Friday, January 22, 2010

गावाकडल्या गोष्टी

वर्षातून एकदाच आम्ही नांदेडला जायचो. सगळी मामे-मावस भावंडे जमलेली असत. नुसती धमाल करायचो आम्ही! कधीतरी औरंगाबाद की नांदेड असा सामना होत असे. मी आणि विश्वास त्या नांदेडवाल्यांना पुरून उरत असू. आमच्याकडे शिक्षणाच्या सोयी, ऐतिहासीक महत्त्वाची ठिकाणे असं बरंच काय काय होतं. गुरूद्वारा सांगितलं तर वेरूळ सांगता येई, ह्नुमानटेकडी, शिकारघाट असं सांगितलं तर आमच्याकडे बावन्न गेट होते, मलिक अंबर वगैरे मंडळींनाही आम्ही आमच्यात ओढत असू. ते म्हणत आमच्याकडे गंगा आहे. (नांदेडला गोदावरीला गंगाच म्हणतात) गंगेला काय सांगणार तुम्ही? पाणचक्की? की मकबरा? असंच काहीतरी आम्ही सांगत असू, पुढे तर आम्ही औरंगाबादेतून खांब नदी वाहते हे ही एका पुस्तकातून शोधून काढलं. नदी कसली? नालाच तो? आमच्या शाळेजवळून वाहणारी ही नदी आहे हे आम्हांला माहितच नव्हतं! तेंव्हाही गंगेच्या तोडीचं काही नाही हे मला कळलेलं होतं. त्यांना त्यांचा मुद्दा नीट मांडता येत नसे, आज वाटतं एका गंगेच्या जोरावर खरं तर ते जिंकू शकत होते.

पहाटे पाचलाच मोठीआई गंगेला जावून येत असे. आम्ही उठल्यावर आठ-साडेआठला आई, मावशा, मामी आणि आम्ही सगळी मुलं गंगेवर जात असू. मंदाआत्याच्या घरापर्यंत गंगा दिसतच नसे, पुढे एकदम पाणीच पाणी दिसायला लागे. त्या उतारावरून तर आम्ही धावतच सुटत असू आधी वाळू मग पाणी...पाण्याचा जिवंत स्पर्श पावलांना झाला की पावले अधर होऊ पाहात.पाण्याची किमया तुमच्यावर झाली की तुम्ही बदलता. कृष्णाच्या गोष्टींमधे जे मंतरलेपण आहे ते यमुनेमुळेच आहे का?.... सुरूवातीला पाणी गार गार पण थोड्या वेळाने तेच उबदार वाटे. वाहत्या पाण्याशी आम्ही वेगवेगळ्या प्रकारे खेळत बसायचो. मोठ्यांचे स्नान, पुढे कपडे धुणे होत असे. कपडे वाळत येत पण आम्ही बाहेर पडायला राजी नसायचो. आमची प्रतिमा गुणी मुले अशी असल्याने आईच्या दोनचार हाकांत आम्हांला बाहेर यावे लागे. हळूहळू सगळेच बाहेर येत. बाहेर आल्यावर उन्हं तापली आहेत हे लक्षात येई. मग वाळूत दगड शोधत बसायचे. दुपारी सागरगोटे खेळायचे असत त्यासाठी आम्ही दगडच वापरत असू. कधी किल्ला करत बसायचो, तोवर आया आमचे कपडे धुवून आणत. पुन्हा आमच्या मागे लागायचे, असं करणार असाल तर उद्या गंगेवर आणणारच नाही अशा धमक्या, शेवटी कसेबसे आम्ही घरी यायला निघायचो. दुसर्‍या दिवशी निघतानाच हाक मारली की बाहेर येणार असं कबूल करून गंगेवर जायचो तरी परत तेच!
लवकरच आम्ही मुली थोड्या मोठ्या झालो, म्हणजे काय ते आम्हांला कळलेलं नव्हतंच. मग शिष्ठ्पणे गंगेवर जावून नुसते पायच बुडवायचे, स्नान घरीच करायचं असं सुरू झालं. मोठ्या ताया तर गंगेवर यायच्या पण नाहीत.कधी घरी पाणी कमी असलं तरीही. बाई ग! तिथे कसे कपडे बदलायचे? त्यांचं असं सुरू असायचं. आम्हांला आम्हीपण मोठ्या होतोय हे छानच वाटायचं. आम्ही कधी भांडलो नाही, मुलांसारखं आम्हांला का नाही? असं म्हणून. कदाचित मोठ्या झाल्याची मान्यता अधिक महत्त्वाची वाटली असेल . गंगा ही आम्हांला किती आवडणारी गोष्ट होती! कसं असतं ना? मुली म्हंटल्या की अशी छोटी छोटी सुखंही त्यांना नाकारली जातात.

