Saturday, December 3, 2011

मराठे बाई

सहावी, सातवीला भूगोल शिकवायला आम्हांला ’मराठे बाई’ होत्या.
उंचीला कमी, स्थूल, कुरूळ्या पातळ केसांची एक वेणी घालायच्या. गोरा रंग आणि मध्यम आकाराचं कुंकू. त्यांची पर्स म्हणजे खादीची शबनम. जरा हळू चालायच्या, गुडघे दुखत असतील.

क्वचित नकाशे घेऊन यायच्या. आम्ही आमच्या भूगोलाच्या पुस्तकातले नकाशेच बघायचो. फळ्यावर त्यांनी कधी फार काही लिहिलं नाही. आल्या की खुर्चीवर बसायच्या. आमचं ’एक साथ नमस्ते’ झालं की हाताने आम्हांला बसायची खूण करायच्या. गप्पा मारत तास सुरू व्हायचा. आमची जगाची सफर सुरू व्हायची.
गवताळ प्रदेश, टुंड्रा प्रदेश, विषुववृत्तीय जंगले, अमेझॉनचं खोरं आणि सहाराचं वाळवंट .......... त्या आमच्या डोळ्यासमोर उभं करीत. त्या कधीही तयार उत्तरे देत नसत. आम्हांला शोधायला लावीत. आधी विशिष्ट भौगोलीक परीस्थिती कशी तयार होत असावी यासंबंधी काही सांगत तेव्हढ्यावरून तिथल्या वनस्पती, तिथला समाज, रितीरिवाज यांची सांगड घालत, आमच्याकडून उत्तरे काढून घेत शिकवीत.

त्यांनी घेतलेला ’थरचे वाळवंट’ हा तास अजून मला आठवतो. पुरेसं पाणी नसेल, वाळूच वाळू आजूबाजूला.... काय करतील माणसं?, प्राणी? झाडं?....... पुढचे काही दिवस पाणी सांडताना माझा हात थबकायचा.
कुठलाही समाज भूगोलाच्या साथीनेच वाढतो ना?

त्यांच्या तासिकेला मी खूप रमून जात असे. मला मजा यायची, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला, कल्पना करायला... बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मीच द्यायची. त्यांचा माझा संवाद .... असाच तास असे बरेचदा... तशी काही मी त्यांची लाडकी विद्यार्थीनी नव्हते. मराठीच्या बाईंची होते, गणिताच्या बाईंची होते, पण मराठे बाईंची? नाही. तसं नसेल ... आज मला वाटतं, मी होते त्यांची खास विद्यार्थीनी.... आमच्यात एक नातं होतं. आम्ही दोघींनीही ते कधी जाहीर केलं नाही. मी एखादं छान उत्तर दिलं ना! की त्यांच्या डोळ्यात कौतुक दिसे. बाकी इतर वेळी मलाच कामं सांगायची किंवा मीच हवी, असं त्यांचं नसायचं. त्यांना कुणीही चाले. आम्ही एकमेकींना समजून होतो.... हे मला आज कळतंय.

त्या परीक्षेच्या दृष्टीने फार तयारी करून घ्यायच्या नाहीत. त्या वहीत काही उतरवून देत नसत. प्रश्नोत्तरे सोडवा, एवढंच सांगत. वर्गातल्या मुलींना त्यांचा तास आणि त्याही फार आवडायच्या नाहीत. त्या नावडत्या होत्या असंही नाही. आमच्या गप्पांत त्यांचा विषय आणि त्या फारशा नसायच्या. शाळेतही त्या फारशा चर्चेत नसायच्या. कुठल्या बाईंची मुले काय करतात, त्या कुठे राहतात, शाळेत कशा येतात अशी माहिती आमच्याकडे असे. मराठे बाईंची घरगुती माहिती आम्हांला नव्हती, ती शोधावी इतका रस कुणी दाखवला नाही. मराठे बाई काही नीट शिकवत नाहीत, कळत नाही, असं मुली कधी मांडत असता, मी बाईंच्या बाजूने बोलले नाही. याची रूखरूख मला तेव्हाही वाटत असे.

