Saturday, December 26, 2009

सहप्रवासी

प्रवास ही मला फार आवडणारी गोष्ट आहे.
माणसाचं जडत्व जातं प्रवासात! कसं हलकं हलकं वाटतं!
गतीची आदिम ओढ असत असेल माणसात.
मानवाच्या प्रगतीतला महत्त्वाचा टप्पा चाकाचा शोध हा तर आहे!

स्वतःच्या खूप जवळ असतो माणूस प्रवासात!
मनातलं बोलायचं असेल तर काय करावं? प्रवासाला निघावं.
हवंहवसं ऎकायचं असेल तर काय करावं? प्रवासाला निघावं.
मनात गुंता झाला असेल तर काय करावं? प्रवासाला निघावं.
एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर काय करावं? प्रवासाला निघावं.
स्वतःला भेटलो नसू खूप दिवसात तर काय करावं? प्रवासाला निघावं.

कारने प्रवास म्हणजे एक कौटुंबिक संमेलन असतं.सगळ्यांनी मिळून गप्पा मारत जायचं. मनसोक्त गप्पा होतात. सगळे ऎकण्याच्या मनस्थितीत असतात. मुख्य म्हणजे कोणीही काहीही वाचू शकत नाही.कारप्रवासाचा हा एक महत्त्वाचा फायदा आहे.

हल्ली बसचे प्रवास फार कमी होतात, त्याचीही एक वेगळीच मजा असते. गर्दीतला एकांत! बसच्या प्रवासात वाटलं तर शेजार्‍याशी बोला, न वाटलं तर बाहेरची गंमत बघा. गर्दी असेल तर आकसून बसा, नसेल तर बसा खुशाल मांडी घालून. हवं तर झोपा सुद्धा!(आधी तिकिट काढा) वाटलं तर (च) विचार करा, नाहीतर अविचार करा, लांबचा प्रवास असेल तर ब आणि कविचार सुद्धा करून होईल.आपले विचार असे गतीबरोबर सोडून द्यायचे. धावोत बिचारे हवे तसे. डोळ्यांसमोरून चित्रे सरकत जातात, काही नोंदवून घ्यायचं नाही, कान असून ऎकायचं नाही. एकप्रकारे समाधीच की ती!
त्या धावत्या जगात आपला आपला एक विचारांचा ढग तयार होतो. बसमधल्या विचार करणार्‍या इतरांचेही आपापले ढग तयार होत असणार! वाटलंच तर त्यांच्या ढगात शिरण्याचा खेळ खेळा.

माझा शेजारी काय बरं विचार करत असेल? ती म्हातारी पुन्हा पुन्हा पैसे आणि तिकिट तपासून पाहतेय. काय बरं असेल तिच्या ढगात? कधी एकटी प्रवास करत नसेल म्हणून काळजीत? पैशांचे व्यवहार कधी केलेच नसतील, सगळं काय ते नवर्‍याच्या हातात असं असेल? की कधीतरी चुकून पाचशेची नोट शंभराची म्हणून गेली असेल? आणि तो कोपर्‍यातला माणूस सारखा दिसणार्‍या देवाला/देवळाला तीनतीनदा हात जोडतोय, ते का? याचा आत्मविश्वास कशाने गेला असेल? हा पुढच्या सीट्वरचा तरूण सारखी गाणी ऎकतोय, एका पायाने ताल धरलाय. ह्याचा ढग गुलाबी असणार! कोण बरं असेल ती?
एकदा मी आणि मुक्ता औरंगाबादहून येत होतो, गर्दी होती ,मुक्ता माझ्या मांडीवर बसली होती. मधल्या एका छोट्या गावाला एक पागोटेवाला म्हातारा चढला.पंच्याहत्तरच्या जवळपासचा असावा. पांढरे पागोटे,पांढरा नेहरू शर्ट, पांढरे धोतर. म्हणजे जाहिरातीतला पांढरा नव्हे, तर जरा मळकट पांढरा. ड्रायव्हरच्या मागच्या सीट्वर बसला होता ,आमच्या इथून दिसत होता . सावळा किंवा काळाच. सुरकुतलेला चेहरा, पण थकलेला नाही तर उत्साही. पायावर पाय टाकून एक हात गुडघ्यावर तर दुस-यानी समोरची दांडी धरलेली, दारातून बाहेर पाहात होता. मोठा छान म्हातारा होता. आयुष्यभर कष्टला असेल,हातापायांच्या शिरा तट्तट्लेल्या होत्या. रेखाचित्र काढायचा मोह व्हावा असा समोर बसला होता.याच्या एकाएका सुरकुतीने याला कायकाय शिकवलं असेल? घरातला मोठा हाच असेल आता. मुलं करतीसवरती झाली असतील तरी बापाला विचारत असतील. काय असेल बरं याच्या प्रसन्नतेचं रहस्य? याची म्हातारी कशी असेल? अजुनही म्हाता-यासाठी गरम भाकरी टाकत असेल का? ती सत्तरीची असेल, या वयात चुलीपाशी जात असेल का? नाहीतर म्हाता-याच्या सुना फार चांगल्या असतील. म्हाता-याची चांगली बडदास्त ठेवत असतील. गर्दी आहे म्हणून , जागा चांगली मिळाली नाही म्हणून मी वैतागले होते. म्हाता-याकडे पाहून मला छान वाटलं. माझा मूड परत आला. थोड्या वेळाने आम्हाला चांगली जागा मिळाली. मुक्ता शेजारी बसली. मीही जरा पाय ताणले. या जागेवरून म्हातारा स्पष्ट दिसत होता. एकदम माझं लक्ष त्याच्या पायांकडे गेलं. पायांची नखे रंगवलेली होती. जुन्या काळ्या पांढ-या फोटोला वरुन रंगवावं, तसं ते दिसत होतं.अगदीच विजोड. पण कोडं सुटलं होतं.

