Tuesday, November 13, 2012

दिवाळी

सहामाहीचा शेवटचा इतिहास - भूगोलाचापेपर सोडवून आलो की सुरु व्हायची दिवाळीची सुट्टी!

आईची घर आवरणे, साफसफाईची कामे नवरात्रीच्या आधीच झालेली असायची.
एकदा दसर्‍यानंतर मालकांनी वाड्याला रंग द्यायचा ठरवला. रंग म्हणजे चुना.
दोन तीन दिवसांत रंगारी येऊन अख्खा वाडा रंगवून जायचे.
आमच्या परीक्षा झाल्यावर आईने घर रिकामं करून दिलं.
बादल्यांमधे चुना, नीळ घातलेला, आणि रंगवायचा ब्रश म्हणजे काठीला बांधलेली सुताची केरसुणीच!
तो एव्हढा मोठा ब्रश, त्याची काठी दोन हातांनी धरत बादलीत बुडवीत आणि लगेच भिंतीवर.
काळवंडलेली भिंत भराभर पांढरीशुभ्र होऊन जाई. दीड - दोन तासांत , डबल कोट सह घर रंगवून होई.
रिकामं घर प्रकाशाने भरून जाई.
आई आधी खोली धूवून घेई, मग अंगणात ठेवलेलं एक एक सामान घरात आणून मांडत असे.
मी आणि विशू, थोडीफार मदत करायचो.
सगळ्या फडताळांखालचे पेपर बदलले जात.
काही डबे आई पुन्हा घासत असे.
संध्याकाळपर्य़ंत घर व्यवस्थित लावलेलं असे.
दिवे लागले की त्या प्रकाशात नेहमीचं घर नवं चकचकीत दिसे.
डोळे या जास्तीच्या प्रकाशाला सरावलेले नसत.
आई, बाबा, विशू हे ही सगळे तेच आहेत ना? असं काहीतरी वाटून जाई.
त्यांच्या वागण्यात बदल झाला तर वाटे, घराला रंग दिल्याने तर नाही हे?
मला तर जुनं उबदार घर कुठे गेलं? आणि नव्या करकरीत घराशी कसं जुळवून घेऊ? असं होई.
जेवायला बसल्यावर ताटाचा तोच स्पर्श, भाजीची तीच चव, याने हळूहळू मी रूळत असे.
दोन दिवसांत करकरीतपणा मोडला जाई आणि नवेपणाची सवय होत असे.

दिवाळीच्या सुट्टीत आम्ही कधीही गावाला जायचो नाही.
वाड्यातले सगळेच विद्यार्थी आणि जी काय कुटूंबे होती, ते जवळपासचे, औरंगाबाद जिल्ह्यातले होते,
ते आपापल्या गावी जात.

दिवाळीच्या महिन्यात बराच जास्ती किराणा आणायचा असे
आणला की डब्यात भरून ठेवायची मदत करायला आम्हां दोघांना आवडे.
डाळी, दाणे निवडता निवडता आई तिच्या लहानपणीच्या दिवाळीचं काय काय सांगे.
आणि वाड्यात कुणी नसल्याने आम्ही दोघे असे आई किंवा बाबांच्या भोवती भोवतीच असायचो.

दिवाळीच्या खरेदीच्या दिवसाची आम्ही खूप वाट पाहायचो.
बाबांना दसर्‍याला कपडे आणि आईची साडी संक्रांतीला असायची. क्वचित ते दिवाळीला कपडे घेत. मला आणि विशूला मात्र दसरा आणि दिवाळी दोन्ही वेळी बहुतेकदा कपडे मिळत. तेव्हा तयार कपड्यांची फार पद्धत नव्हती. कापड घेऊन शिवायला टाकायचं, मग शिंप्याने द्यायचं असंच असे. मला काहीवेळा रेडीमेड फ्रॉक घेतल्याचा आठवतोय. मछलीखडकावर सुरूवातीलाच सर्वदे ब्रदर्स असं दुकान होतं. त्या दुकानातच आम्ही जायचो, माझ्या मापाचे, आमच्या बजेटमधले जे काय आठ - दहा झगे असतील त्यातला एक निवडायचो. आणखी दुसरीकडे पाहू, वगैरे सुरू झालं ते नंतर! तेव्हा मला आकाशी रंग फार आवडत असे. आकाशी रंगाचा, त्यावर फुलांचं भरतकाम, खिसा, असा काहीतरी फ्रॉक मी निवडत असे. विश्वास आणि बाबांचे कपडे टीपटॉप म्हणून दुकान होतं, तिथून, आईची साडी निरूपमा साडी सेंटर मधून. बाबांचे आणि विश्वासचे कपडे सोमलवार टेलर्स कडे शिवायला टाकायचे............. असा तो मस्त दिवस जात असे. त्यानंतर जेवलो बाहेर तर मेवाड मधे डोसा!
  फ्रॉक घरी आणला की मला घालून पाहायची घाई झालेली असे. आई तो देवासमोर ठेवी, आतल्या बाजूला कुंकू लावी. मग मी तो घालायची. दोन्ही हातांनी लांबवून घेर किती आहे ते पाहायची, गिरकी घेऊन घेर कसा फुलतोय ते दाखवायची. ....... अरे राहिलंच! नवे कपडे घालून आधी देवाला नमस्कार, आईबाबांना नमस्कार आणि मगच हे नखरे! नंतर वाड्यात कोण कोण असेल तर त्यांना फ्रॉक दाखवायला पळायचं. प्रत्येकजण कौतुक करीत असे, वाडाभर फिरून घरी आले तरी नवा फ्रॉक काढावासाच वाटत नसे. मी फार दमल्यासारखी दिसले तर आई दृष्ट काढायची.

