Wednesday, February 24, 2010

..कारमाझफ बंधू..

औरंगाबादला एकदा रात्री टीव्ही बघत बसले होते. काहीतरी चालू होतं, पाहावसं वाटलं, कथेत शिरायचा प्रयत्न करत होते, तेवढ्यात त्यातलं एक पात्र म्हणालं," मैं तो इस गम के काबील नही" माझ्या अंगावर सर्र्कन काटा आला. हे दु:ख लाभण्याची माझी लायकी नाही? दु:खाला केवढं मोठं केलं त्याने! आपल्याला माहीत असतं मी दु:खात, पण दु:खच माझ्या दारी चालत आलं . ” अरे बाबा, असा गरीबाघरी का आलास? कसं स्वागत करू मी तुझं? कसं तुला सोसू? नाही रे माझी तेवढी लायकी!”. देवाकडे दु:ख मागणार्‍या कुंतीएवढे नसणारच आपण. देवा, तू मला नाही आठवलास तरी चालेल, पण दु:ख देऊ नकोस. असंच मागणं मागू आपण. फारतर आमच्या क्षूद्र सुखदु:खात रमण्याची आम्हांला शक्ती दे.
दुसर्‍या दिवशी आवर्जून त्या वेळेला टीव्ही लावला, तेंव्हा कळलं तो ईडीयट कांदबरीतला भाग होता, सलग चार-पाच दिवस दाखवत होते. शेवटचा भाग मी पाहिला, काही कळले नाही. ते वाक्य मात्र रूतून बसलं.ही माझी दस्तयेवस्कीशी (Fyodor Dostoyevsky) पहिली भेट. तेंव्हा मला ईडियट ही त्याची कादंबरी आहे हे माहीतही नव्हतं.
पुढे मी पुण्याला आल्यावर मॅजेस्टीक गप्पांच्या कार्यक्रमाला गेले होते. श्री.ना.पेंडसेंशी गप्पा होत्या. शेवटी जागतीक साहित्यात मराठी कादंबरी कुठे ? वगैरे. पेंडसे दस्तयेवस्कीचं (डोस्टोव्हस्की, डोटोव्हस्की असेही त्याचे वेगवेगळे उच्चार केले जातात.) नुसतं कौतुक करत होते, विशेषत: त्याच्या ’कारमाझफ बंधू’(Karamazov brothers) चं! मला हा लेखक माहीतच नव्हता. मला जागतिक किर्तीचे सगळे लेखक माहित आहेत असं नाही.(मी खूपच कमी, तेही मराठीच वाचते.) आपल्याला चित्रांमधलं काहीच कळत नसलं तरी कान कापून घेणार्‍या व्हॅन गॉग चं नाव तरी माहीत असतं. तसं पहिल्या रांगेतला हा लेखक मला निदान ऎकून माहित असायला हवा होता असे वाटून गेले.
(तो रशियन असल्याने जास्तच वाटलं. ’ग्लासनोस्त’ आणि ’पेरिस्त्रोयीका’ पूर्वीच्या भारत-रशिया मैत्रीच्या काळात रशियन पुस्तकांचे मराठी अनुवाद सहज मिळायचे. इतकी स्वस्त, इतकी देखणी पुस्तके असत ती! त्यामुळे काही रशियन लेखकांची नावे माहीत होती. साशा, आल्योशा, मिखाईल, फ्योदरोविच आणि ग्रेगरोविच वगरैंना अडखळत नव्हते.)
कॉन्टिनेन्टलच्या अनिरूद्ध कुलकर्णींनी दस्तयेवस्कीची काही पुस्तके भाषांतरीत करून घेतली आहेत. त्यातली काही मी आणली,वाचली. पुढे एका प्रदर्शनात मला ’कारमाझफ बंधू’ दिसले, मी घेऊन आले. वाचायला सुरूवात केली, दमले. पानांमागून पाने काही कळायचं नाही, मधेच वीज चमकून जावी तशी वाक्ये. कशीबशी ती कादंबरी मी शेवटापर्यन्त आणली. आता नव्या समजेने ती पुन्हा वाचायला हवी आहे. एकाच सौंदर्यवतीच्या प्रेमात असलेल्या पितापुत्रांची गोष्ट, त्यात वडिलांचा खून होतो, मुलावर खूनाचा आरोप. यानिमित्तने माणसाच्या मूलभूत वृत्तींचं केलेलं विश्लेषण.
पुस्तके वाचणार्‍या माणसांबद्द्ल मला आदर आहे. बाकीची एवढी आकर्षणे असताना जी माणसे पुस्तकांची निवड करतात त्यांचं कौतुक वाटतं.माझ्या मनात मी त्यांना पुढच्या रांगेत बसवते. माझी आवडती पुस्तके वाचणार्‍यांना / ती ज्यांना आवडतात त्यांना तर मानाच्या खुर्च्या असतात. लंपन ज्यांना आवडतो, त्यांच्याशी माझे धागे जुळतात. ’देनीसच्या गोष्टी’ मधला देनीस तर माझा लाडका आहे ( पुढे उर्जा प्रकाशनाने ते डेनिसच्या गोष्टी म्हणून आणलं, पण माझा आपला देनीसच), पाडस, कातकरी विकास की विस्थापन, मुक्काम , आहे मनोहर तरी, अशी काही(अजूनही बरीच) माझी लाडकी पुस्तके आहेत. ती वाचणार्‍या माणसांबद्दलही मला कुतुहल वाटतं.

