Wednesday, February 24, 2010

~~~~~~~~

सुस्वागतम!
आपण आठवणीने आलात
बरं वाटलं

हे आहे कच्चं लिखाण
विरंगुळा म्हणून केलेलं
तुम्ही तुमचा वेळ द्यावा
असं काही यात नसेलही

पण जरा जपून
कागद उडताहेत इतस्तत:
एखादा तुमच्या पायाखाली येईल
त्याचा हळवा कोपरा दुखावेल
एखादा फाटून कायमचा जायबंदी होईल

तेव्हढी काळजी घ्या
बाकी स्वागत आहे
ते तर म्हंटलं मी
सुरवातीलाच

************

हिशोब केला सगळा तर
सारं काही चोख
स्वत:साठी ठेवावे म्हणून
उरतात का हे पुन्हा पाहिले
तर शिल्लक काहीच नाही.
दिवसांचे, तासांचे, मिनिटांचे
देणे द्यायचे ठरलेले
काहीही इकडे तिकडे
करायची सोय नाही.

गणित येणं, हिशोब करणं,
या गोष्टी सोप्या आहेत.
हवं तसं जगायला, शिलकीत उरवणं,
ते मात्र अवघड आहे.

*************

निळा, पिवळा, हिरवा, विटकरी
रंग एकात एक मिसळत गेलो की
शेवटी एक काळसर राखाडी तयार होतो
मग त्यात लाल, गुलाबी, पिवळा
कुठलेही रंग मिसळून पहा
मातकट रंगाच्याच वेगवेगळ्या छटा

आयुष्यानेही जर असा मातकट रंग घेतला असेल
तर त्या रंगछटेतून सुटका नाही.

***************

कुठलीही गोष्ट
मग ती हवीशी असो की नकोशी
जर अदृश्य करायची असेल तर
असं समजायचं की ती अस्तित्वातच नाही.

कधी कधी ती खरोखरच गायब होते,
जणू कधी नव्हतीच.
जर अशी दिसेनाशी झाली नाही तर
....स्वीकारायची.

***********


खाली खोल दरीत गेलेल्या स्वत:ला
पुन्हा वर ओढून आणायचं
अंधार संपून आशेचे किरण दिसेपर्यन्त
त्यातील उब शोषून चालायला लागायचं
तो पुढे पुन्हा एक दरी (की तीच दरी?)
आणि, दरीच्या तळाशी कधी पोचते कळतही नाही
पुन:पुन्हा तोच खेळ
आयुष्य म्हणजे स्वत:ला वर खेचत राहणं,
एव्हढच होऊन बसलयं.

**************

दिवस नुसते जातात
हातातून वाळू निसटून जावी तसे
शहाणपण काहीच चिटकत नाही
तेंव्हा जुनं शहाणपण
नव्याने वापरून वेळ निभावून न्यावी
नवा दिवस काय नव्याने शिकवेल
याची वाट पहावी
काही वेळा जुना दिवस नव्याने
नवा दिवस म्हणून उगवतो

पण एखादा दिवस येतोच ना
अंतर्बाह्य़ बदलून टाकणारा
नवी नजर देणारा
त्याच्या प्रतिक्षेत
दिवस नुसते जाऊ द्यावेत

***************

काळजी

”आई असायचं, म्हणजे काय करायचं?”
”मुलांना तहानलाडू, भूकलाडू बांधून द्यायचे बरोबर.”
” ते कसे करायचे?”
” बाई गं, हे माहीत नाही, तर आई कशी झालीस?
आता तुझी मुलं कसा प्रवास करतील, शिदोरीशिवाय?”

********

निष्काळजीपणामुळे बोट कापलं गेलं
भराभर रक्त यायला लागलं,
कसंबसं हळद लावून,
पट्टी बांधून थांबवलं.

रक्ताचं आणि त्वचेचं
बरं चाललं असेल ना आत?
रक्ताने उसळी मारायची आणि
त्वचेने बांधून घालायचं.

हेच तर नातं नाही त्या दोघांचं??

************

मध्यरात्रीचा रिमझीम पाऊस
माझा एकटीचा
सगळं शहर निद्राधीन
मी ऎकतेय, बघतेय...पाऊस

मध्यरात्रीचा रिमझीम पाऊस
लाजरा, संकोची, अनलंकृत
आशीर्वादासारखा झरणारा
खोलवर रूजणारा

मध्यरात्रीचा रिमझीम पाऊस
निशब्द, आश्वासक, आत्ममग्न
सगळं बोलून झाल्यानंतरच्या
शांततेसारखा

मध्यरात्रीचा रिमझीम पाऊस
गळ्यातल्या आवंढ्यासारखा
डोळ्यातून वाहणार्‍या पाण्यासारखा
मोकळं करणारा

मध्यरात्रीचा रिमझीम पाऊस
माझा एकटीचा

***********

मौन म्हणजे

मौन म्हणजे
गप्प बसणं नाही
तर ठरवून गप्प बसणं.