दिवाळीच्या चार दिवस आधी आई फराळाचे पदार्थ करायला सुरूवात करायची. आधी चिवडा, मग वड्या, लाडू, आजूबाजूच्या घरांमधेही असे पदार्थ सुरू होत. सगळीकडून असे हवेहवेसे वास वाडाभर तरंगत असत. मग अनारसे, करंज्या, शेवटी शेव आणि सगळ्यात आवडत्या चकल्या. चकल्या पाडून द्यायला मला, विशूला फार आवडे, तसंच शंकरपाळे करायलाही! वाड्यात फराळाच्या पदार्थांची देवघेव होत असे. धनत्रयोदशीच्या दिवशी दुपारपर्यंत सगळी पुरूषमंडळीही जात. मग वाडा फक्त आमचाच!

 धनत्रयोदशीच्या दिवशी एक महत्त्वाचा कार्यक्रम असायचा! फटाके आणणे!

साधारण पाच वाजता आम्ही तिघे, बाबा- विशू - मी असे फटाके आणायला बाहेर पडत असू. बरोबर दोन तीन मोठ्या पिशव्या. आमखास मैदानावर सगळी फटाक्यांची दुकानं असत. ते तसं आमच्या घरापासून दूर होतं, आम्ही चालतच जायचो, मी तर जवळपास उड्या मारतच चालायचे. बाबांनी नीट चाल म्हंटलं की पुन्हा नीट. विश्वास एका मोठ्या भावाने जितका शहाणपणा दाखवावा, तितका दाखवत असायचा. दूरूनच फटक्यांची दुकाने दिसायला लागत. बाबा छान छान काही बोलत असायचे. आम्ही दोघेही सुतळी बॉम्ब किती घेऊ या, आणि लक्ष्मी बॉम्ब किती? मागच्या वेळेस चिमण्या नव्हत्या नीट गेल्या, यावर्षी नकोच घ्यायला.. वगैरे वगैरे....

तिथे गेलो ती प्रचंड मोठी गोलाकार लावलेली फटक्यांची दुकाने दिसत. आम्ही एक चक्कर मारायचो आणि बाबांचा एक विद्यार्थी होता, त्याच्या दुकानात फटाके घ्यायला जायचो. सगळीकडे गर्दी असे. बाबा एका खुर्चीवर बसायचे, आम्ही दोघे उभे असायचो किंवा गादीवर बसलेले. कुठले फटाके घ्यायचे, किती घ्यायचे? याचे पूर्ण हक्क बाबांनी आम्हाला दिलेले असत. टिकल्यांच्या डब्यांपासून सुरूवात व्हायची. मग लवंगी फटाके, लक्ष्मी बॉम्ब, सुतळी बॉम्ब, डबल व्हल्कॅनो, असे आवाजाचे फटाके, अनार, भूईचक्र, हातचक्र, फुलबाज्या, रॉकेट, शिट्ट्या, चिमण्या, मॅग्नेशियमच्या दोर्‍या, असे देखणे फटाके, शिवाय रंगीत काड्यापेट्या, सापाच्या गोळ्या, नवीन आलेले काय काय फटाके, आम्ही घेत असू. आम्ही आणलेल्या पिशव्यांमधे हे फटाके ठेवून मग हिशोब होत असे, दोन हातभर लांबींच्या जाड उदबत्या, फटाके उडविण्यसाठी म्हणून फ्री मिळत असत. दुकानातून बाहेर पडलो तर अंधारच झालेला असे, तुरळक फटाक्यांचे आवाज आणि पणत्या, आकाशकंदील...

