Friday, May 7, 2010

राशोमोन पाहिल्यानंतर

’राशोमोन’ पाहिला. एकाच घटनेकडे चौघांच्या नजरेतून पाहिलेलं. राशोमोन (मला आधी राशोमान वाटलेलं) दरवाजा आणि पडणारा पाऊस. कुरोसावाचा ग्रेट सिनेमा. एव्हढंच सिनेमा बघण्यापूर्वी माहीत होतं. पाडळकरांचं पुस्तक हेतुत: वाचलं नव्हतं.
”ग्रेट!!” पहिल्या पाहण्यानंतरची प्रतिक्रिया! काही गोष्टी भिडल्या, काही आवडल्या, काही कळल्या काही नाही कळल्या.
पाडळकरांचं पुस्तक वाचताना त्यातल्या महत्त्वाच्या काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या होत्या हे कळल्यावर छान वाटलं. (म्हणूनच हे लिहायचं धाडस करत आहे. या टप्प्यावर जे कळलंय ते एवढं आणि असं आहे.)
पुन्हा एकदा सिनेमा पाहिला.
१) माणसं देहबोलीतून जे सांगतात, त्यातले बारकावे समजून घ्यायचे असतील तर आधी दहा जपानी सिनेमे पाहून मग पुन्हा ’राशोमोन’ पाहायचा, असा प्रयत्न करून पाहायला पाहिजे.
२) पहिल्यांदा पाहताना सारखं लक्ष सबटायटल्सकडेच जात होतं, ते वाचत पात्रांकडे पाहायचं, एक कसरतच.तरी संवाद खूप कमी आहेत. (त्यानिमित्ताने लक्षात आलं, मला पहिलं आकर्षण शब्दांचंच आहे की काय? काहीही समजून घ्यायचं तर ते शब्दांद्वारे आणि ते बाहेर पडणार तेही शब्दांच्या माध्यमातूनच. माझ्या मनात जाण्याचा मी एक शब्दांचा महामार्ग करून ठेवलाय, बाकी पायवाटा?? )
३) पहिल्यांदा पाहताना ’आत पाऊस- बाहेर पाऊस’ असा मस्त योग होता. सिनेमात शिरायला मदत झाली. पाऊस पडत असताना आपणही स्वीकारासाठी अनुकूल असतो.

**************

राशोमान जवळच्या जंगलातून एक सामुराई आणि त्याची सुंदर बायको जात असतात, वाटेत डाकू त्याला फसवून त्याच्या बायकोचा गैरफायदा घेतो, नंतर त्याचा खून होतो. खून कोणी केला? की आत्महत्या? हे तिघे आणि लाकूडतोड्या यांच्या नजरेतून हे प्रसंग दाखवले आहेत.
छायाचित्रण अफाट आहे. माणसाच्या मनाचं प्रतिक असणारं ते जंगल इतकं प्रभावीपणे चित्रित केलं आहे. छायाप्रकाशाचा खेळ, ऊनसावलीची जाळी असणारी ती जमीन, विशेषत: पानांमधून दिसणारा सूर्य. राशोमोन गेटवर सतत कोसळणारा तो पाऊस. तो पाऊस आणि ते जंगल ही दोन महत्त्वाची पात्रे आहेत.
संगीताबद्द्ल मला काहीच लिहीता येणार नाही, भिडणारं आहे.
अभिनय लाउड वाटला. कदाचित बारावे शतक अधोरेखीत करण्यासाठी असेल, त्यामानाने राशोमोन गेटवरील पात्रांचा अभिनय सहज होता. घटना सांगताना ती अशी जरा भडक होत जाते म्हणूनही असेल. ताजोमारूचा अनागरपणा ठसवण्यासाठी असेल. बरचसं काम शब्दांशिवाय झालं. तिघांच्याही कहाण्या सांगितल्या जात होत्या, त्याप्रमाणे पात्रांचा अभिनय बदलत होता.
मला महत्त्वाचं वाटलं ते दिग्दर्शक चित्रपटाद्वारे काय सांगू पाहतोय ते! (मला काय कळलं ते! मुख्यत: कथेच्या अंगाने)

******
(या भागातील विवेचनासाठी विजय पाडळकरांनी पुस्तकात (गर्द रानात... भर दुपारी) दिलेल्या पटकथेचा आधार घेतला आहे.)
आणखी एक महत्त्वाचं पुस्तकातलं--कुरोसावा म्हणतो,’माझ्यावर दस्तयेवस्कीइतका कुठल्याच लेखकाचा प्रभाव नाही.’