मौन म्हणजे
बोलायचं नाही, असं नाही
तर सुचवायचं काही काही.

मौन म्हणजे
संवादाला नकार नाही
तर संवादाची पद्धत निराळी

***********

आपण शोधतो वाटा
इकडे, तिकडे
आजूबाजूला
आपल्याला माहीत असतं
या सत्यापर्यंत पोचत नाहीत

सत्य चक्रव्यूहात असतं
त्याबाबतीत आपण सारे असतो
अभिमन्यूसारखे
लढत आत जावू शकणारे
बाहेर पडायचा रस्ता माहीत नसणारे

अशावेळी शेवटी काय?
तेच एक अंतिम सत्य

************


वारा आला
तुझ्या दिशेचा
मंद मंद, अन
गंधभारित
हलका हलका
वळणे घेत
गाण्याची रे
लकेर घेत
पान अन पान
हलले रे
मन माझे
थरथरले रे
सारे सारे
कळले रे

*************

भरतकाम

भरतकामात आपण टाके घालत जायचे
कधी साखळी टाका, तर कधी उलटी टीप
टाके कुठलेही असोत
आपण आपलं पुढे जायचं
वेळोवेळी गाठी माराव्या लागतात,
त्या मनात ठेवायच्या नाहीत.
एखादे वेळी चार टाके उसवून
पुन्हा घालावे लागतात.
कधी सुई, टचकन बोटात जाते
रक्ताचा टपोरा थेंब वरती येतो,
बोटाला फूल आल्यासारखा...
डोळ्यात पाणी येतं आपोआप
ते कुणाला दाखवायचं नाही.
एक दिवस दोरा संपतो....
झालेलं भरतकाम निरखता यावं,
एवढा वेळ मिळेलच असे नाही.
सुई कापडाला टाचून ठेवायची नीट
आणि उठायचं

*************


मी ठरवते, आता रडणं थांबवायचं.
कुणीतरी येतं सहज खपली काढून जातं.

मी ठरवते,आता पुरे, मी बाहेर पडेन
काहीतरी नवं उभं राहतं, माझ्या पायातलं बळच जातं.

मी ठरवते, मी जगायला सुरूवात करीन
कुठलं तरी वादळ येतं, माझी उमेदच संपून जाते.

सत्य काय आहे? मला उभं राहता येत नाहीये, हे?
की मला उभंच राहायचं नाहीये. हे?

************

डोळ्यांवर विश्वास ठेवायचा आणि
आकाश गाठायचं ठरवलं तर
मैलोनमैल चालत गेलो तरी
आकाश भेटणार नाही.

निष्कर्ष काय काढायचे?
दिसतं तसं नसतं?
धरतीची साथ सोडल्याशिवाय
हे शक्य नाही?

तर्क बाजूला ठेवून
मनाने गेलात तर??
बघा,
तिथे कुठलीच मर्यादा नाही.

************


एकटं आकाश

माझ्या लहानपणी ना!
झाडं असायची उंच उंच!
घरं?? बुटकी बुटकी!
झाडांकडे ना!
असं वर, पाहावं लागायचं!
हिरव्या पानांमधून ना!
निळं आकाश दिसायचं!

आता ना!
इमारती झाल्या आहेत उंच उंच!
झाडांकडे ना!
असं खाली, पाहावं लागतं!
आणि वरती पाहिलं ना!
तर नुसतं आकाश दिसतं, एकटंच!

*************
तू म्हणजे

समज, तू म्हणजे
एक पिंपळाचं झाड आहेस.
ते गीतेतलं नाही हं!
’खाली शाखा वरी मूळ’
किंवा तो आळंदीचा
सोन्याचा पिंपळही नाही.

तू आहेस एक साधं
पिंपळाचं झाड ;
फाल्गुनात सगळी पानं
गळाल्यावर,
चैत्रात पुन्हा पालवी धरणारं,
लाल, किरमीजी, पोपटी.
ते बघ, या खिडकीतून दिसतंय,
सळसळणारं.

ते झाड माझं? की तू माझा?