एकूण समजा पस्तीस रूपयांचे फटाके होत. ही म्हणजे काहीच्या काहीच खरेदी झालेली असे, आई नक्की ओरडणार! पोरं तर पोरं ह्यांना कळू नये का? मग आम्ही ठरवत असू की आईला सांगायचं अठरा रूपयांचे फटाके आणले. बाबाही अशी अ‍ॅक्टींग करायचे, आम्हांला वाटायचं हे आईला घाबरताहेत, आमची तिघांची एक टीम होत असे, आम्ही दबकतच घरात जात असू. आईची रांगोळी काढून झालेली असे, तिने आकाशकंदील काढून ठेवलेला असे. दारात पणत्या लावलेल्या असत. दिवाळी घरी आलीये असं वाटॆ.

बाबा आकाशकंदील लावत, मग जेवणे होत. त्यानंतर फटाक्यांची वाटणी होत असे. आई आम्हांला दोन पत्र्याचे डबे देत असे. आपापले फटाके आम्ही आमच्या डब्यात ठेवायचो. काही फटाके समसंख्येत नसत मग ते बाबांच्या वाटणीला जात, कधी आईच्या, त्या दोघांचा मिळून अगदीच छोटा डबा असे. आम्ही दोघे त्यातही कुठल्या दिवशी कुठले फटाके, किती उडवायचे, याचीही विभागणी करून ठेवायचो. सगळं कसं शिस्तीत! हे काम चालू असताना आई विचारी, "केव्हढ्याचे झाले फटाके?" बाबा सांगत, "अठरा रूपयांचे." आई म्हणॆ, "बापरे! किती महाग! एवढे कशाला आणले?" आम्हांला येणारं हसू आम्ही दाबत असू.


हे झालं की साबण लावून ते हात धुवायचे आणि झोपायचं. उद्या उठलो दिवाळी! जिची आम्ही वर्षभर वाट पाहायचो!

 उद्या दिवाळी आहे याचा विचार करत झोपण्याएवढं सुख प्रत्यक्ष दिवाळीत देखील नाही.

नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान असायचं. सुर्योदयापूर्वी सगळ्यांचं स्नान झालं पाहिजे. ( नाहीतर नरकात जावं लागेल! )

त्याआधी माक्याच तेल लावून व्हायचं. मग उटणं आणि नवी कोरी म्हैसूर सॅन्डल सोप.. भरपूर गरम पाणी... खरं असं असतं की धनत्रयोदशीच्या दिवशी बायकांची न्हाणी उरकून घ्यायची, पुरूषांची नरकचतुर्दशीच्या दिवशी, सोयच होती ती, पण मी अगदी पहिली दुसरीत असेन, आईला म्हणाले, "असं का? मला नाही चालणार. " मग आई एकटी आदल्यादिवशी न्हाऊन घ्यायची, मी मात्र नरकचतुर्दशीला. विशू मग काही फुलबाज्या, फटाके उडवायचा. त्याच्या आंघोळीच्या वेळी मी. मग आत येऊन त्याला म्हणायचं आत्ताचा आवाज ऎकलास ना? तो माझ्या फटाक्याचा होता." दिवे बंद करून त्याला सांगायचं की फुलबाजीच्या उजेडात कर स्नान! एक संपता संपता घाईघाईने दुसरी लावायची.. आमचं आवरून होईपर्य़ंन्त उजाडलेलं असे. सगळे फराळाचे पदार्थ घेऊन फराळ व्हायचा. बाबांची ती आली दीपवाळी, गड्यांनो आली दीपवाळी, रोज रोज शाळा..... " कविता व्हायची. ती रोज रोज शाळा इतकी मागे पडल्यासारखी वाटायची आणि तिच्या आठवणीने एक बारीकशी कळ यायची.

रोजचे पेपर जरा चाळले की आम्ही तिघेही दिवाळी अंक घेऊन बसायचो. आईला तिची कामं असायची.