नांदेडला जाताना असंच काय काय आठवत होते. चार-पाच वर्षांनी जात होते. मधल्या एक दोन लग्नांनाही जाता आलं नव्हतं. आता तीन दिवसात परभणी, नांदेड आणि वडगाव , बहूतेक सगळ्या नातेवाईकांना भेटणे म्हणजे महत्वाकांक्षीच कार्यक्रम होता. सगळ्यांना फक्त पाहणे होणार होते, भेट अशी होणार नव्हतीच.
काका, मावशा, आत्या, मामा, मामी,भाऊ,बहीणी, वहिन्या, भाचे, भाच्या किती जणांना भेटले/ पाहिले. प्रत्येकाच्या माहितीचे नुतनीकरण करायचे, मी तर दमून गेले. जे भेटले नाहीत तेही सगळे काय करताहेत, कुठे आहेत. आई-बाबांशी बोलतना त्यांचेही काही काही सांगायचे राहून जाते, त्यामुळे काही गोष्टी मला नवीनच कळत होत्या. एका लग्नाची सीडी पाहताना’
” ही कोण ग?" " अगं सुलभाताई." ’’काय? चांगलीच सुटलीय हं” ’’आता तिची बिट्टी लग्नाला आलीय, सासू होईल ती पुढच्या वर्षी” दहा वर्ष झाली असतील तिला भेटून, मुक्ता सहा महिन्यांची होती तेंव्हा.
"रोहनदादा काय करतोय?" " त्याची एक नोकरी टिकेल तर शपथ!”
"अर्चनाची मुलगी खूप आजारी होती, मरता मरता वाचली, नंतर सगळे मिळून माहूरला जावून आले."
"एकदा मीताकडे जाऊन या हैद्राबादला, छान घर बांधलय तिने"
”नीताताईचा वास्तूशास्त्राचा चांगला अभ्यास आहे हं. कुठून कुठून बोलावणी येतात तिला." ” काय???" " हो, ती शाळा बांधली, त्याचं सगळं पाहिलयं तिनं" "फी घेते?" "घेत असणार, तिने घराच्या दिशा, कुठे काय सांगितलं ना की भलंच होतं बघ त्यांचं"
मी इथे थबकले. आपण करू त्या असल्या गोष्टींनी लोकांचं भलंच होईल असं वाटण्याइतका आत्मविश्वास कुठून येतो माणसांत?? आणि भलं म्हणजे काय? ते असं अधल्या मधल्या टप्प्यावर ठरवता येतं का? नीताताई अजून भाबडीच राहिली आहे की बेरकी झाली आहे. आपल्या समोरची माणसं कशी अनोळखी होत जातात नं आपल्याला.
वरवरचंच बोलणं झालं सगळ्यांशी. खुशाली आणि जुजबी चौकशा पण त्याच्यामागे असणारं त्यांचं प्रेम आणि माया यांचं काय करू असं होऊन गेलं मला! एकीकडे वाटत राहिलं क्वचित भेटतोय म्हणून हे असेल. पाहिल्यावरची पहिली प्रतिक्रिया अशीच असणार!