की तूच ते, इथून सतत दिसणारं झाड
होऊन राहिला आहेस, माझ्यासाठी?

************
मनातला तू

माझ्या मनातल्या मनात
एक मनातला तू आहेस
मनातल्या तुला मी
हे सांगते, ते सांगते,
त्यावरच्या तुझ्या प्रतिक्रिया?
त्याही मीच ठरवते.
आपल्या खूप गप्पा मारून होतात.

आपण एकमेकांसमोर आलो
की गप्प होतो.

तुझ्याही मनातल्या मनात
एक मनातली मी असणार

*************


गाण्याची जर असेल साथ

रस्ता लांबच लांब,
सोबतीला कुणी नाही;
चालत जाल आरामात,
गाण्याची जर असेल साथ.

एकाकी एकांतात,
दुखर्‍या आठवणीच्या तळाशी;
बाहेर याल आरामात,
गाण्याची जर असेल साथ.

गर्दी गोंगाटात,
टीपेला पोचलेला स्वर;
ऎकू शकाल आतला आवाज,
गाण्याची जर असेल साथ.

गाण्याची जर असेल साथ,
हवे काय आयुष्यात?
गाण्याची जर असेल साथ.
तरून जाल आरामात.


*************

गाणं

मला भेटलं एक गाणं
वळणावरती थांबलेलं
वरून वरून उत्साही
आतून आतून आनंदी

लागण झाली मला त्याची
होतंच तसं लाघवी ते
वरून वरून तरंगणारं
आतून आतून भिजलेलं

माझं गाणं- भिरभिरं
मजेत फिरणारं
माझं गाणं- खरंखुरं
काळजात बसणारं

माझं गाणं- गोडुलं ते
आत्ता होतं- गेलं कुठे?
मनात माझ्या रूतलेलं
आत्ता होतं- गेलं कुठे?

वळणावरती मीच थांबलेय
येणार्‍याची वाट पहात
वरून वरून फुललेली
आतून आतून गंध जपत

************

मोगर्‍याचे दिवस

पुन्हा आले आहेत
मोगर्‍याचे दिवस
यावेळी त्यांना जमतयं
तीच जादू करायला
आतून आतून
मनं उमलवणारी

पाकळी पाकळी
सुटी होत जाते
गंधाची वलयं
फेर धरू लागतात
आतमधे ही हुरहुर कशाची?
आता कोणाची वाट पाहायची?



***************
एकांताचा डोस

जर लोकांमधे वावरतानाचं नाटक,
यशस्वीरित्या पार पाडायचं असेल;
तर एकांताचा एक डोस
रोज घ्यायला हवा,
तो मिळू शकला नाही
तर लोकांमधे नाटक
उघडं पडण्याची भीती असते.

************


तुला काहीच कसं ग आशादायक दिसत नाही?
तेच तेच लिहू नकोस, खरं वाटायला लागेल.
दुसर्‍या बाजू पाहायच्याच नाहीत
असं ठरवलं आहेस का? पस्तावशील.
वळीवाचा पाऊस पडतो,
कसला मातीचा गंध सुटतो,
तुला कोणीच आमंत्रण देत नाही का?
बाहेर ये, धुऊन जावू देत पावसात सारं
बघ कसं स्वच्छ वाटेल,
मग नवं काही लिही, किंवा लिहू नकोस
लिहिणं हे कौशल्य आहे फक्त!
अनुभवायला जमेल का बघ.


*************

पायातलं त्राण गेलंय़
चालायचंय अजून
मैलोन मैल
तेही हसर्‍या चेहर्‍याने
वेदनेची रेष न दाखवता
ती शक्ती
कुठून आणायची?


*************

भीती

भीती
किती सहजपणे लिहितो
हा शब्द!
पोटात जेंव्हा गोळा येतो ना?
आणि अंगभर पसरत जाते
थंडगार निर्जीव लहर
त्याचा अनुभव घेतला की कळतं
भीती म्हणजे काय असेल ते!
हळूहळू निष्प्राण होत जायचं
आपल्या डॊळ्यांदेखत!
भीती मारत नाही,
अशा अवस्थेतही जिवंत ठेवते
पुढे तिला सोबत घेऊन जगायचं
तिने तुम्हांला सोडावं
इतके भाग्यवान तुम्ही
आहात की नाहीत, माहित नाही!

**************
शेवटी जिवंत!

दलदलीत मी चालले आहे खोल खोल
पायाला कसलाच आधार नाही
तरी त्या भीतीतही मनात आलं
दलदलीत बूडून मरणारे, असे मरतात होय?
