Friday, February 13, 2009

कुटुंब

"उत्सुकतेने मी झोपलो’ ही श्याम मनोहरांची तीन विभागात पण सलग आशय असणारी कादंबरी.

यात मध्यमवर्गीय कुटुंबव्यवस्थेचा उभा छेद घेतलेला आहे. यातील निरीक्षणांना काही सन्माननीय अपवाद असतीलही पण ते नियम सिध्द करण्यापुरते. एरवी सर्वत्र काय दिसते ?


"कुटुंबात विचारच होत नाहीत"
(कशाला विचार हवेत ? कुटुंब म्हणजे सुरक्षितता, कुटुंब म्हणजे सुख...)

मला वाटले, हे तपासून पाहू या का ? काय दिसते आपल्याला ?
कुटुंबात कशाकशाबद्द्ल विचार होतात ?
रोज होणारे विचार (चर्चा)
  • भाजी कुठली करायची ? डब्यात काय ? जेवायला काय ?
  • कपडे कुठले घालायचे ?
  • रोजचे वेळापत्रक सांभाळणे
  • कार्यालयीन कामासंबंधी
  • टीव्ही, ठळक बातमी, मालिकांसंबंधी
अधूनमधून होणारे विचार (चर्चा)
  • खरेदीसंबंधी,, हे घेऊ या का ? ते घेऊ या का ? केव्हा ? कधी ? (वस्तू, कपडे, दागिने वगैरे वगैरे)
  • सणवार, विशेष समारंभ साजरा करण्यासंबंधी, आहेर, त्यास उपस्थित राहणे वगैरे वगैरे
  • मुलांची प्रगती
  • आर्थिक बाबी
  • घरातल्या ज्येष्ठांविषयी, प्रकृती-आजारपण
  • राजकारण
  • खेळ (टीव्ही वरील)
  • कुटुंबाकुटुंबातील तुलनात्मक आचरणासंबंधी
क्वचित केले जाणारे विचार
  • सहलीसंबंधी
  • लग्नासंबंधी
  • व्यवसाय निवड / बदल
वरील यादी परिपूर्ण आहे असे मी म्हणत नाही पण कुटुंबात बोलले जाणारे विषय साधारणपणे याला समांतर जाणारेच असतात.
यात विचार काय आहे ? बहुतेकवेळा ’पर्याय निवड’ असते. इतर वेळा समाजात बरं दिसेल, तथाकथित प्रतिष्ठेचे असेल त्याचं अनुकरण असं असतं.
यापलिकडे खरंच कुटुंबात काही मूलगामी विचार होतात का ? माणसं समजून घेतली जातात का ? की प्रेम (तेही चौकटीतले) हेच पुरेसे आहे असे समजले जाते ? कुटुंबात काही गाभ्याशी जाणारे प्रश्न पडतात का ?
समजा - नैतिकता म्हणजे काय ? याचा विचार होतो का, किंवा स्वातंत्र्य ? (आपल्याला आहे का?) मृत्यू अटळ आहे. त्याचा विचार / स्पष्ट उच्चार कुटुंबांमधून होतो का ? जगण्याचा तरी होतो का ?
विचार करायचा म्हंटलं तर असा एखादा प्रश्न, (जो आपली खरी ओळख दाखवेल) कुटुंबामध्ये सापडेल का ?
कुटुंबात विचार होत नाही याविषयी मला वाटले तसे हे...
याशिवायची त्यांची बाकीची निरीक्षणे अशी
१]लग्न ही केवळ स्त्रीपुरुषांची गोष्ट नसते,कुटूंबाची गोष्ट असते.मुलीचे,मुलाचे लग्न योग्य वयात होणे आवश्यक असते.
२]कुटूंबात विचारच होत नाही
३]कुटूंबात माणूसच समजत नाही
४]कुटूंबात वर्ल्ड व्ह्यू येत नाही.
५]निर्मितीला कुटूंबात जागा नसते.
६]कुटूंबव्यवस्थेत ज्ञानाला जागा नाही.
७]कुटूंब एकाच प्रकारची असतात.(म्हणजे आई-वडील मुले, फारतर वडीलांचे आई-वडील, असे)
८]कुटूंबव्यवस्थेत नव्वद टक्के आठवणी सगळ्यांच्या सारख्याच असतात.
९]स्त्रीपुरुषसमानता हे तत्व कुटुंबव्यवस्थेतून नाही आले.
१०]स्त्रीपुरुषसमानतेचे कुटुंबात काय करायचे हे अजून नीट नाहीच उमगत.
११]श्रमप्रतिष्ठा हे तत्व कुटूंबव्यवस्थेतून नाही आले. श्रमप्रतिष्ठेचे कुटुंबात काय करायचे हे अजून नीट नाहीच उमगत
१२]कुटुंबातल्या घटकांनी सामंजस्याने वागून एकमेकांचा आदर ठेवून एकमेकांच्या दुःखात सहभागी व्हावे आणि कुटुंबव्यवस्था टिकवावी. या तत्वाशिवाय दुसरे तत्व सापडले नाही कुटूंबव्यवस्थेतून.
१३) कुटूंबव्यवस्थेतून सतीची चाल बंद झाली नाही.
१४) कुटूंबव्यवस्थेतून भ्रष्टाचार बंद होत नाहीय.
१५). कुटूंबव्यवस्थेत फार कामे असतात, विचार करायला वेळच नसतो. कोणकोणती कामे करायची अन कशीकशी करायची याचाच विचार कुटूंबव्यवस्थेत होतो.
१६) जगायचे असेल तर नुसते कुटुंब नीट असून उपयोगी नाही, समाजच नीट पाहिजे.
१७) कौटुंबिक अवकाशात लहाम मुलांच्या विचित्र गोष्टी बसू शकतात, मोठ्यांच्या विचित्र गोष्टी नाही बसू शकत.
१८) मोठे झाल्यावर ओढीवर संयम ठेवायचा असतो, ओढीप्रमाणे वागून कुटुंब टिकेल ?
१९) कुटुंबव्यवस्था नसती तर मृत्युचे दुःख इतके कळले नसते.
२०) कुटुंबात एकटे व्हायची, असायची पद्‍धत हवी.
२१) कुटुंबव्यवस्था कितीही वाढवली तरी विश्वाएवढी नाही होणार.
२२) कुटूंबव्यवस्थेत मैत्रीची गोष्ट वरचेवर होत नाही.
२३) एकटे होऊन जीवनाचा विचार करण्याचे आकर्षण जबरदस्त असते. या आकर्षणाला कुटूंबव्यवस्थेत जागा हवी.
२४) म्हातारपण येईपर्यंत काळाचा खडक दिसतच नाही. कुटुंबव्यवस्थेत अशी काही सुधारणा केली पाहिजे की कुटूंबव्यवस्थेतल्या घटकांना लहानपणापासून काळ ठसठशीत जाणवेल.