म्हाता-याची लाडकी धाकट्या लेकाची धाकटी मुलगी असेल, किंवा मोठ्या लेकाची नात असेल, पोरीलाही म्हातार्‍याचा लळा असेल.

नागपंचमीला मावशीने बांगड्या भरल्या असतील, मेंदी काढली असेल आणि एक नेलपेंट्ची रंगीत बाट्ली आणली असेल. रंगवलेली नखे बघून पोर हरखली असेल. कसा हात बदलून गेला हे पाहिले आणि आपल्या आज्याकडे गेली असेल, नखे रंगविण्यासाठी त्याच्या मागे लागली असेल, तिचा आग्रह मोडवेना म्हणुन म्हाता-याने आपला हात पुढे केला असेल, सुना पदराआड हसल्या असतील पण म्हातारा नातीच्या निरागस आनंदाकडे पाहात बसला असेल. दोन्ही हात झाल्यावर आपले पाय पुढे केले असतील.

पुढे एका फाट्यावर तो उतरून गेला. माझा प्रवास चांगला झाला.

महिन्यापूर्वी मी आणि सुहृद संगमनेरला चाललो होतो. साडेचार पाच वाजले असतील, जी बस समोर होती तिच्यात बसलो. जागा चांगली मिळाली. बसलो निवान्त. आमच्या पुढच्या सीटवर एक चौकोनी कुटुंब बसलं होतं.दोन मुली, धाकटी पाच वर्षांची असेल, मोठी सात. मोठी खिडकीशी धाकटी वडीलांच्या मांडीवर. बाजूच्या सीटवर एक आजोबा-आजी. त्यांच्यापुढे एक बाई. अगदी मागे दोन-तीन माणसे. गाडी तशी रिकामीच होती. पाच-दहा मिनिटे झाली, लोक हळूहळू वाढत होते. पण ड्रायव्हर काही येत नव्हता. माझ्या कर्णरेषेत बसलेल्या त्या बाईला मी विचारलं,’कितीची बस आहे ही!’ तिला माहित नव्हतं. मागे एक संगमनेर बस सुटताना दिसत होती.मी म्हणाले,’ ती संगमनेर गाडी निघतीये. तिच्याने जायला पाहिजे.’आजोबा म्हणाले,’ ही पण संगमनेरलाच जाते. जागा चांगली आहे. कशाला उठून त्या गाडीत जाताय? ही मुक्कामाला आलीय का? ही पण निघणारचं’ मी दहा मिनिटांसाठी बैग आणि छोट्या मुलाला घेवून या गाडीतून उतरून त्या गाडीत जावं हे त्यांना पटत नव्हतं. मीही निमूट त्यांचं ऎकलं.का कोण जाणे. ज्याला त्याला आपापलं ठरवू द्यावं हेच खरं तर योग्य पण कधीतरी ऎकावं की एक दुसर्‍याचं, काय हरकत आहे?
या गडबडीत समोरचं कुटूंब वेगळं झालं होतं. काय झालं त्यांच्यात कुणास ठाऊक? धाकटी आणि तिचे बाबा मागे बसायला गेले होते. बस सुटली.नाशिकफाटय़ाला तर गर्दी झाली. सुहृद आणि मी दोघच बसलो होतो तर शेजारी एक मावशीबाई आल्या. सुहृदला आवडलं नाही त्याला मांडीवर घेतलं. तो कुरकुरतच होता. या मुलांना काही सवयच नाही. समोरही एक लठ्ठ माणूस येवून बसला, पण तिने नवर्‍याला शेजारी बोलावले नाही. तोही बिचारा मागे आणखीच कुणालातरी शेजारी घेवून बसला होता.
मंचरला आमच्या दोघीचेही शेजारी बदलले. तो काही तिच्याशेजारी बसायला आला नाही. टूसीटरवर आरामात मावावे असे सडपातळ कुटूंब होते ते!
मला दुसरा काही विचार करता येत नव्हता. काय बिघडलयं यांच्यात? !