पूर्वी मी कायम माझ्या मुद्द्यांवर वाद घाल, त्यांच्या दृष्टीने टोकाच्या प्रतिक्रिया दे, यात काय पडलयं आणि त्यात काय पडलयं असं काहीसं बोलत असे. त्यावर ’तू अजून लहान आहेस’ हे मला ऎकून घ्यावं लागे. यावेळेस.....मला दोन मुलं झाली, त्यांचं करतीये, त्यांच्या मागे फिरतीये म्हणजे मी बदललेच असं त्यांना वाटलं. माझा संयम वाढलाय पण मी बदलले नाहीये. काही झालं तरी मी माझी वाट बदलून घेईन असं यांना वाटलच कसं? मिलिन्द सोबत आहे म्हणून इथवर येऊन, तो नसता आणखीच कुणी असता तर आधीच्याच कुठल्या टप्प्यावर मी भांडत, झगडत राहिलेच असते ना?

काकू म्हणाल्या," बघ, कांताच्या पोरानं कसं केलं! आपल्या घरात असं कधी झालं नव्हतं. आपल्यात काय कमी पोरी आहेत का? किती सुंदर सुंदर पोरी सुचवल्या आणि यानं बघ कसं केलं" " तुम्हांला वाईट वाटणं मला समजू शकतं काकू".... तरीही काकूंचं पुढे सुरूच...मी ऎकतीये....सुरूच. " खरं सांगू का काकू? मला नाही याचं काही वाटत. त्याला आवडली ना मुलगी, पुरेसं आहे ना एव्हढं"... तरीही सुरूच. "काकू, हे असं होणारच, तुमची इच्छा असो की नसो. उद्या माझ्याकडे होणार आहे , नंतर तुमची ही नातवंडं आहेत ना ती पण दुसर्‍या जातीतल्या मुलींशी लग्न करणार आहेत. तुम्ही तयारी ठेवा." काकू माझ्याकडे बघत राहिल्या. मग हात जोडले म्हणाल्या,” त्याच्या आत नारायणानं माझे डोळे मिटावेत." ( सॉरी काकू! मला तुम्हांला दुखवायचं नव्हतं. काय करू? तुम्हीपण जरा आधी का नाही थांबलात?) माझ्याशी जरावेळ बोलल्याच नाहीत. ( आईला वाटतं मी नुसतं ऎकून घ्यावं, नाही काही बोलले तर चालणार आहे.) आता यांचा रूसवा कसा काढू? माणसं दुखावली गेली की त्याचा त्रास होतो. स्पष्टीकरण काय देणार? शक्यच नसतं काही. विशेषतः आपण योग्य तेच बोललेलो असतो तेंव्हा. असं स्पष्टीकरण द्यायला आणि ओशाळं हसायला मला अजिबात आवडत नाही. दुखावलं त्याचं वाईट वाटत राहतं. यातून स्वतःला सोडवायचं कसं? माणसं खूप जवळची असली की त्यांना दुखवायचा आपल्याला अधिकार आहे असं वाटतं. ते काहीही गैरसमज करून घेणार नाहीत याची खात्री असते. एकमेकांना दुखावूनही तुम्ही एकमेकांच्या जवळ येत जाता. पण तसं नसतं तेंव्हा?
थोड्या वेळाने काहीतरी विषय निघाला, मी हसत म्हणाले,’ असला नवरा तर मी चालवूनच घेतला नसता’ काकू हसल्या म्हणाल्या, " आम्ही घेतला बरं चालवून" आणि काकांचं काही काही सांगायला लागल्या. ( धन्यवाद, काकू!) तुम्हांला असं नाराज ठेवून मला इथून जाता आलं नसतं, जावं तर लागणारंच होतं. कशी सुटका केलीत माझी! पुन्हा किती वेळ त्यांच्याजवळ बसले, गुडघेदुखी, रात्रीची झोप त्याचं सगळं आस्थेनं ऎकून घेतलं, काही सुचवलं. उत्साहानं काय काय बोलत राहीले. मला त्यांना एव्हढंच म्हणायचं होतं__आभारी आहे.

