मिलिन्दने लायब्ररीतून प्रभाकर पेंढारकरांची तपोवन आणली आहे. तो म्हणाला,"चांगली आहे." मला बरीच कामे आहेत. वाचायला वेळ नाही. प्रभाकर पेंढारकर म्हंट्लं की त्यांची रारंगढांग आठवते.... मी तपोवन वाचायची ठरवते.
मुखपृष्ठ पाहते. तपोवनाचं चित्र. मलपृष्ठावर झाडे... त्यावर जे लिहिलंय त्यावरून ही कुणा एका पंडितांच्या, पन्नास वर्षांपूर्वीच्या, कोल्हापूरच्या स्मृतीं जागवणारी कादंबरी आहे हे लक्षात येते.
पुढे विजया राजाध्यक्ष यांची प्रस्तावना. पुस्तक वाचण्यापूर्वी मी सहसा प्रस्तावना वाचत नाही. ती पाने मागे टाकते आणि वाचायला सुरूवात करते.
पंडित विमानाने कोल्हापूरला यायला निघतात.... कशासाठी? तर मलपृष्ठावरचं वाचून माहितच आहे, परदेशातले अधिक पर्यटक कोल्हापूरकडे आकर्षित करण्यासाठी काय काय करता येईल याची पाहणी करायला.. सरकारतर्फे.... पंडितांचं बालपण इथे गेलं असेल. जुना वाडा अजून असेल, एखादं लिंबाचं झाड किंवा तपोवन हेच त्यांचं घर असेल.... वाचत असताना, त्यापेक्षा वेगात माझे विचार पुढे धावताहेत. मला वेळ नाही, आणि ही कादंबरी वाचायचीच आहे..... रेखाचित्रे सुरेख आहेत... ती पाहायलाही मी फारशी रेंगाळत नाही.... कथेच्या ओघात कळतं. कोल्हापूर काही त्यांचं गाव नाही. पंडित मुंबईचेच, आई गेली.. दहावीचं वर्ष.., या मुलाकडे कोण पहाणार?.. म्हणून रेल्वेत असणारे त्यांचे वडील, चांगल्या शाळेत ठेवायचं म्हणून पंडितांना कोल्हापूरला घेऊन येतात.
हळू हळू दीक्षित गुरूजी, तपोवन, पंडितांची शाळा, त्यांचे मित्र, शिवाय शाहू महाराज, यांची ओळख होते आहे.. दीक्षित गुरूजींची मुल्ये, त्यांचं तपोवनातील मुलांना वाढवणं हाच कादंबरीचा विषय दिसतो आहे, तपोवन हे एक वसतिगृह आहे... बहुदा पंडित म्हणजे वामन काहीतरी चुकीचं वागणार .... दीक्षित गुरूजी त्याला समजून घेणार.... आयुष्यभराची मोलाची शिकवण त्याला इथे मिळाली असणार..... हं, कथेत माझ्या अंदाजाप्रमाणे घडतंय का, याची मी वाट पाहतेय... भराभर वाचते आहे, शब्दांशी, अर्थाशी, चित्रांशी न थांबता मी पुढे चालले आहे..... आता मला गोष्ट कळायला हवी आहे.. बाकी मी पुन्हा कधीतरी बघीन... शाळेतल्या बाकावर बसलेला वामन असं चित्र येतं, हा शेजारचा सुधाकर असेल, मागचे कोण कोण? ऎरवी मी अंदाज करत, चेहर्यावरचे भाव निरखीत थांबले असते.. आता पान उलटते, वेळ मिळाला तर सवडीने सगळी चित्रे पाहू... संवाद संथ आणि पन्नास वर्षांपूर्वीचे वाटावेत असेच आहेत....
वामनचं भूतांना न घाबरता स्मशानात जाऊन येणं... पैज जिंकणं... मी वाचते आहे. पुस्तकात जी चित्रे आहेत त्या अनुषंगाने मी आणखीही काही चित्रे मनातल्या मनात काढते आहे. पुस्तकातल्या चित्रांसारखीच पेन्सिलीची रेखाचित्रे.....