कुरोसावा या सिनेमाच्या मध्यवर्ती कल्पनेबद्द्ल म्हणतो,’यातील माणसे, आपण खरे जसे आहो, त्यापेक्षा अधिक चांगले आहो ह्या असत्याची साथ घेतल्याशिवाय जगू शकत नाहीत." ’कारण माणसाचे हृदय हीच अनाकलनीय गोष्ट आहे.’

यात एक खून होतो, त्यात वि्शेष काही नाही, कितीतरी खून होतात. डाकू ताजोमारू एका परस्रीची अभिलाषा धरतो, तिचा गैरफायदा घेतो, यातही नवीन काही नाही. विशेष हे आहे की प्रत्येक जण ही गोष्ट सांगताना आपली प्रतिमा कशी उजळवू पाहतो.
ताजोमारू सामुराईला फसवून त्या स्त्रीचा गैरफायदा घेतो, इथपर्यन्त गोष्ट सारखी आहे. फरक त्यापुढे सुरू होतो.
(ताजोमारू=डाकू, सामुराई=नवरा, दोन्ही वापरले गेले आहेत.)
कोर्टासमोर तिघांनी सांगीतलेली घटना---

ताजोमारू----
एका वार्‍याच्या झुळूकीमुळे हे झाले. त्यामूळे तो जागा झाला, स्त्रीच्या तोंडावरचा पडदा उडाला, तिचे अप्रतिम सौंदर्य त्याच्या दृष्टीक्षेपात आले, तो मोहात पडला, शक्यतो नवर्‍याला न मारता तिला मिळवायची असे त्याने ठरवले. नवर्‍याला फसवून जंगलाच्या आत नेऊन बांधून ठेवले. ती स्त्री जंगलात खोलवर आली नव्हती. तो तिच्याकडे आला, तिच्या नवर्‍याला साप चावला असे सांगीतले. त्यावर ताजोमारू म्हणतो,’ गोठलेल्या डोळ्यांनी ती माझ्याकडे पाहात होती. अचानक गंभीर झालेल्या मुलासारखी ती मला वाटली. तिला असे पाहून मला त्या माणसाविषयी मत्सर वाटला.” त्यामुळे त्याने नवर्‍याची काय अवस्था केली आहे, ते तिला दाखवायचे ठरवले.
हा क्षण मला महत्त्वाचा वाटतो. नवर्‍याच्या डॊळ्यांदेखत जर काही घडलं नसतं तर गोष्ट बदलली असती.
आणखी एक, हे तिघेही मानवी मनाची ओळख असणारे आहेत. शब्दांपेक्षाही चेहर्‍यावरचे हावभाव, त्याचे त्यांनी लावलेले अर्थ कथेत महत्त्वाचे आहेत. ( तिघेही असे मानवी मनाचे तज्ञ कसे?--एक शंका)
तो तिला नवर्‍यासमोर घेऊन आला. ते दृष्य पाहून ती आपल्या कमरेचा खंजीर काढते, डाकूला मारायला धावते, त्याला तिचे कौतुक वाटते. झतापट होते. शेवटी ती दमते कोसळते. सुरुवातीला प्रतिकार करते नंतर त्याच्या आवेगाला साथ देऊ लागते.
नंतर डाकू ताजोमारु जाऊ लागतो. ती थांबवते, दोघांसमोर मानहानी सहन करू शकणार नाही म्हणते, दोघांपैकी जो दुसर्‍याला मारील त्याच्याबरोबर जाईन म्हणते. डाकू नवर्‍याच्या दोर्‍या सोडतो. नवरा शूरपणे लढतो, शेवटी डाकू त्याला मारतो. ती पळून गेलेली असते.

