Monday, May 3, 2010

ती वेळ येईल तेव्हा

आमच्याकडे हिरव्या कापडी बांधणीचं ’कठोपनिषद’ होतं. त्यातील नचिकेत आणि यम यांची प्रश्नोत्तरे वाचण्याचा फार पूर्वी एकदा प्रयत्न केला होता. तेव्हा काहीही कळलं नव्हतं, हे आठवतंय. रेड्यावर बसलेल्या यमाचं उगमस्थान ते पुस्तकच आहे की काय असं वाटलेलं. मृत्यूचा शोध घेणार्‍या नचिकेताचा मात्र चेहरा डोळ्यासमोर येत नाही.
००
’विहिर’ पाहिला.( नीट कळायला अजून एकदा पाहायला हवा आहे.) आपापल्या पातळीवर आपणही शोधत असतोच अर्थ. जीवनाचा शोध काय नि मृत्यूचा शोध काय शेवटी एकच आहे.
००
’आपण अमर असल्यासारखे जगतो’ असं म्हणतात, मला ते तितकसं खरं वाटत नाही. मरणाची जाणीव आपल्या आत खोलवर असते. मृत्यूचा घाव फार लवकर स्वीकारतात लोक. त्यातनं बाहेर कदाचित येणार नाहीत लवकर, पण स्वीकार होतो. कारण आत आत आपल्याला ते माहीत असतं.
००
आत्मा अमर, तो शरीरे बदलतो. अशा कल्पनांनी माणसाला खूप आधार दिला असणार. आपण संपणार, काहीच उरणार नाही, पुढे काय?? मुलांबाळांवरचं प्रेम हे त्या तीव्र जीवनेच्छेमुळे असेल काय?
००
औरंगाबादला पुस्तके मासीके चाळताना, एक मला आवडणारी कविता सापडली, ’अकस्मात धनलाभ’ व्हावा तशी! आशय माझ्या लक्षात होता, शब्द विसरल्याची चुट्पूट लागून राहीली होती.

ती वेळ येईल तेव्हा

मंत्र नकोत, फुलं नकोत
भाषणंबिषणं तर नकोतच नको.
तुला तर ठाऊक आहेतच
माझ्या सगळ्या आवडीनिवडी.

शेंदरी पानं गळताना
बागेतून मारलेली चक्कर
शेकोटीच्या उबदार धगीसमोर
मन लावून घातलेले गोधडीचे टाके

मी स्वैपाक करीत असताना
तू मोठ्याने वाचलेल्या कविता
अंधार्‍या नि:शब्द हिमसेकात
एकाच पांघरूणामधली ऊब.

एक तेवढं लक्षात असू दे.
तशी काही चढाओढ आहे असं नाही. पण
तुझ्यावरचं प्रेम आणि शब्दांवरचं प्रेम
यामधलं अधिक तीव्र कुठलं?

तेही ठरवायचं कारण नाही.
काही कोडी न सोडवलेलीच बरी!
ती वेळ येईल तेव्हा
फक्त एक कविता वाच.

--अजिता काळे

योगायोगाने (कदाचित तेव्हा मी मुद्दाम ठेवले असतील, दोन वर्षांनंतरच्या ) त्या खालच्या अंकात अजिताला श्रद्धांजली होती. तिने स्वत:ला मिटवत आणले, संपवले. का ते तिच्या जवळच्यांनांही कळले नाही.
००

1 comment:

  1. किशोर कदमच्या कवितांची आठवण करुन देणार्‍या ओळी आहेत अजिता काळेंच्या. (का ते सांगता येत नाही).

    राहिलेल्यावर ती वेळ येते तेव्हा...

    अलिकडे अलिकडे असे होते.
    आकाशवाणीवरील वार्ता
    कुणाच्या जीवनाचा पूर्णविराम देऊन थांबते.
    पूर्णविराम.
    आदरणीयांचा, स्नेह्यांचा, जिवलगांचा, कुणाकुणाचा.
    मनाची वीज बंद पडते.
    सगळ्या भूतकाळाचा हुंदका एक आवंढा गिळून टाकतो,

    उगाचच आठवते लग्नातली जेवणावळ...
    पानावरुन उठून जाणारी माणसे आणि
    हे संपव, ते संपव, करीत रेंगाळणारी मी....
    तसेच हे काही....

    इंदिरा संत

    ReplyDelete