Saturday, November 3, 2012

पुन्हा भेटताना


जयंत नारळीकर तीन वर्षे केंबिज मधे राहून दोन तीन महिन्यांसाठी भारतात आले, बनारसला त्यांच्या घरी आले, तेव्हा त्यांनी लिहिलंय...   मला तिथल्या जीवनाशी इतक्या लवकर एकरूप होता आले की दोन तीन दिवसांतच असे वाटायला लागले की केंब्रिजमधील ती तीन वर्षे म्हणजे एक दीर्घ स्वप्न होते.

******


मला "आपलं घर", " माझं घर" ची व्याख्या अशीच करावीशी वाटते. कुठूनही आलो, केंव्हाही आलो, की आपण जिथे लगेच/ फारसा वेळ न घेता, मोकळे होतो, घरचेच होतो.
काहीतरी पोझ / भूमिका घेऊन वावरायला लागत नाही. हात पाय पसरून जसे असतो तसं बसता येतं.


जितकं ते घर परकं असतं तितकं आपल्याला तिथे जमवून घ्यायला वेळ लागतो. खूपशा घरात तर आपण औपचारीकतेची सीमा ओलांडत नाही.
कुठल्याही घरातलं आपलं स्थान काय आहे, याचा आपल्याला अंदाज असतो, त्यानुसार आपण वागतो.

औरंगाबादचं घर असं आहे, जिथे मी गेले की घरचीच होते. माझी मुलंही आईबाबांवर सोपवून मला लहान होता येतं. 

मामांच्या , आत्यांच्या, मावशीच्या घरी पूर्वी रूळायला दोन- तीन तास पुरायचे, आता नव्या सुना आल्या आहेत, दोन दिवस राहिले तरी सगळावेळ पाहुणे आहोत, हेच जाणवत राहतं. 
त्यातल्या त्यात वडगाव आणि मुधोळ या दोन गावी, गेलं की आपुलकी जाणवायला लागते, माणसांचीच नव्हे, त्या वास्तूची!
बंगईवर बसून जुन्या दिवसांत जाता येतं, मातीचा वास अजून तसाच आहे.

 मी हॉस्टेलला होते तेव्हाही हा विचार करायचे की कुठल्या कुठल्या घरांमधे गेल्यावर रुळायला मी किती वेळ घेते?

गेल्यापासून रूळॆपर्यंतचं माझं वागणं कसं असतं? माझं बोलणं कसं असतं? समोरच्याचं कसं असतं? नेमकी कधी त्या घराला माझी ओळख पटते? मला घराची ओळख पटते?

मोकळेपण येण्याचा क्षण कुठला असतो?
काहीवेळा मी जाणीवपूर्वक तो क्षण पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

म्हणजे नांदेडला मोठीआईकडॆ गेलेले, सुरवातीचं बोलणं चाललेलं, मोठीआई म्हणाली, " थोडे अडकूल खाऊन घे." तो अडकूल ( पोहे) शब्द आला आणि मी मोकळीच झाले.

किंवा आत्याकडे गेलेले, देवाला नमस्कार करून, मोठ्यांना नमस्कार करून, ओसरीवर बसलेले, आत्यांशी बोलत, आत्यांनी दूध गरम करायला ठेवलेलं, चुलीवर तापणार्‍या त्या गरम दुधाचा वास आला, आणि जमलंच जुन्या दिवसांत शिरायला. मी उत्साहाने याच्या, त्याच्या चौकशा करू लागले. मोठ्या वाड्यातून काकू आल्या, त्यांच्याशी छान हसून बोलले.

कधीतरी हा अभ्यास थांबला. वरचं नारळीकरांचं ते वाक्य वाचलं आणि जुनं पुन्हा आठवलं.

*******

घरांचं आहे ना? तसंच माणसांचंही असतं.
आपली माणसं कुठली?
कुठूनही आलो, केव्हाही आलो तरी ज्यांच्यापाशी लगेच मोकळं होता येतं, एकमेकांच्या असण्याचं ओझं होत नाही. सहजता असते. काहीतरी एक पोझ घेऊन बसायला लागत नाही.
जसे आहोत तसे आहोत......