स्त्री-----
तिचा गैरफायदा घेतल्यावर डाकू पळून जातो. ती रडत नवर्‍याजवळ जाते. त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागते. रडता रडता तिचं लक्ष त्याच्या डोळ्यांकडे जातं. ती सांगते,” त्याच्या डोळ्यात दु:ख नव्हतं, संताप नव्हता. होता फक्त माझ्याबद्दल तिरस्कार.”
ती खंजीराने नवर्‍याच्या दोर्‍या कापते, त्याला म्हणते,” वाटल्यास मला शिक्षा करा, मारून टाका, पण असे पाहू नका.” ती खंजीर घेऊन नवर्‍याजवळ जात असते. कोर्टात ती सांगते,”त्या क्षणी मला चक्कर आली. जागी झाले तेव्हा खंजीर छातीत खुपसलेला होता. नंतर मी एका तळ्यात स्वत:ला संपवायचा प्रयत्न केला.” (हे सगळं ती रडत रडत सांगत असते.)

नवरा---
हा मेलेला नवरा एका माध्यमाच्या मार्फत बोलता होतो,
माझ्या बायकोवर अत्याचार केल्यावर डाकू तिच्याजवळ बसून तिचे सांत्वन करू लागला. ”जे काही घडले आहे त्यानंतर तिचा नवरा तिचा स्वीकार करणार नाही”, त्याने तिच्या प्रेमात पडूनच हे कृत्य केले. तिने डाकूबरोबर का जावू नये?
माझी बायको त्याच्याकडे हळूवार नजरेने पाहात होती. माझ्या आयुष्यात इतकी सुंदर मी तिला कधीच पाहिले नव्हते.
माझी बायको डाकूला म्हणाली,’ मला तुझ्याबरोबर घेऊन चल.” त्यापुढे ती म्हणाली,’त्याला ठार कर” याहून क्रूर कुठले शब्द असतील काय? तो डाकूसुद्धा क्षणकाल स्तंभित झाला.
डाकूने तिला खाली पाडले, तिच्या पाठीवर पाय ठेवून म्हणाला,’ या स्त्रीचे मी काय करू? सोडून देऊ की ठार मारू? तू फक्त सांग--” या शब्दांसाठी मी डाकूला जवळ्जवळ माफच केले.
डाकू सामुराईकडे येऊ लागतो, तेवढ्यात ती पळून जाते.
खूप वेळाने डाकू एकटाच परत येतो. सामुराईच्या दोर्‍या कापतो. जातो.
सामुराई खंजीर आपल्या छातीत खूपसून घेतो.

लाकूडतोड्याने ही घटना पाहिलेली असते, कोर्टात तो प्रेत पाहिल्याचे सांगतो. पण नंतर नागरीक आणि उपदेशकासमोर तो त्याने काय पाहिलं ते सांगतो.
ताजोमारू स्त्रीजवळ बसून तिला विनवीत असतो, लग्न करण्यासाठी गळ घालत असतो. तू म्हणशील तर डाकूचे आयुष्यही सोडून देईन, प्रामाणिकपणे कष्टाची कामे करीन. शेवटी वैतागून ’तू हो म्हण, नाहीतर तुला ठार करीन.’
ती स्त्री म्हणते,” मी काय सांगू? एक स्त्री अशा प्रश्नाचे उत्तर देऊ शकते?”
तिला जमिनीत रूतलेला खंजीर दिसतो, तो घेऊन ती धावत नवर्‍याजवळ जाते, त्याच्या दोर्‍या कापते.
ताजोमारू म्हणतो,”अच्छा, आम्ही दोघांनी याचा निकाल लावावा अशी इच्छा आहे तर?”
पण तेवढ्यात नवरा म्हणतो, ’अशा स्त्रीसाठी मी आयुष्य पणाला लावणार नाही. पाहिजे तर ही तुला घेऊन टाक. माझा घोडा माझ्यासाठी हिच्यापेक्षा किमती आहे.’
स्त्रीला धक्का बसतो. ताजोमारू जायला निघतो. ती त्याला म्ह्णते,’थांब’ ताजोमारु म्हणतो, ”माझ्यामागे येऊ नकोस.” जमिनीवर पडून ती रडू लागते. नवरा म्हणतो,’ कितीही रडलीस तरी आमच्यापैकी कुणीही तुला स्वीकारणार नाही.’ असे बोललेले ताजोमारूला आवडत नाही,” तिच्याशी असा वागू नकोस. हे पुरूषाला शोभत नाही. ती दुर्बल स्त्री आहे, रडेल नाहीतर काय करेल?’ हे ऎकल्यावर स्त्री एकदम मोठमोठ्याने हसायला लागते. ( तिचं हसणं भयंकर आहे) ती म्हणते, ”मी दुर्बल? तुम्ही दोघे दुबळे आहात.(नवर्‍याकडे वळत) तू जर खरा पुरूष असशील तर या डाकूला ठार का करत नाहीस? तू खरा पुरूषच नाहीस. म्हणून मी रडते आहे. या नाटकाने मला थकवून टाकले आहे. (ताजोमारूकडे वळून) ताजोमारू तरी कुणी वेगळा असेल असे मला वाटले होते. (त्याच्या चेहर्‍यावर थुंकते.) पण नाही. तोही पुरूष नाही. तोही माझ्या या नवर्‍यासारखाच!”
”ध्यानात ठेवा. स्त्री फक्त खर्‍या पुरूषावरच प्रेम करते. आणि जेव्हा ती प्रेम करते वेड्यासारखे करते. इतर सारे काही विसरून. स्त्रीला फक्त ताकद वश करू शकते. तलवारीची ताकद-”
डाकू आणि सामुराई द्वंद्वासाठी तयार होतात............. शेवटी ताजोमारू सामुराईची हत्या करतो.
स्त्री पळून जाते. डाकू पळतो पण ती त्याला सापडत नाही.

