावसाचा ओलावा वर्गभर पसरला होता. पाचेक मिनिटं ती सर कोसळत होती. नंतर पाऊस कमी झाला, खिडकीमधून दिसेनाशी झालेली झाडे पुन्हा दिसायला लागली. बाईंनी शिकवायला सुरूवात केली.......

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनि ऊन पडे

आईशप्पथ! आम्ही सगळ्या अशा अधर झालो आणि अख्खा वर्ग असा उचलला गेला त्या ओळींनी! चमत्कारच झाला. मी एकदा बाईंकडे पाहिलं आणि मग खिडकीतून बाहेरच बघत बसले. ती कविता, त्यावरचं बाईंचं स्पष्टीकरण कानावर पडत होतं. कविता थेट आत शिरत होती. मी तर वर्गात नव्हतेच मुळी, उघड्या हिरव्या माळावर अशी हात पसरून कविता भोगत होते. पुढे मी जेव्हा साऊंड ऑफ म्युझिक पाहिला तेव्हा त्यातलं ते पहिलं दृष्य आहे ना? ती हात पसरून गाणं म्हणत असते तेव्हा मला ’श्रावणमासी’ आठवली.
त्यादिवशी त्या कवितेला परातत्वाचा स्पर्श झाला होता. जे आम्ही अनुभवत होतो ते या जगातलं नव्हतंच मुळी. आनंदाचं एक कारंजं आतमधे सुरू झालं होतं. आम्ही त्यात भिजत होतो. हळूहळू पाऊस पूर्ण थांबला आणि ते वेडं ऊन पडलं. पिवळं, सोनेरी, ओलं, हळवं, सगळ्या जगावर जादू करणारं. आता हा आनंद सहन होईना. हा तो हर्षमानसीच की काय कवितेतला?

तास संपला.

5 comments:

  1. छानच. "माणसे: आरभाट आणि चिल्लर" मध्ये जीएंनी त्यांनी जगलेल्या कवितेच्या ओळींबद्दल लिहीलं आहे. ते आठवलं.

    हर्षमानसी तो का ती? माझ्या मते ती.

    खरंतर पाऊस तरी तो का ती? माझ्या मते पाऊस पेक्षा वर्षा किंवा बारिश शब्द छान.

    ReplyDelete
  2. हर्षमानसी ..( हर्षमनासी अशीही एक आवृती आहे.)
    हर्ष ...मनात/ मनाला .... हर्ष तर ’तो’ च आहे ना?
    म्हणून ”हर्षमानसी’ ही तो च.

    पाऊस सुद्धा तोच! (काही इलाज नाही.)

    (माणसे, अरभाट आणि चिल्लर ची आठवण मलाही होती.)

    ReplyDelete
  3. ....आम्ही सगळ्या अशा अधर झालो!!

    मस्त !

    ReplyDelete
  4. वाचल्यावर खरोखर ’हर्षमानसी’ !

    ReplyDelete