Monday, February 16, 2009

उत्सुकतेने मी झोपलो च्या परीक्षणानिमित्त

उत्सुकतेने मी झोपलो’ चे परीक्षण रविवार १५ फेब्रु. च्या लोकरंग (लोकसत्‍ता रविवार पुरवणी) मध्ये आले आहे, अरुण अनंत भालेराव यांनी केलेले.
ते ज्या कादंबरीविषयी बोलत आहेत ती आणि मी वाचलेली जणू दोन वेगळ्याच कादंबर्‍या आहेत.
मुळात ही मुख्यतः एकाकीपणाची गोष्ट आहे असे मला वाटत नाही. कुटुंबव्यवस्थेत विचार करणार्‍या माणसांना या व्यवस्थेबद्‍दलचे काही मूलभूत प्रश्न पडत जातात. त्यामुळे त्यांचे जगणे बदलते पण कुटुंबव्यवस्थेतील इतरांना हे बदल जाणवतही नाहीत. म्हणजे माधुरीने सासू, जाऊ यांच्याबद्‍द्ल तक्रार केली तर चालणार आहे पण "रोज मन लावून हिंदी सिनेमा पाहताना सासूच्या मनात काय येत असेल" असा प्रश्न विचारणे बसत नाही.
पुढेही गोष्ट विलास आणि हर्षद यांना येणार्‍या एकाकीपणाची नाही तर कुटुंबव्यवस्थेच्या कुटुंबातील घटकांकडून असलेल्या अपेक्षा आणि या प्रत्येक घटकाच्या कुटुंब्व्यवस्थेकडून असणार्‍या अपेक्षांचा आलेख यात मांडलाय. आपली कुटुंबे समाजनियमात बसणारीच असावीत ची धडपड आहे.
यात वनिता आणि विलास यांचं नातं हळुवारपणे आलेलं आहे. हे दोघे चुलत बहीण भाऊ आहेत. त्यांचं एकमेकातलं गुंतणं याला आपल्या समाजचौकटीत प्रेम नाही म्हणता येणार. त्यांची माया आहे एकमेकांवर त्याचं काय करायचं हे दोघांनाही उमजत नाही.
तिसर्‍या भागात तर कुटुंबव्यवस्थेबद्‍दलचेच विचार आहेत.
अरुण भालेराव म्हणतात -- "तरुणांची मिश्र मन:स्थिती सांगताना लेखक आवर्जून १५/२० ठिकाणी म्हणतो, ’त्याला आनंद वाटला. त्याला पडेल वाटले." म्हणजे सध्या जी तरुणांची डिप्रेशन ची स्थिती आपण सर्वत्र पाहतो त्याची जाणीव लेखक ’पडेल वाटले’ अशा साध्या सरळ वर्णनाने करून देतो.
हे असं नाही.
एकतर फक्‍त विलासलाच पडेल वाटते. हर्षदला किंवा वनिताला. संजय किंवा परागला कधी पडेल वाटत नाही. लेखक सांगतोय ती तरुणांची मन:स्थिती नाही. ’पडेल वाटणे’ चा अर्थ एका शब्दात सांगता नाही यायचा. वाचता वाचता आपल्याला कळतंच पडेल म्हणजे विलासला काय वाटतं ते !
त्याला आनंद होतो तेव्हाच त्याला वाटते की किती छोट्या गोष्टी आहेत ह्या, ज्याचा आपल्याला आनंद होतोय. त्याचे त्याला वैषम्य वाटते म्हणजेच पडेल वाटते. किंवा रुखरुख वाटते, हताश वाटतं, वेगवेगळ्या प्रसंगी त्याला वेगवेगळ्या अर्थच्छटा आहेत.
अरुण भालेराव पुढे म्हणतात -------- ’ रचनेचा, विषयाचा वेगळेपणा टिकवण्याच्या लोभापायी लेखकाकडून भाषेच्या बर्‍याच अनावश्यक चुका झालेल्या आहेत. एमए ऐवजी एमे..’
हे वेगळे शब्द लेखकाने आवर्जून वापरले आहेत. लेखकाने एम ए असे का म्हंटले नसेल ? एम ए हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना शिस्तीत अभ्यास करायचा आहे. जमल्यास पुढे एम फिल, पी एच डी वगैरे. एखाद्‍या महाविद्‍यालयात प्राध्यापक व्हायचं आहे.
माधुरीला करायचंय एमे, तिला मजा म्हणून शिकायचंय. त्या पदवीचा वापर ती भविष्यात करेलच असे नाही. लग्नाचं एक वय येईतो ती शिकते आहे. हल्‍ली नुसतं घरी बसून काय करणार त्यापेक्षा शिकायला पाठवतात. तसं तिला शिकायचंय म्हणून एमे.
’दोघे फोनात मजेत हसले’ इथे वाचता वाचता मीही थांबले पण मला ते खटकलं नाही. उलट आकर्षक वाटलं. फोन हा परभाषीय शब्द आपण मराठीत स्वीकारला आहे. त्याला प्रत्ययही भाषेप्रमाणे लावतो त्याऐवजी मराठीप्रमाणे लावला पाहिजे. आपण फोनवर बोलतो का ? तर नाही, फोनात बोलतो, आणि फोनात हसल्यामुळे हसण्याची मजा आणखी वाढली आहे.
भाषेचे हे प्रयोग लेखकाने का केले असावेत ? मला वाटते _______ रोजच्या जगण्यातले, नेहमीचे प्रसंग तो सांगतो आहे पण त्यातला वेगळा अर्थ त्याला जाणवून द्‍यायचा आहे. त्यासाठी त्याच्याकडे भाषा तर रोजचीच आहे. म्हणून तीच भाषा तो अधिक थेटपणे वापरतो आहे.

श्याम मनोहरांची ’कळ’, ’खूप लोक आहेत’ ही पुस्तके वाचताना मी भारावल्यासारखी झाले होते. हे पुस्तक वाचताना तसे झाले नाही. पूर्वीही काही काही कळले नव्हते, याही वेळी काही काही कळले नाही. पुस्तक ’ग्रेट’ आहे असे नाही पण अतिशय चांगले आहे.
कथानकात फारसे काही घडत नाही, त्यात गुंतण्यासारखे काही नाही म्हणून मग त्यातल्या आशयाचा आपण पुन्हा पुन्हा विचार करायला लागतो, बरंचसं पटतं, थोडंफार पटतही नाही.
वाटलं ’कुटुंबात विचारच होत नाहीत’ हे म्हणणे तपासून पाहावे.

1 comment:

  1. "या सर्व आटाआटीनंतर सिद्ध झालेले जे लेखन वाचकांसमोर येते त्याची सिद्धी-असिद्धी लेखकाने ठरवायची नसते. इथे ते लेखन वाचकाचे असते. वाचकही लेखकाप्रमाणेच साहित्यकृती घडवतो."

    - दुर्गा भागवत (लेख 'स्वच्छंद', संग्रह 'पैस')

    ReplyDelete