गावाची शीव लागताच दिसते उंचावरी ती गढी
भिंती ढासळल्या, बुरूज पडले ये खालती चावडी
.........................................................शेवटी
ही काठी दिसते तिलाच मुजरा आता करू आपण
बाबा ही कविता इतकी छान म्हणतात. माझ्या डोळ्यासमोर वडगावच उभं राहतं.
सोबत आई-बाबा होते त्यामुळे परत लहान व्हायला जमत होतं.
अगदी घाईघाईत वडगाव झालं. देवात जाऊन आलो,पवळाच्या वावरात गेलो पण वांग्यांच्या विहिरीवर गेलोच नाही. वाड्यातली विहिर कोरडीठाक होती. कधीमधी आम्ही हौसेने पाणी शेंदायचो. मुक्ताला पाणी शेंदणं माहीतच नव्हतं. आमच्यासाठी छोटा पोहरा होता. सवय नसल्याने पाणी डुचमळत वरती यायचं. वाकून पोहरा धरावा लागायचा, तेंव्हा भीती वाटे. मुक्ताला सांगीतलं, इथे ना चमकोरा लावलेला असायचा. तिकडे नां, चुलीवर मोठ्ठा हंडा ठेवलेला असायचा. ही बघ बळद. पूर्वी पोती नव्हती फारशी, कणग्या भरलेल्या असायच्या,इथे बाजा टाकून आम्ही झोपायचो, या बुरूजावर ना रात्री घुबड असायचे. असंच काय काय सांगत होते. वावरात तर तुरीच्या शेंगा तोडायलाही वेळ नव्हता. चुलतभाऊ म्हणाला,’ पुढच्या वेळी दिवस घेऊन ये, तू आलीस तरच आपली भेट व्हायची.’ खरं होतं ते! सगळ्यांना तुम्ही एकदा पुण्याला या असं सांगत होते, पण अवघडच होतं त्यांच्यासाठी. मलाच यायला हवं. म्हणाले,’ आता पुढच्या वर्षी येईन, इतके दिवस लावणार नाही.’
 आम्ही वडगावला जावू या म्हणालो की बाबाच खूप खूष होतात. त्यांना वडगावची ओढ आहे, ती थोडी जरी आमच्यात उतरलेली दिसली की त्यांना बरं वाटतं. तिथे ते अतिच उत्साहात असतात. बाकी सगळं जावू देत पण त्यांच्या या आनंदासाठी तरी इथे सारखं सारखं यायला हवं.
आमची वाटेकरीण तेजनबाई म्हणाली,’ बाई, आता इकडचच सोयरं-धायरं करा म्हंजी येनं होत र्‍हाईल’ किती खरं होतं ते! मला हसूच आलं. ते सगळं माझ्याच हातात आहे असं समजून चालली होती ती!

ठरवलेल्या बहूतेक सगळ्या गोष्टी झाल्या. सगळ्यांचं बरं चाललेलं होतं. नातेवाईकांत असायचे तसे राग-लोभ, रूसवे फुगवे होतेच. मी दूर असल्याने या सगळ्यांपासूनही दूर होते.( ते बरंच आहे.) पुन्हा कधी येणं होईल म्हणून हुरहुर वाटत होती. आमच्याकडची भाषा कानात साठवत होते.( येताना रेल्वेत मुक्ता म्हणाली,’ तो बघ पॅटीसवाला येऊ लागलाय’ ’येऊ लागलाय??’ वा! मी बाबांइतकीच खूष झाले.)

या गडबडीत मिलिन्द नसल्याने बरच झालं. आमच्याकडे जावाई म्हणजे त्याच्याच मागे पुढे सगळेजण! मग आमचं आमचं काही बोलणं होत नाही. मिलिन्दलाही आमच्या देशस्थी अगत्याची सवय नसल्याने त्याचीही जरा पंचाईतच होते.

शेवटच्या दिवशी संध्याकाळी मुक्ता-सुहृदला गुरूद्वारा दाखवायला नेलं. ’गुरूता गद्दी’ नंतर नांदेड खूप बदललयं. गुरूद्वारा पण खूप छान केलाय. पर्यटनस्थळच झालंय ते!( सुहृदला तिथली कारंजी आवडली. म्हणाला,’ हे पाण्याचे फटाकेच आहेत’) काका ज्या वाड्यात राहात होते, तो ही या नुतनीकरणात गेला. आम्ही सहज केंव्हाही गुरूद्वारात जात असू. एक रूमाल डोक्याला बांधला की झाले! ’सत श्री अकाल’ ’सच बोले सो निहाल’ हे तर आम्ही इतकेदा ऎकायचो. शिखांची काही भीती वाटायची नाही. ते कधी कधी त्यांचे लांब केस धुवून वाळवत बसलेले असायचे. निरागसच दिसायचे. समाजात दरी पडली , माणसं दृष्टीआड गेली की त्यांची भीती वाटायला लागते, असं होत असेल का?