एके दिवशी शाळेत जाताना अचानक जोरदार पाऊस कोसळायला लागला, आजूबाजूला आसरा घ्यावा असं काहीच नाही. माझ्या चित्रातल्या पावसाच्या रेघा.. जाड आणि जवळ जवळ.... एकच बंगला.. मी पावसात भिजत असलेला बंगला काढते... म्हंटलं तर ही चलचित्रे आहेत.... बंगल्याचं दार उघडतं.... समोर एक गोर्यापान बाई उभ्या! अंगात फ्रॉक, डोक्यावर भुरे केस, इंग्रजी सिनेमातल्या फॊटोसारख्या.. त्यांनी आम्हांला खूण केली , त्या म्हणाल्या, "दीन दोब्रे, कम इन... कम"...... मी एक चाळीस पंचेचाळीस वर्षांची, व्हिक्टोरियन काळातली बाई काढली, फ्रॉकला खूप घेर, गळ्याला लेस, झिरझिरीत बाह्या, केशभूषा? उंच अंबाडा, फ्रॉकखालून दिसणारे निमूळते पाय आणि पायात घरात घालायच्या चपला, त्या काही उंच टाचेच्या नसणार... बाई मुलांना केस पुसायला टॉवेल घेऊन येतात... चहा विचारतात.. तोवर मी खिडक्यांना लांबलचक पडदे काढते.. पान पलटलं... बाई मुलांसाठी चहा बिस्किटे घेऊन आल्या. या पानावर चित्र आहे!! या बाई म्हणजे तर मुलगी आहे!! वामनपेक्षा दोन तीन वर्षांनी मोठी असलेली. एकोणीस वीस वर्षांची, ज्युलिया! ...
...... आता काय करावं?? बंगल्यात ज्युलिया एकटीच राहते. मी काढलेलं बाईचं चित्र खोडायचा प्रयत्न केला. जमेना. त्या बंगल्यात दोन बायकांना कुठे ठेवू? छे! अशी घाईने चित्रे काढायला नको होती!...
मी विचार केला, ती ज्युलियासोबत राहणारी तिची मावशी आहे. मावशीला कादंबरीत कुठे जागाच नाही! ज्युलिया एकटीच असायला हवी आहे. पुढे वाचताना मनात ही रूखरूख. मनातल्या मनात चित्रे काढणं बंद झालं.
वामनला ज्युलियाबद्दल असणारी ओढ, तिची काळजी नंतर नीटच कळतं ते प्रेम! दहावीत नंबर काढायचा म्हणून नेटाने त्याने केलेला अभ्यास आणि पेपर सोडून ज्युलियाचा घेतलेला शोध!......
कादंबरीची अर्पणपत्रिका
ज्यूलिया...
शोध शोध शोधलं तुला
त्याही वेळेस आणि
आत्ताही शोधतोय...
कुठे आहेस तू?
हे ’तपोवन’
द्यायचंय तुला...
कादंबरी वाचून झाल्यावर पाहिली...
ज्युलियाची मावशी मी मधेच उगीच घुसडलेली, तिला पूर्णपणे बाहेर काढता आलं नाही. ती आठवतेच आहे.
मी ठरवते यापुढे इतक्या घाईने काहीही वाचून टाकायचं नाही. नीटच काळजी घ्यायची.
Monday, April 23, 2012
Tuesday, April 3, 2012
पठाण सर
बाबांच्या शाळेत एक पठाण सर होते. तिकडे रोशनगेटजवळ कुठेतरी राहायचे. त्यांच्या घरचा "भंगार" घेणे /विकणे असा काही व्यवसाय होता. वडिल, भाऊ ते बघत. हेच एकटे कसे काय शिकले कोण जाणे. नुकतेच शाळेत लागले होते. कधी कधी रोशनगेटहून सायकलवर आमच्याकडे गप्पा मारायला येत. आमच्या वाड्यात बाबांच्या शाळेतले आणखी दोन सर राहायचे. त्यांच्या भरपूर गप्पा चालायच्या.