****************

तिघांनी आपापल्या कहाण्या का बदलल्या असतील? ----- कारणे (मला वाटणारी)

लाकूडतोड्याने आपली कहाणी बदलली आहे. शिवाय किमती खंजीर उचलून नेला आहे. तरीही गोष्टीत तो सहभागी नाही, निरीक्षक आहे म्हणून त्याचीच कहाणी जास्तीत जास्त सत्याच्या जवळ जाणारी आहे असं म्हणता येईल. हे लक्षात घेऊन त्या तिघांनी आपापल्या कहाण्या कशा बदलल्या? आणि का बदलल्या? हे पाहण्याचा प्रयत्न करू या.
ताजोमारू ---- आपण ज्या स्त्रीच्या मोहात पडलो ती सुंदर तर आहेच, सुरूवातीला प्रतिकार करते, ती वेगळी आहे, मी काही कुणाही सामान्य स्त्रीच्या मागे लागलो नाही हे त्याला सांगायचे आहे. तो तिला शोधत नाही कारण शेवटी ती सामान्य स्त्रीसारखी पळून गेली.

प्रत्येकजण (त्यात आपण सगळेही आलोच.) विचारले जावू शकणारे संभाव्य प्रश्न लक्षात घेऊन, आपल्या वागण्यातून त्याची उत्तरे मिळतील याची काळजी घेत कहाणी सांगतो. त्यात स्वप्रतिमा जपणे आणि स्वसमर्थन दोन्ही आहे.
अर्थात स्वप्रतिमाही समाजाच्या कुठल्या स्तरातला तो आहे, त्याच्या + समाजाच्या नैतिक अनैतिकतेच्या कल्पना काय आहेत? यावर अवलंबून असते.
ताजोमारू स्त्रीला लग्नासाठी गळ घालतो, हे सांगत नाही, त्यासाठी डाकूगिरी सोडायला तयार झाल्याचे सांगत नाही. त्याने पुन्हा आपली अस्सल डाकूची प्रतिमा उभी केली आहे. उलट सामुराई शौर्याने लढल्याचे सांगतो. ह्याचं शौर्य सिद्ध व्हायचं असेल तर समोरचाही तोलामोलाचा नको का?