तिथे बसलो आणि कल्पना केली की हं इथे असेल वाडा. एकदम काकांच्या समोर राहणारी पूनम आठवली. पंजाबी ड्रेस घालायची. एक दोन वर्षांचा मुलगा होता तिला. तरीही आम्ही मुले सुद्धा तिला पूनमच म्हणायचो. एका खोलीत ती आणि तिचा मुलगा राहायचे. नवरा मिलिटरीत होता तिचा. भाकरीच्या पिठाचा गोळाच गरम तव्यावर थापून भाकरी करायची ती! रोज गुरूद्वारात जावून द्रोणभर प्रसादाचा तुपकट शिरा घेऊन यायची. आम्हां सगळ्यांना तो वाटायची. कधी कधी स्वैपाकच करायची नाही. लंगरमधे जावून जेवून यायचे दोघं. आता वाटतं नव‍र्‍याने सोडून दिलं होतं का तिला? म्हणून अशी तीर्थक्षेत्री राहात असेल का ती? कोण जाणे.

घरी आल्यावर मामीला म्हणाले,’ मामी, गुरूद्वारा किती सुंदर दिसतोय! तिकडचा भाग खूप बदललाय. नांदेड वाटतच नाही.’
मामी म्हणाल्या,’ तरी तुम्ही पुढे गेला नाहीत. गंगेला चांगला घाट बांधलाय.लाईट लावलेत. संध्याकाळीसुद्धा छान वाटतं’

गंगा??.... गंगेला मी विसरलेच की!.... माझ्या मनातल्या यादीतही गंगा नव्हती का?....

’ आपला नंदीघाट हो मामी?’
’तो तसाच आहे, आता पूर्वीपेक्षाही वाईट अवस्था आहे.’
मामा, मावशा, काका सगळेच पूर्वी नंदीघाटाजवळ होळीवर राहात. गंगेला जाणे सहज शक्य होते. आता सगळ्यांनीच दूर दूर आपली घरे बांधली आहेत. त्यांचाही गंगेशी रोजचा संबंध राहिलेला नाही. जाता येता क्वचित पुलावरून पाणी (असलं तर) दिसतं तेव्हढंच.

उद्या सकाळी निघायचं आहे. गंगेवर जाता येणार नाही, हे स्वीकारलंच मी. त्या सहज स्वीकाराचंही वाईट वाटत राहिलं.

आता समाधानानं परतता येणारच नव्हतं.
लवकरच पुन्हा इथे येण्याचं ठरवायला हवं.

गंगा आहे माझ्या खूप जवळची. जरी आम्ही सारखं सारखं भेटत नसलो तरी.
ती समजून घेईल.

7 comments:

  1. "गावातल्या मनाची आणि मनातल्या गावाची होणारी भेट मस्त मांडली आहेस.

    अल्लड बागडण्यापासून nostalgic होण्यापर्यंत मजल मारण्याएवढे मोठे आपण कधी बरं झालो हा धक्का मधूनमधून ढुशी देताना दिसतो आहे.


    या सार्‍याचा आपण एक हिस्सा होतो आत्ताआत्ता आणि एवढे लांब कधी/का आलो यांच्यापासून ही तर ’राहिले रे दूर घर माझे’ सारखी बोचणारी भावना.. जिच्याकडे तो सल घेउन जावा अशी गंगेपेक्षा चांगली सखी कोण मिळणार

    ReplyDelete
  2. आई मस्त! आता मलाही गंगेवर जावं वाटत आहे. लवकर जाउ आपण नांदेडला.
    - मुक्ता

    ReplyDelete
  3. gange saarkhach lihileyes-
    nikhal
    pravaahi
    laaghavi
    ani dolyatun ganga vahu ghalnara!! (kinva mi tya pravahat 'pohu' shaklo mhaNun asel..)

    vishwas

    ReplyDelete
  4. एखाद्या गायिकेने आवाज कमवावा आणि घरातच गात बसावं असं तुझं चाललयं.
    तू लेखनाकडे गांभीर्याने पाहायला पाहिजेस.