प्रत्येक माणसाशी आपले वेगवेगळ्या प्रकारे धागे जुळलेले असतात.
खूप दिवसांनी माणसं भेटली की आधी चाचपणी सुरू होते.
आधी नुसत्या चौकशा.... मग त्याची उत्तरं कशी येतात... त्यावर पुढचे प्रश्न
नंतर अंदाज घेणं...
जुनं काही उरलंय का? कितपत उरलंय? 
मग त्यावर नवी उभारणी केली जाते.
कधी कधी भूतकाळातले झरे जिवंत असतात पण त्या काळापुरतंच बोलता येतं, सध्याच्या जगण्याचे संदर्भ येऊ शकत नाहीत. पण तेव्हढ्यावरही आपण खूष असतो, कारण त्या दिवसात परत जायला ती ती च माणसं लागतात. 
माणूस सतत बदलत असतो. आपणही आणि समोरचाही...
म्हणून अडखळायला होतं, आपण ती जुनी मैत्री शोधत असतो, जुनी आपुलकी....
आपल्या परीने अंतर कापायचा प्रयत्न करत असतो. समोरची व्यक्तीही जर चार पावले चालत पुढे आली, तर अंतर संपतं.
हा अंतर संपण्याचा क्षण मला शोधावा वाटतो.
एकमेकांची जुनी ओळख नव्याने पटण्याचा क्षण!
कधी आणि कशाने ओळख पटते?

कधी कधी आपण नुसते बोलत बसतो.... काही कुठेच हवंसं सापडत नाही, मग वाटायला लागतं, ती जुनी मैत्रिण कुठे गेली? ही कोण नवीच माझ्यासमोर बसली आहे. तिच्यातला रसच संपून जातो.
हे कळण्याचा नेमका क्षण कुठला असतो?

काही माणसे ना अशी धबधब्यासारखी असतात, कोसळतातच आपल्यावर, गृहित धरतात... जुने संबंध तसेच आहेत याची. मग मीही जुन्या भाषेत बोलायला लागते, जुनी ओळख पटॊ न पटॊ, 
काही माणसे दुरावल्याचं वाईट वाटतं, काहीचं काहीच वाटत नाही, असली तरी ठीक नसली तरी ठीक. प्रवासातल्या सोबतीसारखी!

******

काही माणसे ना, हरवू नये अशी इच्छा असते........ ती आपली असतात, त्या काळाच्या तुकड्यापुरती तरी नक्कीच........  तीही जगण्याच्या रेट्यात थांबून जातात, कुठे कुठे......
स्मरणात ती तशीच असतात.......
पण प्रत्यक्षातल्या त्यांना भेटायची हिंमत होत नाही,
वाटतं जुनी ओळख पटली नाही तर काय करायचं?

*******

औरंगाबादला मी मुक्ताला काय काय दाखवून आणलेलं आहे ....
पण आम्ही राहायचो तो वाडा तिला दाखवायची/ त्यानिमित्ताने स्वत: वाड्यात जायची माझी अजून हिंमत झालेली नाही.
ओळख पटली नाही ना, तर मला सहनच होणार नाही.
मला तो धोका पत्करायचा नाही.

********

1 comment:

  1. लेखाचा सुरुवातीचा भाग (घराबद्दलचा) वाचता वाचता मनात आलं की, असंच माणसांचंही असतं. वाटलं हे प्रतिक्रियेत लिहावं.

    पण तितक्यात तू लिहिलेलं वाक्यं आलंच, "घरांचं आहे ना? तसंच माणसांचंही असतं." झालंच.

    मग उगाच अट्टाहासाने दुसरी काही प्रतिक्रिया देणं, आता नको वाटतंय. तुझा लेखच अगदी पूर्ण झाला आहे. मस्त!

    ReplyDelete