चला, हा अनुभव गाठीशी घेऊन मरूया.
....................................
ओ, सॉरी! मला जगायचंय.
आवाजच फुटेना तोंडातून
मी गेले बहुदा पूर्ण आतच
आजूबाजूला नुसता गार चिखल!
...................................
जाग आली तेंव्हा मी जिवंत!
कोणीतरी हात दिला बहुतेक.
.....................................
.....................................
काय ग! किती खराब झालीस?
हसले. (पण जिवंत आहे ना?)

**************


तुला काही सांगायचंय?
तू शब्द शोधतीयेस?
तुला खात्री वाटत नाहीये शब्दांबद्द्ल?
तू साशंक आहेस शब्दांच्या अर्थाबद्द्ल?
(मनातल्या मनात दहावेळा
म्हणून झालंय ना?)
तू अंदाज घेतीयेस?
तू घाबरत नाहीयेस ना?
छे! मला वाटतच होतं,
तू काही बोलणार नाहीस.


*************

माझी मुलगी
सारखी बडबडत असते,
गळ्यात पडते’
कानात ’सिक्रेट’ सांगते,
मला हे घाल,
ते नको सांगते,
जरा दुर्लक्ष झालं तर
रूसून बसते,
अगदी मी होते तशीच!
मला खूप ओळखीची वाटते.
उद्या आणखी शहाणपण शिकवेल,
मग प्रेमात पडेल.....

माझा मुलगा
बडबड करतो,
त्याच्याशी खेळायला लावतो,
हे हवं, ते नको हट्ट करतो,
मी त्याला समजून घ्यायचा
प्रयत्न करते,
हा कुठल्या वाटेने मोठा होईल?
मला तो अनोळखी वाटत राहतो,
त्याच्या बाबांइतका!

****************

”मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा”

कवी असोत की शायर
प्रेम करायचं ते त्याने
करवून घ्यायचं ते तिने
विचारायचं त्याने
होकार द्यायचा तिने
इथेसुद्धा पायर्‍या
ठरलेल्या आहेत
कर्ता तो कायमच
(आणि कर्म तिचं??)
प्रेमबीम करायचं असलं
तरी ती दोन पायर्‍या खालीच

एके दिवशी सकाळी उठल्यावर
साक्षात्कारासारख्ं तुमच्या लक्षात येतं
प्रेम म्हणजे ’हे असं असतं’

*************

प्रेम खरं म्हणजे साक्षात्कारी असतं.
एके दिवशी सकाळी तुम्ही उठता
आणि तुमच्या लक्षात येतं
तुम्ही प्रेमात पडला आहात.
ते तुमच्या हातात नसतंच मुळी
फारतर प्रेमामागे जायचं की नाही
हे तुम्ही ठरवू शकता,नीट विचार करून
आणि मग जाता किंवा जात नाही
त्याने तसा काहीही फरक पडत नाही.

**************


प्रेम म्हणजे
काय असतं?
सुरवातीच्या आकर्षणानंतर
उरतं ते?
पुराचा भर ओसरल्यावर
संथपणे वाहात राहतं ते?
चेहर्‍यावरच्या हललेल्या रेषेवरून
मनातलं ओळखतं ते?
समोरच्यासाठी स्वत:ला
बदलण्याचा प्रयत्न करतं ते?
वाळवंटाच्या दिवसांमधे
चालतं ठेवतं ते?
रोजच्या रगाड्यातही
सारखं आठवतं ते?

ह्याच्यापेक्षाही अधिक काहीतरी
जे सांगता येत नाही ते.

*************

माणसं एकमेकांना वापरतात
खेळणं म्हणून,
दोन माणसांच्या संबंधातली युद्धं
आणि राजकारणं
तर सनातन आहेत.

आपल्याला
शस्त्र आणि चिलखतांशिवाय
भेटणे शक्य होईल का?

*****************
लेखक आणि अभिनेता

लेखक माझ्यापर्यंत पोचतात
त्यांच्या लेखनातून
लेखन ही एक
भूमिका असते का?
लेखकाने घेतलेली?
त्या पलीकडचा लेखक
म्हणजे अज्ञाताचा प्रदेश
त्यामुळे लेखन कसं आहे?
सांगता येईल एकवेळ
लेखक कसा आहे?
कसं सांगणार?

तरीही,
लेखक आणि अभिनेता
यांच्यात फरक
असेलच ना?


*******************

No comments:

Post a Comment