आमच्याकडे मी म्हणजे बडबड करायला नं. एक. अर्थात चौकोनी घरातली धाकटी मुलगी जशी सगळ्यांची लाडकी असते तशी लाडकी. विश्वासच्या मते ’तुम्ही तिला फार चढवून ठेवता, जरा अभ्यास करायला सांगत जा" आमचे हे बंधुराज म्हणजे ’आदर्श पुत्र’ च . अभ्यासात हुशार! वर्गात यांचा पहिला नंबर येणार! अति व्यवस्थित! यांच्या बुटांचं खोकं सहा महिने तरी चांगलं राहणार, शाळेतून आले की बूट व्यवस्थित खोक्यात! मला ते जमायचं नाही, आईची बोलणी खावी लागायची. शाळेतून आला की वह्या पुस्तके काढून कप्प्यात ठेवणार! शेजारी भिंतीवर वेळापत्रक लावलेले. रात्री अभ्यासानंतर वेळापत्रकाप्रमाणे दप्तर भरून ठेवणार! काही वेळा मला वाटे, मला बोलणी बसावीत म्हणून हा मुद्दामच जास्ती करतो.
मी काय अभ्यास वगैरेच्या भानगडीत पडायचे नाही. पहिलीत असताना मी माझं मराठीचं पुस्तक तीन वेळा हरवलं. दुसर्या दिवशी मराठीचा पेपर.
आई म्हणाली , " मराठीचं पुस्तक घेऊन वाचत बस."
’बरं"
दप्तर उघडलं तर काय? मराठीचं पुस्तक बेटं गायब! मला पत्ताच नाही! एकूण प्रसंग बाका. मी दप्तरात मान घालून..... आई समोर उभी!.... आईने पाहिलं, " पुन्हा हरवलं!" मग उपदेशाचा एक मोठ्ठा डोस! मराठीच्या पुस्तकाने चौथ्यांदा हरवायला नको होतं. आमच्या बंधुराजांना परमानंद झाला. त्यांनी ही बातमी वाडाभर पोचविली. बाबा शाळेतून आल्या आल्या त्यांना ही महत्त्वाची बातमी दिली. एकूण घडलेलं रामायण बाबांच्या लक्षात आलं असणार. ते काही बोलले नाहीत. ” चल आपण नवीन आणूया " म्हणाले. आमची स्वारी बाबांबरोबर दुकानात. तीन चार दुकाने फिरलो कुणाकडेही पहिलीचं मराठीचं पुस्तक नव्हतं.
पाचव्या दुकानात, दुकानदार म्हणाला," ये टाईमपे बुका मिलते नही, जून मे लेनेका" एप्रिल महिना होता.
बाबा म्हणाले, "आपका बराबर है. लेकीन ये हमारी बच्ची है ना, बहोत पढती है, जूनमे किताब लेनेका और वहीं एप्रिलतक पढनेका? उसे चलता नहीं. हम जूनमे एक किताब लेते है, फिर सितंबर मे लेते है, फिर दिसंबर मे लेते है.................." मी एवढंसं तोंड करून उभी! बाबांची व्यथा त्या दुकानदाराला कळली, त्याने त्याच्या दुकानात काम करणार्या पोर्याला माळ्यावर चढवले आणि एक शेवटचे पहिलीचे मराठीचे पुस्तक काढून आम्हांला दिले. ” जगन कमल बघ,.... हैबती आणि गैबती, पुन्हा माझ्या ताब्यात आले." हुश्श!
तर काय सांगत होते, हं, माझं हे असं!