नारायणगावला बरीचशी बस रिकामी झाली. मी छान मांडी घातली. सुहृदला झोप येतच होती, तो झोपला. थंडी वाजत होती, त्याच्या अंगावर शाल घातली. बाहेर अंधार झाला होता. बस निघाली. बसमधलेही दिवे घालवले. माझ्या डोक्यात सारखी ही दोघचं. मला काही अंदाजच करता येत नव्हता. बस बदलायची या घोळात मी त्यांच्याकडे लक्षच दिले नव्हते. काहितरी धागा मिळाला असता. त्या दोघांनी भांडण सोडावे, असे मला वाटू लागले. माझ्या वाटण्याला काहीही अर्थ नव्हता. हे मलाही कळत होते. घरूनच भांडून निघाले होते का? सुरवातीला तसे वाटले नाही..तो जरा समंजस वाटत होता, म्हणजे एका पोरीला घेवून बसला होता म्हणून. ती का रूसली होती? तो का रूसवा काढत नव्हता? सात वर्षांची मुलगी म्हणजे आठ्तरी वर्षे लग्नाला झाली असतील. अजूनही जर का ही रूसू शकते तर दोघांचे नक्की ठिक चालले असणार! प्रवासातला दोघांचाच असू शकणारा वेळ हे का घालवताहेत.

बस धाब्यावर थांबली. संगमनेर इतकं जवळ आलेलं असताना अर्धातास धाब्यावर थांबायचं म्हणजे कंटाळा येतो. सगळे उठले. शेजारी आजींचा गुडघा दुखतो म्हणून आजोबा मागे बसायला गेले होते. आजी पाय पसरून बसल्या होत्या. आजोबांनी त्यांना उठायला मदत केली.दोघे उतरले.तो आणि धाकटी निघाले. धाकटी म्हणाली,’ मम्मी, चल ना गं’ ती गेली नाही. मोठीला पाठवून दिलं. मोठी परत वर आली,’ मम्मी, पप्पा बोलवताहेत’ ’मला भूक नाही, तुम्ही जा.’ मोठी जावून परत वर आली,’पप्पा म्हणतेत नुसतं चल’ ’माझं डोकं दुखतयं’ ती सीट्वर आडवी झाली. माझ्याकडे घड्याळ नव्हतं, मोबाईल नाही, वेळेचा अंदाज येत नव्हता. मी समोर डोकावले, समजा हातात घड्याळ असेल सहज वेळ दिसली तर पाहावी म्हणून. घड्याळ नव्हते, चांगलीच चिडली असावी. ..... बाहेरून खिडकीवर धप..धप... थंडीमुळे सगळ्या खिड्क्या बंद होत्या.....धपधप...धपधपधप ....ती उठली, माझ्याकडे पाहिलं, खिडकी काढायचा प्रयत्न करू लागली, निघेना. तो म्हणाला,’चल गं’

..................चारी दरवाजे उघडा ग बाई
                  झिप्र्या कुत्र्याला बांधा ग बाई.......................

ती उभी राहिली. साडी जरा नीट केली. मला हसू आवरेना. तिने माझ्याकडे पाहिलं.तिलाही हसू आवरेना. दोघींनाही कळलंच काय झालं ते! म्हणाली,’ गाडीत एकट्याच थांबणार का?’ ’ हो. काय करणार?हा झोपलाय ना!’ ’सामानाकडे लक्ष ठेवा.’ ’हो.’

मला खूप बरं वाटलं. चला आता काळजी नाही.

हळूहळू लोक येऊ लागले. बटाटेवड्याचे, सांबाराचे, पानमसाल्याचे वासच जणू गाडीत चढत होते. त्या वासांनी गाडी भरून गेली. सगळ्यात शेवटी गाडी निघता निघता आपले हसरे चौकोनी कुटूंब चढले. पुन्हा दोघे माझ्या पुढे, दोघे मागे. .............. ती मागे वळून म्हणाली,’अहो, या इथे.’ आता तिला माझी पर्वा नव्हती. तिने माझ्याकडे लक्षसुद्धा दिले नाही. तो म्हणाला,’असू दे.’ ’अहो, या.’ अहो उठून पुढे गेले.

गाडीने वेग घेतला. टू सीटरवर ते कुटूंब आरामात बसले होते, पहिल्यासारखेच. फक्त आता तिची मान त्याच्या खांद्यावर कललेली होती......

(थोड्याच वेळात संगमनेर आलं. मी सुहृदला कडेवर घेऊन उतरले. त्या दोघांची ती कहाणी तशीच पुढे गेली.)

..............मनभावन के घर जाये गोरी.....

1 comment:

  1. विद्या blog वाचताना सगळ्या घटना मी जिवंतपणे डोळ्यासमोर आणत होते. खरच प्रवासात असं माणसांच शांतपणे बसून वाचन करताना किती मजा येते. नकळ्त आपण त्यांची काही ऒळख नसतानाही किती जवळ पोहोतचतो. पागोटेवाला तर अगदी डोळ्यासमोर अजूनही तरळत आहे. आता यापुढे प्रत्येक प्रवासात छान द्रुष्टी मिळाली.

    -वैशाली

    ReplyDelete