Monday, May 31, 2010

पैठणीच्या चौकड्यांनो

शांता शेळक्यांची एक ’पैठणी’ नावाची कविता आहे. ही आजीची पैठणी आहे.

फडताळात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शेले, शाली,
त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी.

फडताळ्यातल्या गाठोड्यात पैठणी जपून ठेवलेली आहे. तिथे जे जुने कपडे आहेत ना? त्या प्रत्येकाचीही एक एक गोष्ट आहे. आज कवयित्रीने आपल्याला पैठणीची गोष्ट सांगायला घेतली आहे.
फडताळ, गाठोडे या शब्दांमुळे आपण त्या खूप जुन्या दिवसांमधे जाऊन पोहोचतो. त्यातली ही तळातली गोष्ट आहे. पैठणी कशी आहे त्याचं वर्णन पुढे येतं. पैठण्या अस्सल रेशमाच्या असतात, पूर्वी जरीत सोन्या, चांदीच्या तारा असत. पैठणी हातमागावर विणतात. मागावर विणकाम चालू असलेली पैठणी फार सुंदर दिसते, ते ताणे, बाणे चमकणारे धागे, एका एका धाग्याने, मानवी पद्धतीने पैठणी पुढे सरकत जाते, रोज इंच, दोन इंच. विणून झालेला भाग ज्या निगुतीने गुंडाळून ठेवलेला असतो, बघायला हवा. पैठण्या वर्षानुवर्ष टिकतात. दोन तीन पिढ्यांना वापरता येतात.
हे विणकामाचे वातावरण शांताबाईंना जवळून परीचयाचे होते. त्याबद्दल त्यांनी फार सुंदर लिहून ठेवलंय.
अशी ही पैठणी, आजी तिच्या लग्नात नेसली होती.

माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती
पडली होती सार्‍यांच्या पाया हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास
ओळखीची...अनोळखीची....जाणीव गूढ आहे त्यास.

आजी डोक्यावरून घेतलेला पदर हातात धरून वाकून सगळ्यांच्या पाया पडली होती.... नवी नवरी, नुसते सासरच्यांचे पायच पाहिले असतील, ज्यांना नमस्कार करायला सांगीतला त्यांना करायचा इतकंच. आणि ज्याच्या जोडीने ती सगळ्यांच्या पाया पडली असेल, त्याची तरी तिला ओळख होती का? नाहीच. आजीने त्याला नीट पाहिलेलंसुद्धा नसेल, क्वचित ओझरती डॊळाभेट झाली असेल, भटजींनी सांगीतलं तेंव्हा हाताला हात लावला असेल, सप्तपदीच्या वेळी त्याचा हात धरून मागोमाग चालली असेल. या भांडवलावर अख्खं आयुष्य त्याच्याबरोबर काढायचं. त्याची ओढ वाटली असेल, दुरावाही असणारच. सगळे लग्न विधी पूर्ण होईपर्यन्त तो होताच ना आसपास? त्याचा अंगगंध लागलाच असेल ना पैठणीला?.......ओळखीची...अनोळखीची....जाणीव गूढ आहे त्यास.

धूप-कापूर-उदबत्यांतून जळत गेले किती श्रावण
पैठणीने या जपले तन...एक मन...
खस-हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची, चमेलीची आरास पदराआडून हसली.

पैठणी नेसायची वेळ केंव्हा येणार? सण-वार असले तरच. बरेचसे सण-वार तर श्रावणातच. सण म्हणजे तर किती कामे, बायकांचा पिट्टा पडतो म्हणून श्रावण जळत गेले असं म्हंटलं असेल का? पैठणीने मन जपलं असं का म्हंटलं असेल? आजीला देवाधर्माचं वेड असेल. तो देव तिला देत असणार मन:शांती. कितीही काम पडलं तरी सण-वार नीट केल्याचं समाधान आजीला होत असेल. सगळी आरासही आजी मन लावून करत असणार. कितीतरी हळदी-कुंकाचे समारंभ पैठणी नेसून साजरे झाले असतील.ते सगळे वासही पैठणी धरून आहे.

वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले.

नवी नवरी संसारात मुरत गेली तशी तशी वापरून वापरून पैठणीही मऊ होत गेली. सराव हा शब्द सरसरून अंगावर येतो मग जाणवतं किती खरा आहे तो! पैठणीने आजीचे आयुष्य कसे गेले हे सांगितले. रंग, गंध, स्पर्शाने! ही कविता वाचताना सारखी सारखी मी येऊन थांबते त्या ओळी आहेत...अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले..... या दोन ओळीत बायकांच्या आयुष्याची गोष्ट आली आहे. काय हवं बाईला?? घरदार, मुलंबाळं आणि अहेवपणी मरण. आजीचं पुण्यं भारी असणार!! सगळं मिळालं आजीला.. तिच्या आयुष्याचं सोनं झालं.
इथे आजीची गोष्ट संपली. आणि नातीची सुरू झाली.....

कधी तरी ही पैठणी मी धरते उरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात; कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो, आजीला माझे कुशल सांगा.

पैठणीचा अजूनही आजीशी संपर्क असणार, आजीचं मन गुंतलेलं असेल पैठणीत, नातीचं कुशल पैठणी नक्कीच आजीला सांगू शकेल.
इथे न मागीतलेलं एक मागणं नात पैठणीकडे मागते आहे असं मला वाटतं, ते म्हणजे आजीसारखं अहेवपणी मरण.....

*************

माझी एक मैत्रीणसुद्धा या कवितेत जाऊन बसली आहे. कविता वाचताना ती मला आठवतेच आठवते.
हॉस्टेलवर गप्पांचे विषय कुठून कुठे जातील सांगता येत नाही. एकदा असंच मरणावर बोलणं चाललं होतं. कुणाकुणाचं काय काय... नवर्‍याच्या मांडीवर आणि सगळी नातवंडं अशी समोर दिसत असतानाच मी मरणार, एखादा नातू यायचा असेल दूरून तर मी त्याच्यासाठी थांबेन........ , ...मला तर अपघाती मरण हवं, आत्ता आहे , आत्ता नाही, माझं मलापण कळणार नाही...., मला कळायला हवं सहा महिन्यांनी मरणार, म्हणजे त्या सहा महिन्यात मी हवं तसं जगून घेईन.......असं सगळं चाललेलं.... मग नवर्‍याच्या आधी मरायचं की नंतर? आमचे कुणाचेही नवरे तेव्हा दूरवरही दिसत नव्हते. अशावेळी बोलणं किती सोपं असतं. बहुतेकींचं मत पडलं की नवर्‍याच्या आधी मरायचं. एक मैत्रिण म्हणाली,” तुम्ही सगळ्या स्वार्थी आहात. मी माझ्या नवर्‍यावर खूप प्रेम करीन. शेवटी त्याला कुठलं आजारपण येईल? दुखणं येईल? माहीत नाही. मी त्याचं सगळं करीन. मुलं/ नातवंडं त्याच्याकडे नीट बघतील न बघतील, त्यापेक्षा मीच बघेन. असा माझ्या मांडीवर माझा नवरा जाईल. आणि मग मी मरायला मोकळी .” त्यादिवशी ती माझी मैत्रिण मला जरा जास्त कळली.
**************

No comments:

Post a Comment