मी तिसरीत असताना बाबांनी मला ’शारदा मंदिर" आणि विश्वासला " सरस्वती भुवन" या औरंगाबादमधील प्रतिष्ठीत शाळांत घातले. एकाच संस्थेच्या त्या मुलींची आणि मुलांची अशा शाळा आहेत. विश्वास तेव्हा पाचवीत होता. पाचवीचा वार्षिक परीक्षेचा निकाल लागला तेव्हा तो शाळेच्या पाचवीच्या सातही तुकड्यांमधून पहिला आला. मला काहीतरी बावन्न/ चोपन्न टक्के होते. विज्ञानाच्या पेपरमधे कारणे सांगा, हा प्रश्न मी चूक की बरोबर असा सोडवला होता. कारणं मला माहितच नव्हती, म्हणून ती विधाने बरोबर आहेत असे मी ठोकून दिलेले. गणितातही दिलेले गणित येत नव्हते मग त्या प्रकारच्या मला येत असणार्या गणितातील आकडे मी परीक्षेत लिहिले आणि बरोबर सोडवून दाखवले.
आहे त्या परीस्थितीत डोकं लढवून बाहेर पडायचं ही कला मला फार पूर्वीच अवगत झालेली होती.
अभ्यासाचं जावू देत, मला ज्या इतर असंख्य कला अवगत होत्या त्यावर मी खूष होते. खरं म्हणजे गणित मला आवडायचं. वाडाभर मी पाटी घेऊन मला गणितं घाला म्हणत फिरायचे. विश्वासची, मोठ्या वर्गांची मराठीची, इतिहासाची पुस्तके वाचायचे. मी अभ्यासात हुशार नाही असाच माझा समज होता, मला मार्कही तसलेच पडायचे.
एकदा पठाण सर दुसर्या कुठल्यातरी सरांबरोबर बोलत बसलेले. पठाण सर तयारी करून शिकवायला जायचे. ते नविन होते, त्यांना अडचणी असायच्या. ते असंच काहीतरी भूगोलावर बोलत होते. मी तिसरीत असेन. जगातले वेगवेगळे खंड असं काहीतरी, नकाशा घेऊन कुठला अमेरिका खंड, कुठला आफ्रिका, कुठला युरोप त्यांच्या सीमा वगैरे. ते म्हणाले , " हा युरेशिया कुठला?" त्यांना प्रश्न पडलेला. मी तिथेच होते, मी म्हणाले, "युरोप आणि आशियाला मिळून युरेशिया म्हणतात" आणि पुढे त्यांच्या खंडांबद्दलच्या आणखीही प्रश्नांना उत्तरे दिली आणि खेळायला गेले.
बाबा शाळेतलं सांगत होते... बाबांच्या शाळेत स्टाफरूमधे विश्वास कसा हुशार आहे, स्कॉलरशिप मिळवली, असा काहीतरी विषय चालू होता, तेव्हा पठाण सर म्हणाले, " एसआरसरकी बच्चीभी शार्प है, तुमने कभी उससे बात की है? बहोत होशियार लडकी है. देखते रहो" ......... मी चमकले.
माझे घरी दारी लाड व्हायचे पण कोणी मला हुशार म्हंटलेलं नव्हतं, हं विश्वासचं कौतुक खूप ऎकलेलं. आपण काही त्याच्यासारखे नाही हे मी मनात कुठेतरी मान्य केलेलं.
माझ्या अभ्यासातल्या हुशारीचं कुणीतरी कौतुक करावं असा तो पहिला प्रसंग होता.
अरे! मला जमेल की त्यात काय! मीही हुशार आहे. मीही मार्क मिळवू शकते. अशी माझ्या मनात बांधणी व्हायची ती सुरूवात होती.
माझा आत्मविश्वास जागं करण्याचं काम त्यांनी केलं. पुढे मी फार अभ्यासाच्या मागे लागले असं नाही, मार्क मिळवायला लागले.
********
छोट्या छोट्या मुलांना "तुला येतं", "तू करू शकशील", "वा! कशी हुशार आहेस तू!", "मस्त! खूप छान केलं आहेस".... अशा छोट्या छोट्या वाक्यांची गरज असते. तुम्ही ही वाक्ये वापरता ना?
********
पठाण सरांना मी कधी भेटले नाही. आमच्या लग्नात कदाचित, मिनिटभर. ... खूप खूप वर्षांपूर्वी तुम्ही एक चांगलं काम केलेलं आहे, हे त्यांना सांगायचं राहून गेलेलं आहे.

Subscribe to:
Posts (Atom)