सामुराई--- डाकू तिला विनवतो ऎवजी हा सांगतो नाहीतरी या प्रसंगानंतर नवरा तुला स्वीकारणार नाहीच म्हणून तू माझ्याबरोबर चल, असे डाकू म्हणाला. आणि डाकूबरोबर जाताना बायको नवर्‍याला ठार मार असे सांगते. डाकूही अशा स्त्रीला स्वीकारत नाही. इथे बायकोची प्रतिमा वाईट करून तो स्वत:ची सुधारतो आहे.
इतका वेळ अभिमानाने तो बायकोला मिरवीत आणत असतो पण तिच्यावरच्या बलात्कारानंतर तिची किंमत शून्य होते. आजवर बायकोचे सौंदर्य ही त्याच्यासाठी मानाची गोष्ट असेल पण तिचे पावित्र्य संपल्यावर ती नकोशी झाली.
डाकूकडे ती पाहात होती तेंव्हा ती किती सुंदर दिसत होती, हे तो सांगतो..... हे त्याचे स्वसमर्थन चाललेय. अशा बायकोसाठी काय लढायचे?..... स्वत:चं नाकर्तेपण लपवतोय. ज्याची बायको अशी वागते तो काय करणार? म्हणून तो स्वत:च्या छातीत खंजीर खुपसून घेतो.

स्त्री---सांगते तिला नवर्‍याचे केवळ तिरस्काराने, थंडपणे बघणे असह्य होते. नाहीतरी त्याची बघ्याचीच भूमिका असते. ती द्वंद्वाला उद्युक्त केल्याबद्दल काही बोलतच नाही. इथे ती स्वत:ची प्रतिमा खाली करून नवर्‍याची सावरते आहे. ती नवर्‍याला खलनायक बनवत नाही, नवरा मात्र सगळा दोष तिच्या माथी मारतो आहे. ती असे करून फार त्याग करतेय असं नाही, हे करून ती स्वत: सहानुभुती मिळवू पाहते आहे. कारण सरळ सरळ नवर्‍याला दोष देणारीला सहानुभूती मिळणार नाही हे तिला माहीत आहे.
नवरा अनावधानाने स्वत:कडून मारला गेल्याचं ती सांगते, हे ही तसं पाहता खरंच आहे, शेवटी तो तिच्यामुळेच मेला ना? तरी त्याला मारण्याचा गुन्हा ती स्वत:वर का ओढवून घेत असावी?

*************

एकाच घटनेकडे पाहण्याचे तिघांचे दृष्टीकोन वेगवेगळे आहेत. प्रत्येकासाठीचं सत्य वेगवेगळं आहे. कोणीही गुन्हा लपवत नाही, प्रत्येकजण आपापल्या परीने खरंच सांगतो आहे.
आपण आपापल्या परीने वाढत असतो, बरे-वाईटाच्या आपापल्या व्याख्या असतात ( जरी त्याच्यांवर समाजाचा प्रभाव असतो.) आपले अनुभव असतात, आपली कुवत असते, हे सगळं घेऊनच आपण सत्याला भिडतो. ह्या संचितामुळे जे आपल्याला सत्याचं आकलन होईल ते आपलं सत्य. खास आपलं! ते प्रत्येकाचं वेगवेगळं असणारंच ना?
जे सत्य असतं, त्याची नॊंद करताना आपण त्याचे आपल्या परीने अर्थ लावून नोंद्वून घेतो, नोंदवून घेतलंय ते सत्य नाही. ते सत्याचं आकलन आहे.
मग निरपेक्ष सत्याचं काय? तसं काही असणं शक्य आहे का? तसं नसेल तर आधाराची फळीच काढून घेतल्यासारखं होईल.
सत्य आणि असत्य यात तरी काही फरक करता येईल की नाही? आपल्याला कळलेलं सत्य जाणीवपूर्वक बदलणे म्हणजे असत्य असं म्हणता येईल का? मग सत्य आणि असत्य यात महत्त्वाची गोष्ट जाणीव/ जाणीवपूर्वकता? मग अजाणतेपणीचं सगळंच आकलन सत्य? छे! हे काही गणित नाही. असेल तर मला कळलेलं नाही किंवा गृहीतकात काहीतरी चूक असेल.
आपलं सत्य म्हणजे आपल्या अनुभवांनी डागाळलेलं सत्य??
म्हणजे आपण वागणार एक आणि दुसरे त्याचा अर्थ लावून ठरवणार आपण काय/ कसं वागलोय ते! मग आपण सुद्धा समोरचा काय अर्थ लावेल याचा अंदाज बांधत आपल्या सत्यापर्यन्त त्याला पोचवता येईल असं वागायचं. सत्यावर संस्कार करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे सत्य आणि असत्य यांची सरमिसळ होतेय का?
असं करून आपण जे सत्य बनवतो ते आपल्या अहंकाराला सुखावणारं, आपली प्रतिमा सुधारणारं असं असतं का? म्हणजे स्वार्थी सत्य?? कुणाला ऎहिकाची ओढ कुणाला पारलौकिकाची. पण स्वार्थ कुणाला चुकला नाही.
मग निखळ सत्याला जाणून घेण्याची काही वाट आहे की नाही?? की तसं काही अस्तित्वातच नसतं?