तर, कारमाझफ बंधू!
मिलिन्द मुंबईत असताना आम्ही ठाण्यात छोटा फ्लॅट घ्यायचा विचार करत होतो. मी तिथे जाईन तेंव्हा घरं बघायचे. रिसेलचाच बघत होतो.एक घर पाहायला तीन मजले चढून गेलो, तेवढं चढल्यावरच लक्षात आलं हा फ्लॅट काही आपण घेणार नाही. गेलो होतोच म्हणून बेल वाजवली. ज्यांचं घर होतं ते अजून तिथे राहातच होते. मी जुजबी प्रश्न विचारले. त्या बाईंना घराबद्द्ल काय काय सांगायचं होतं, मी ऎकत होते. कोणाच्या खाजगी वर्तूळात शिरायचं म्हणजे मिलिन्द्ला अवघडल्यासारखं होतं, मी सहज शिरते. कुठलेही प्रश्न सहज विचारू शकते.
माणसे कशी जगतात? कशी लढतात? कशी जिंकतात? कशी हरतात? काय विचार करतात? हे जाणून घ्यायला मला आवडतं. घरंही घरातल्यांबद्दल खूप काही बोलतात. घराची रचना कशी आहे? कुठल्या गोष्टी म्हणजे घरातल्यांना सोयी वाटतात, कशाला महत्व आहे? घरात बाईचं स्थान काय असेल? याचा एक ढोबळ अंदाज आपण लावू शकतो. मग मी खरंच त्या घरात शिरते. कोणी कुणाबद्द्ल चांगलं बोलत असेल तर तेही आपण ऎकलंच पाहिजे (दुर्मिळ गोष्टी) ते ऎकून माणसांच्या मनात घराला काय स्थान आहे, हे ही कळते. मिलिन्द कंटाळतो हे लक्षात असूनही मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवते. तो स्वैपाकघर पाहायला येतच नाही. बाई बोलत असतात मी त्यांच्या उत्साहाला आवर घालत नाही. त्यांनी दारामागे कसं कपाट केलंय हे मला दाखवलं. चांगलं मोठं आहे म्हणून उघडून दाखवलं. कपाटात एका बाजूला मुलीची खेळणी आणि दुसर्‍या बाजूला पुस्तके. त्यात ’कारमाझफ बंधू’. मी चकीत झाले.
बाहेर आल्यावर मिलिन्दला म्हणाले," अरे, त्यांच्याघरी ’कारमाझफ बंधू’ होतं कपाटात! "
कोण बरं वाचत असेल? त्या बाई? की त्यांचा नवरा? मी त्या दोघांकडेही नीट पाहिलेसुद्धा नाही.
छे! पुढच्यावेळेस कोणाकडे दिसलं तर मी हा प्रश्न नक्की विचारीन.
मागच्या वर्षी मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी गळ्यातलं, कानातलं असं काही बघायला आमच्या मागच्या सोसायटीत गेले होते. ती बाई हौसेने असं काही बाही बनवते. शनिवार सकाळ . मला दार उघडून बसायला सांगितलं. मुलीला न्हाऊ घालत असावी. मी बसले. घर पाहात होते. पुस्तकांच्या कपाटात जी.एं. ची पत्रे. त्या इंग्रजाळलेल्या वातावरणात हा धक्काच होता. मागे वळून पाहिलं तर माझ्या डोक्यामागच्या कपाटात ’कारमाझफ बंधू-१’ ’कारमाझफ बंधू-२’ बसलेले. तिने मला निवडीसाठी डबा आणून दिला, बहुदा मुलीच्या डोळ्यात साबण गेला. मला एकटीला सोडून ती परत गेली. आली तेंव्हा पहिला प्रश्न मी विचारला, ” ही पुस्तके कोण वाचतं तुमच्याकडे?" ती म्हणाली,"माझा नवरा, त्याचीच आहेत सगळी पुस्तके". बुटका, गुट्गुटीत, कुरळ्या केसांचा असा तो नवरा बाहेर आला, टेरेसवर गेला, आतमधे रेंज नसावी, मोबाईललवर बोलत होता. मी त्याच्याकडे नीटच पाहून घेतलं. बाहेर कुठे भेटला तर ओळखता येईल इतकं. फ्रिजवर गच्च भरलेले A,B,C,D , छोट्या वाटीत बांबूची रोपे, मण्यांचे पडदे ( आणि सलग मराठी बोलू न शकणारी मराठी बायको) मला त्याची काळजीच वाटायला लागली. कसा निभावणार हा?
मी काही निवडलं, पैसे दिले, बाहेर पडले.
हा माणूस मराठी भाषांतर का वाचत असेल? कारमाझफ बंधू बद्द्ल त्याला कुतुहल का वाटलं असेल? त्याला जमलं का वाचायला? वाचताना त्याचं मत काय बनलं? तो दमला का? त्याला काय कळलं त्यातलं? त्याने दस्तयेवस्कीचं आणखी काय काय वाचलंय?

छे! आता पुन्हा कोणाकडे हे पुस्तक दिसलं तर मी हॆ प्रश्न नक्की विचारीन.

०००००००००००००००००

2 comments:

  1. खूप छान.

    >> आता पुन्हा कोणाकडे हे पुस्तक दिसलं तर मी हॆ प्रश्न नक्की विचारीन.

    पुस्तक कुठे मिळेल?!! :-)

    ReplyDelete
  2. धन्यवाद!
    ’कॉन्टिनेन्टल’ कडे मिळू शकेल कदाचित!
    नाहीतर माझ्याकडे आहे.

    ReplyDelete