    मधुकर धर्मापुरीकर

    ReplyDelete
  5. खूप छान. लेखाच्या पुर्वार्धात गंगा भेटते आणि उत्तरार्धात न भेटून आठवणीत रहाते. वाचताना नंतर नंतर गंगेबद्दल काहीच कसं लिहीलेलं नाही म्हणून माझा धीर सुटत चाललेला... शेवटी हायसं वाटलं.

    गावाकडल्या गोष्टी तू बर्‍याच सांगितल्या असल्यास तरी लेख शेवटी गंगेचा आहे.

    ReplyDelete
  6. विद्या,
    खूपच छान वाटले वाचताना! तुम्हा सर्वांची शब्दांवरची (आणि की-बोर्डवरचीही) हुकमत बघीतली की तुमच्याबद्दलचा आदर अधिकच वाढतो!
    मलापण माझे थोडे बालपण गेले त्या तासगावची आठवण झाली. पण मी मात्र तिथे जायचे टाळतो आहे. कारण मला माहीती आहे की माझ्या मनातलं गाव आणि आबांच्या काळातलं गाव यात प्रचंड फरक पडला आहे. मी जिथे वाडे शोधणार तिथे कॉंक्रीट्च्या मोठ्या इमारती दिसणार. जिथे मी ओढे शोधणार तिथे मला सिमेंटच्या पाइपमधे बंदिस्त झालेले नाले दिसणार; जिथे मी बैलगाड्या आणि धुळींनी माखलेले रस्ते शोधणार तिथे मला सुमो आणि स्कॉर्पीओ धुळ उडवताना दिसणार. जिथे मी चिंचेची आणि कवठाची झाडे शोधणार तिथे मला रूंद झालेले रस्ते आणि दुकाने दिसणार. आणि जिथे मी माझ्या ओळखीची माणसे शोधणार तिथे मला (असलेच तर) त्यांचे भिंतींवर लटकवलेले फोटो आणि संशयाच्या, अनोळखी नजरा दिसणार! आपण आपलं बालपणीचं गाव डोळ्यांनी पहातच नाही मुळी; आपण सगळच मनानी पहात असतो आणि मनातली प्रतिमा जुळली नाही की सैरभैर होवून जातो.
    गाव बदललं आहे आणि ते बदलायला हवंच! माझ्या बालपणीचं गाव मात्र माझ्या मनात अजूनही शांतपणे वसलं आहे...एकदम सुरक्षित! त्या गावाचं वय कधीच वाढत नाही.
    - सचिन

    ReplyDelete
  7. मोहल्ले की सबसे निशानी पुरानी,
    वो बुढ़िया जिसे बच्चे कहते थे नानी,
    वो नानी की बातों में परियों का डेरा,
    वो चेहरे की झुर्रियों में सदियों का फेरा,
    भुलाए नहीं भूल सकता है कोई,
    वो छोटी-सी रातें वो लम्बी कहानी।

    कड़ी धूप में अपने घर से निकलना,
    वो चिड़िया, वो बुलबुल, वो तितली पकड़ना,
    वो गुड़िया की शादी पे लड़ना-झगड़ना,
    वो झूलों से गिरना, वो गिर के सँभलना,
    वो पीपल के पल्लों के प्यारे-से तोहफ़े,
    वो टूटी हुई चूड़ियों की निशानी।

    कभी रेत के ऊँचे टीलों पे जाना,
    घरौंदे बनाना,बना के मिटाना,
    वो मासूम चाहत की तस्वीर अपनी,
    वो ख़्वाबों खिलौनों की जागीर अपनी,
    न दुनिया का ग़म था, न रिश्तों का बंधन,
    बड़ी खूबसूरत थी वो ज़िन्दगानी।
    वो कागज़ की कश्ती, वो बारिश का पानी।

    ReplyDelete