एकदा काही कारणाने मी दोन दिवस शाळेत गेले नव्हते. कशासाठीतरी वर्गातल्या दोन मुलींची निवड करायची होती. आमच्या वर्गशिक्षिका बाईंनी दोन मुलींची निवड केली, त्यात मी नव्हते. शाळेत गेल्यावर मला हे कळलं. मला वाईट वाटलं. माझ्या मैत्रिणींनी हे फारच मनावर घेतलं. त्यादिवशी मी नसले तरी बाईंनी माझी निवड करायलाच हवी होती असं त्यांचं म्हणणं पडलं. मग काय! मला डावलल्याचं , आणखीनंच वाईट वाटायला लागलं, मी रडायला सुरूवात केली. मुलींनी सहानुभूती दाखवायला सुरूवात केल्यावर मला रडं आवरेना. मग गणिताच्या तासाला, इतिहासाच्या तासाला त्या त्या बाईंनी मला समजावलं, ’बरोबरच आहे, तू नव्हतीस, त्यामुळेच" वगैरे वगैरे... मग भूगोलाचा तास होता. मराठे बाई आल्या. मी बाकावर डोकं ठेवून शोकमग्न! "काय झालंय?" बाईंनी विचारलं. मुली तयारच होत्या, त्यांनी सांगितलं. मी हळूहळू डोकं वर काढलं. बाई माझ्यावरच ओरडल्या,"काय हा वेडेपणा? एवढं रडण्यासारखं त्यात काय आहे? अशा साध्या गोष्टींनी तू मोडून पडणार आहेस? रडून रडून डोळे किती सुजवून घेतलेस, पाहिलंस का? उद्या मोठी होशील तेव्हा हे घडणारच आहे ना! अपमान झाला की काय करशील? अपयशी झाल्यावर काय करशील? तुझ्या हक्काचं तुला मिळणार नाही, तेव्हा काय करशील? नेहमी आपली चूक असते, असं नसतं बेटा, भोगावं लागतंच. किती रडशील?" ..........बाई खूप वेळ बोलत होत्या... काही माझ्याशी, काही वर्गाशी, काही स्वत:शी........ शेवटी मला सांगितलं, "रडायचं नाही. जा, डोळे धुवून ये."

मराठे बाई कुठे असतात, मला माहित नाही. दहावीनंतर आमची भेट झालेली नाही.

बाई, मला तुमची आठवण येते.

2 comments:

  1. मस्त लिहीलं आहेस, विद्या! तुझ्या मराठेबाई आणि शाळेतली तू डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
    मला वाटतं हे बहुतेक सगळ्यांच्याच वाढीच्या टप्प्यातील अनुभव असावेत. आपली चूक नसतानाही अन्याय/अपमान सहन करावे लागतात, सगळंच आपल्या मनासारखे घडायचे दिवस फक्त बालपणीच असतात हे हळू हळू उमजू लागते; पटवून घ्यावे लागते. काहींना हे थेट समजवून सांगणारे मराठेबाईंसारखे हितचिंतक लाभतात; काहींना स्वतःच पडत-धडपडत हे ज्ञान आपसूक प्राप्त होते. "भोगावं लागतंच" हे शाश्वत सत्य समजतं तेव्हा काहींचा गंभीर गौतम बुद्ध होतो; तर काही जगावर आणि स्वतःवरसुद्धा हसायला शिकतात.

    - सचिन

    ReplyDelete
  2. खूप छान.. त्या वयात परिचय झालेल्या अशा व्यक्तींचा विशेषत: शिक्षकांचा खोलवर प्रभाव कदाचित जन्मभर आपल्यावर असतो. वाचताना तो अनुभव आपलाच वाटायला लागावा ही तुझी खासीयत आहे.
    मराठेबाई आता कुठे असतात याबाबत- माझ्या जोशी मीस माझ्याच नव्हे तर वर्गातल्या बहुतेक जणांच्या आवडत्या. ५ वी,७वी आणि ९ वी अशा तीन वर्ष आमच्या क्लासटीचर त्यामुळे जास्तच जवळच्या. अशाच हरवल्या मग त्या. गेल्या वर्षी आमच्या दहावीच्या क्लासचं ’पुनर्मिलन’ झालं तेव्हा "आम्हाला तुमची खूप आठवण येते" हे त्यांना कळवावस सगळ्यांनाच प्रकर्षाने वाटलं. मी त्यांना शोधलं, त्यांचा नंबर मिळवला आणि हे त्यांना कळवलं. योगायोगाने त्या दिवशी गुरूपौर्णिमा होती. त्यांना मी अगदी नीट आठवते हे कळल्यावर मला आणि आम्हाला त्यांची इतकी आठवण येते हे कळल्यावर त्यांना झालेल्या आनंदाचे वर्णन करायला शब्द नाहीत. थोडक्यात मराठेबाईंना तुझी भावना तू पोचवायला हवीस असं मला वाटतं.

    ReplyDelete