बाबांकडे बरीच वर्षे त्यांच्या शाळेच्या ग्रंथालयाचं काम होतं. त्यांना शाळेसाठी पंधराएक दिवाळी अंक घ्यायचे असायचे. आम्ही ते औरंगाबाद बुक डेपो मधून घेत असू. मौज, हंस, दीपावली, मटा, मराठवाडा, आवाज यासोबतच मुलांसाठीचे चांगले चार पाच दिवाळी अंक आम्ही निवडायचो. एका वर्षी फक्त किशोर चा अंक लवकर आला, बाकीचे यायचे होते, मग मी आणि विशू दोघे तो घेऊन शेजारी शेजारी बसलो, एक गोष्ट त्याने मोठ्याने वाचायची एक मी, असं करून न भांडता तो अंक संपवला. मग गंमतजंमत चा आला, तोही तसाच वाचून काढला. एकूण दिवाळीच्या दिवसांत आमच्यातला समजूतदारपणा वाढत असे की काय?

छोट्यांचे अंक संपले की आम्ही मोठ्यांचे वाचत असू. आवाज ची खिडकीचित्रे गमतीशीर असत, बरेचदा चावटपणाकडे झुकलेली, त्यातलं साहित्यही तसंच, काय काय लिहितात? असं वाटत असूनही आम्ही ते वाचत असू. कुठल्या कुठल्या मोठ्यांच्या अंकातला हा लेख वाचा, तो वाचा, असं बाबा सांगत, मग तेही वाचून काढत असू. नंतर ते अंक शाळेत द्यायचे असत. चार-पाच दिवसात आमचे बर्‍यापैकी वाचून होत. व्यंगचित्रे तर सगळीच पाहून होत. जाहीराती कमी असत, त्याही नीट वाचून/पाहून होत. कासव छाप अगरबत्ती च्या चित्रकथा, आणि मला वाटतं नायसिल ची डोक्याला डोके भिडते जेथे वाली.. चार चारदा वाचून होत. ’अभिरूचीची एक छोटी १/४ पान जाहीरात पाहिल्याचं आठवतंय. पाने आत्तासारखी गुळगुळीत नसत. आणि अक्षरजुळणी केलेली लक्षात येई. मुखपृष्ठावर मात्र नट्यांचेच फोटॊ असत. काही अपवाद वगळता.

कितीतरी लेख आणि लेखक पहिल्यांदा दिवाळी अंकात वाचले आहेत. प्रकाश नारायण संतांचा लंपन, मिलिन्द बोकील, सानिया, गौरी देशपांडे, शिवाय पुलं, मिरासदार, माडगुळकर, कसली भारी भरी नावं असायची अनुक्रमणिकेत!

 नरकचतुर्दशीच्या दिवशी आम्ही आत्यांकडच्या सगळ्यांना जेवायला बोलावत असू. त्यांना आईच्या हातच्या पाकपुर्‍या आवडत, म्हणून बरेचदा तोच बेत असे. त्यादिवशी आईला खूपच काम असायचं , चौथी पाचवी नंतर मी थोडीफार मदत करायला लागले, पण जुजबीच.

 दुसरी- तिसरीपासून मी रांगोळी काढायला शिकले असेन. आईने मला दोन/चार रांगोळ्या शिकवल्या होत्या. माझी रेघ एकसारखी येत नसे, ठिपके जवळ दूर होत, कधी आई ठिपके काढून देई, मी रांगोळी काढायचे. मग रंग भरायला विशू येई. आम्ही दोघे मिळून ठरवून कशाशेजारी काय छान दिसेल याचा विचार करून रंग भरत असू. आमच्याकडे एक छाप होता, एक फूल आणि दोन पाने, त्यात रांगोळी भरून मी मुख्य रांगोळीभोवती ते छाप उठवत असे. रांगोळी पूर्ण झाली की जवळून - दूरून त्याकडे बघत बसे. इथून कशी दिसत्येय आणि तिथून कशी दिसत्येय....

आई म्हणे, "आता आवरा..."

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवा फ्रॉक घालायचा. .... आणि मधे सुपारीची फुलं असलेली शेंवंतीची वेणी! ती म्हणजे अगदी मस्टच!

 दिवाळी चांगली चार दिवस असते, एक दिवस संपला तरी अजून असतेच..... इतकं बरं वाटतं.

दुसर्‍या दिवशी फटाक्यांचा कचरा गोळा करायचा आणि अंगणात पेटवायचा. मग त्यात काही न फुटलेले फटाके फुटत. काही वेळा कुठला न फुटलेला फटाका असला तर तो आम्ही सोलायचो, त्यातली ती चंदेरी दारू गोळा करायचो, आणि एखाद्या फटीत कागदात ती दारू घालून पेटवायचो, उजळून निघत त्या दारूची राख होत असे.