सिनेमा पडद्यावर चालू असतो तोपर्यन्त काही नाही पण नंतर तो मनात घुसतो....... आपण विचार करायला लागतो, ह्या व्यक्तिरेखा अशा का वागल्या असतील?...... पुढे विचार करतो, माणसे अशी का वागतात?....... मग लक्षात येतं, आपणही माणूसच आहोत.....ते थेट आपल्याजवळच येऊन पोचतं....प्रत्येक वेळी खंजीरच खुपसावा लागतो असं नाही.................

*************

3 comments:

  1. मस्त लिहिलेस.

    मी हा सिनेमा तिन वेळा बघितला. पहिल्यांदा सब टायटल्स बघायची का दृष्य बघायच हा गोंधळ उडतो. पण परत बघताना मात्र सब टायटल्स कडे बघायची गरजच वाटली नाही. यातली पात्र त्यांच्या देहबोलीतून आपल्याला जे सांगू पहातात ते ग्रेट आहे. पण मला यातला सगळ्यात आवडलेला प्रसंग आहे तो शेवटचा. वाटसरु रडत असलेल्या बाळाचे कपडे पळवतो व त्याचे समर्थन करतो व लाकुडतोड्याने चोरलेल्या खंजिराचा उल्लेख करुन तो म्हणतो सगळे जगच स्वार्थी आहे. हे ऐकुन बौध भिक्षुचा मानवतेवरचा विश्वास उडतो. पण लाकुडतोड्या जेव्हा बाळाची मागणी करतो आणि घरातील ६ मुलां बरोबर आणखी एकाला संभाळणे फारसे जड नाही हे सांगतो तेव्हा बौध भिक्षु त्याला ते बाळ देतो आणि म्हणतो यामुळे मानवतेवरचा माझा विश्वास आणखी दृढ झाला.

    जग हे कितिही स्वार्थी असल तरी प्रत्येकात कोठेतरी चांगुलपणा दडलेला आहे हा या सिनेमातून दिलेला संदेश मला फार महत्वाचा वाटतो.

    पण हा सिनेमा बघितल्या नंतर माझी अवस्था तहानलेल्या माणसा सारखी झाली. कितीही पाणी पिलं तरी तहान भागत नाही अशी. पहिल्यांदा तर मी हा सिनेमा लागोपाट दोनदा बघितला. पण दरवेळी बघताना काहितरी नविन गवसत. त्यामुळे आता काय बघायच राहिलय अस मनात म्हणुनही परत बघावासा वाटतो.

    या सिनेमातले अकिराने वापरलेले कॅमेर्‍याचे angles तर फारच अप्रतिम आहेत.

    ReplyDelete
  2. धन्यवाद! कौस्तुभ,
    चांगली भर घातलीस.

    ReplyDelete
  3. घडलेल्या घटनेचे अर्थ लावताना, तो/ती असेच का वागले असतील याबद्दल तर्क बांधताना, हेतू चिकटवताना, आपल्या सार्यांेनाच हे कधीपासून ठाउक आहे की ही interpretations व्यक्ती प्रमाणे बदलतात(च).
    मग कुरोसावाच्या राशोमोन चे वेगळेपण कशात आहे ?

    माझ्या समजुतीप्रमाणे, राशोमोन चे वेगळेपण यात आहे की तो या अन्वय-मतभेदाच्या खूप अलिकडे येतो आणि आपल्याला सांगतो की मुळात नक्की काय घडलं याबद्दलच्या versionsच भिन्न असू शकतात, असतात.

    ReplyDelete