3 comments:

  1. ब्लॉग तयार केल्याबद्दल मनापासून अभिनंदन.

    हे वाचून कादंबरी बद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. (न वाचता इतर २४ निरीक्षणांवर बोलणे बरोबर होणार नाही.)

    "कुटुंबात विचारच होत नाहीत" यावर (कुटुंबाबाहेर) विचार करून नंतर प्रतिक्रिया देतो.

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणे श्याम मनोहरांचे म्हणणे मूलभूत विचार करायला लावणारे
    आहे.सध्या त्या कादंबरीचे वाचन चालू आहे का?
    मला वाटते,कुटुंबात कोणत्या विषयाबद्द्ल विचार होतो यापेक्शा तो कसा होतो? विचार मांडतांना प्रत्येकाचे म्हणणे किती मोकळेपणाने ’ऎकून’घेतले जाते?यासाठीचे लोकशाही वातावरण कुटुंबात
    असण्याची गरज तरी घरातील लोकांना जाणवते का? हे अधिक महत्त्वाचे आहे.घ्रराघ्ररातील चर्चांचे transactional analysis
    केले तरी हे लक्शात यावे.
    असो.
    राजश्री

    ReplyDelete
  3. विद्या, छान लिहिले आहेस.

    "कुटुंबात विचारच होत नाहीत" हे एका अर्थाने मान्य. (इथे विचार म्हणण्यापेक्षा विचारविनिमय हा शब्द योग्य होईल.)

    पण ही कुटुंबाविषयी तक्रार आहे का? तर तशी गरज वाटत नाही. पहिली गोष्ट म्हणजे "विचार" हे कुटुंबाचे साध्य नाही. एखाद्या कुटुंबात विचार होत असेल तर छानच, पण विचार होत नसेल तर ती कुटुंब या संस्थाप्रकाराची मर्यादा आहे असे वाटत नाही. "विचार" करायचे शिक्षण देऊ शकतील अशा व्यक्ती सामान्य कुटुंबात अभावानेच असतात हे याचे कारण आहे.

    आणि विचार कुटुंबात होत नाहीत, तर इतर कुठे कुठे होतात हे सांगणेही तसे कठीणच. समाजात होतात का? शाळेत होतात का? बागेत होतात का? कामाच्या ठिकाणी होतात का? सहलींत होतात का? बर्‍याचदा नाहीच. "एकत्रित" विचार हा बहुतांशी तेव्हाच होतो जेव्हा तो विचार करणे याच हेतुने माणसे जमतात. (उदा. office meetings, परिसंवाद, शाळेचे तास, पुस्तक भिशी).

    बाकी उरतो तो एकटयाने करायचा विचार. आणि यासाठी कुटुंब जितका वाव देते तितका इतर कोणीच देत नाही. जोपर्यंत कुटुंब सदस्यांना एकेकटयाने विचार करायला स्वातंत्र्य आणि space देते आहे, तोवर पुरेसे आहे.

    आणि एक महत्वाचा विचार करायला आपण कुटुंबातच शिकतो... तो म्हणजे इतरांचा (खरे म्हणजे "आपल्या" माणसांचा) विचार.

    ReplyDelete