भाऊबीजेच्या दिवशी आत्यांकडे जेवायला जायचं असे. आम्हां दोन कुटूंबांना खरोखरच मजा येई. मिळून जेवताना काहीतरी हास्यविनोद चाले, मामा काहीतरी जुन्या आठवणी काढत, ताईच्या मागे मागे मी ताटाभोवती रांगोळी काढत असे. ती तिच्याकडचं नेलपॆंट मला लावून देत असे. मला तयार करत असे, विचारी, "केस कापू या का तुझे? मस्त दिसतील." मी , "नाही" म्हणायचे.

चार वाजता तिची रांगोळी झाली मग घरी यायचे.

दिवसभर टिकल्या, लवंगी फटाके , असलं काय काय फॊडणं चालूच असे, पण रात्री सगळे महत्त्वाचे फटाके...... आई पणत्या लावी दारात, खिडकीत, तुळशीजवळ, नळाजवळ, शेजार्‍यांच्या दारात..... आकाशकंदीलाचा प्रकाश रांगोळीवर पडलेला असे, शिवाय त्याच्या रंगीबेरंगी कागदातून बाहेर पडलेला रंगी बेरंगी प्रकाश भिंतीवर आणि कुठे कुठे..... आईलाही संध्याकाळच्या स्वैपाकाची चिंता नसे, ती आवरून अंगणात येऊन बसे, बाबाही असत....... आम्ही दोघे एकानंतर एक आपापले फटाके उडवत असू. सुरसुर्‍या अर्ध्या उडवल्या की त्यांची दांडी वाकडी करायची आणि त्या वर फेकल्या की पिंपळाच्या झाडाला अडकून बसत, झाडही दिवाळीत सामील होई......... शेवटचं भूईचक्र रांगोळीवर लावायचं. रांगोळीचे सगळे रंग एकमेकांत मिसळले जात..... धूर, आवाज, यांनी आज जसं प्रदूषणच आठवतं, नको वाटतात ते आवाज... तसं व्हायचं नाही...... ते सगळे आवाज आनंदाचे असत. फटाक्याच्या दारूचा वासदेखील आनंदात भरच घाले...... वाटे दिवाळी संपूच नये..... आम्ही चौघेही खूप जवळ आलो आहोत असं वाटे.

भाऊबीजेचं ओवाळणं झालं, फटाके झाले की जाणवायचं दिवाळी संपली.

जरा वाईट वाटायचं, पुन्हा कधी येणार? असं होऊन जायचं......

कशी होती ना तेव्हा दिवाळी! वर्षातून एकदाच येणारी! ... वाट पाहायला लावणारी.... हुरहूर लावून जाणारी...

4 comments:

  1. विद्या,

    माझ्या दिवाळीच्या काळातील आठवणीत घेऊन गेलीस.
    घराची स्वच्छाता...डबे घासून पालथे घालतलेले...किराणा सामानाचे पुडे...चिवडा परतणे..लाडू वळणे...

    >दिवाळीच्या सुट्टीत आम्ही कधीही गावाला जायचो नाही....
    आणि आता एकदमच चित्र पालटलं,
    धूराचा, आवाजाचा त्रास सहन होत नाही म्हणून दूर कुठंतरी शांत ठिकाणी जायचं.

    ..

    >वाटे दिवाळी संपूच नये..... आम्ही चौघेही खूप जवळ आलो आहोत असं वाटे.
    नात्याची ही घट्ट वीण कायमच आपल्या साथीला असते.

    वैशाली

    ReplyDelete
  2. >> एकूण दिवाळीच्या दिवसांत आमच्यातला समजूतदारपणा वाढत असे की काय?
    हे आवडलं.

    >> आम्ही चौघेही खूप जवळ आलो आहोत असं वाटे.
    मस्त!

    ReplyDelete
  3. किती सुरेख लिहिलं आहेस.. कामाच्या गडबडीत आज वाचायला मिळालं..
    अगदी तपशीलवार, निरागस आणि खूप प्रामाणिक..

    एकदम पाणी आलं डोळ्यातून...
    कधीकधी वाटत...

    असा १०-१५ रुपयात घेतलेल्या फटके आणि कपड्यांनी दिलेला आनंद आज हजार रुपयांचे कपडे किंवा फटाके का देऊ शकत नाहीत??

    कोडंच आहे एक...

    ReplyDelete
  4. अजून छान वाटते आहे.... कविता पोस्ट करावी

    ReplyDelete